राजे चार्ल्स तृतीय, पद्मिनी कोल्हापुरे, राणीसाहिबा एलिझाबेथ,


इंग्लंडच्या राणीसाहिबा एलिझाबेथ दुसऱ्या यांच्या पार्थिव अवशेषांची अंतिम यात्रा सुरु झाली आहे. त्यांचा पार्थिव देह लंडनला आणण्यासाठी प्रवास होतो आहे तेव्हा ठिकठिकाणी हजारो लोक या राणीला अखेरचा मानदंड देण्यासाठी फुले घेऊन उभे राहत आहेत असं बातम्यांतून दिसतं. इंग्लंडविषयी आणि या देशाचे वैभव अनुभवलेल्या, त्या वैभवाचा एक हिस्सा असलेल्या राणीसाहिबाबद्दल जगभर कुतूहल तर आहेच आणि संमिश्र भावनाही आहेत.

दिडशे वर्षे इंग्लंडने भारतीय उपखंडाला गुलामगिरीत ठेवले, या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी हजारो लोकांनी आपले रक्त आणि घाम गाळले. आणि तरीसुद्धा आपल्या देशात इंग्लंडविषयी कटुतेची भावना नाही. राणीच्या मृत्यूविषयी शोक करण्यासाठी एक दिवस सुतक पाळून आणि देशाचा राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवून भारताने हे दाखवून दिलं आहे. 

इंग्लंडविषयी भारतीय जनतेत एक सुप्त आकर्षण आहे. बहुधा जगभर अनेक देशांतील लोकांत, विशेषतः ब्रिटिश वसाहती असलेल्या राष्ट्रांत- अशी भावना असणं शक्य आहे. अमेरिकेविषयीसुद्धा असच आकर्षण आहे. 

भारतातील अनेक लोकांना इंग्लंडमध्ये स्थायिक होण्याची, तिथलं नागरीकत्व घेण्याची इच्छा आहे. पोर्तुगालची साडेचारशे वर्षे वसाहत असलेल्या गोवा, दमण आणि दीव इथल्या लोकांना आणि १९६१ आधी जन्मलेल्या लोकांना पोर्तुगालचं नागरिकत्व घेणं आजही शक्य आहे. अनेक जण याबाबत प्रयत्न करून लिस्बनची वाट धरत आहेत.

आपल्या आधीच्या वसाहतीतील लोकांना नागरिकत्व देण्याची अशीच सवलत इंग्लंडने दिली तर काय होईल याची नुसती कल्पनाच करुन बघा. 

दहा वर्षांपूर्वी कुटुंबियांसह युरोप सहल आखताना इंग्लंडच्या वारीला आम्ही प्राधान्य आणि सर्वाधिक दिवस दिले होते. दुदैवानं आमच्या सहलीची तारीख आठवड्यावर आली आणि तरीही मुंबईतली ब्रिटिश वकिलात व्हिसाबाबत निर्णय घेईना तेव्हा इंग्लंड वगळून आम्हाला युरोप दौरा करावा लागला होता याची खंत आजही आहे. 

गोव्याहून मी बल्गेरिया आणि रशियाला गेलो तेव्हा विमानमार्ग बदलून मॉस्को ऐवजी रोमला थांबण्याची माझी संधी थोडक्यात हुकली होती. मात्र काही वर्षांपूर्वी रोममध्ये आणि इटलीत भरपूर दिवस मुक्काम गेला. 

इंग्लंडबाबतही असं काही घडावं अशी गोड आशा आहे. 

चाळीस वर्षांपूर्वी आताचे राजे चार्ल्स तृतीय आणि लेडी डायना स्पेन्सर यांचा विवाह जगानं अत्यंत कुतूहलपूर्वक पहिला होता. त्यावेळी जगभर वृत्तपत्रांत याबद्दल रकानेच्या रकाने लिहिली गेली. बातमीदार म्हणून मीही याबाबत अपवाद नव्हतो. 

प्रिंस ऑफ वेल्स चार्ल्स आणि डायना यांच्या दोन्ही मुलांची लग्ने झाली तेव्हाही याविषयी आणि अनेक वादग्रस्त घटनांविषयी भरपूर लिहिलं गेलं. 

आपल्या लग्नाआधी तेव्हाचे प्रिन्स ऑफ वेल्स चार्ल्स हे मुंबईला आले होते तेव्हा अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांनी त्यांच्या गालावर चुम्बन घेऊन मोठी खळबळ उडून दिली होती. या १९८० साली झालेल्या घटनेची जगभर चर्चा झाली होती. 

नंतर पद्मिनी कोल्हापुरे स्वतः लंडनला गेल्या तेव्हा ``प्रिन्स चार्ल्सचे चुंबन घेणाऱ्या तुम्हीच काय ? '' असा प्रश्न त्यांना विमानतळावरच्या एका अधिकाऱ्यानं विचारला होता असं या अभिनेत्रीनं सांगितलं आहे. 

पद्मिनी कोल्हापुरे यांच्या सिनेमांना विसरलेले अनेक सिनेमाप्रेमी लोक हे चुंबन प्रकरण मात्र विसरलेले नाहीत.

जगभर लंडनच्या या शाही कुटुंबाविषयी लिहिलं गेलं ते इंग्लंडच्या आंतरराष्ट्रीय पातळीवर असलेल्या स्थानामुळं आणि राणी साहिबा एलिझाबेथ यांच्या व्यक्तिमत्वामुळं. राजे चार्ल्स तृतीय हे इंग्लंडच्या राजघराण्यातल्या शतकांपासून चालत आलेल्या परंपरा आणि संकेत पाळतील कि नाही याबद्दल रास्त शंका आहेत. 

इंग्लंडच्या राज्यघटनेची अधिकृत मान्यता असलेले हे राजघराणे चालू ठेवायचे कि नाही याविषयीसुद्धा या देशाचे नागरिक फेरविचार करु शकतात. 

इंग्लंडच्या राजघराण्याविषयी असलेले जागतिक वलय मात्र पुढच्या काही वर्षांत कमी होईल अशी चिन्हं नाहीत.

सद्याच्या इंग्लंडच्या राजाचा एक मुलगा प्रिन्स हॅरी राजघराण्याचा हक्कांचा आणि विशेषाधिकारांचा त्याग करून सामान्यजनांचं जीवन जगण्यासाठी आपली पत्नी आणि मुलं यांना घेऊन अमेरिकेला राहायला गेला आहे, तिथंही हे राजघराणं त्याचा कायम पिच्छा करेल. 

%%

Camil Parkhe

Comments

Popular posts from this blog

Dnyanodaya monthly enters 175th year

Fr. Rudolf Schoch. A Jesuit Looks back in satisfaction

A day at Mother Teresa’s Home for Destitutes