राज्यसत्ता, धर्म यांची पूर्णतः फारकत. युरोपात मध्ययुगाच्या अखेरीस जी वैचारिक, वैज्ञानिक, सामाजिक क्रांती झाली ती राज्यसत्ता आणि धर्म यांची पूर्णतः फारकत केल्यानंतरच.
त्यांचे फलित काय झाले ते आपण सर्वांच्या डोळ्यांसमोर आहेच.
आपल्यामध्ये आणि पाश्चिमात्य समाजात जे जमीनअस्मानाचे फरक आहे, आपल्या नजरा आणि लक्ष्य कायम पाश्चिमात्य जगताकडे असते ते या अनिवार्य फारकतीमुळेच.
ख्रिस्ती धर्मियांचे परमाचार्य पोप लिओ कालपर्यत फ्रान्सच्या दौऱ्यावर होते.
पोप हे धार्मिक गुरु आहेत तसेच व्हॅटिकन सिटी या नामधारी राष्ट्राचे राष्ट्रप्रमुखसुद्धा आहेत.
त्या शिष्टाचारानुसार त्यांना फ्रान्सने निमंत्रित केले आणि तसा पाहुणचार आणि आदरातिथ्य सुद्धा केले.
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी त्यांचे स्वागत केले.
धर्मगुरु या नात्याने पोप लिओ यांचे फ्रान्समध्ये दररोज ठिकठिकाणी मिस्साविधी झाले.
मात्र राष्ट्राध्यक्ष यांनी राज्यसत्ता आणि धर्म यांची पूर्ण फारकत' या संकेतानुसार या प्रार्थनेला हजार राहण्याचे टाळले.
मात्र राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी शेवटच्या क्षणी आपला कार्यक्रम बदलला आणि सोमवारी पोप लिओ चौदावा यांच्या फ्रान्समधील अखेरच्या मिस्साला उपस्थित राहिले.
फ्रान्सच्या दौऱ्यापूर्वी मॅक्रॉन यांनी पोप यांच्या मिस्सांना उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले होते.
त्यामागे फ्रान्समधील ‘लायसिते’ (laïcité) हे तत्त्व आहे. १९०५ मध्ये कायद्यात समाविष्ट करण्यात आलेल्या या तत्त्वानुसार चर्च आणि राज्य यांच्यात फारकत आहे.
पॅरिसमधील एलिसे पॅलेसमध्ये मॅक्रॉन यांनी पोपचे स्वागत केले होते; मात्र तेथील मिस्साला ते उपस्थित राहिले नव्हते.
त्यानंतर रविवारी संध्याकाळी एलिसे पॅलेसने राष्ट्राध्यक्षांनी “आपल्या कार्यक्रमात बदल केला आहे” असे जाहीर केले.
सोमवारी दुपारी पूर्व फ्रान्समधील मेट्झ शहरातील सेंट-एतिएन कॅथेड्रलमध्ये मॅक्रॉन उपस्थित होते.
तेथे अमेरिकेत जन्मलेले पहिले पोप लिओ चौदावा यांच्या चार दिवसांच्या फ्रान्स भेटीतील अखेरची मिस्सा झाली.
गॉथिक वास्तुशैलीतील या भव्य कॅथेड्रलच्या मुख्य मनोऱ्याची उंची ८८ मीटर आहे.
सुमारे ३५ हजार लोक कॅथेड्रलच्या आत आणि बाहेर जमले होते.
त्याच दिवशी यापेक्षा हलकाफुलका प्रसंगही घडला.
युरोपविषयीचे आपले भाषण संपवताना पोप यांनी एक जुनी म्हण उद्धृत केली :
“फ्रान्समध्ये देवासारखा आनंदी.”
ही म्हण यिडिश आणि जर्मन भाषांमधून आली असून शांत, सुखकर आणि निवांत आनंदाचे वर्णन करण्यासाठी तिचा वापर केला जातो.
त्यावर मॅक्रॉन यांनी स्वतःच्या शैलीत उत्तर दिले :
“आपल्यासोबत येथे पोप लिओ चौदावे आहेत याबद्दल मी आनंदी.आहे.''
Camil Parkhe September 29, 2026
Comments
Post a Comment