पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या निवडणुका
उद्या रविवारी पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या निवडणुका आहेत.
निवडणुका होणार आहेत म्हणून बरे वाटले.
पुणे युनियन ऑफ वर्किंग जर्नालिस्टस (Puwj) त निवडणुका मी सुरु केल्या.
मी पुण्यात आलो तेव्हा या संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या व्हायच्या. ही पद्धत बंद व्हावी म्हणून १९९१ आणि ,१९९२ ला मी सलग दोन वर्षे अध्यक्ष आणि इतर पदांसाठी अर्ज भरले. त्यामुळे निवडणूक घ्यावीच लागली.
सहमतीने धोरण सोडून मी सहकारी साखर कारखान्याच्या प्रमाणे निवडणूक लादली म्हणून वरुणराज भिडे यासारखे त्यावेळचे अनेक बुजुर्ग पत्रकार माझ्यावर खवळले होते. (सहकारी साखर कारखाने म्हणजे सर्व दुर्गुणांचा पुतळे अशी भावना फार आधीपासूनच आहे. )
अर्थात निवडणुकीत सपाटून पडलो. पहिल्या वेळेस सकाळ चे राजीव साबडे यांच्याविरुद्ध तेरा मते मिळाली, दुसऱ्या वेळेस सत्तावीस.
तिसऱ्या निवडणुकीत मी आणि पराग रबडे मिळून अख्खे पॅनल निवडून आणले.
गेल्या तीस वर्षांत त्यानंतर आजपर्यंत दुसरी कुणी महिला सरचिटणीस झालीच नाही.
पुण्यात puwj महिला अध्यक्ष तर नाहीच नाही.
त्याआधी मी गोवा युनियन ऑफ जर्नालिस्ट चा आणि औरंगाबाद श्रमिक पत्रकार संघाचा सरचिटणीस होतो.
त्यावेळी कामगार युनियन म्हणून आणि सभासदांच्या हिताची खूप खूप कामे मी केली. पत्रकारांसाठी आरोग्य विमा योजना मी आणि परागने सुरु केली.
मात्र खूप झगडूनसुद्धा ऐंशी वर्षांचा इतिहास असलेल्या या संघाच्या वार्षिक सभेच्या जेवणाचा शाकाहारी सात्विक मेन्यू बदलणे शक्य झाले नाही ही खंत आहेच.
ज स करंदीकर, साथी एस एम जोशी हे पुणे श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष. 'अग्रणी' या नियतकालिकांचा संपादक असलेला नथुराम गोडसे या संघाचा कार्यकारी सभासद होता.
श्रमिक पत्रकार आणि वृत्तपत्र कामगार चळवळीने मला खूप खूप दिले आहे. माझे व्यक्तिमत्त्व या कामगार चळवळीने घडविले. माझा बल्गेरिया इथला पत्रकारितेचा अभ्यासक्रम, रशिया दौरा, काश्मिर, ओडिशा, बंगलोर दिल्ली असे दौरे मी गोवा युनियन ऑफ जर्नालिस्ट (गुज ) चाआणि अखिल भारतीय श्रमिक पत्रकार महासंघाच्या (इंडियन फेडरेशन ऑफ वर्किंग जर्नालिस्टचा) पदाधिकारी म्हणूनच झाले.
पुणे श्रमिक पत्रकार संघाने आणि पत्रकार प्रतिष्ठानने (गोपाळराव पटवर्धन, किरण ठाकूर, मल्हार अरणकल्ले पदाधिकारी असताना ) माझ्या `इंग्रजी मराठी मिडिया डिक्शनरी' (1997) आणि महाराष्ट्र चरित्रकोशासाठी (2000) पैसे पुरवले. माझ्या इतर काही पुस्तकांचे प्रकाशन समारंभ पत्रकार भवनात घडवून आणले.
माझ्याप्रमाणेच अनेक सभासदांना पत्रकार संघाने असेच पाठबळ द्यावे ही अपेक्षा आणि सदिच्छा.
निवडून येणाऱ्या नव्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा सदिच्छा..
Camil Parkhe
Comments
Post a Comment