एखादी नवी वसाहत केवळ एका विशिष्ट समुदायासाठी वसवली जावी याची संपूर्ण जगात फार कमी उदाहरणे असतील. मराठवाड्यात जालना शहरापासून अगदी जवळ असलेल्या एका ठिकाणी असा प्रयोग मागील शतकात पहिले देशस्थ ब्राह्मण ख्रिस्ती मिशनरी असलेल्या नारायणराव शेषाद्री परळीकर यांनी केला.
बेथेल असे बायबलशी संबंधित नाम धारण करणारी ही वसाहत आजही आहे.
बेथेल या नावाची पूर्वपीठिका महत्त्वाची आहे.
बायबलमधील जुन्या करारात आधीच वर्णिल्याप्रमाणे दाविदाच्या घराण्यातील कुटुंबात बेथेलहेम या गावात येशू या मसिहाचा जन्म झाला होता.
मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भुषवलेल्या माजी न्यायाधीश नरेंद्र चपळगावकर यांनी खूप कष्ट घेऊन नारायणराव शेषाद्री परळीकर यांच्या बेथेल गावाची जन्मकहाणी विस्तृतपणे लिहिली आहे.
महान योगदान करणाऱ्या केवळ काही ख्रिस्ती व्यक्तींच्या चरित्रांवर असलेल्या नरेंद्र चपळगावकर यांच्या ' सावलीचा शोध' (मौज प्रकाशन २०१२) या पुस्तकात आगळ्यावेगळ्या बेथेल वसाहतीची कथा सांगण्यात आली आहे.
एका विशिष्ट समुदायाची वसाहत बनवण्याचा असा प्रयोग आधुनिक काळात दुसऱ्या महायुद्धानंतर मध्य आशियात करण्यात आला.
इस्राएलच्या निर्मितीच्या या प्रयोगाची झळ तेव्हापासून आजतागायत संपूर्ण जगाला सोसावी लागते आहे.
बेथेल वसाहतीची जन्मकथा आणि त्यानंतरची व्यथा न्यायमूर्ती चपळगावकर यांनी अत्यंत समर्पक शब्दांत मांडली आहे.
नारायणराव शेषाद्री परळीकर (१८२३- १८९१) यांच्यावर इंग्रजी भाषेत बरेच लिहिले गेले आहे. मात्र शेषाद्री परळीकर यांचे एकही चरित्र मराठीत अद्याप लिहिले गेलेले नाही.
बेथेल गावाची कथा तर महाराष्ट्रातल्या ख्रिस्ती जगतालासुद्धा ठाऊक नाही. इतरांबद्दल बोलायलाच नको.
मुंबईत स्कॉटिश मिशनरी जॉन विल्सन यांनी अव्वल इंग्रजी अमदानीत सुरु केलेल्या पहिल्यावहिल्या आधुनिक शाळांतील अनेक पारशी आणि ब्राह्मण विद्यार्थी ख्रिस्ती धर्माकडे आकृष्ट झाली.
त्यापैकी नारायणराव शेषाद्री परळीकर हे एक प्रमुख नाव.
मूळचे परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेडचे असलेल्या देशस्थ ब्राह्मण शेषाद्री कुटुंबाने बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ येथे स्थलांतर केले होते. गोविंद शेषाद्री यांची नारायण आणि श्रीपती ही दोन मुले.
त्याकाळात स्कॉटिश मिशनरी जॉन स्टीव्हन्सन, जॉन विल्सन, जेम्स मिचेल आणि जॉन मरे मिचेल यांनी मुंबई-पुण्यात चालवलेल्या मराठी आणि इंग्रजी शाळांचा बोलबाला संपूर्ण महाराष्ट्रात पसरत होता.
आपली मुलांनाही या आधुनिक शाळांत शिक्षण घ्यावे असे गोविंद शेषाद्री यांना वाटले. त्यानुसार त्यांचा थोरला मुलगा नारायण १८३६ च्या सुमारास पुण्यात स्कॉटिश मिशनच्या शाळेत दाखल झाला. त्यावेळी तो तेरा वर्षांचा होता.
स्कॉटिश मिशनरी रेव्हरंड जॉन स्टीव्हन्सन यांनी सुरू केलेल्या शाळेत नारायण शिकला, पुढे याच शाळेत जोतिबा फुले शिकले,
पुण्यात स्कॉटिश शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षणासाठी नारायणने मुंबईत जॉन विल्सन यांच्या शाळेत १८३८ला प्रवेश घेतला होता. शिक्षण पूर्ण केल्यानंतर नारायणची स्कॉटिश शाळेतच शिक्षक म्हणून दहा रुपये पगारावर १८४२ साली नेमणूक झाली.
दरम्यानच्या काळात श्रीपतीसुद्धा मुंबईत शिक्षणासाठी आला होता आणि स्कॉटिश शाळेतच शिकत होता.
येथेच ते धर्मातराचे वादग्रस्त प्रकरण घडले.
नारायण आणि त्याचे लहान बंधू श्रीपती यांच्या होऊ घातलेल्या खिस्ती धर्मांतरामुळे त्याकाळात मोठे वादळ निर्माण झाले होते आणि कोर्टबाजीही झाली होती.
नारायण शेषाद्री यांचा १३ सप्टेंबर १८४३ रोजी विधिवत बाप्तिस्मा झाला आणि समाजात मोठी खळबळ माजली.
छोट्या श्रीपतीचे धर्मांतर रोखण्यासाठी न्यायालयाकडे धाव घेण्यात आली.
न्यायालयीन हस्तक्षेपामुळे सज्ञान नसलेल्ल्या बारा वर्षांच्या श्रीपती शेषाद्री याचे ख्रिस्ती धर्मांतर रोखणे शक्य झाले. ख्रिस्ती मिशन हाऊसमध्ये शिजवलेले अन्न खाल्ल्यामुळे श्रीपती मात्र धर्मबहिकृत ठरला.
'दर्पण' हे मराठीतले पहिले वृत्तपत्र १८३२ साली सुरु करणाऱ्या बाळशास्त्री जांभेकर यांनी श्रीपतीला पुन्हा हिंदू धर्मात आणण्यासाठी अथक प्रयत्न केले. यात जांभेकर यशस्वीही ठरले.
मात्र या प्रमादाबद्दल बाळशास्त्री जांभेकरांना खूप हाल सोसावे लागले.
शुद्धीकरण न झालेल्या श्रीपतीच्या संपर्कात आल्यामुळे जांभेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध ग्रामण्य चालवले गेले आणि शिक्षा म्हणून त्यांना प्रायश्चितसुद्धा घ्यावे लागले.
विशेष म्हणजे जांभेकरांना श्रीपतीच्या शुद्धीकरणासाठी साहाय्य करणाऱ्या `प्रभाकर' वृत्तपत्राचे संपादक भाऊ महाजन यांनी प्रायश्चित घेण्यास साफ नकार दिला होता.
''तुमच्यामध्ये शास्त्राधारे प्रायश्चित देणारा सत्पात्र ब्राह्मण कोण आहे?'' असा सवाल त्यांनी केल्यावर त्यांना प्रश्न करणारे सगळे जण चिडीचूप झाले होते.
श्रीपतीचे थोरले भाऊ नारायणराव शेषाद्री मात्र पुढे एक महत्त्वाचे ख्रिस्ती मिशनरी ठरले.
धनंजय कीर यांनी जोतिबा फुले यांच्या `महात्मा जोतीराव फुले' या चरित्रात शेषाद्री बंधू धर्मांतर प्रकरणाबाबत भरपूर लिहिले आहे.
ब्रिटिशांनी हैदराबादच्या निजामाच्या खर्चाने जालना आणि इतर परिसरांत तैनाती फौज उभी केली होती. चर्च ऑफ स्कॉटलंडने रेव्हरंड गणपतराव नवलकर यांची जालना येथे १८५९ ते १८६१ या काळात नेमणूक केली होती,
रेव्हरंड नारायणराव शेषाद्री यांची जालना येथे १८६६ साली बदली झाली.
काही मोजकेच अपवाद वगळता महाराष्ट्रातील बहुतेक ख्रिस्ती धर्मांतरित अस्पृश्य जातींतले होते.
साहजिकच त्यांची वसती गावकुसाबाहेर असायची. त्यांना मंदिरांत प्रवेश नसायचा. सन्मानाची वागणूक नव्हती.
ख्रिस्ती धर्मात आलेल्या आणि समाजात बहिष्कृत असलेल्या या लोकांची मग वेगळीच वसाहत निर्माण करावी असे नारायणराव शेषाद्री परळीकर यांना वाटू लागले.
त्यांनी मग हैदराबादच्या निजामाशी संपर्क साधला आणि ब्रिटिश रेसिडंटच्या मदतीने ४०० बिघे जमीन इनाम म्हणून मिळवली आणि इतर ६०० बिघा जमीन लोकांना कसण्यासाठी मिळवले.
निजाम सरकारने दिलेल्या या एकूण १००० बिघा जमिनीवर मग रेव्हरंड नारायणराव शेषाद्री परळीकर यांनी बेथेल हे केवळ ख्रिस्ती लोकांचे गाव वसवले.
न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी याबाबत विस्तृतपणे लिहिले आहे. चपळगावकरांच्या पुस्तकातील या प्रकरणाचे शिर्षकच मुळी `कहाणी दोन भावांची आणि एका गावाची' असे आहे.
या बेथेल गावात नारायणराव शेषाद्री परळीकरांनी एक मोठे चर्च बांधले. त्याशिवाय शाळा, मिशन हाऊस, दोन धर्मशाळा बांधल्या. शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी एक विहीरसुध्दा तेथे बांधण्यात आली.
या नव्या गावाचे औपचारिक उदघाटन एका खास समारंभात १८७६ साली झाले. हैदराबाद निजामाचे अधिकारी, ब्रिटिश अधिकारी, मिशनचे अधिकारी आणि इतर मंडळी असे सातशे लोक या कार्यक्रमाला हजर होते.
'''नारायण शेषाद्रींच्या आयुष्यातील हा सुवर्णक्षण होता. एक नवे गाव त्यांनी वसवले होते आणि आजवर ज्यांना उपेक्षितांचे जीवन जगावे लागले होते, त्यांना नवा धर्म आणि त्याच्या आधारे नवी प्रतिष्ठा देण्याचा प्रयत्न केला होता. हे त्यांचे जवळजवळ एकहाती कर्तृत्व होते.
बहिष्कृत मानली गेलेली पूर्वाश्रमातील हिंदू अस्पृश्य मंडळी छोट्याशा टुमदार घरांत राहू लागली. त्यांना आपलेपणाने जेथे प्रवेश मिळतो असे एक प्रार्थनामंदिरही मिळाले.
केवळ ख्रिस्तीच ज्यात राहतात असे गाव वसवण्याचा हा पहिलाच प्रयत्न होता.''
काल रविवारी अगदी अवचितपणे बेथेल गावी जाण्याचा योग्य आला.
निमित्त होते मराठी ख्रिस्ती साहित्य परिषदेच्या वतीने विवेक निर्मळ यांनी आयोजित केलेल्या मराठवाडा प्रादेशिक ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे.
शंभर वर्षांच्या कालावधीनंतर या पूर्णतः ख्रिस्ती बेथेल गावाची सध्या काय स्थिती आहे?
जालना शहरापासून अगदी जवळ असलेली ही वसाहत आजही पूर्णतः ग्रामीण राहिलेली आहे. जाधव, शिंदे वगैरे चारपाच आडनावांची ख्रिस्ती कुटुंबे येथे राहतात.
बेथेल गावातील सियॉन चर्चचे हल्ली रेव्हरंड अब्राहाम रत्नाकर कसबे हे पाळक म्हणजे धर्मगुरु आहेत.
तर हा बेथेल वसाहत प्रयोग समाजशास्त्रज्ञांसाठी आणि इतर संशोधकांसाठी एक खास अभ्यासाचा विषय ठरु शकतो.
Camil Parkhe November 8, 2026




Comments
Post a Comment