गोवा, दमण आणि दीव

पणजीतल्या धेम्पे कॉलेजात बारावीसाठी प्रवेश घेतल्यापासून दमण आणि दीव हे चिमुकले प्रदेश माझ्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहेत. गंमत म्हणजे हे दोन छोटे प्रदेश मी कधी पाहिलेही नव्हते वा भारताच्या नकाशात त्यांचे स्थान नक्की कुठे आहे हेसुद्धा मला माहिती नव्हते. तरीसुद्धा या प्रदेशांशी मी जोडला गेलो आहे. याचे एक मुख्य कारण म्हणजे गोव्याबरोबरच दमण आणि दीव ह्या दोन प्रदेशांचा माझ्या उच्च माध्यमिक शालान्त परीक्षेच्या प्रमाणपत्रात उल्लेख आहे. १९७५ पासून गोव्यातील दहावी आणि बारावीच्या त्याकाळच्या गोवा, दमण आणि दीव माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतलया जायच्या.
ह्या दोन प्रदेशांशी माझा संबंध जोडला जाण्याचे एकमात्र कारण गोव्याप्रमाणेच दमण आणि दीव हे दोन्ही प्रदेश पोर्तुगीजांच्या भारतातील वसाहतींचा सुमारे ४५० वर्षे एक भाग होते. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुंनी ११ डिसेंबर १९६१ रोजी लष्करी कारवाई करून गोवा, दमण आणि दीव हे प्रदेश पोर्तुगीजांच्या सत्तेतून मुक्त केले. गोवा महाराष्ट्राच्या दक्षिणेला सागरी किनाऱ्यावर तर दमण आणि दीव गोव्यापासून शेकडो किलोमीटर दूर गुजरातच्या सागरी किनाऱ्यापाशी आहेत. मात्र पोर्तुगीजांच्या वसाहतीच्या सामायिक ऐतिहासिक वारशामुळे भारतातील त्यांच्या विलीनीकरणानंतर गोवा, दमण आणि दीव यांचा एकत्रित नवा केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आला. एक केंद्रशासित प्रदेश म्हणून. हे तिन्ही प्रदेश १९८७ पर्यंत म्हणजे गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळेपर्यंत एकत्र राहिले.
पोर्तुगीज इंडियाचा भाग म्हणून अनेक शतके हे तीन प्रदेश एकत्र होते तरी खरे पाहता गोव्यातील लोकांचे दमण आणि दीवमधील लोकांशी सामाजिक, सांस्कृतिक आणि भाषिकदृष्ट्या कोणतेही अजिबात साम्य नाही. भौगोलिकदृष्ट्या एकमेकांपासून खूप अंतरावर हे प्रदेश असल्याने यात काही आश्चर्य वाटायला नको. बारावीच्या निकालाच्या माझ्या प्रमाणपत्रात दमण आणि दीव हे दोन प्रदेश कायमचे चिकटले.
त्यानंतर पणजीला धेम्पे कॉलेजात मी पदवी शिक्षण पूर्ण केलं आणि लगेचच 'द नवहिंद टाइम्स' ह्या इंग्रजी दैनिकात बातमीदार म्हणून १९८१ मध्ये मी रुजू झालो. मात्र मग दमण आणि दीव या दूरच्या प्रदेशांनी तेव्हाही माझा पिच्छा काही सोडला नाही. एक बातमीदार म्हणून हे दोन्ही प्रदेश गोव्यातील माझ्या पत्रकारितेच्या कामकाजाचे एक अविभाज्य घटकच बनले. त्याचे कारण म्हणजे कुठलीही बातमी लिहिताना या केंद्रशासित प्रदेशाचा उल्लेख करायचा झाल्यास गोवा, दमण आणि दीव असाच उल्लेख करणे अनिवार्य होते.
आमच्या दैनिकातील सर्व बातम्यांत प्रदेशाचा असा पूर्ण उल्लेख बंधनकारक होता. त्यामुळे आम्ही लिहित असू, "गोवा, दमण आणि दीवचे मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी आज अशी घोषणा केली...", "गोवा, दमण आणि दीवचे शिक्षण संचालक यांनी सांगितले...". ''गोवा, दमण आणि दीवचे नायब राज्यपाल डॉ. गोपाळ सिंग यांनी आपल्या भाषणात ...''' ''गोवा, दमण आणि दीवचे पोलिस महानिरीक्षक म्हणून अमुकअमुक यांनी आज सुत्रे घेतली..''
एक छोटा केंद्रशासित प्रदेश असूनही गोवा, दमण आणि दीवला आपली स्वतःची ३० आमदारसंख्या असलेली विधानसभा होती. एक छोटे पाच-सदस्यीय मंत्रिमंडळ होते. दयानंद बांदोडकर हे या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री. त्यानंतर शशिकला काकोडकर आणि प्रतापसिंह राणे हे या केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री होते. या मुख्यमंत्र्यांकडे सर्व प्रमुख खाती म्हणजे गृह, अर्थ, खाण किंवा गोव्यात सर्वांना हवेहवेसे वाटणारे पर्यटन खाते असायचे. ह्या तीस आमदारांमध्ये दमण आणि दीवचा प्रत्येकी एक आमदार होता. ह्या छोट्या केंद्रशासित प्रदेशाच्या १९७० च्या दशकातील सत्तास्पर्धेत दमण आणि दीवचे दोन आमदार महत्वाची भूमिका बजावित असत, त्यांची विधानसभेच्या उपसभापतीपदावर दोनदा निवडही झाली होती. १९८० दशकाच्या सुरवातीला दीवचे आमदार नारायण फुग्रो हे गोवा, दमण आणि दीवच्या विधानसभेचे सभापतीही होते.
मध्ययुगीन काळातील पोर्तुगीजांच्या पालघर जिल्ह्यातील वसई येथील सत्ता होती. पोर्तुगीजांच्या या सत्तेचा वसई या छोट्याशा प्रदेशावर आजही धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परिणाम दिसून येतो. दमण मधील ख्रिस्ती समाजाच्या बाबतीतसुद्धा हा प्रभाव आजही दिसून येतो. दीव वर हा पोर्तुगीज प्रभाव कितपत आहे हे मात्र मी खात्रीने सांगू शकत नाही.
जेसुईट किंवा येशूसंघीय धर्मगुरुंनी पणजीत येथे चालविलेल्या प्री-नोव्हिशिएटमध्ये धर्मगुरु होण्यासाठी दाखल झालेले आम्ही विसपंचवीस उमेदवार पाच वर्षे उच्च माध्यमिक व पदवी शिक्षण घेत होतो. मिरामार समुद्रकिनाऱ्यापाशी असलेल्या आमच्या प्री-नोव्हिशिएटमध्ये मूळ दमणचा रहिवासी असलेला फ्रान्सिस हा मेस्ता किंवा आचारी होता. तो फक्त पोर्तुगीज, कोंकणी आणि थोडीफार हिंदी बोलायचा. संध्याकाळी कामातून मोकळा झाल्यावर फेणी घेतल्यावर तो आपल्या कर्कश्य आवाजात पोर्तुगीज गाणी गायचा. आमच्या जेवणासाठी तो रोज बनवत असलेल्या बिफच्या विविध पाककलाकृती, केक आणि त्याची जीवनशैली दमण येथील त्याकाळातही कायम असलेल्या प्रभावाचे प्रतिक होते. मेस्ता फ्रान्सिसमुळेच पोर्तुगीज भाषेत दमण ह्या शब्दाचा उच्चार ‘दमॉव’ असा करतात, पोर्तुगालची राजधानी लिस्बन चा पोर्तुगीजमध्ये उच्चार 'लिसबॉव' असा करतात हे मला कळाले होते. या मेस्ताकडून मी 'ओब्रिगाद' (थॅक्स) असे अनेक पोर्तुगीज शब्द शिकलो. तरीदेखील दमण माझ्यासाठी अजूनही एक अनोळखी प्रदेशच होता.
१९८० च्या दशकातील नवहिंद टाइम्सचा कॅम्पस रिपोर्टर म्हणून मी गोवा, दमण आणि दीव शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेतील गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेत असे. त्यावेळी मी भारतात फक्त गोव्यातच आढळणाऱ्या भाडोत्री मोटारसायकल पायलटबरोबर गूणवत्ताधारक विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी गोव्यातील तिसवाडी, बार्देस, सालसेट, काणकोण वगैरे तालुक्यांत खेडोपाडी मी दूरवर जात असे. मला आठवतंय कि गोवा, दमण आणि दीव शिक्षण मंडळाच्या बारा वर्षांच्या पूर्ण कारकिर्दीत एकदाही दमण किंवा दीवमधील एकही विद्यार्थी दहावी अथवा बारावीच्या परीक्षेत पहिल्या दहा विद्यार्थ्यांत आला नाही. दमण अथवा दीव मधील एक जरी विद्यार्थी या गुणवत्ता यादीत आला असता तर आम्ही पत्रकारांनी गुणवत्ता यादीत त्यांचे फक्त नांव आम्ही छापले असते, त्यांचे फोटो किंवा मुलाखती छापणे १९७० आणि १९८०च्या दशकांत अशक्यच होते.
क्राईम आणि कोर्ट बिट्स हाताळताना गुन्हेगारी आणि न्यायालयीन बातम्यांचे वार्तांकन करतानासुद्धा दमण आणि दीव माझ्या अवतीभोवती होतेच. मी कधीही गुन्हे किंवा न्यायालयीन बातम्यांसाठी पणजी ज़िल्हा व सत्र न्यायालयात गेलो नाही. गोवा, दमण आणि दीवच्या सचिवालयाजवळच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात मात्र मला रोज जावे लागत असे. ह्या खंडपीठात नेहमीच आता प्रसिद्ध असलेल्या 'कॅफेपोसा'शी संबंधित केसेस आणि हेबियस कॉर्पस रिट अर्ज असत. अशा 'कॅफेपोसा'शी संबंधित केसेस आणि हेबियस कॉर्पस रिट अर्ज हे हमखास दमण आणि दीव मधील गुन्हेगारी जगताशी किंवा तस्करी संबंधात अटक केलेल्यांचे असत. हेबियस कॉर्पस रिट किंवा देहोपस्थिती याचिका अर्ज हे जर एखाद्या व्यक्तीला सबळ कारण नसताना गजाआड केले असेल तर दाखल केले जातात. (अलिकडेच एका आत्महत्येच्या प्रकरणात आरोपी असलेल्या 'रिपब्लिक' या वृत्तवाहिनीच्या मालकाला म्हणजे अर्णब गोस्वामींना अटक केल्यानंतर हा हेबियस कॉर्पस रिट अर्ज दाखल करण्यात आला होता.)
त्याकाळी सोन्याच्या आयातीला बंदी होती. त्यामुळे सोन्याची तस्करी करणाऱ्या लोकांसाठी दमण आणि दीव येथील निर्मनुष्य समुद्रकिनारे तस्करीसाठी खूपच सुरक्षित बेट असायचे. दमणचा सुकूर नारायण बाखिया आणि मुंबईचे वरदराजन मुदलियार व हाजी मस्तान हे त्याकाळी कुख्यात तस्कर होते. यांपैकी सुकूर नारायण बाखिया याचे गोव्याच्या कडेकोट बंदोबस्त असलेल्या फोर्ट अक्वाद मध्यवर्ती तुरुंगातून केलेले पलायन १९८३ च्या सुरुवातीला संपूर्ण भारतभर गाजले होते.
१९८० च्या दशकात गोवा, दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेशाला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा ह्या मागणीने जोर धरला. ह्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनांच्या आणि निदर्शनांच्या बातम्या मी दिल्याचं मला आठवतंय. काही राजकिय पुढारी, सामाजिक कार्यकर्ते आणि कोंकणी लेखकानीं ह्या आंदोलनांना पाठिंबा दिला होता. आमच्या नवहिंद टाइम्स'चा एकमेव स्पर्धक असलेल्या ‘हेरल्ड’ या इंग्रजी दैनिकानेदेखील स्वतंत्र राज्याची ही मागणी उचलून धरली होती. इतर मुद्द्याप्रमाणेच या मागणीबाबत मध्यममार्गी असणाऱ्या आमच्या 'नवहिंद टाइम्सने नेहेमीप्रमाणे तठस्थ भूमिका ठेवली होती. कोकणी भाषेला गोव्याची अधिकृत भाषा म्हणून मान्यता मिळावी यासाठी आंदोलन सुरु तेंव्हा गोव्यातील मराठी 'गोमंतक'चे संपादक नारायण आठवले हे मराठी भाषेचे चे पाठीराखे होते तर इंग्रजी हेराल्ड दैनिकाचे संपादक राजन नारायण हे कोंकणीचे पाठीराखे होते.
मला आजही कुतूहल वाटतंय कि दमण आणि दीव या प्रदेशांची स्वतंत्र राज्याविषयी वा भाषेसंदर्भांत काय भूमिका होती. गोव्याला शेवटी १९८७ साली स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला. गोव्याची दमण आणि दीव या प्रदेशांशी कायम असलेली अनेक शतकांची नाळ यावेळी तोडण्यात आली आणि दमण आणि दीव ला एका स्वतंत्र केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला.
याचा एक परिणाम म्हणून गोव्याचा भौगोलिक किंवा राजकीय संदर्भ देताना आम्हा पत्रकारांना आणि इतरांनाही गोव्याबरोबर दमण आणि दीवचे नाव घेण्याची गरज राहिली नाही. स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाल्यावर गोव्याने दमण आणि दीवशी असलेले ४०० वर्षांचे संबंध तोडले. परंतु ह्या घटनेबाबत दोन्ही बाजुंपैकी एकानेही अश्रू ढाळले नाहीत. मला तर आता असे वाटते कि आपल्या दूरच्या भावंडांबरोबरचे म्हणजे गोव्याबरोबरचे आपले नातेसंबंध तोडताना दमण आणि दीवच्या लोकांना उलट आनंदच झाला असेल. ह्या दोन्ही प्रदेशांना गोवा,दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेशात कधीच मानाचे स्थान मिळाले नव्हते. .
जानेवारी २०२० मध्ये दमण आणि दीवची विशेष ओळखसुद्धा संपुष्टात आली. कारण हे दोन प्रदेश आता नव्याने स्थापन केलेल्या दादरा, नगर हवेली, दमण आणि दीव ह्या केंद्रशासित प्रदेशाचे भाग बनविले गेले आहेत. आता दमण हे ह्या केंद्रशासित प्रदेशाचे नवीन मुख्यालय बनवले आहे.
मागच्या आठवड्यात मी दमणला भेट दिली तेंव्हा भूतकाळातील म्हणजे तीसचाळीस वर्षांपूर्वीच्या या सर्व घटना, ऐतिहासिक वारसा आणि प्रसंगांचा पट माझ्या नजरेसमोरच उभा राहिला. हो, नानी दमणच्या ग्रामीण भागातील अरुंद रस्ते, नारळाची झाडे आणि आजही पोर्तुगीज भाषा बोलणाऱ्या ख्रिश्चन लोकांची घरे माझ्या गोव्याच्या वास्तव्यातील आठवणी जागवत होते. दमण मधील ख्रिश्चन समाजाची संख्या झपाट्याने कमी होत आहे कारण त्यांच्यापैकी बरेच लोक पाश्चात्य देशात स्थायिक झालेले आहेत, अजूनही पोर्तुगीज पासपोर्ट असल्याने आजही युरोप आणि इतर देश त्यांना खुणावत आहेत.
नानी दमणच्या या अरुंद आणि जवळ-जवळ निर्मनुष्य रस्त्यांवरून फिरताना मी गतकाळातील आठवणींत हरवलो. त्या संध्याकाळी गर्दीने भरलेल्या दमण बीचवर उभा राहून अरबी समुद्राकडे बघत भान हरपून उभा राहिलो. चार दशकांपासून माझ्या अस्तित्वाचा एक हिस्सा असलेल्या या प्रदेशात मी पहिल्यादाच पाऊल ठेवत होतो. याकाळातील वरील सर्व घटना माझ्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या होत्या.
गोवा, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशाच्या आठवणी बाळगणाऱ्या वा आत्मियता असणाऱ्या कुणाही व्यक्तीला मी दमणच्या या दौऱ्यात भेटलो नाही. नव्या पिढीला तर दमणचा गोव्याशी असलेल्या सामायिक ऐतिहासिक आणि राजकिय वारशाशी काही देणेघेणेही नाही. हा वारसा मी मात्र विसरु शकत नाही.
दमणच्या समुद्रकिनाऱ्यावरील त्या स्वच्छ, सफेद वाळूवर माझ्या उमटलेल्या पाऊलखुणांकडे वारंवार मागे वळून पाहत मी रस्त्यावर आलो.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Shakuntala Paranjape : Crusade of a lifetime

Dnyanodaya monthly enters 175th year

Fr. Rudolf Schoch. A Jesuit Looks back in satisfaction