प्रिन्स चार्ल्स आणि डायना स्पेन्सर यांचे लग्न
 
गोव्यातील वृत्तपत्रात लंडनच्या शाही लग्नाचे फोटो मिळविण्यासाठी २९ जुलै १९८१ला आम्ही केलेला हा आटापिटा. प्रिन्स चार्ल्स आणि डायना स्पेन्सर यांचे लग्न ठरले, तेव्हाच ते विसाव्या शतकातील सर्वांत मोठे शाही, सेलेब्रिटी लग्न असेल असे म्हटले जात असे. ब्रिटिश राजघराणे , ब्रिटिश पर्यटन खाते आणि संपूर्ण जगभरातील प्रसारमाध्यमांतून या होणाऱ्या विवाहाविषयी प्रचंड गाजावाजा केला गेला. त्यात तसे वावगे असे काहीही नव्हते. 
 
यापूर्वी म्हणजे तीन दशकांपूर्वी १९४७ला राणी एलिझाबेथ व्दितीय यांचा स्वतःचा विवाह झाला तेव्हा ग्रेट ब्रिटन हे जगातले एक प्रमुख राष्ट्र असले तरी प्रसारमाध्यमांचे क्षेत्र आताइतके जनसामान्यांपर्यंत पोहोचले नव्हते. 
 
मात्र १९८०च्या सुरुवातीच्या काळात प्रिन्स चार्ल्स आणि डायना यांची एंगेजमेंज वा साखरपुडा झाला तेव्हा रेडिओ सामान्य माणसांपर्यंत पोहोचला होता, वृत्तपत्रे शहरांत आणि खेड्यापाड्यांत जाऊ लागली होती आणि ब्लँक अँड व्हाईट टेलिव्हिजनचे भारताच्या काही प्रमुख शहरांत आगमन झाले होते. 
 
एके काळी ब्रिटिश साम्राज्याचा सूर्य मावळत नसे. त्यामुळे ब्रिटिश राजघराण्याविषयी जगात अनेक देशांत कुतूहल होते. एके काळी ब्रिटिशांनी जेथे राज्य केले होते त्या देशांत आणि इतरही ठिकाणी हा विवाह ठरला, तेव्हापासूनच पुढील काही महिने हे लग्न म्हणजे एखाद्या परिकथेतील गोड सोहोळा. 'फेरीटेल वेडिंग' आहे असेच वृत्तपत्रांतून आणि इतर प्रसारमाध्यमातून रंगविले जात होते. 
 
याचे एका कारण म्हणजे खुद्द डायना यांचे व्यक्तिमत्व होते. प्रिन्स चार्ल्सने तिशी पार केली असली तरी डायना स्पेन्सर लग्नाच्यावेळी एका टीनएजर होती, एका सामान्य घरातून ती आता राजघराण्याचा भाग होणार होती. प्रसारमाध्यमातून ब्रिटिश राजघराण्याच्या परंपरा, या शाही विवाहाची पूर्वतयारी, डायना यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी वगैरे संदर्भात भ्ररपूर काही लिहिले जात होते. 
 
या शाही लग्नानिमित्त स्मरणिका ठरतील अशा अनेक वस्तू बाजारात आल्या होत्या. 
 
दिनांक २९ जुलै १९८१ला पार पडलेला हा शाही विवाह त्या काळात सर्वाधिक लोकांनी टेलिव्हिजनवर पाहिलेली घटना होती. 
 
जगभर लोकांच्या कुतूहलाचा विषय बनलेली या घटनेचा वृत्तांत देण्याबाबत पणजी येथे 'नवहिंद टाइम्स'मधील आमच्या संपादकांनी मोठी व्यूहरचना केली होती. लग्नाची बातमी पीटीआय वगैरे वृत्तसंस्थांकडून ताबडतोब मिळणे शक्य होते. मात्र छायाचित्रांच्या बाबतीत तसे नव्हते. 
 
१९८०च्या दशकाच्या सुरुवातीस राष्ट्रीय आणि प्रादेशिक वृत्तपत्रे फोटोंसाठी फार मोठया प्रमाणात प्रेस इन्फॉर्मशन ब्युरो (पीआयबी) वर अवलंबून असत. दिल्ल्लीतून पीआयबीने पाठविलेली तीन-चार दिवसांपूर्वीच्या घटनांची छायाचित्रे सर्वच वृत्तपत्रे वापरत.असत. लंडन येथील या शाही विवाहसोहळ्याची छायाचित्रे त्याच दिवशी मिळणे अशक्यच होते. 
 
त्याकाळात महाराष्ट्रात टेलिव्हिजन फक्त मुंबई आणि नजिकच्या परिसरात दिसत असे. जवळपास कुठे टेलिव्हिजन टॉवर्स नसल्याने गोव्यातही टेलिव्हिजनचे कार्यक्रम पाहता येत नसे. असे असले तरी 'द नवहिंद टाइम्स'चे संपादक बिक्रम व्होरा हे गोव्यात टेलिव्हिजन सुविधा असणाऱ्या अगदी बोटावर मोजणाऱ्या व्यक्तींमध्ये होते. 
 
त्यासाठी त्यांनी मिरामार येथील आपल्या बंगल्यात मुंबई दूरदर्शन केंद्राचे कार्यक्रम पाहता यावे यासाठी आपल्या टेलिव्हिजनसाठी एक उंच अँटेना लावली होती. 
 
त्याशिवाय त्या अँटेनाला एका बुस्टरही लावला होता. त्यामुळे मुंबई दूरदर्शन केंद्राने प्रसारीत केलेले सर्व कार्यक्रम त्यांना अगदी स्पष्टपणे पाहता येत असत. 
 
गोव्यात असलेल्या या दुर्मिळ सुविधेचा वापर करून या लग्नाचे छायाचित्र वापरण्याचे संपादक व्होरांनी ठरविले होते. त्यानुसार लग्नाच्या तारखेच्या आदही काही दिवस फोटोग्राफर संदिप नाईक याने संपादकांच्या घरी जाऊन रंगीत तालीम घेतली. 
 
टेलिव्हिजनसमोर कॅमेरा स्टॅन्ड लावून त्याने टेलिव्हिजनवर चाललेल्या कार्यक्रमाचे चांगल्याता चांगले फोटो काढण्याका सराव केला. 
 
त्यानंतर लग्नाच्या दिवशी संध्याकाळी दूरदर्शनच्या बातम्यांच्या वेळी संदिप सह संपादक आणि आम्ही काही बातमीदार टेलिव्हिजनसमोर श्वास रोखून उभे होतो. 
 
त्या शाही लग्नाच्या बातम्या आणि चित्रे दाखविली जाऊ लागली तसे संदिप कॅमेराची बटणे खटाखट दाबू लागला. लग्नाचे व्हिजुल्स चालू असेपर्यंत कॅमेराचे शटर वेगाने फिटर गेले. व्हिजुल्स संपेपर्यंत संदिप तणावाने घामाघूम झाला होता. 
 
त्यानंतर तो वेगाने फोटोच्या प्रिन्टस काढण्यासाठी निघून गेला आणि आम्ही इतर जण दैनिकाच्या ऑफिसात गेलो. 
 
एक तासानंतर संदिप फोटोंच्या प्रिन्टस घेऊन आला तेव्हा एकदम खुशीत होता. 
 
काही फोटो अगदी मस्त आले होते. 
 
संपादकांनी त्यापैकी एका फोटोची छापण्यासाठी निवड केली. 
 
फोटो अर्थातच पान एकवरच जाणार होता. दु सऱ्या दिवशीच्या नवहिंद टाइम्सच्या पान एकवर लग्नाच्या बातमीसह तो फोटो प्रसिद्ध झाला.
 
फोटो कॅप्शनवर 'दूरदर्शन फोटो बाय संदिप नाईक ' अशी बायलाइनही होती !
 
त्याकाळात द नवहिंद टाइम्स हे गोव्यातील एकमेव इंग्रजी दैनिक होते. दुसऱ्या दिवशी गोव्यातील सर्वच मराठी वृत्तपत्रांनीं चार्ल्स-डायनाच्या लग्नाची बातमी छापली पण त्या लग्नाचा फोटो केवळ नवहिंद टाइम्सकडेच होता !
 
संपादक बिक्रम व्होरांनी केलेले नियोजन कमालीचे यशस्वी ठरले होते. त्यानंतर पुढे अनेक दिवस म्हणजे गोव्यात टेलिव्हिजन टॉवर येईपर्यंत काही विशेष बातम्यांसाठी या दैनिकात टेलिव्हिजन फोटोची बायलाईन्स असे.
 
संपादक बिक्रम व्होरा नंतर अनेक वर्षे आखाती देशांतील गल्फ न्यूज आणि खलीज टाइम्स या आघाडीच्या दैनिकांचे संपाद्क होते.

Comments

Popular posts from this blog

Shakuntala Paranjape : Crusade of a lifetime

Dnyanodaya monthly enters 175th year

Fr. Rudolf Schoch. A Jesuit Looks back in satisfaction