या फोटोला कुठले राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय पारितोषिक मिळायला हवे ?
बुलडोझर झोपड्या पाडत असताना, घराला आग लागली असताना एक मुलगी छातीला पुस्तके कवटाळून तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करते आहे असा दाखवणारा एक व्हिडीओ आणि फोटो आहे.
इंडियन एक्सप्रेसने आज पहिल्या पानावर हा फोटो दिला आहे.
हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील आंबेडकर नगर जिल्ह्यातील आहे.
त्यात जलालपूरमध्ये घरे जमीनदोस्त केली जात असताना एका मुलीला तिच्या झोपडीतून पळताना, तिच्या पुस्तकांना घट्ट धरून पळताना दाखवण्यात आले आहे.
पाडापाडी चालू असताना पोलीस आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या गराड्यात ही घाबरलेली मुलगी अत्यंत वेगाने धावते आहे, असे दिसते.
बुलडोझरच्या मदतीने घरे पडली जाताना शेजारच्या घरात आग लागली तशी छोटीशी अनन्या आपल्या झोपडीत पुन्हा पळाली आणि तिथून आपल्या सर्वांत मौल्यवान वस्तू - इंग्रजी , हिंदी भाषा पुस्तके आणि गिनती पुस्तक (गणित) - घेऊन ती आपल्या आईकडे आली.
" त्या आगीत माझी पुस्तके जळून जातील अन् मग माझ्या शाळेकडून मला दुसरी पुस्तके मिळणार नाहीत असे मला वाटले "असे अनन्याने म्हटले आहे.
तिची ही सगळी धावपळ कुणीतरी टिपते आहे , देशातील आणि परदेशांतील अनेक लोक नंतर ही घटना पाहतील याची तिला कल्पनाही नव्हती.
ही आठ वर्षाची धावणारी मुलगी अनन्या यादव आहे. पहिल्या इयत्तेत शिकते आहे.
तिला शिकून `IAS अधिकारी व्हायचे आहे असे एक्सप्रेसच्या बातमीत म्हटले आहे.
माझ्याकडे जे मराठी वृत्तपत्र येते त्यात ही बातमी दडपून टाकली आहे,
छोटीशी सिंगल कॉलम आहे.
हा व्हिडीओ उपलब्ध आहे, तुम्ही आवर्जून पाहायला हवा.
कुठल्याही सहृदय व्यक्तींच्या डोळ्यात लगेच पाणी तरळेल असे हे दृश्य आहे.
ज्याने कुणी तो व्हिडीओ काढला त्याला सलाम करायला हवा.
तर या व्हिडिओची काल सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली.
"एक व्हायरल व्हिडिओ आहे ज्यामध्ये एका पाडलेल्या घराबाहेर एक लहान मुलगी दिसते. अशा दृश्यांमुळे सर्वांनाच खूप त्रास होतो," असे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश उज्ज्वल भुयान म्हणाले आहेत.
न्यायालयाने अधिकाऱ्यांवर कडक टीका केली आणि बुलडोझर कारवाईला "अमानवीय" म्हटले आणि न्यायालयात धाव घेणाऱ्या प्रत्येक घरमालकाला १० लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले.
अशा बुलडोझर कारवायांपासून स्वतःचे, आपल्या पुस्तकांचे रक्षण करु पाहणाऱ्या छोट्या अनन्यासारखी कितीतरी मुलेमुली असतील.
Comments
Post a Comment