पुणे ख्रिस्ती साहित्य संघाच्या शुक्रवारी २४ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या मासिक बैठकीत रेव्हरंड सुभाष चांदोरीकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
चांदोरीकर यांचे प्रदीर्घ आजाराने शुक्रवारी सकाळी वयाच्या ७३व्या वर्षी निधन झाले होते.
या प्रसंगी बोलताना रेव्हरंड डॉ. अजितकुमार फरांदे यांनी चांदोरीकरांच्या आगळ्यावेगळ्या धर्मकार्याची, शब्दसेवेची आणि सामाजिक कार्याची प्रशंसा केली.
पुण्यातील भैरोबा नालाशेजारी असलेल्या युनायटेड थिऑलॉजिकल सेमिनरी ऑफ महाराष्ट्र (यू.टी.एस.एम.) येथे अनेक वर्षे प्राध्यापक असलेल्या चांदोरीकरांनी आपल्या धार्मिक कार्याचाच एक भाग म्हणून समाजाच्या विविध दुर्लक्षित घटकांसाठी विशेषतः पुण्यातील बुधवार पेठेतील वेश्यांसाठी समाजकार्य केले असे ते म्हणाले.
चांदोरीकर एक विलक्षण व्यक्तिमत्त्व, समर्पित विद्वान आणि देवाचे विश्वासू सेवक होते असे फरांदे म्हणाले.
``प्राध्यापक म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये ईशज्ञानाची आवड आणि बौद्धिक प्रामाणिकता रुजवली. तसेच एक धर्मगुरू म्हणून त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना ज्ञान आणि करुणेने मार्गदर्शन केले. त्यांचे जीवन हे श्रद्धा आणि तर्क यांच्या सुंदर समन्वयाचे जिवंत उदाहरण होते.
`चांदोरीकरांनी जे शिकवले ते स्वतःच्या जीवनातही जगले आणि यू.टी.एस.एम.च्या परिसरात तसेच पुणे येथील मेथोडिस्ट चर्चमध्ये एक न मिटणारा ठसा उमटवून गेले. समाजातील गरीब, गरजू आणि वंचित लोकांना त्यांनी नेहमी मदतीचा हात दिला,'' असे ते पुढे म्हणाले.
``प्रभु येशू ख्रिस्ताची चांदोरीकरांनी अत्यंत निष्ठेने सेवा केली, प्रभूच्या सान्निध्यात त्यांच्या उदात्त आत्म्यास चिरंतन शांती लाभो अशी त्यांनी प्रार्थना केली. “शाब्बास, चांगल्या आणि विश्वासू सेवका” (संत मॅथ्यू २५:२१ )
या बैठकीला पुणे ख्रिस्ती साहित्य संघाचे अध्यक्ष दीपक अमोलिक, सचिव कामिल पारखे, इतर पदाधिकारी सॅमसन कवडे, डेव्हिड वायदंडे, प्रफुलचंद्र रणावरे आणि दयानंद ठोंबरे उपस्थित होते.
रेव्हरंड अरविंद निर्मळ यांच्यानंतर रेव्हरंड चांदोरीकर यांनी दलित ख्रिस्ती साहित्य चळवळ चालू ठेवली होती.
चांदोरकर यांच्या पुढाकाराने पाचवे दलित ख्रिस्ती साहित्य संमेलन (अध्यक्ष बिशप प्रदीप कांबळे - पुणे २००१), सहावे संमेलन (अध्यक्ष चांदोरीकर, संगमनेर २००४), सातवे संमेलन (अध्यक्ष डॉ. गिलबर्ट लोंढे, नागपूर २००६), आठवे संमेलन (अध्यक्ष वसंत म्हस्के, उदगीर २००८), नववे संमेलन (अध्यक्ष अनुपमा डोंगरे जोशी, श्रीरामपूर २०१२) आणि दहावे संमेलन (अध्यक्ष फादर ज्यो गायकवाड, श्रीरामपूर २०१२) भरवण्यात आली होती.
सुभाष चांदोरीकर यांच्याच आग्रहाने या सर्व अध्यक्षीय भाषणांचे संकलन 'शतकातील मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलने' या कामिल पारखे लिखित पुस्तकात करण्यात आले आहे.
नाशिक येथे सायमन मार्टिन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या २७व्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या आधी हे पुस्तक प्रकाशित झाले, मात्र प्रकृती गंभीर झाल्याने हे पुस्तक चाळणे चांदोरीकरांना शक्य झाले नव्हते.
उषाताई आणि विलास वाघ यांच्या सुगावा प्रकाशनाने चांदोरकरांची काही पुस्तके प्रकाशित केलेली आहेत. `गवंड्यांचे पोर' हे आत्मचरित्र चांदोरीकरांचे अखेरचे प्रकाशित पुस्तक.
शुक्रवारी दुपारी पुणे कॅम्पातील ओल्डहॅम मेमोरियल मेथाडिस्ट चर्चमध्ये रेव्हरंड चांदोरीकरांसाठी अखेरची प्रार्थना करण्यात आली.
या प्रसंगी मुंबई मेथाडिस्ट धर्मप्रांताचे बिशप अनिल सरवंड यांनी मुख्य प्रार्थना केली. रेव्हरंड चंद्रशेखर जाधव, रेव्हरंड जयप्रकाश आढाव, व्ही, जी. डोंगरे वगैरेंनी यावेळी चांदोरीकरांना श्रद्धांजली वाहिली.
चांदोरीकरांच्या कन्या अलका चांदोरीकर यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.
नंतर तळेगाव येथे चांदोरीकर यांच्या पार्थिव देहाला चिरविश्रांती देण्यात आली.
Camil Parkhe
Comments
Post a Comment