- Get link
- X
- Other Apps
सोनिया गांधी या जन्माने रोमन कॅथोलिक आहेत. जसे मूळचे कर्नाटकातील मंगळूरचे असलेले समाजवादी आणि साहजिकच नास्तिक प्रवृत्तीचे असलेले नेते जॉर्ज फर्नांडिस जन्माने रोमन कॅथोलिक होते.
मी स्वतः कामिल पारखे मराठवाड्याचे आणि त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील श्रीरामपूरचे नाते सांगणारा पण जन्माने रोमन कॅथोलिक आहे.'जन्माने' असा मी उल्लेख मुद्दाम केला आहेकाही गोष्टी निवडण्याचा आपल्याला अधिकार नसतो,उदाहरणार्थ आपले लिंग, आपले आईबाप, आपल्या चामडीचा रंग, आपली मातृभाषा, आपला मायदेश (किंवा पितृदेश) आणि अर्थात केवळ भारतात (आणि भारतीय संस्कृतीत) आपली जात.
यापैकी फक्त काही गोष्टी नंतर बदलण्याचे स्वातंत्र्य आहे.
धर्म, देश, नागरिकत्व अशा काही मोजक्या बाबी.
काही जन्माधिष्टित बाबी मात्र अटळ असतात.
नारायण गणेश तथा नानासाहेब गोरे, एस. एम. जोशी, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, कॉम्रेड बी. टी. रणदिवे, रेव्हरंड नारायण वामन टिळक, रेव्हरंड नारायण शेषाद्री परळीकर ही सर्व मंडळी जन्माने ब्राह्मण.
त्यांनी विविध कारणांनी जानवे फेकले तरी त्यांचे जन्मतः मिळालेले ब्राह्मणत्व त्यांना कर्णाच्या कवचकुंडलीप्रमाणे चिकटून राहिले.
तीच बाब अस्पृश्य वर्गांत जन्मलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची.
हयातभर आणि मृत्यूनंतर आजतागायत त्यांच्या जाती गळून पडलेल्या नाहीत.
सोनिया गांधी यांचीही हीच तऱ्हा.
वर वर्णन केलेल्या मंडळीप्रमाणे सोनिया गांधी यांना याबाबत अगदी कटू अनुभव आलेला असणार.
त्यांचे जन्माने परदेशी असणे, रोमन कॅथोलिक असणे हे त्यांना पासपोर्टवरील नोंद बदलून आणि धर्माचा कलम रिकामा ठेवून कधीच बदलता आलेले नाही.
भविष्यातसुद्धा हे शक्य नाही.
शरद पवार, पूर्णो ए. संगमा, तारिक अन्वर, सुषमा स्वराज आणि उमा भारती यांनी त्यांच्या विदेशीत्वावर हल्ला चढवला तो यामुळेच.
रोमन कॅथोलिक म्हणजे इटलीची राजधानी रोम याचा यात काडीमात्र संबंध नाही.
रोमन कॅथोलिक म्हणजे कॅथोलिक चर्चच्या विसांहून अधिक असलेल्या राईट्सपैकी किंवा उपासना विधींपैकी एक असलेल्या उपासना पध्दतीतील एक.
राईटस म्हणजे प्रार्थना आणि विधी करण्याची वेगळी सांस्कृतिक पध्दत. त्यात धूप जाळणे, पुरोहिताची वेशभूषा, भाषा वगैरे अनेक अंग येतात.
उदाहरणार्थ, केरळमधील मल्याळम भाषक सिरियन कॅथोलिक लोक.
या सर्व कॅथोलिक उपासनापद्धतीचे एकमेव समान वैशिष्ट्य म्हणजे सेंट पिटरचे उत्तराधिकारी म्हणून रोममधील पोप यांचे अधिकार ते सर्व जण मानतात.
रशिया वगैरे ऑर्थोडॉक्स ख्रिस्ती देशांत ख्रिस्ती पुरोहित मंडळी लांब दाढीमिशा राखतात , डोईवर मोठी काळी मुकुटवजा टोपी परिधान करतात. पूर्ण पेहेराव काळा असतो.
युरोपात आणि इतरत्र पेहेराव अगदीं वेगळा असतो. रशिया आणि इतर देशांत गेल्यावर मला हे जाणवले.
खूप गुंतागुंतीचे हे प्रकरण आहे, त्यात मी मुद्दाम खोलात जात नाही. त्याची गरजही नाही.
सोनिया गांधी यांचे पुस्तक मी मागितले आहे. सामान्यतः अशी पुस्तके महानगरांत दोनतीन दिवसांत घरपोच मिळतात.
मला वीस नोव्हेंबरपर्यंत मिळेल असे सांगण्यात आले आहे.
तर सोनिया गांधी यांनी आपण स्वतः जन्माने रोमन कॅथोलिक असल्याबद्दल आणि हे रोमन कॅथोलिकत्व त्यागण्याबद्दल किंवा निधर्मी/ नास्तिक होण्याबद्दल लिहिले आहे का याबद्दल मला जाम उत्सुकता आहे.
याबद्दल उत्सुकता वाढवणारा एक प्रसंग आठवतो.
मदर तेरेसा यांच्या अंत्यसंस्काराचा प्रसंग होता.
इंद्र कुमार गुजराल यांच्या नेतृत्वाखालील केंद्रात त्यावेळी जनता दलाचे सरकार होते. सोनिया गांधी यांनी तोपर्यंत राजकारणात प्रवेश केलेला नव्हता.
कोलकात्यात होणाऱ्या या अंत्यविधीला सोनिया गांधी मात्र जातीने हजर होत्या.
मदर तेरेसा यांच्याशी नेहरु -गांधी घराण्याचे घनिष्ट संबंध होते. त्याशिवाय सोनिया यांचे रोमन कॅथोलिक कनेक्शन..
अंत्यविधीनिमित्त मिस्साविधी होता. दूरदर्शनवर लाईव्ह कव्हरेज होते.
मिस्सादरम्यान कम्युनियन वाटपाच्या वेळी फादर कम्युनियन घेऊन रोमन कॅथोलिक असलेल्या सोनिया गांधी यांच्याकडे वळाले होते.
कम्युनियन हे फक्त श्रद्धावंत लोकांनाच दिले जाते.
माझी उत्सुकता त्यावेळी कमालीची ताणली होती.
तेव्हा सोनिया यांनी लांबूनच नकारार्थी हात हलवत नकार दर्शवला होता हे मला आजही आठवते.
त्याआधी काही वर्षांपूर्वी राजीव गांधी पंतप्रधान असताना म्हणजे १९८६ साली पोप जॉन पॉल दुसरे यांनी दहा दिवसांचा भारत दौरा केला होता.
या भेटीदरम्यान पोप महाशयांनी पंतप्रधान राजीव गांधी आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती.
पोप जॉन पॉल यांनी या भेटीच्या वेळी राहुल आणि प्रियंका यांचा बाप्तिस्मा केला अशा वावड्या उडवण्यात आल्या होत्या.
या कुजबुजीचे स्त्रोत अर्थातच नेहमीचेच होते.
सोनिया गांधी या इटली या कम्युनिस्ट राजवटीत जन्मल्या. मात्र रोमन कॅथोलिक म्हणून जन्मानंतर काही दिवसांतच त्यांचा बाप्तिस्मा झालेला असणार.
हे रोमन कॅथोलिकत्व किंवा धार्मिकता कशी आणि कधी गळाली हे जाणून घेण्याची माझी उत्सुकता आहे.
कुठल्याही आत्मचरित्रांत गाळलेल्या अनेक जागा असतात याची अर्थात मला जाणीव आहे.
सोनिया गांधी यांचे हे आत्मचरित्र अशा येनकेन कारणांनी गाजत आहे.
Camil Parkhe November 15, 2026
Babasaheb Ambedkar
Belonging A Journey of Love
Camil Parkhe
George Fernandes
Mother Teresa
Narayan Sheshadri
Reverend Tilak
Roman Catholic
Sharad Pawar
Shrirampur
Sonia Gandhi
Syrian Catholic
- Get link
- X
- Other Apps

Comments
Post a Comment