‘निरोप्या’चे संपादक फादर प्रभुधर
- Get link
- X
- Other Apps
‘निरोप्या’चे संपादक फादर प्रभुधर
कामिल पारखे
रविवारची मिस्सा संपल्यावर मी माझ्या वडिलांचे बोट धरून चर्चच्या समोरील मोकळ्या जागेत उभा होतो. देवळातून बाहेर पडणारे लोक आपसांत बोलत उभे होते. श्रीरामपूरला अलिकडेच बदली होऊन आलेले ते तरुण धर्मगुरू घोळक्याने उभे असलेल्या लोकांशी बोलत होते. फादर प्रभुधर यांचे व्यक्तिमत्व अगदी देखणे असेच होते. वक्तृत्व शैलीची देणगी लाभलेल्या फादरांच्या ओघवत्या उपदेशांनी लोक प्रभावित होत असत. भरपूर उंचीचे फादर आपल्या पांढऱ्या झग्यात फिरत होते, तसे त्यांना ‘जय ख्रिस्त’ म्हणून अभिवादन करण्यासाठी लोक त्यांच्याकडे वळत होते. आमच्याकडेही ते आले आणि माझ्या वडिलांशी – दादांशी – बोलू लागले.
बोलत असताना मध्येच थांबून माझ्याकडे पाहत त्यांनी विचारले, “पारखे टेलर, तुम्हाला किती मुले आहेत? आणि त्यांच्यामध्ये याचा नंबर कितवा?”
माझ्या वडिलांचे श्रीरामपुरात मुख्य बाजारपेठेत सोनार लेनमध्ये ‘पारखे टेलर्स’ हे टेलरिंगचे दुकान होते. शहरातील दोन-तीन प्रसिद्ध टेलरिंगच्या दुकानांत त्याचा समावेश होता. दिवाळी आणि लगीनसराईच्या हंगामात सात-आठ कारागीर असणारे आमचे दुकान अख्ख्या पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. शुक्रवारच्या आठवडी बाजाराच्या दिवशी आसपासच्या गावातील गिऱ्हाईकांची या दुकानात गर्दी होत असे.
“फादर, हा कामिल माझ्या मुलांमध्ये सर्वांत धाकटा आहे!” दादांनी उत्तर दिले.” तसे असेल तर, पारखे टेलर, हा तुमचा धाकटा मुलगा तुम्ही देवाला द्या!” फादर ताबडतोब उत्तरले.
क्षणाचाही विचार न करता दादा म्हणाले, “जशी परमेश्वराची इच्छा, फादर ! त्याच्या इच्छेप्रमाणे होवो!
त्या काळात अनेक कॅथोलिक भाविक पालकांची आपल्या एकातरी मुलाने वा मुलीने फादर किंवा सिस्टर व्हावे अशी इच्छा असे. तसे पोषक धार्मिक वातावरण घराघरांत असे. त्यामुळे आजकाल प्रत्येक कॅथोलिक कुटुंबात त्यांच्या जवळच्या नात्यातील कुणीतरी फादर वा सिस्टर झालेलो असतोच. पालघर जिल्ह्यातल्या वसई परीसरात आणि गोव्यातील कॅथोलिक समाजातही असेच आढळते. त्या दोघांचे संभाषण मी ऐकत होतो. ते बोलणे माझ्याविषयी असले तरी दोघांपैकी एकानेही त्यासंदर्भात माझे काय मत आहे हे विचारले नव्हते.
ही घटना असेल १९७२ ची. त्यावेळी मी सातवी-आठवीला असेल. नुकतीच गुरुदीक्षा होऊन फादर प्रभुधर श्रीरामपूरला सहाय्यक धर्मगुरू म्हणून नेमणूक होऊन आले होते. फादर प्रभुधर हे मूळचे काँस्टंशियो किंवा कुस्तास द्रागो. बेळगावजवळील संती बस्तवाड येथे त्यांचा जन्म १ ऑगस्ट १९३६ साली झाला. लहानपणी गाईच्या शिंगांमुळे इजा झाल्याने त्यांना आपला दावा डोळा कायमचा गमवावा लागला होता. मात्र त्या बुबळात काचेचा कुत्रिम डोळा आहे हे इतरांना कळतही नसे. धर्मगुरूपदासाठी शिक्षण घेण्यासाठी काही काळ त्यांनी पोस्ट खात्यात पोस्टमन म्हणून नोकरी केली होती. सन १९६९ साली त्यांची गुरुदीक्षा झाली.
फादर प्रभुधर हे कोकणीभाषक बार्देस्कर समाजाचे म्हणजे मूळचे गोव्यातील बार्देस तालुक्यातील. बार्देस्कर समाज हा सतराव्या-अठराव्या शतकांत गोवा सोडून महाराष्ट्राच्या आणि कर्नाटकाच्या सीमाभागांत स्थायिक झालेला. मूळचे गोवन असल्याने कोकणी तर त्यांची मातृभाषा. बेळगावजवळ संतीबस्तवाड येथे घर असल्याने फादर प्रभुधर यांचे मराठी आणि कन्नड या भाषांवर प्रभुत्व होते. त्यामुळेच येशूसंघ किंवा सोसायटी ऑफ जिझस (जेसुइट) या त्यांच्या धर्मगुरूंच्या संस्थेने त्यांची ‘निरोप्या’ या मराठी मासिकाचे संपादक म्हणून नेमणूक केली होती. अहमदनगर जिल्ह्यात राहुरीपाशी केदळ या खेडयात १९०३ साली फादर हेन्री डोरींग या जर्मन धर्मगुरूने ‘निरोप्या’ हे मराठी मासिक सुरू केले होते. जेसुइट संस्थेतर्फे गेले शंभर वर्षे हे मासिक चालविले जात आहे. आज पुण्यातून स्नेहसदन संस्थेतून प्रसिद्ध होणाऱ्या ‘निरोप्या’ चा काही मोजक्या शतायुषी मराठी नियतकालिकांमध्ये समावेश होतो.
जानेवारी १९७१ ला फादर प्रभुधर यांनी ‘निरोप्या’चे संपादक म्हणून सूत्रे हाती घेतली. त्यांच्याआधी योसेफ स्टार्क हे ‘निरोप्या’चे बावीस वर्षे संपादक होते.फादर प्रभुधर हे `निरोप्या’चे ते दुसरे भारतीय संपादक. रेजिनाल्ड गोन्सालवीस हे भारतीय धर्मगुरु काही काळ निरोप्याचे संपादक होते. फादर प्रभुधर आपल्या पहिल्या संपादकियात लिहितात: ”जवळ जवळ दोन’तपांच्या अमोल सेवेनंतर निरोप्या’चे संपादक फादर योसेफ स्टार्क आमची रजा घेत आहेत. ‘निरोप्या’ने आपल्या जीवनाचे अर्धे आयुष्य त्यांच्या हाताखाली घालविले आहे. महायुद्धाच्या आणि अवमूलनाच्या कठिण परिस्थितीत त्यांनी ‘निरोप्या’ समर्थपणे सांभाळला. साऱ्यांनाच ”वांछिले ते ते लाहो’ हा मंत्र जपणाऱ्या या व्यक्तीच्या सेवेने ‘निरोप्या’ पुनीत झाला आहे. परदेशातून यावे, येथील भाषा शिकावी आणि या भाषेत एखादे मासिक २२ वर्षे चालवावे यालाच मिशनरी डिवोशन म्हणतात, नाही?”
’निरोप्या’ या मासिकाचे संपादक झाल्यावर फादर प्रभुधर दर अंकात ख्रिस्ती धर्मविषयक आणि बायबलसंबंधी एक शब्दकोडे छापित असत, या शब्दकोड्यांची बरोबर उत्तरे देणाऱ्यांची नावे ते प्रकाशित करत असत. अनेकदा सर्व उत्तरे बरोबर देणारे कुणीच नसत. मग फादर फक्त एक क़िवा दोनच चुकीची उत्तरे देणाऱ्यांची नावे छापत असत. अशाच लोकांबरोबर तेव्हा पहिल्यांदाच माझे नाव ’निरोप्या’त छापून आले. निरोप्या’चे आणि माझे असे अगदी शालेय जीवनापासूनचे नाते आहे. आज मी पूर्णवेळ पत्रकार आणि लेखक म्हणून कार्यरत आहे याचे बीज फादर प्रभुधर यांनी ’निरोप्या’च्या माध्यमातून माझ्यामधे रुजवले होते.
फादरांनी श्रीरामपूर धर्मग्रामातील भाविकांसाठी भरवलेले शुक्रवार ते रविवार असे तीन दिवसांचे ते अध्यात्मिक तप किंवा स्पिरिच्युअल रिट्रीट माझ्या आजही स्मरणात आहे. बाई आणि दादांबरोबर त्यावेळी सहावी किंवा सातवीला असलेलो मीही त्या तपात सहभागी झालो होतो. दुसऱ्या व्हॅटिकन परिषदेने आणलेल्या सुधारणानंतरचा तो काळ होता. भाविकांसाठी तप आयोजित करताना नामजपाचे विविध प्रकार ते हाताळत असत. उदाहरणार्थ, ‘ओम भगवान, ओम भगवान, प्रभू ख्रिस्त भगवान !’ या नामजपात एकच ओळ किंवा पद पेटी आणि तबल्याच्या सुरांत लागोपाठ कितीतरी वेळ गायले जायचे. आणि तरीसुद्धा हा नामजप कंटाळवाणा होत नसायचा याचे मला नवल वाटायचे.
त्यावेळी आमचे कॅटेकिस्ट किंवा धर्ममास्तर असलेले आढाव मास्तर `उत्पादकातम्या येवोनि सज्जना भेट प्रेमाने” या गायनाने प्रत्येक प्रवचनाची पुर्वतयारी करायचे. (त्यामुळे हे भलेमोठे गायन आजही मला तोंडपाठ आहे.) तपाच्यावेळी आपल्या प्रवचनांत फादर प्रभुधरांनी सांगितलेल्या काही मुद्द्यांनी माझ्या काही बायबलमधून आलेल्या काही श्रध्दांना एकदम सुरुंगच लावला. यातील एक मुद्दा म्हणजे बायबलमधील उत्पत्तीच्या पुस्तकातील आदाम आणि इव्ह या आदिमानवांच्या निर्मितीची कथा शब्दश: खरी आहे असे मानू नये ! देवाने मातीचा गोळा करुन त्यात प्राण फुंकला आणि आदामाची निर्मिती झाली आणि आदामाला गाढ झोप लावून त्याची एक फासळी काढून त्यापासून त्याला जोडीदारीण म्हणून ईव्ह हिची निर्मिती केली असे बायबलमध्ये उत्पत्ती या पहिल्या पुस्तकात लिहिले असले तरी त्यावर विश्वास ठेवू नका, असे सांगून फादर प्रभुधरांनी माझ्या कोवळ्या भाविक मनावर एक मोठा बॉम्बगोळाच टाकला होता.
आदाम आणि ईव्ह यांच्या निर्मितीची ही कथा खूप शतकांपूर्वी लोकांनां सांगितली असली तरी देव हा सृष्टीचा निर्माता आहे हे त्याकाळच्या भाबड्या लोकांवर ठसविण्यासाठी ती कथा रचण्यात आली. या विज्ञानयुगात आपण या कथेकडे केवळ प्रतीकात्मकदृष्ट्या पाहायला हवे असे सांगून माझी आणि इतरांची एकदम ढासळलेली श्रद्धा त्यांनी एकप्रकारे खुंटा हलवून पुन्हा मजबूत केली होती.
फादर प्रभुधर यांनी यावेळी टाकलेला दुसरा बाँबगोळा म्हणजे उत्पत्ती हे बायबलच्या जुन्या करारातील पहिले पुस्तक असले तरी दोन हजार वर्षांपूवी लिहिलेल्या या जुन्या करारातील विविध पुस्तकांमधील ते सर्वांत शेवटी लिहिलेले पुस्तक असू शकते !
या घटनेआधी आणि नंतरही फादर प्रभुधर यांनी शालेय मुलांसाठी आयोजित केलेल्या विविध शिबिरांत मी सहभागी झालो होतो. आम्हा मुलांसाठी आयोजित केलेल्या शिबिरात फादर टाळ हातात घेऊन कीर्तने करत असत. भारूड गाताना नाचत असत. ख्रिस्ताचे सरदार, आम्ही तर येशूचे सरदार हे स. ना. सूर्यवंशीचे गीत म्हणत त्यावेळी ढोल-ताशांच्या तालावर आम्ही कवायत करत असू.
या शिबिरांतील फादरांची व्याख्याने, सांस्कृतिक आणि इतर कार्यक्रमांमुळे फादरांच्या व्यक्तिमत्वाचा माझ्यावर खूप प्रभाव पडला होता. पौगंडावस्थेत असलेल्या आम्हा मुलांना शिबिरांत शिकवताना स्वप्नदोष वा झोपेत वीर्यस्खलन होणे अगदी नैसर्गिक आहे, त्याबाबत कुणी अपराधीपणाची किंवा पाप केल्याची भावना बाळगू नये असे त्यांनी सांगितल्याचे आजही आठवते. स्वप्नदोष म्हणजे एकप्रकारचा कॅथर्सिस आहे, कॅथर्सिस म्हणजे निचरा होणे असे म्हणाले होते. अशा प्रकारचे लैंगिग शिक्षण त्याकाळात आम्हाला पहिल्यांदा मिळाले. बायबलमध्ये मारिया गाब्रिएल देवदूताला सांगते कि आतापर्यंत कुणाही पुरुषाला मी जाणिले नाही. येथे ‘जाणिले’ किंवा to know हा वाक्प्रचार `शरीरसंबंध ठेवणे’ या अर्थाने वापरला आहे असेही त्यांनी सांगितल्यामुळे मला पहिल्यांदा समजले.
हरेगावच्या सेंट तेरेजा स्कुलच्या बोर्डिंगमध्ये फादर हुबर्ट सिक्स्ट, फादर रिचर्ड वासरर, फादर बेन्झ वगैरे पारंपारिक युरोपियन फादरांच्या तालमीत कॅथेखिसम म्हणजे धर्मशास्त्राची शिकवण घेतलेल्या मला हे विचार खूपच प्रागतिक वाटले. महाराष्ट्र आणि कर्नाटक आणि मर्यादित अर्थाने गोव्याच्याही सीमेवर असलेल्या बेळगावीजवळच्या संतीबस्तवाड गावातून येणाऱ्या या फादरांचे मराठीवरचे प्रभुत्व आणि वकर्तृत्वशैली माझ्या बालमनाला खूपच प्रभावित करुन गेली.
त्यानंतर एकदोन वर्षांतच फादरांची बदली कराडला झाली. ‘विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर’ या नात्याने त्यांच्याबरोबर ‘निरोप्या’चे कार्यालयही कराडला गेले. त्यानंतर मी पोस्टाने कराडला ‘निरोप्या’साठी छोटेसे लेख पाठवू लागलो आणि फादर प्रभुधर ते लेख प्रसिद्ध करू लागले. त्याकाळात लेखाबरोबर प्रसिद्ध होणाऱ्या नावाला बायलाईन म्हणतात हे मला माहित नव्हते. काही वर्षांनी पत्रकार झाल्यावर ते कळाले.
दहावीची परीक्षा दिल्यानंतर मी निकालाची वाट पाहत होतो. त्याचप्रमाणे भविष्याचाही वेध घेणे चालू होते. माझ्या मनात घोळत असलेल्या विचाराबाबत फादर प्रभुधर यांना पोस्टकार्डाने कळवले होते. खूप दिवस वाट पाहून त्यांचे काहीच उत्तर न आल्याने मग पुण्याचे बिशप विल्यम गोम्स यांच्याही नावाने त्याच आशयाचे पोस्टकार्ड लिहिले. पण बिशपांचेही काही उत्तर नाही आले. नंतर अचानक फादर प्रभुधर यांचे कराडहून आमच्या पारखे टेलर्स या दुकानाच्या पत्त्यावर निळ्या रंगाचे अंतर्देशीय पत्र आले. माझ्या नावाने येणारे ते पहिलेच पत्र. साहजिकच ते दादांच्या हातात पडले आणि ते फोडून आणि वाचून त्यांना मी घेतलेल्या निर्णयाची कल्पना आली.
या पत्रात फादरांनी लिहिले होते:
”प्रिय कामू, सप्रेम आशीर्वाद,
तुझे पत्र मिळाले. .. तुझ्याबाबत माझा विचार असा आहे. तू माझ्याजवळ कराडला दोन वर्षे राहावे. हायर सेकंडरीचा अभ्यास करावा. तोपर्यंत इंग्रजी पक्की करून घेऊ. ‘निरोप्या’चे थोडेफार काम करता येईल. भरपूर वाचन करता येईल. लिखाण करण्यास शिकता येईल. बरोबर आपले डॉमनिक, संतान वगैरे चार मुले आहेतच. हायर सेकंडरी संपल्यावर तुला फादर होण्यासाठी जाता येईल. तरी आपल्या आईवडिलांच्या संमतीने आपला विचार पक्का करून ठेवावा आणि एसएससी रिझल्टची वाट बघत राहावे. तोपर्यंत मी आमच्या अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन ठेवतो. ”
जून महिन्याचा पहिला आठवडा असेल, दहावीची परीक्षा देऊन निकालाची मी वाट पाहत होतो. एके सकाळी श्रीरामपुरातील आमच्या घरासमोर जीप उभी राहिली. त्यातून फादर प्रभुधर खाली उतरले. ‘’कामिल कराडला निघायचे आहे, लगेच तयारी करून ठेव’’, एवढे मला आणि माझ्या आईवडिलांना सांगून ते गेलेसुद्धा . काही वेळानंतर ते परत आले तेव्हा मी माझे कपडे एका पेटीत कोंबून तयार होतो. सामानाने आणि लोकांनी गच्च भरलेल्या जीपमध्ये अगदी मागे मी बसलो होतो. घोडेगाव आणि शेवगाव मिशन केंद्रावर काही कामानिमित्त थांबून आम्ही मग कराडच्या दिशेवे प्रवास करू लागलो. वयाच्या सोळाव्या वर्षी येशूसंघीय धर्मगुरू, संन्यासी होण्यासाठी मी माझे घर, आईवडील, भाऊबहिणी सोडून बाहेर पडलो होतो. माझे घर आणि कुटुंब मी सोडले ते जवळजवळ कायमचेच.
कराडला कार्वे नाका येथे असलेल्या आपल्या भाडोत्री निवासस्थानाला फादरांनी पुण्यातील फादर मॅथ्यू लेदर्ले यांच्या ‘स्नेहसदन’च्या धर्तीवर स्नेहसदन आश्रम असे नाव दिले होते. पुण्यातील स्नेहसदनच्या धर्तीवर इथलीही जीवनशैली आणि आहारपद्धत होती. फादर मांडी घालून, खांद्यावर शाल पांघरून मिस्सा म्हणत. माझ्याबरोबर डॉमिनिक फर्नांडिस, संतान लोबो उर्फ संताजी, प्रल्हाद बनसोडे, ओहोळ कैतान वगैरे तरुणमंडळी राहत होती. बाराही महिने आमचा आहार शुद्ध शाकाहारी होता. विशेष म्हणजे आम्हापैकी प्रत्येक तरुणाला आठवड्यातील एक दिवस एकट्याने क्वचित दुसऱ्याच्या मदतीने सर्वांसाठी स्वयंपाक करण्याची जबाबदारी असे. अगदी सकाळी दूध तापवून दही लावण्यापासून! फादर प्रभुधर स्वतः रविवारी सर्वांसाठी जेवण बबवत, त्यादिवशी मग पूर्ण आठवड्यासाठी ते चटणी बनवत, हिरव्या मिरच्यांचे, वांग्यांचे किंवा लिंबाचे लोणचे बनवून ठेवत. आम्ही सर्व जण त्यांच्या हाताखाली राबत, कांदे कापत, नारळ सोलत आणि किसत, स्वयंपाकाचे धडे घेत असू. त्याकाळी फादरांनी कराडला फातिमा सिस्टरांच्या शाळेच्या इमारतीचे बांधकाम हाती घेतले होते. कराडमधील टिळक हायस्कुलात शिकतानाच या बांधकामातसुद्धा मी सहभागी होत असे. श्रमाच्या प्रतिष्ठेचे आमच्या मनात त्याचवेळी बिबवले गेले.
उन्हाळयात आम्ही सर्व जण गच्चीवर झोपायचो तेव्हा झोपण्याआधी फादर आपल्या बुबळातून तो कुत्रिम, काचेचा डोळा काढून पाणी असलेल्या एका ग्लासात ठेवत. सकाळी उठल्यावर तो साफ करुन पुन्हा बुबळ्याच्या मोकळ्या खाचेत ठेवत असत.
कराडला मी अकरावीला होतो तरी सारखा अभ्यास करत नसायचो. ''पुस्तकी किडा किंवा शिक्षणात टॉपर असलेले लोक आयुष्यात फार काही कमावतात असे नाही. त्याऐवजी जीवनाच्या सर्व क्षेत्रांत रस घ्यावा आणि त्यांत पारंगत व्हावे, ऑल-राऊंडर व्हावे हे बरे. तसेच खूपच धार्मिक असणारी म्हणजे सतत प्रार्थना करणारी तरुण फादर होतीलच असे नसते,'' असे फादर म्हणायचे. दुसरे वाक्य तंतोतंत खरे होते याचा मी नंतर अनुभव घेतला.
याच काळात या फातिमा स्कुलला कराडच्या खासदार प्रेमलाकाकी चव्हाण यांनी एकदोनदा भेट दिली होती. नंतर केंद्रिय मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनलेले प्रेमलाकाकी चव्हाणचे चिरंजीव पृथ्वीराज चव्हाण तेव्हा राजकारणातही नव्हते. आपल्या जीपमध्ये पुढल्या सिटवर बसून येणाऱया, पांढरीशुभ्र साडी नेसलेल्या आणि सफेद केशसंभार असलेल्या डोक्यावरुन पदर घेणाऱ्या प्रेमलाकाकी मला आजही आठवतात.
त्याकाळी फादरांनी कराडला फातिमा सिस्टरांच्या शाळेच्या इमारतीचे बांधकाम हाती घेतले होते. कराडमधील टिळक हायस्कुलात शिकतानाच या बांधकामातसुद्धा मी सहभागी होत असे. श्रमाच्या प्रतिष्ठेचे आमच्या मनात त्याचवेळी बिबवले गेले.
अकरावीची
परीक्षा दिल्यानंतर सुट्टीला घरी पाठविण्याऐवजी फादरांनी मला फातिमा स्कुलच्या बांधकामावर
ठेवले. झालेल्या विटांच्या आणि काँक्रिटच्या बांधकामावर पाईपने पाणी फिरवायचे म्हणजे
क्युरिंग करण्याचे काम मला दिले होते. एक दिवस
नुकतेच स्लॅब पडलेल्या पहिल्या मजल्यावर पाणी टाकून तेथली विद्युत वायर तेथून हलवण्यासाठी
मी उचलली आणि काय झाले ते मला कळालेच नाही. दुसऱ्या क्षणाला मी पहिल्या मजल्यावरुन
खाली फेकला गेला होतो. पाण्यात मला विजेचा धक्का बसला होता. मी खाली पडलो अन आजूबाजूला
बांधकामावर असलेल्या कामगार महिला जोरजोराने
ओरडू, रडू लागल्या. जमिनीवर असलेल्या वाळूच्या
ढिगाऱ्यावर मी पडलो होतो आणि तेथून तीनचार फुटांच्या अंतरावर वर टोक असलेल्या बांधकामाच्या
जाडजूड लोखंडी सळया होत्या. थोड्याशा अंतराने मी वाचलो होतो नाहीतर वरुन पडल्यावर त्या
लोखंडी सळया शरीरात खुपसून मी शरपर्जरी भीष्म झालो असतो ! त्या रडणाऱ्या बाया आणि इतर
पुरुष कामगार माझ्याजवळ येऊन मला काही दुखापत झाली का, एखादे हाड मोडले का, हे माझ्या
अंगाला हात लावून, मला उभे करुन तपासत होते. माझ्याविषयी काहीही माहिती नसणाऱ्या त्या
कामगार बायांचे रडणे मात्र चालूच होते. मी अगदी आश्चर्यकारकरीत्या वाचलो होतो हे त्यांच्या
लक्षात आले होते.
संध्याकाळी फादर प्रभुधर यांना हे सर्व कळाले आणि त्यांना काय वाटले कुणास ठाऊक. मात्र दोन दिवसानंतर मला कराडहून श्रीरामपूरला त्यांनी दहा दिवसांच्या सुट्टीवर पाठवले. गोव्यातील पणजी येथे जेसुइट्स संस्थेतर्फे पुढच्या जून महिन्यात सुरु होणाऱ्या प्री-नोव्हिशिएटमध्ये मी दाखल होणार होतो.
कामाच्या व्यापात वेळ काढून फादर निरोप्याच्या संपादकाची जबाबदारीही सांभाळत होते. फादर प्रभुधर यांनी 1971 च्या जानेवारीत ’ निरोप्या ’चे संपादक म्हणून सूत्रे हाती घेईपर्यंत हे मासिक केवळ अहमदनगर, औरंगाबाद आणि नाशिक जिल्ह्यातील ख्रिस्ती समाजापुरतेच मर्यादित राहिले होते. फादर प्रभुधर यांनी पुण्यातील डी नोबिली कॉलेजात तत्त्वज्ञान शिकणाऱ्या ब्रदरांना एकदोन वर्षांसाठी सहाय्यक संपादक म्हणून नेमणूक करून त्यांना लिहिते केले. हे सर्व ब्रदर पालघर जिल्ह्यातील वसई परिसरातील होते आणि त्यामुळे तेव्हापासून ’निरोप्या’ अहमदनगर आणि पुणे जिल्ह्याची हद्द पार करून वसईतील वाचकांपर्यंत पोहोचला.
निरोप्या’संपादक या पदाची धुरा फादर प्रभुधर यांनी घेतली आणि श्रीरामपूर, पुणे, कराड आणि नंतर कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तेथून त्यांनी जवळजवळ दीड दशके वाहिली. या काळात हे मासिक प्रत्येक ख्रिस्ती कुटुंबात वाचले जाईल यासाठी त्यांनी प्रयत्न केले. १९७०च्या दशकात अनेक ख्रिस्ती घरात निरोप्या आणि सत्यवान नामदेव सूर्यवंशी यांचे आपण हे साप्ताहिक हमखास असे. लेखणीने या दोन्ही संपादकांनी आपल्या वाचकांची मने जिंकली होती.
अहमदनगर जिल्ह्यातील फादर प्रभूधरांचे वास्तव्य आणि कार्यकाळ १९७०च्या दशकात केवळ चारपाच वर्षाचा होता. मात्र या कालावधीत त्यांनी केलेले सामाजिक आणि धार्मिक कार्य आजही येथील लोकांच्या चांगले समरणात आहे. मुलांसाठी, तरुणांसाठी आणि इतरांसाठी फादरांनी आयोजित केलेले तीन-चार दिवसांचे तप असेच समरणीय होते. आपल्याबरोबर असलेल्या संताजी लोबो आणि इतर तरुणांच्या मदतीने जीपमध्ये प्रवास करत प्रोजेक्तरच्या सहाय्याने फादर विविध धार्मिक चित्रपट दाखवत असत. रेडिओशिवाय इतर करमणुकीची साधने नसलेल्या त्या काळात फादरांच्या या कार्यक्रमाला तुफान गर्दी होत असे.
भरपूर उंची लाभलेल्या फादरांचे व्यक्तिमत्व अत्यंत आकर्षक आणि देखणे होते. कन्नड, कोकणी, मराठी आणि इंग्रजी भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. आपल्या प्रवचनातून विविध गहन धार्मिक विषय सोप्या भाषेत ते भाविकांना समजावून सांगत असत. ख्रिस्ती चर्चच्या सांस्कृतिकरणाबाबत फादर प्रभुधरांची मते पुण्यातील स्नेहसदनचे संस्थापक फादर मॅथ्यू लेदर्ले यांच्यासारखी होती. माझ्या मोठ्या बहिणीचे फादर प्रभुधर यांनी लग्न लावले तेव्हा उपनिषदातील ‘तमसो मा ज्योतिर्गमय हा श्लोक गाऊन त्यांनी लग्नविधीची सांगता केली होती, हे मला आठवते.
आजऱ्यात असताना फादरांनी ‘आपण’ या एकेकाळी गाजलेल्या साप्ताहिकाचे संपादक, लेखक आणि कीर्तनकार सत्यवान नामदेव सूर्यवंशी सूर्यवंशींना या परिसरात खास कीर्तने करण्यासाठी बोलावून घेतले होते. कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि कर्नाटकातील बेळगावी जिल्ह्यांत स्थायिक झालेल्या बार्देसकर ख्रिस्ती लोकांमध्ये या काळात सूर्यवंशींनी अनेक कीर्तने केली. या कालावधीत त्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळाला. यानंतर अशाप्रकारची लागोपाठ कीर्तने करण्याची सूर्यवंशींनां संधी मिळाली, इतका लोभ आणि मानसन्मान त्यानंतर परत कधी मिळाला असेल असे मला वाटत नाही. याकाळात सूर्यवंशींनी ‘निरोप्या’ मासिकात लिहिलेली लेखमाला वाचायला हवी. या जवळजवळ महिन्याभरात फादरांनी सूर्यवंशींच्या दिमतीला आपली जीप दिली होती आणि या काळात स्वतः मात्र एसटी बसने प्रवास करत होते.
आजरा या गावी बदली झाल्यानंतर फादर प्रभुधर स्थानिक बार्देस्कर समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक उन्नतीसाठी अनेक प्रकल्प राबविले. या काळात त्यांनी अनेक संस्था स्थापण्यात पुढाकार घेतला. वराहपालनासारखा अपरंपरागत व्यवसाय त्यांनी आजरा परिसरात सुरु केला आणि तेथील पोसलेली मोठी, पांढरी डुकरे गोव्यात विकून स्थानिक लोकांना उत्पन्नाचे साधन मिळवून दिले. फादरांचा कामाचा झपाटा त्यांची ऊर्जा आणि उत्साह अगदी तरुणांनाही थक्क करणारा असे.
येशूसंघीय गोवा – पुणे – बेळगाव धर्मप्रांताचे विभाजन झाल्यानंतर फादरांनी गोवा-बेळगाव प्रांताची निवड केली. बेळगावी जिल्ह्यातील सौंदत्ती या गावात स्थायिक झाले आणि त्यानंतर त्यांचा अहमदनगर पुणे परिसरातील ख्रिस्ती लोकांशी संपर्क कमी झाला. याच काळात कर्नाटकातील लोकांमध्ये लिंगायत समाजात कार्य करताना फादर प्रभुधर स्वामी प्रभुधर झाले आणि त्यांनी ख्रिस्ती धर्मगुरूंच्या नेहमीच्या सफेद झग्याच्या ऐवजी भगव्या वस्त्रांचा म्हणजे भगवी लुंगी, भगवा कुर्ता आणि भगवे पागोटे या पेहेरावाचा स्वीकार केला तो कायमचाच.
पुणे – अहमदनगर परिसरातील कार्य करणारे, नंतर कराड आणि आजऱ्यात कार्यरत असणारे आणि निरोऱ्याचे संपादक असणारे आणि अखेरीस स्वामी म्हणून मिशनसेवा करणारे अशी फादरांच्या आयुष्याची तीन पर्वत विभागणी करावी लागेल. या तीन पर्वात आपल्या संपर्कात असणाऱ्या लोकांची मने फादरांनी जिंकली. आयुष्याच्या अखेरीपर्यंत स्वामी प्रभुधर इतरांसाठी झटत होते. एकामागून एक प्रकल्पाची आखणी आणि अंमलबजावणी करत होते. काही वर्षांपूर्वी ‘झपाटलेले झाड’ या शीर्षकाचे त्यांचे चरित्र किसनराव कुराडे पाटील यांनी लिहिले होते. मात्र त्यात त्यांच्या १९७० च्या आणि १९८० च्या दशकातील कार्याचा आणि ‘निरोप्या’चे चे संपादक म्हणून त्यांच्या कार्याची फारशी माहिती नाही.
फादर प्रभुधरांना प्रगल्भ बुद्धिमत्ता लाभली होती. ते एक उत्तम वक्ते होते. ओघवल्या शैलीत लिखाण करण्याचे त्यांना वरदान लाभले होते. हे त्यांचे केवळ एक पानभर असलेल्या निरोप्याचे संपादकीय वाचल्यावर लक्षात येते. कराडला असताना कॉटवर पडून ते मला संपादकीय डिक्टेट करत असत. तेव्हा एकदा लिहून झाल्यानंतर त्यात बदल करण्याची त्यांना गरज भासत नसे. इतके त्यांचे विचार अगदी स्पष्ट असत. निरोप्याचे संपादक असताना त्यांनी माझ्यासारख्या अनेकांना लिहिण्यासाठी उत्तेजन दिले. प्रागचा बाळ येशू सारखी संशोधनात्मक पुस्तके ओघवल्या शैलीत त्यांनी लिहिली आहेत.
एक धर्मगुरू म्हणून फादर प्रभुधरांनी अनेक तरुणांना येशू ख्रिस्ताकडे आकर्षित केले. त्यापैकी काही मोजकीच मंडळी धर्मगुरू झाली हे खरेच. मात्र आपल्या कार्याने आणि वर्तनाने फादरांनी हजारो व्यक्तींना प्रभावित केले. त्यांचे व्यक्तिमत्व आणि आयुष्य घडविण्यास प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या हातभार लावला होता. माझ्या आयुष्यातील ते माझे पहिले गॉडफादर ! त्यांच्यामुळे माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. त्यांच्या प्रभावामुळे मी धर्मगुरु व्हायला निघालो होतो आणि गोव्यात येऊन अखेरीस पत्रकार बनलो. लेखणीचे वरदानही फादर प्रभुधर यांच्यामुळे मला मिळाले.
नवहिंद टाइम्समध्ये बातमीदार म्हणून रुजू झाल्यावर एकदोन वर्षांतच फादर प्रभुधर यांच्यावर लेख लिहिण्याची संधी मिळाली. संत फ्रान्सिस झेव्हिअर यांच्या ३ डिसेंबरच्या फेस्तानिमित्त ओल्ड गोव्याला मी माझ्या बहिणीकडे गेलो होतो. तेथे आजरा आणि शेजारच्या परिसरातील भाविकांसह पायी चालत म्हणजे वारी करत आलेल्या फादर प्रभुधर यांना मी भेटलो. चालण्यासाठी त्यांनी हातात काठी घेतली होती आणि चालूनचालून फोड आलेल्या तळपायांनां त्यांनी कापड गुंडाळले होते. `देअर वे ऑफ रिचिंग हिम’ या शिर्षकाची बातमी त्यावेळी नवहिंद टाइम्सने ‘ कामिल पारखे’ या बायलाईनसह म्हणजे नावानिशी छापली होती.
कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, वाटंगी, इचलकरंजी या परीसरातील मूळचे गोवन असलेले बार्देस्कर भाविक गोयंच्या सायबाच्या फेस्ताला दरवर्षी तीनचार दिवस चालून येतात. वाटेत प्रार्थना म्हणत, भजने आणि गायने गात ते चालत जातात. काळात फादर प्रभुधर यांनी सुरु केलेली आजरा (कोल्हापूर)- ओल्ड गोवा वारीची परंपरा आजही चालू आहे.
फादर प्रभुधर यांनी धर्मगुरू म्हणून पुणे, अहमदनगर व नाशिक शहरात कार्य करणे निवडले असते, तर ते अनेक येशूसंघीय शाळांचे प्रिंसिपल झाले असते. शहरातील आरामदायक जीवन जपणे त्यांना शक्य झाले असते. मात्र त्यांनी श्रीरामपूर, कराड आजरा, सौंदत्ती सारख्या ठिकाणी मिशनरी जीवन जगणे स्वीकारले. त्यासाठी अनेक हाल सहन केले. अनेकदा मानहानीला त्यांना सामोरे जावे लागले. मात्र जीवनाच्या अखेरीपर्यंत फादर प्रभुधरांची कार्य करण्याची जिद्द कायम होती. धर्मगुरू म्हणून ४६ वर्षे त्यांनी तीन वेगवेगळ्या परिसरात आणि अगदी भिन्न सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या समाजात कार्य केले. त्यांचा उमेदीचा काळ पुणे-अहमदनगर जिल्ह्यात मराठी भाषक समाजात होता. कोल्हापूर जिल्ह्यात त्यांनी मूळचे गोमंतकीय असलेल्या कोकणी बोलणाऱ्या बार्देस्कर समाजात कार्य केले. अखेरच्या काळात ते कर्नाटकात कन्नड बोलणाऱ्या समाजात मिशनरी म्हणून कार्यरत होते. इतक्या भिन्न स्वरूपाच्या समाजात कार्य करण्याची संधी कुणाही धर्मगुरूला इतकेच काय कुणाही व्यक्तीला क्वचितच मिळते. फादर प्रभुधर यांना हे भाग्य लाभले आणि त्यांनी या संधीचे सोने केले.
बेळगावी येथे या कर्मयोगी मिशनरीचे २७ जुलै २०१५ ला निधन झाले. दुसऱ्या दिवशी या धर्मगुरूला अंतिम निरोप देण्यासाठी गोवा, पुणे, बेळगावी वगैरे धर्मप्रांतांतील अनेक लोक साश्रू नयनांनी उपस्थित होते.
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment