- Get link
- X
- Other Apps
न्यूड फोटोज वाद
आपल्या नवीन चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी त्या चित्रपटाचे अभिनेते आणि अभिनेत्री पुण्यातल्या 'सकाळ टाइम्स'च्या कार्यालयात येत असत. अशा मुलाखती देणे हा त्या चित्रपट कलावंतांनी चित्रपट निर्मात्यांशी केलेला कराराचा भागच असतो, हे चित्रपट कलाकार अशा मुलाखतीला सामोरे जाण्यास नकार देऊ शकत नाही हे नंतर लक्षात आले.
विशेष म्हणजे सर्वच दैनिके आणि नियतकालिके अशा प्रकारच्या अरेंजड मुलाखतीसाठी काही लाख रुपयांचे पॅकेज निर्मात्यांकडून घेत असतात हे कळले तेव्हा मी आश्चर्याने तोंडात बोट घातले आणि त्याचवेळी एक पत्रकार म्हणून शरमेने मान खाली घातली होती.
अशा प्रकारच्या जाहिराती सॉफ्ट बातम्यांच्या स्वरूपांत देण्याची परंपरा पुण्यात सर्वप्रथम 'टाइम्स ऑफ इंडिया' ग्रुपने म्हणजे बेनेट अँड कोलेमान वृत्तसमुहाने सुरु केली आणि हे अभिनव आर्थिकदृष्ट्या अतिशय फायदेशीर धोरण मग इतर वृत्त समुहांनीसुद्धा लगेचच आपलेसे केले.
अशा प्रकारच्या प्रायोजित मुलाखती संपादकीय विभागातील फीचर्स टीममधले सहकारी घ्यायचे. फीचर्स विभाग म्हणजे सॉफ्ट बातम्या देणारे लोक म्हणून या विभागातले सर्वच जण विशीत किंवा तिशितल्या महिला असायच्या आणि असतात. आम्हा बातमीदारांचा विभाग फीचर्स टीमला लागून असायचा आणि त्यामुळे शेजारच्या कॉन्फरन्स रुममधल्या या मुलाखतीला बसता यायचे किंवा हे नट आणि नट्या येताना आणि जाताना त्यांचे दर्शन घडायचे.
अशा प्रकारे 'सकाळ टाइम्स'मध्ये असताना अनेक मराठी आणि हिंदी चित्रटसृष्टीतील मान्यवर जवळून पाहिले. चित्रपट मी फारसे पाहत नसल्याने आपल्या जवळून कॉन्फरन्स रुम मध्ये जाणारी व्यक्ती कोण आहे हे कधी कळत सुद्धा नसायचे.
अशाप्रकारे किती चित्रपट कलावंत कार्यालयात आले, किती जणांना मी पाहिले असे आता आठवत नाही.
एकदा अशाच बिग बजेट हिंदी चित्रपटातले काही कलावंत मुलाखतीसाठी आले होते. मोबाईलचा जमाना नुकताच सुरू झाला होता.
मी लगेच घरी फोन करुन मुलीला सांगितले, Aditi, Shah Rukh Khan is now in our office ."
"Shah Rukh is there now? Wow...just give him the mobile... I want to talk to him.."
मी कपाळाला हात लावला आणि मोबाईल बंद केला.
नाना पाटेकर आणि इतर काही कलाकार मंडळी बहुधा नटसम्राट चित्रपटाच्या प्रमोशन साठी आली होती. आल्याआल्या पॅसेजमध्ये च नानांनी मुलाखत पॅकेज बद्दल मॅनेजरला धारेवर धरलं होत पण क्षणभरच. मुलाखत आणि त्यानंतरची प्रसिद्धी ठरलेल्या पॅकेज नुसार झाली.
इरफान खान हा या असल्या एका प्रमोशन मुलाखतीला आलेला माझा अत्यंत आवडता अभिनेता. `लंच बॉक्स' वगैरे चित्रपटांतल्या त्याच्या भूमिका गाजलेल्या. त्याच्या अकाली जाण्याची बातमी कळली तेव्हा त्याची ती भेट आणि त्याचे ते अतिशय बोलके, संवेदनशील डोळे आठवले.
मात्र या काळात मुलाखतीला आलेल्या चित्रपट कलावंताला पाहण्यास ऑफिसच्या गेटबाहेरआणि आत सर्वाधिक गर्दी झाली ती फक्त एकदाच.
त्यावेळी ऑफिसबाहेर लोकांची प्रचंड गर्दी झाल्याने परिस्थिती हाताबाहेर जाते आहे असे दिसले. शेवटी जवळच्या पोलिस चौकीला फोन करून वाढीव सुरक्षा कुमक बोलावी लागली होती
आणि यावेळी मुलाखतीसाठी आली होती आंतरराष्ट्रीय पातळीवरची पोर्न स्टार सनी लियॉन. आपल्या नवऱ्यासह चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती आली होती.
भरपूर उंची आणि उत्तम फिगर राखून असलेली सनी लियॉन गेटपासून कॉन्फरन्स रूमकडे येऊ लागली तेव्हा तिच्यावर खिळलेल्या सर्वांच्या नजरा माझ्या आजही आठवणीत आहे. भरपूर संख्येने असलेले तिचे बॉडी गार्ड्स आगंतुक लोकांना तिच्यापासून सुरक्षित अंतरावर ठेवत होते.
त्यावेळी कॉन्फरन्स रुम तर फीचर्स टीम मधल्या सहकाऱ्यांसह बातमीदार, जाहिरात आणि इतर विभागांतील लोकांनी गच्च भरली होती.
मुलाखत कशी झाली आणि सनी लियॉन नेमकी काय बोलली हे आता आठवत नाही. मात्र मुलाखतीनंतर तिच्याबरोबर सेल्फी घेण्यासाठी झालेली गर्दी आणि तिच्या बॉडीगार्डसनी काही लोकांना दाखवलेला हिसका मला आजही आठवतो.
काही (अविवाहित) तरुणांनी सनी लियॉनबरोबरच्या गर्दीत असलेले सेल्फीज आंणि इतर फोटो समाज माध्यमांवर टाकले होते आणि या फोटोंना प्रचंड लाइक्स आणि चावट कमेंट्स मिळाल्या होत्या.
काही सहकारी तरुण मंडळी मुलाखतीनंतर मुख्य प्रवेशद्वारापाशी त्या नट नट्याबरोबर सेल्फी किंवा फोटो काढवून घ्यायचे. असा वेडगळपणा कि लाळघोटेपणा का कुणास ठाऊक पण मी एकदाच केला.
हा अभिनेता होता मिलिंद सोमण. कुठल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हा अभिनेता आला होता ते आता आठवत नाही, मात्र बातमीदार विभागातील एका सहकाऱ्याबरोबर मिलिंद सोमणसोबत दोनतीन फोटो काढले होते.
मिलिंद सोमणला प्रत्यक्ष पाहताना साहजिकच खूप वर्षांआधीचा भारतातल्या जाहिरात जगतातील एका खूप गाजलेल्या जाहिरातीची आठवण होणे अगदी साहजिकच होते.
एकेकाळी मिलिंद सोमण आणि मधु सप्रे ही मराठमोळी जोडगोळी देशातील जाहिरात क्षेत्रातील सर्वात `हॉट युगुल' होते.
मिलिंद सोमण आणि त्याची त्यावेळची मैत्रीण मधु सप्रे या जोडगोळीचा पूर्ण नग्नावस्थेत असलेला एका बुटांच्या कंपनीच्या जाहिरातीचा कृष्णधवल फोटो खूप वादग्रस्त ठरला. नग्न असलेल्या त्या दोघांच्या शरीरांभोवती केवळ एक अजगर गुंडाळला होता. भावना दुखावल्या किंवा चेकाळल्या म्हणून कुणी संस्कृतीरक्षकाने या युगलांवर न्यायालयात खटला दाखल केला होता.
हा खटला खूप वर्षे चालला. या दरम्यान मधु सप्रेने भारत सोडला होता आणि परदेशात कुठे तरी ती स्थायिक झाली होती. मात्र या खटल्याच्या सुनावणीसाठी तिला वेळोवेळी भारतात यावे लागत असायचे.
तब्बल चौदा वर्षे चाललेला हा कोर्ट खटला काही वर्षांपूर्वी मिटला आणि दोघा ' आरोपींची' निर्दोष सुटका झाली, त्यावेळी मधु सप्रेला किती दिलासा मिळाला असेल याची नुसती कल्पनाच केलेली बरी.
पाचसहा वर्षांपूर्वी एका मासिकात जाहिरात क्षेत्रातील पुरुष मॉडेल्स यांची संघर्ष गाथा यावर कव्हर स्टोरी आली होती, त्या अंकात मिलिंद सोमण आणि मधु सप्रे यांचा तो वादग्रस्त फोटो पुन्हा एकदा जसाच्या तसा पुन्हा वापरला होता, यावेळी मात्र त्या फोटोबाबत प्रतिकूल प्रतिसाद आले नव्हते.
रणवीर सिंगने अलीकडेच आपले काही न्यूड फोटो समाजमाध्यमांत शेअर केले. त्याबद्दल उलटसुलट प्रतिक्रिया कानावर आल्या. वृत्तवाहिन्यावर NDTV वर बोलतांना कुणीतरी हे न्यूड फोटो एक नॅशनल इश्श्यु आहे असे म्हटलेले ऐकले अन् मिलिंद सोमण आणि मधु सप्रे यांच्याबाबत घडलेला हा किस्सा आठवला.
Camil Parkhe
films
Irfan Khan
Madhu Sapre
Milind Soman
Nana Patekar
nude photos
porn star
Ranvir Singh
Sakal Times
Shah Rukh Khan
Sunny Leone
Times of India
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment