दलित पॅन्थर, नामदेव ढसाळ, नारायण आठवले

गोव्यातील कॉलेजशिक्षणाचा आणि नंतर बातमीदाराच्या नोकरीचा काळ संपवून ऐंशीच्या दशकाच्या अखेरीस मी महाराष्ट्रात परतलो, औरंगाबादला `लोकमत टाइम्स'ला रुजू झालो तेव्हा राज्यातील सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रांपासून आणि राजकारणापासून आपण फार काळ दूर राहिलो होतो याची जाणीव झाली . औरंगाबाद शहरात आणि मराठवाड्याच्या अनेक भागांत त्याकाळात `भारतीय दलित पॅन्थर' असे फलक दिसत. हे नाव वाचून कुतूहल आणि जिज्ञासा निर्माण झाली. 
 
फार पूर्वी मी श्रीरामपूरला शाळेत असताना सत्तरच्या दशकात दलित पँथरची स्थापना झाली होती, मुंबईतील त्याकाळातल्या दंगली आणि अशांत सामाजिक परिस्थिती याविषयी अंधुक आठवत होतं, मात्र इनमिन अडीच वर्षे मात्र खळबळजनक आयुष्य लाभलेल्या या संघटनेविषयी फार माहिती नव्हती. 
 
अशा प्रकारची फलके त्या संघटनांचं त्यात्या परिसरातलं अस्तित्व आणि ताकद दाखवून देत असतात. आपल्या परिसरात स्वतःच्या वाढदिवसानिमित्त फ्लेक्स उभारून काय पडसाद उमटतात याचा अनुभव घ्या म्हणजे मी काय म्हणतो आहे हे कळेल. अशी फलके उभारणं म्हणजेच प्रस्थापित घटकांविरोधी आव्हान तयार करणं. सत्तरच्या दशकात शिवसेनेची अशीच फलके ठिकठिकाणी उभी राहून त्याद्वारे स्थानिक प्रस्थापित सत्तेला आव्हान देण्यात आलं होतं. कधी काळी शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेची फलके अशी गावागावांत दिसत असत आता भारतीय दलित पँथर्सचे हे फलक पाहताना मराठवाड्यात या संघटनेचं असं अस्तित्व जाणवलं. 
 
त्याकाळात ऐंशीच्या दशकात औरंगाबाद शहरात आणि आसपास दलित कार्यकर्त्यांचं आणि संघटनांचं दाट जाळं होतं. `लोकमत टाइम्स' या आमच्या इंग्रजी दैनिकात औरंगाबाद महापालिका बिट माझा सहकारी मित्र मुस्तफा आलम यांच्याकडं होती. त्याच्याबरोबर पालिकेत गेल्यानं नगरसेवक गंगाधर गाडे, प्रितमकुमार शेगावकर, शिवसेनेचे नगरसेवक चंद्रकांत खैरे, काँग्रेसचे औरंगाबाद शहराध्यक्ष एस टी प्रधान वगैरेंची ओळख झाली. सफारी ड्रेस घालून डोक्यावर नेहेमी पांढरी टोपी घालणारे शिवसेनेचे मोरेश्वर सावे त्यावेळी औरंगाबाद महापौर होते. 
 
औरंगाबादला असतानाच पहिल्यांदा मी प्रकाश आंबेडकर यांना भेटलो, त्यांच्या कार्यक्रमाचं वृत्तांकन केलं. 
 
औरंगाबाद शहरात मुसलमान आणि दलित लोकसंख्या लक्षणीय आहे. याचकाळात हिंदू आणि मुसलमान मतदारांचे ध्रुवीकरण करुन औरंगाबाद शहरात सत्ता मिळवण्यात शिवसेनेला यश मिळाले. मोरेश्वर सावे खासदार बनले,. यानंतर शहरातील आणि मराठवाड्यातील दलितांची आणि त्यांच्या संघटनांची ताकद कमी होत गेली. त्याकाळात गंगाधर गाडे वगैरेंमुळे दलितांचा आवाज आणि अस्तित्व जाणवायचं, आज हे काम तिथं कोण करतंय हे मला माहित नाही.

औरंगाबाद आणि मराठवाडा सोडून मी पुण्याला इंडियन एक्सप्रेसला जॉईन झालो पण दलित पॅन्थरबाबत जाणून घेण्याची इच्छा कायम राहिली. आमच्या दैनिकातला त्यावेळचा क्राईम रिपोर्टर असलेल्या प्रसन्नकुमार केसकर याने याबाबत मदत केली. त्याने दिलेल्या `दलित पँथर’ या पुस्तकानं या संघटनेच्या स्थापनेपासूनची भरपूर माहिती पुरवली. 
 
काही वर्षांपूर्वी ``मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर) आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर - अमेरिकेतील वर्णभेद आणि भारतातील अस्पृश्यताविरोधी लढा' या शिर्षकाचं माझं पुस्तक सुगावा प्रकाशनाच्या विलास आणि उषा वाघ यांनी प्रकाशित केलं. या पुस्तकासाठी संशोधन करताना अमेरीकेतील `ब्लॅक पँथर' हा लढाऊ संघटनेची ओळख झाली. या संघटनेच्या कामाने प्रेरित होऊन `दलित पँथर' हे नाव घेण्यात आले असं म्हटलं जातं. त्यामुळे `दलित पँथर' या संघटनेविषयी आधीच असलेल्या उत्सुकतेत भर पडली.
 
या `दलित पँथर' नावाविषयी असलेल्या वलयामुळे म्हणा किंवा गूढ आकर्षणापायी म्हणा, अलिकडेच लोकवाड्मय गृहाने प्रकाशित केलेल्या अर्जुन डांगळे यांनी लिहिलेल्या `दलित पँथर अधोरेखीत सत्य' हे जाडजूड पुस्तक वाचले. अनेक वर्षे शोधत असलेल्या अनेक प्रश्नांची या पुस्तकात काही उत्तरे मिळाली. 
 
त्यानंतर लगेचच डॉ. अनिल अवचट यांनी `साधना' साप्ताहिकाचा १९७२ साली प्रकाशित केलेला `काळा स्वातंत्र्यदिन' या विशेषांक, राजा ढालेंचा तो वादग्रस्त लेख आणि त्यानंतर महाराष्ट्रात निर्माण झालेलं वादळ याविषयीचा एक लेख मी इथं फेसबुकवर टाकला होता. 
 
दलित पँथर या संघटनेचा अल्पकालीन असलेला इतिहास खूप अस्वस्थ करणारा आहे, तितकाच या संघटनेनं ज्या समाजघटकांसाठी हातात निखारा घेतला त्यांच्यासाठी खूप प्रेरणादायक आहे. `दलित पँथर' या नावाभोवती एक गूढ वलय आहे, ही संघटना अधिकृतरित्या बरखास्त होऊन पाचेक दशक झालीयेत तरीही हे वलय कायम आहे.
याचे कारण म्हणजे नामदेव ढसाळ, राजा ढाले यासारख्या संस्थापकांनी आणि अनेक ज्ञात आणि अज्ञात कार्यकर्त्यांनी या संघटनेसाठी खूप खस्ता, त्रास आणि संकटे भोगली आहेत. त्यामुळेच त्याकाळातल्या रिपब्लिकन पक्षाच्या प्रस्थापित नेत्यांच्या स्वार्थी वृत्तींविरोधी आणि दलित समाजाच्या हक्कांसाठी रस्त्यांवर उतरलेल्या या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दलित समाजाच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. तसेच तत्कालीन सत्ताधारी लोकांना धडकी बसवली होती. 
 
कुठलीही सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय क्रांती अनेक नेत्यांना जन्म देते, दलित पँथरने पण तेच केलं. नामदेव ढसाळ आणि राजा ढाले ही त्यापैकी दोन ठळक नावं. `दलित पॅंथर’ची ही शिदोरी या दोन नेत्यांच्या आयुष्यभर पुरली. ही संघटना बरखास्त झाल्यानंतरसुद्धा. या दोन्ही नेत्यांचे थोड्या वर्षांच्या अंतराने निधन झाले तेव्हा त्यांच्या संघटनेच्या कामाची उजळणी झाली. 
 
त्याशिवाय इतर कितीतरी तरुणांना `पँथर्स' हा बिल्ला आयुष्यभर लागला, त्यापैकी काही जण आयुष्यातून कायमचे उठले, कांहींनी वेळीच शहाणे होऊन नवे, वेगळे बिल्ले शोधले. 
 
पत्रकार असलो तरी नामदेव ढसाळ किंवा राजा ढाले यांना प्रत्यक्ष भेटण्याचा, त्यांच्या कार्यक्रमांचे वृत्तांकन करण्याचा योग कधी आला नाही. ढसाळ यांचे कवितासंग्रह किंवा इतर साहित्य पण कधी वाचले नाही. मात्र त्यांच्यावर आणि दलित पँथरवर लिहिले गेलेले साहित्य आवर्जून वाचलं आहे. 
 
डांगळे यांनी लिहिलेला आणि १९७० साली घडलेला एक प्रसंग इथं सांगितलाच पाहिजे. दादरच्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात कवीसंमेलन होते. अध्यक्षस्थानी अनंत काणेकर होते आणि विंदा करंदीकर, वसंत बापट, मंगेश पाडगावकर, नारायण सुर्वे ही दिग्गज मंडळी उपस्थित होती. संमेलन संपतासंपता अध्यक्षांच्या हातात एक चिट्टी आली.
 
``मी एक टॅक्सी ड्रायव्हर आहे. मला कविता वाचायच्या आहेत. ''
 
त्यावर अध्यक्ष शांतपणे म्हणाले
 
``आता वेळ संपत आली आहे, कविता वाचता येणार नाहीत.''
 
त्यावर डांगळे आणि इतरांनी गलका करून मागणी केल्यावर त्या ड्रायव्हरला कविता वाचण्याची परवानगी देण्यात आली. 
 
एक कुरळ्या केसांचा, नाकेला, सावळ्या रंगाचा, शिडशिडीत बांध्याचा, मळकट पांढरा गणवेश चढवलेला टॅक्सी ड्रायव्हर समोर आला. कविता वाचू लागला. 
 
त्याची कविता ऐकता ऐकता सभागृह हादरुन गेल्यासारखे झाले. त्या सभागृहात श्रोत्यांमध्ये 'सत्यकथा' मासिकाचे कार्यकारी संपादक राम पटवर्धन बसले होते. कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी त्या कविला बोलावले आणि आपले कार्ड देऊन 'उद्या कविता घेऊन कार्यालयात या'' म्हटले. पुढच्याच 1सत्यकथे'च्या अंकात त्या कवीच्या पाच कविता प्रसिद्ध झालेल्या वाचकांना दिसल्या. नुसत्या दिसल्या नाही तर त्या चर्चेच्या विषय झाल्या ! भारतीय साहित्याला नवे वळण देणारा म्हणून त्या कवीकडे काव्यरसिक पाहू लागले. त्या कवीचे नाव होते - नामदेव लक्षण ढसाळ ! 
 
नोबेल पारितोषक विजेते व्हि एस नायपॉल यांनी ``इंडिया या मिलियन म्युटिनीज नाऊ’’ या जाडजूड ग्रंथात नामदेव ढसाळ यांच्यावर एक प्रकरणच लिहिलं आहे, तशा प्रकारचं लिखाण ढसाळ यांच्यावर मराठीतही नसावं असं मला वाटतं. 
 
याविषयी अर्जुन डांगळे यांनी लिहिलं आहे. ''एका पत्रकाराचा मला फोन आला. ''आंतरराष्ट्रीय कवि-लेखक व्ही एस नायपॉल हे भारत येत आहेत, त्यांना मुंबईमध्ये दलित वस्ती, वेश्यावस्ती, मुंबईचे अंडरवलर्ड बघायचं आहे. दाखवाल का?'' 
 
मला हे शक्य नव्हते. मी नामदेवचं नाव सुचवले. नामदेवने नायपॉलला सगळीकडे फिरवले. त्यांना दाखवायचे होते ते सगळे दाखवले. नंतर नायपॉलने त्याविषयी आपल्या पुस्तकात लिहिले. ‘’ 
 
एका घटनेमुळं मात्र ढसाळ यांच्याबद्दल माझ्या मनात अढी निर्माण झाली होती. महार, मातंग आणि इतर पुर्वाश्रमीच्या अस्पृश्य समाजातून ख्रिस्ती झालेल्या लोकांना म्हणजे दलित ख्रिश्चनांना अनुसूचित जातींमध्ये समावेश करावा अशी एक जुनी मागणी आहे. या मागणीस विरोध करण्यासाठी नामदेव ढसाळ यांनी काही लोकांसह पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २२ जून २००५ रोजी निदर्शने केली. 
 
आधी केवळ हिंदूंचा समावेश असलेल्या अनुसूचित जातींमध्ये १९५६ साली दलित शिखांचा आणि पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या काळात दलित बौद्धांचा समावेश केला गेला होता, त्यामागचे तार्किक कारण सर्वांना ठाऊक होते. मात्र याकाळात ढसाळ यांनी शिवसेनेचे कंगण बांधून घेतले होते आणि दलित ख्रिश्चनांना ते विरोध करण्यामागचे कारण स्पष्ट होते. 
 
नंतर एकेकाळी खऱ्याखुऱ्या अर्थानं पँथर असलेल्या ढसाळ यांची विविध कारणांनी आलेली हतबलता कळाली तेव्हा माझ्या मनातल्या अढी नाहीशी झाली. 

 

अर्जुन डांगळे यांचे पुस्तक वाचताना नारायण आठवले यांचा संदर्भ आला आणि मी चमकलो. पत्रकारितेत मी नवखा असताना १९८० च्या दशकात आठवले गोव्यातल्या गोमंतक या आघाडीच्या मराठी दैनिकाचे संपादक होते. द नवहिंद टाइम्स या गोव्यातल्या त्यावेळच्या एकमेव आणि त्यामुळे आघाडीच्या इंग्रजी दैनिकाचा मी कॅम्पस आणि क्राईम- हाय कोर्ट रिपोर्टर होतो. प्रत्यक्ष गाठभेट होऊन संभाषण कधीही झाली नाही तरी संपादक नारायण आठवले मला चांगले ओळखून होते याचं कारण म्हणजे आम्ही अनेकदा समोरासमोर आलेलो होतो. 

त्यावेळी मी गोवा युनियन ऑफ जर्नालिस्टचा सरचिटणीस होतो, त्याकाळात पत्रकारांसाठी आणि इतर वृत्तपत्र कामगारांसाठी वेतन आयोगाची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी मी पणजीत मोर्च्यांचं नेतृत्व करायचो तेव्हा मोर्चा सान्त इनेझला असलेल्या गोमंतक भवनाला आला कि संपादक आठवले गॅलरीत मला आणि मोर्च्याला कौतुकानं न्याहाळत असत हे मला आजही आठवतं. संपादकाची केबिन सोडून आठवले मैदानातील सभा गाजवत असत हे मी पाहिलं होतं , त्यांच्याआधीचे गोमंतक संपादक माधव गडकरी सुद्धा याच पठडीतले होते. 

त्याकाळात स्वतः आठवले हे चळवळ्ये असतील आणि विविध क्षेत्रांत त्यांनी मोलाचं योगदान केलं असेल याची मला कल्पनाच नव्हती. `अनिरुद्ध पुनर्वसु' या नावाने ते साहित्य लिखाण करत असत हे नंतर कळालं. 

अर्जुन डांगळे यांचे पुस्तक हे वाचताना नारायण आठवले यांनीच नामदेव ढसाळ यांचा गोलपिठा हा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित केला, त्यासाठी त्यांनी स्वतःच ढसाळ यांची भेट घेतली हे कळालं आणि आठवले यांच्याविषयीचा आदर वाढला. 

डांगळे लिहितात : 'गोलपिठा'चे प्रकाशक अनिरुद्ध पुनर्वसु उर्फ नारायण आठवले उर्फ वा. ना. वांद्रेकर हे आमच्याशी अत्यंत आपुलकीने वागायचे. ते सोबत साप्ताहिकात ' बॉंबे कॉलिंग' हे सादर लिहायचे. त्यांनी नामदेवच्या प्रेमापोटी हा कवितासंग्रह प्रकाशित केला होता. ‘’

`गोलपिठा'ला प्रस्तावना होती विजय तेंडुलकर यांची. ही प्रस्तावना लिहित असताना तेंडुलकरांनी कामाठीपुरातल्या बऱ्याच वस्त्या पायाखाली घातल्या होत्या असं डांगळे यांनी लिहिलं आहे. 

नामदेव ढसाळ यांनी स्वतः नारायण आठवले यांची त्यांच्या लोकसत्ता कार्यालयात जाऊन भेट घेतली याविषयी ढसाळ यांनीच लिहिलेला एक छोटासा लेख हा पुस्तकात परिशिष्ट म्हणून जोडला आहे. वानगीदाखल ही काही वाक्ये. वानगीदाखल म्हटलं आहे कारण ही दिलेली वाक्य सलग नाहीत. 

‘’ `गोलपिठा' नारायणरावांनीं स्वतःहून छापली. मी ज्या कविता कविता वाचल्या, त्याने नारायणराव एवढे प्रभावित झाले कि त्यांची माझी सलगी नसतानाही ते माझ्याजवळ आले. आस्थेने माझी विचारपूस करुन ''मी तुझा कवितासंग्रह माझ्या प्रकाशनातर्फे छापायला तयार आहे. तुझी तयारी असेल तर उद्या इंडियन एक्सप्रेस टॉवरमध्ये लोकसत्ता कायालयात ये'' .

ते लोकसत्ताच्या साहाय्यक संपादकपदावर होते. एरवी नारायणरावांबद्दल मला माहिती होती. ते प्रजसमाजवादी, संयुक्त समाजवादी या डाव्या पक्षांच्या राजकारणात एकार्थी वाढले. लोकसत्ताच्या नोकरीशिवाय ते नाना उलाढाली करत असत. इंडियन एक्सप्रेस, लोकसत्ता कामगारांची युनियन यांचेही ते मोठं समर्थक आणि सल्लागार मार्गदर्शक होते. त्यांच्या कार्यालयाच्या दैनिकाच्या मालकापासून तो मॅनेजमेंटच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत त्यांची दहशत होती. सर्व कला, साहित्य, राजकारण विषय नारायणरावांचे प्रिय विषय असत. एक नव्या दमाचा, नव्या जाणीवेचा कवी म्हणून माझी कविता त्यांच्या पसंतीला उतरली होती. 

नारायणराव पत्रकारच नव्हे तर राजकीय कार्यकर्ता म्हणून चांगलेच प्रसिद्ध होते. 

मी भीतभीत त्यांच्या कार्यालयात गेलो. त्यांनी जवळची खुर्ची ओढून, जवळ बसवून बोलू लागले. '' या कवितासंग्रहाची रॉयल्टी तुला किती हवी?'' 

यावर मी म्हणालो'' मला रॉयल्टी वगैरेत काही रस नाही.. मी माझ्या मावस बहिणीच्या घरी राहतो. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. माझ्या बहिणीचे झोपडे अतिशय गळते ते गळक्या छतामुळे. त्या गळक्या झोपडीवर मला मेणकापड टाकायचे आहे. तेवढे घेण्यापुरते द्या'' 

ते म्हणाले ``किती देऊ पैसे ?''

मी चारपाचशे रुपयांची मागणी केली आणि हजारभर रुपये त्यांनी लगेच आपल्या सुटकेसमधून काढून माझ्या हातावर टिकवले. 

मो तडक बहिणीच्या घरी म्हणजे एम पी. मिल्सच्या झोपडपट्टीत आलो. मी जाऊन तिच्या हातात आठशे रुपये टेकवले. म्हटलं '' झोपड्यावर मेणकापड घालायचं होतं ना तुला? घाल आता.'' तिला काही काळ गहिवरल्यासारखं झालं. पण ती खुश होती. मी खुश होतो. ‘’ 

हा लेख वाचला आणि मला पत्रकारितेच्या व्यवसायात अतिशय जवळच्या असणाऱ्या नारायण आठवले यांच्या व्यक्तिमत्त्वाचे मला तोपर्यंत माहित नसलेले कितीतरी पैलू ढसाळ यांच्यामुळे मला कळाले .

गोव्यात असताना `गोमंतक'चे संपादक म्हणून आठवले यांनी कोकणी आणि मराठी राज्यभाषा वादात मराठीसाठी खिंड लढवली होती. गोव्यात मूकबधिर मुलांसाठी शाळा उघडण्यास त्यांनी पुढाकार घेतला यास मी साक्षीदार होतो. पण या आधीची ढसाळ यांनी वर्णिलेल्या त्यांच्या 'नाना उलाढालीची' मला काहीच कल्पना नव्हती. 

नंतर नारायण आठवले शिवसेनेच्या तिकिटावर १९९८ साली मुंबईतून लोकसभेवर निवडून गेले. भारतीय संसदेच्या इतिहासात सर्वाधिक कमी काळ म्हणजे केवळ १३ महिन्यांचा कालावधी या लोकसभा सदस्यांना लाभला. या खासदारांमध्ये महाराष्ट्रातील दलितांच्या विविध गटांतील नेते - प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, रा सु गवई, जोगेंद्र कवाडे होते आणि ते काँग्रेसच्या मदतीने रिपब्लिकन पक्षाच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यानंतर आतापर्यंत केवळ रामदास आठवले हे एकमेव खासदार म्हणून टिकून राहिले आहेत !

नारायण आठवले यांच्यासारखे पत्रकार, चळवळ्ये आणि सामाजिक कार्यकर्ते आता नाही आढळत.

आणि ढसाळ यांच्यासारखे लढवय्ये सामाजिक कार्यकर्ते सुद्धा. 

आता इतिहासजमा झालेल्या दलित पँथर संघटनेच्या स्थापनेचा सुवर्णमहोत्सव जुलै महिन्यात सुरु झाला आहे. अनेक प्रागतिक संघटनांनी त्यानिमित्त विविध कार्यक्रम हाती घेतले आहेत. महाराष्ट्रातील किती दैनिकांनी किंवा वृत्त वाहिन्यांनीं दलित पँथरच्या या सुवर्णमहोत्सवी वर्षाची दखल घेतली आहे हे मला माहित नाही. 

लोकसत्ताच्या १८ सप्टेंबरच्या रविवारच्या पुरवणीत जयदेव डोळे यांचा अर्जुन डांगळे लिखित `दलित पँथर अधोरेखित सत्य' वरील पुस्तकाचे परीक्षण आलं आहे. 

इतिहास हा प्रामुख्याने जेत्यांचा असतो असं म्हटलं जातं. तरीदेखील एकेकाळी जीव पणाला लावून लढलेल्या महाराष्ट्रातील असंख्य पँथर्सची यानिमित्त आपण सर्वांनी दखल घ्यायलाच हवी.

 ^^^^

Camil Parkhe
 

Comments

Popular posts from this blog

Dnyanodaya monthly enters 175th year

Shakuntala Paranjape : Crusade of a lifetime

Fr. Rudolf Schoch. A Jesuit Looks back in satisfaction