"माणुसकी हाच धर्म'
मुसलमान आणि ख्रिस्ती लोकांचा वर्षातील पवित्र मानला जाणारा उपवासकाळ सद्या चालू आहे.
ख्रिस्ती लोकांचे कॅलेंडर ग्रेगरियन म्हणजे सौरवर्षीय आहे तर मुस्लीम धर्मियांचे कॅलेंडर चांद्रवर्षीय असते.
त्यामुळे ख्रिस्तीजनांचा लेन्ट सिझन किंवा उपवासकाळ नेहेमीच फेब्रुवारी अखेरीस किंवा मार्चच्या सुरुवातीला सुरु होतो आणि सुमारे चाळीस दिवसानंतर एप्रिलमध्ये गुड फ्रायडे या सणाने संपतो.
तर मुस्लिमांचा रमझान महिना ग्रेगरियन कॅलेंडरमध्ये वर्षभर कधीही असू शकतो.
कुठल्याही धर्मात उपवासाच्या पवित्र काळात जे करावयाचे असते ते या काळात मुसलमान आणि ख्रिस्ती लोकसुद्धा करतात.
उपवास धरतात, प्रार्थना करतात आणि त्यांनी याकाळात दानधर्म आणि इतर सत्कार्य करावे अशीही अपेक्षा असते.
तर पुण्यातील रास्ता पेठेत राहणाऱ्या जावेद खान आणि मायकल साठे या दोघांनी त्यांच्या भिन्न धर्मांच्या या चालू पवित्र काळात एक वेगळ्या प्रकारचे पुण्यकर्म केले.
त्यांच्या इमारतीशेजारी असलेल्या सुधीर किंकळे ( वय ७० वर्षे) नावाच्या माणसाचे निधन झाले, तेव्हा त्यांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी एका बहिणीशिवाय इतर कुणीही हजर नव्हते असे त्यांना कळाले.
अशावेळी जावेद खान आणि मायकल साठे यांनी पुढाकार घेऊन वैकुंठ स्मशानभूमीत या अंत्यसंस्कारात भाग घेतला.
म्हणजे अंत्यसंस्कारांत कुटुंबिय किंवा इतर जवळचे लोक जे करतात ते सगळे केले.
तीन भिन्न धर्मीय व्यक्ती, मात्र "माणुसकी हाच खरा धर्म " आहे असे मायकल साठे यांनी यासंदर्भात त्यांच्या फेसबुकवर शेअर केलेल्या व्हिडिओ आणि पोस्टमध्ये म्हटले आहे.
अंत्यसंस्काराचे आणि पार्थिवाचे फोटो शक्यतो छापू नयेत असे आमच्या इंग्रजी दैनिकांत संकेत होते. त्यानुसार असे फोटो इथे देत नाही.
जावेद खान आणि मायकल साठे यांना त्यांच्या या सत्कार्यासाठी निश्चितच दुआ मिळेल.
Comments
Post a Comment