भव्य दिव्य सेंट पिटर स्क्वेअर

 

भव्य दिव्य सेंट पिटर स्क्वेअर


 को वाडीस?

बायबलमध्ये एक कथा आहे. येशू ख्रिस्त आपल्या खांद्यावर क्रूस घेऊन जातो आहे आणि त्यावेळेस आपल्या  होणाऱ्या छळापासून  सुटका घेण्यासाठी रोममधून पळ काढणाऱ्या सेंट पिटरची  त्याची गाठ पडते. रोमकडे निघालेल्या आपल्या प्रभूला पाहून पिटर थक्क होतो. ''दोमिनी,  को वाडीस ?''  'प्रभूं, तू कुठे चाललास ? असे तो विचारतो. ''मी पुन्हा एकदा क्रुसावर मरायला निघालो आहे!''  येशू आपल्या सर्वात लाडक्या शिष्याला सांगतो आणि सेंट पिटरला आपली चूक समजते. येशू ख्रिस्ताच्या अनुयायांची रोममध्ये होणाऱ्या छळाची पर्वा न करता तो माघारी वळतो आणि रोमन साम्राज्याच्या या राजधानीत तो हौतात्म्य कवटाळतो. 

लॅटिन  भाषेतील 'को वाडीस'  (कुठे निघालास?) हा वाक्प्रचार त्यातील गर्भित आशयामुळे अनेक भाषांत रुढ झाला आहे. (बायबलमधील जुना  करार हिब्रू भाषेत तर नवा करार ग्रीक भाषेत आहे. नंतरच्या काळात बायबलची आणि चर्चची अधिकृत भाषा लॅटिन बनली.) सेंट पिटरने आणि इतर अनेक ख्रिस्ती लोकांनी रोममध्ये हौतात्म्य  स्वीकारल्यानंतर अचानक बदल झाला आणि रोमन सम्राटानेच ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यामुळे रोमन साम्राज्याचा हा अधिकृत धर्म बनला ! यापुढचा इतिहास सर्वांना ठाऊक आहेच.  जेरुसलेम व इस्राएल या येशू ख्रिस्ताच्या कर्मभूमीपेक्षा रोमला अधिक महत्त्व आले. रोम किंवा व्हॅटिकन सिटी ख्रिस्ती धर्माचे प्रमुख पीठ आणि पवित्र भूमी बनले.

तर अशा या पौराणिकवजा किंवा आख्यायिका असलेल्या रोम शहरात जवळजवळ आठवड्याच्या सुट्टीसाठी मी कुटुंबासह आलो होतो. रोम शहराच्या एका मध्यवर्ती भागात ट्रॅम थांबली आणि आम्ही तिघेही खाली उतरलो. व्हॅटिकन शहराची सीमा त्या समोरच्या रस्त्याच्या पलिकडे सुरु होते असे आम्हाला सांगण्यात आले आणि आमची पावले वेगाने त्या दिशेने पडू लागली.  मी, जॅक्लीन आणि आमची मुलगी आदितीसह यूरोपच्या दौऱ्यावर आलो होतो. रोम ही ख्रिस्ती समाजाची एक पवित्र भूमीच. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने अगदी लहानपणापासून रोमविषयी खूप काही ऐकलेले आणि वाचलेले असते. येशूच्या जन्माच्या वेळी तत्कालीन रोमन सम्राट ऑगस्टस सीझरने जनगणनेचा आदेश दिला होता. त्यामुळेच जोसेफ आपल्या गर्भवती पत्नी मारियासह बेथलेहेम या आपल्या मूळगावी पोहचला होता. रोमन सम्राटाचा येरुशलेम येथील गव्हर्नर पिलातानेच येशूला क्रुसावर खिळण्याचा आदेश दिला होता. ‘प्रेषितांची कृत्ये’ या पुस्तकात आणि नंतर संत पौलांच्या विविध पत्रांत रोममधील कितीतरी घटनांचे वर्णन आढळते. 

व्हॅटिकन सिटी हे आकाराने जगातील सर्वात चिमुकले राष्ट्र. व्हॅटिकन सिटी या जगातील सर्वात छोट्या देशात पोप महाशयांचे वास्तव्य असते. त्यामुळेच रोममध्ये प्रवेश करताना या प्राचीन शहराविषयी मनात प्रचंड औत्सुक्य आणि कुतूहल होते.  या राष्ट्राच्या अधिकृत नागरिकांची संख्या केवळ आठशेच्या आसपास आहे. येथे राहणारे पोप महाशय, कार्डिनल, आर्चबिशप, विविध संस्थेच्या सिस्टर्स आणि स्वीस गार्डेस हेच केवळ येथील नागरीक. शंभर एकराच्या आसपास क्षेत्रफळ असलेल्या व्हॅटिकन सिटीचे राष्ट्रप्रमुख पोप आहेत. 

संपूर्ण व्हॅटिकन सिटी हे राष्ट्र सर्व बाजूनी रोम शहराच्या म्हणजेच इटली राष्ट्राच्या सीमेने वेढलेले आहे. व्हॅटिकनच्या इमारतीच्या भिंतीनजीकच्या रस्त्याने तुम्ही चालत असला म्हणजे तो रस्ता आणि त्या रस्त्यापलीकडचा परिसर इटली राज्यात असतो, अशी चमत्कारिक स्थिती  आपल्याला आढळून येते. हो, व्हॅटिकन सिटी हे स्वतंत्र राष्ट्र केवळ औपचारिकरीत्या आहे, तिथे जायला व्हिसा  वगैरे लागत नाही. रस्ता ओलांडून  शुक्रवार पेठेतून शनिवार पेठेत जाण्यासारखे ते सोपे आहे. हो, आत शिरण्याआधी सुरक्षा म्हणून तुमची तपासणी होते. 

व्हॅटिकनचे भव्य खांबाचे प्रवेशद्वार आम्ही ओलांडले आणि जगातील एका प्रसिद्ध स्थळी आम्ही पोहोचलो होतो हे एका क्षणात लक्षात आले. रंगमंचावरचा पडदा वर जावा आणि प्रेक्षकांना अनपेक्षित असे काही दृश्य दिसावे तसे आमचे झाले होते. 

येथे आमच्या समोर वर्तुळाकार आकाराचे सेंट पीटर स्क्वेअर होते. भव्य आणि दिव्य ही विशेषणे चपखल लागू व्हावी असेच हे ऐतिहासिक मैदान आहे. या मैदानाच्या दूरच्या टोकाला सेंट पीटर बॅसिलिकाची वास्तू होती. दर रविवारी पोप महाशय आपल्या निवासस्थानाच्या खिडकीतून सेंट पीटर स्क्वेअरमध्ये असलेल्या भाविकांना दर्शन देतात आणि प्रवचन करतात, त्यावेळी या मैदानात हजारो भावि असतात. बॅसिलिकात प्रवेश करण्यासाठी दिवसभर भाविकांची आणि पर्यटकांची लांबवर रंग कायम असते. 

या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी येथे साध्या वेशातील सुरक्षा कर्मचारी असतात. त्याशिवाय व्हॅटिकन खाजगी विभागाच्या प्रवेशद्वारातच आपल्या खास पारंपरिक टोपी आणि रंगीबेरंगी पोशाखात हातात भाला घेऊन स्मार्टपणे उभे असलेले उंचपुरे गार्डस सर्वांचे लक्ष वेधून घेतात. लंडन शहरातील बॉबी गार्ड्ससारखे !  पोपमहाशयांची आणि व्हॅटिकनची सुरक्षाव्यवस्था सांभाळणारे हे स्विस गार्डस यांची खासियत म्हणजे गेली पाच शतके स्वित्झर्लंड या देशातील तिशीच्या आतील युवक पोपमहाशयांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळत आहेत. अर्थांत हे स्वीस गार्डस  हे तसे 'सेरेमोनियल गार्ड' म्हणजे शोभेचे गार्ड म्हणता येईल. आपल्याकडे स्वातंत्र्यदिनी आणि प्रजासत्ताकदिनी राष्ट्रपतींच्या भोवती असणाऱ्या रंगीबेरंगी पोशाखातील आणि फेट्यांतील रक्षकांसारखे! सुरक्षेची खरी जबाबदारी पाहाणाऱ्या आणि साध्या वेशातील सुरक्षा अधिकाऱ्यांची तीक्ष्ण नजर सगळीकडे सारखी भिरभिरत असते हे आपल्याला माहिती आहेतच. 

पोपमहाशयांच्या सुरक्षेचा विषय निघाला आणि पोपपदावर अगदी तरुण वयात निवड झाल्यावर (म्हणजे साठी ओलांडण्याच्या आधी !) पोप जॉन पॉल दुसरे यांच्यावर या सेंट पिटर चौकातच जीपमधून भाविकांना दर्शन देतांना झालेल्या प्राणघातक हल्ल्याची आठवण झाली! १३ मे १९८१ला झालेल्या  गोळीबारात पोटात गोळ्या लागलेले पोप या हल्ल्यातून आश्चर्यकारकरित्या वाचले आणि त्यांनी नंतर २७ वर्षे पोपपदावर राहण्याचा अलीकडच्या काळातला एक विक्रम केला.  या हल्ल्यानंतर पोप जॉन पॉल दुसरे १९८६ साली भारतभेटीवर असताना गोव्याला आले तेव्हा 'नवहिंद टाइम्स'चा मी क्राईम रिपोर्टर होतो. मात्र या  हल्ल्यानंतर पोप नेहेमी  खास बनवलेल्या बुलेटप्रूफ 'पोपमोबाईल'मधून फिरायला लागले.      

सेंट पिटर बॅसिलिका हे सेंट पिटरच्या समाधीवर उभारलेले चर्च आहे. या बॅसिलिकाच्या समोर उजव्या बाजूला मैदानात हातात स्वर्गराज्याची चावी असलेल्या सेंट पिटरचा भव्य पुतळा आहे. त्याचप्रमाणे बॅसिलिकाच्या डाव्या बाजूला त्याच आकाराचा सेंट पॉलचा पुतळा आहे. या दोन्ही पुतळ्यांची उंची साडेपाच मीटर इतकी आहे. उंच चबुतऱ्यावर असलेले हे पुतळे येथील वास्तूच्या भव्यतेत भर टाकतात. ख्रिस्ती धर्माची सुवार्ता जगभर पसरविण्यात सेंट पिटर (संत पेत्र) आणि सेंट पॉल  (संत पौल)  या येशू ख्रिस्ताच्या शिष्योत्तमांचा अत्यंत महत्वाचा वाटा आहे. 

त्याचप्रमाणे बॅसिलिकाच्या प्रथमदर्शनी भागावर केंद्रस्थानी मुक्तिदाता (रिडिमर) येशू ख्रिस्ताचा आणि त्याच्या दोन्ही बाजूला शिष्यांचे आणि इतर संतांचे पुतळे आहेत. त्याशिवाय शेजारच्या अर्धवर्तुळाकार भिंतीवर संतांचे मोठ्या आकाराचे पुतळे रांगेने उभारलेले आहेत. या मोठ्या मैदानात संत पिटर आणि सेंट पॉलच्या पुतळ्यांच्या समोर दोन कारंजे आहेत आणि या कारंजाच्या अगदी मध्यभागी खूप शतकांचा इतिहास असलेला एक उंच स्तंभ आहे.

बॅसिलिकांच्या आत शिरताच या वास्तूच्या आतील दर्शनाने कुणीही व्यक्ती अगदी थक्क होते. ज्या स्थापत्य तज्ज्ञांनी , शिल्पकारांनी आणि चित्रकारांनी ही वस्तू बनवली त्यांनी आपली ही कलाकृती आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम कामगिरी आहे, असे म्हणूनच या कामात आपला पूर्ण जीव ओतला होता हे नक्की. सोळाव्या शतकाच्या मध्यात ज्या वेळी या बॅसिलिकाच्या नूतनीकरणाचे काम सुरु झाले त्यावेळी युरोपात नुकतेच रेनाइसांसचे युग सुरु झाले होते. रेनाइसांस म्हणजे चित्रकला, शिल्पकला, संस्कृती, तत्वज्ञान या क्षेत्रातील सुवर्णकाळच काळ. चौदाशे शतकात सुरु झालेली ही नवविचारांची आणि कलाक्षेत्रातील क्रांती सतराव्या शतकापर्यंत चालली. 

मायकल एंजेलो, लिओ नार्डो दि व्हिन्सी हे युरोपातल्या रेनाईसान्सचे  बिन्नीचे शिलेदार. मायकल आंजेलो यांच्या व्हॅटिकनमधील सिस्टाइन चॅपेलमधील छतावरील चित्रे, ‘ला पिएता’ हे शिल्प आणि लिओ नार्डो दि व्हिन्सी यांचे मोनालिसा हे चित्र वगैरे कलाकृती रेनाइसन्स युगाचे मूर्तिमंत प्रतीक समजल्या जातात. 

बॅसिलिकाच्या आत प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला मी पहिले आणि मी चमकलोच. मायकल आंजेलोची सर्वोत्कृष्ट कलाकृती समजली जाणारे 'ला पिएता' हे मोठे संगमरवरी शिल्प तेथे होते. आपल्या पुत्राचे, येशू ख्रिस्ताचे कलेवर आपल्या मांडीवर घेऊन मारिया बसली आहे असे हे जगप्रसिद्ध शिल्प ‘ला पिएता’ म्हणजे करुणा. क्रुसावर खिळल्यामुळे असह्य वेदना सहन केल्यानंतर मेलेल्या आपल्या पुत्राचे शरीर न्याहाळणाऱ्या आईचे हे शिल्प म्हणून ‘ला पिएता’ हे या कलाकृतीचे नाव. वयाच्या तेविसाव्या वर्षी मायकल एंजेलोने संगमरवरी दगडातूनही कलाकृती साकारली. येशूचे निस्तेज, अचेतन कलेवर आणि आपल्या तरुण पुत्राकडे पाहणाऱ्या मारियेची भावमुद्रा याविषयी खूप काही लिहिले गेले आहे. जगातील सर्वात सुंदर आणि मौल्यवान असणाऱ्या कलाकृतीमध्ये या शिल्पाचा समावेश होतो. मात्र १९७२ साली एका माथेफिरू इसमाने हातोड्याच्या साहाय्याने हे शिल्प तोडण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्याची  पुनरावृत्ती होऊ नये म्हणून हे शिल्प असलेल्या आल्तारासमोर आता बॅलेटप्रुफ काच बसविण्यात आली आहे. 

सेंट पिटर बॅसिलिका हे भव्य चर्च येशूचा शिष्योत्तम आणि पहिले पोप असलेल्या संत पेत्राच्या समाधीवर उभारले असल्याने येथील पेत्राची समाधी, तेथील संत पेत्राचे आसन आणि पेपल आल्तार या वास्तूचा सर्वात महत्वाचा भाग. या भागात आल्यावर भाविकांचे खरोखरच डोळे दिपतात. संपूर्ण बॅसिलिकामधे फिरताना तेथील शिल्पे, उंचउंच स्तंभ, तेथील कोरीव काम आणि इतर कलाकृती न्याहाळणारी आणि त्यांचे फटाफट फोटो घेणाऱ्या लोकांपैकी अनेकांना येथे आल्यावर आपण चर्चमध्ये आणि तीर्थक्षेत्री आहोत याची जाणीव होते  आणि मग ते काही काळ येथे असलेल्या बाकांवर बसून प्रार्थना करताना दिसतात. 

सेंट पिटर बॅसिलिकाच्या वास्तूचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे या धर्मस्थळाचा घुमट. हा गोलाकार घुमट जगातील सर्वात मोठ्या आकाराचा घुमट आहे. मात्र ही कलाकृती कुणा केवळ एकाच वास्तूशास्त्रज्ञाने बनवलेली नाही. या घुमटाच्या रचनेत योगदान असणारा सर्वात प्रसिद्ध वास्तुशास्त्रज्ञ शिल्पकार आणि चित्रकार म्हणजे मायकल एंजेलो. ‘ला पिएता’ ही मायकल एंजेलोच्या कारकिर्दीची अगदी सुरुवातीची कलाकृती तर हा घुमट अखेरची कलाकृती. या घुमटाला आकार देण्याचे काम करत असतानाच या श्रेष्ठ कलाकाराचा आणि कारागिरांचा वयाच्या ८९ व्या वर्षी मृत्यू झाला. सेंट पिटर बॅसिलिकाची सोळाव्या शतकात नव्याने बांधणी झाल्यानंतर रोम शहरास आणि व्हॅटिकनला किती भाविकांनी आणि पर्यटकांनी भेट दिली असेल याची कल्पनाच केलेली बरी.  

सेंट पिटर बॅसिलिकातील सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे ऐतिहासिक सेंट सिस्टाईन चॅपेल. नव्या पोपची निवड करण्यासाठी येथे जगभरातील कार्डिनलांची बैठक होते. कार्डिनलची ही कॉन्क्लेव्ह चालू असताना सेंट पिटर बॅसिलिकाच्या  चिमणीतून काळा धूर निघाला म्हणजे नव्या पोपसंदर्भात अजून मतैक्य झालेले नाही. ही बैठक अनेक दिवस चालू शकते. चिमणीतून पांढरा धूर येऊ लागला म्हणजे चौकात जमलेल्या हजारो लोकांना आणि संपूर्ण जगाला कळते कि नव्या पोपची निवड झाली आहे. आणि काही क्षणांत पोपपदी निवड झालेल्या कार्डिनलना बाल्कनीत आणले जाते आणि ते पोप म्हणून आपले नवे नाव सांगतात. 

सिस्टाईन चॅपेल येथेच  मायकल एंजेलोच्या  'दि क्रिएशन' आणि 'द लास्ट जजमेंट' सारख्या अनेक अजरामर कलाकृती छतावर चितारलेल्या आहेत. या सेंट सिस्टाईन चॅपेलविषयी वेगळाच लेख लिहावा लागेल.


Comments

Popular posts from this blog

Shakuntala Paranjape : Crusade of a lifetime

Dnyanodaya monthly enters 175th year

Fr. Rudolf Schoch. A Jesuit Looks back in satisfaction