बोलावणे मिशनरीसेवा व्रताचे आणि पत्रकारीतेचे

         विशेष लेख 


बोलावणे मिशनरीसेवा व्रताचे आणि पत्रकारीतेचे

कामिल पारखे

रविवारची मिस्सा संपल्यावर मी माझ्या वडिलांचे बोट धरून चर्चच्या समोरील मोकळ्या जागेत उभा होतो. देवळातून बाहेर पडणारे लोक आपसांत बोलत उभे होते. श्रीरामपूरला अलिकडेच बदली होऊन आलेले ते तरुण धर्मगुरू घोळक्याने उभे असलेल्या लोकांशी बोलत होते. फादर प्रभुधर यांचे व्यक्तिमत्व अगदी देखणे असेच होते. वक्तृत्वशैलीची देणगी लाभलेल्या फादरांच्या ओघवत्या उपदेशांनी लोक प्रभावित होत असत. भरपूर उंचीचे फादर आपल्या पांढऱ्या झग्यात फिरत होते, तसे त्यांना ‘जय ख्रिस्त’ म्हणून अभिवादन करण्यासाठी लोक त्यांच्याकडे वळत होते. आमच्याकडेही ते आले आणि माझ्या वडिलांशी बोलू लागले.

बोलत असताना मध्येच थांबून माझ्याकडे पाहत त्यांनी विचारले, ”पारखे टेलर, तुम्हाला किती मुले आहेत? आणि त्यांच्यामध्ये याचा नंबर कितवा?”

माझ्या वडिलांचे श्रीरामपुरात मुख्य बाजारपेठेत सोनार लेनमध्ये टेलरिंगचे दुकान होते. शहरातील दोन-तीन प्रसिद्ध टेलरिंगच्या दुकानांत त्याचा समावेश होता. दिवाळी आणि लगीनसराईच्या हंगामात सात-आठ कारागीर असणारे आमचे दुकान अख्ख्या पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. शुक्रवारच्या आठवडी बाजाराच्या दिवशी आसपासच्या गावातील गिऱ्हाईकांची या दुकानात गर्दी होत असे.

”फादर, हा कामिल माझ्या मुलांमध्ये सर्वांत धाकटा आहे!” दादांनी उत्तर दिले.

”तसे असेल तर, पारखे टेलर, हा तुमचा धाकटा मुलगा तुम्ही देवाला द्या!” फादर ताबडतोब उत्तरले.

क्षणाचाही विचार न करता दादा म्हणाले, ”जशी परमेश्वराची इच्छा, फादर ! त्याच्या इच्छेप्रमाणे होवो!

त्या काळात अनेक कॅथोलिक भाविक पालकांची आपल्या एकातरी मुलाने वा मुलीने फादर किंवा सिस्टर व्हावे अशी इच्छा असे. तसे पोषक धार्मिक वातावरण घराघरांत असे. त्या दोघांचे संभाषण मी ऐकत होतो. ते बोलणे माझ्याविषयी असले तरी दोघांपैकी एकानेही त्यासंदर्भात माझे काय मत आहे हे विचारले नव्हते.

ही घटना असेल १९७२ ची. त्यावेळी मी सातवी-आठवीला असेल. नुकतीच गुरुदीक्षा होऊन फादर प्रभुधर श्रीरामपूरला सहाय्य्क धर्मगुरू म्हणून नेमणूक होऊन आले होते. फादर प्रभुधर (मूळचे काँस्टंशियो किंवा कुस्तास  द्रागो ) हे कोकणीभाषक बार्देस्कर समाजाचे म्हणजे मूळचे गोव्यातील बार्देस तालुक्यातील. बार्देस्कर समाज हा सतराव्या-अठराव्या शतकांत गोवा सोडून महाराष्ट्राच्या आणि कर्नाटकाच्या सीमाभागांत स्थायिक झालेला. बेळगावजवळ स्थायिक झाल्याने फादर प्रभुधर यांचे मराठी आणि कन्नड या भाषांवर प्रभुत्व होते. त्यामुळेच येशूसंघ किंवा सोसायटी ऑफ जिझस  (जेसुइट) या त्यांच्या धर्मगुरूंच्या संस्थेने त्यांची ‘निरोप्या’ या मराठी मासिकाचे संपादक म्हणून नेमणूक केली होती. या घटनेआधी आणि नंतरही फादर प्रभुधर यांनी शालेय मुलांसाठी आयोजित केलेल्या विविध शिबिरांत मी सहभागी झालो होतो. या शिबिरांतील फादरांची व्याख्याने, सांस्कृतिक आणि इतर कार्यक्रमांमुळे फादरांच्या व्यक्तिमत्वाचा माझ्यावर खूप प्रभाव पडला होता

त्या काळात फादर प्रभुधर .बायबलवर आधारीत असलेले एका शब्दकोडे ‘निरोप्या’त चालवत असत. सर्व उत्तरे बरोबर देणाऱ्यांची नावे या मासिकात छापली जात असत. एकदा या सदरात माझे नाव छापून आले. नियतकालिकात माझे नाव अशाप्रकारे पहिल्यांदाच छापून आले. त्यानंतर एकदोन वर्षांतच फादरांची बदली कराडला झाली. ‘विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर’ या नात्याने त्यांच्याबरोबर ‘निरोप्या’चे कार्यालयही कराडला गेले. त्यानंतर मी पोस्टाने कराडला ‘निरोप्या’साठी छोटेसे लेख पाठवू लागलो आणि फादर प्रभुधर ते लेख प्रसिद्ध करू लागले.

अहमदनगर जिल्ह्यात राहुरीपाशी केदळ या खेडयात १९०३ साली फादर हेन्री डोरींग या जर्मन धर्मगुरूने ‘निरोप्या’ हे मराठी मासिक सुरू केले होते. जेसुइट संस्थेतर्फे गेले शंभर वर्षे हे मासिक  चालविले जात आहे. आज पुण्यातून स्नेहसदन संस्थेतून प्रसिद्ध होणाऱ्या ‘निरोप्या’ चा काही मोजक्या शतायुषी मराठी नियतकालिकांमध्ये समावेश होतो.,

दहावीची परीक्षा दिल्यानंतर मी निकालाची वाट पाहत होतो. त्याचप्रमाणे भविष्याचाही वेध घेणे चालू होते. माझ्या मनात घोळत असलेल्या विचाराबाबत  फादर प्रभुधर याना पोस्टकार्डाने कळवले होते. फादरांचे कराडहून आमच्या दुकानाच्या पत्त्यावर निळ्या रंगाचे अंतर्देशीय पात्र आले. माझ्या नावाने येणारे ते पहिलेच पत्र. साहजिकच ते दादांच्या हातात पडले आणि ते वाचून त्यांना मी घेतलेल्या निर्णयाची कल्पना आली.

या पत्रात फादरांनी लिहिले होते:

”प्रिय कामू, सप्रेम आशीर्वाद,

तुझे पत्र मिळाले. .. तुझ्याबाबत माझा विचार असा आहे. तू माझ्याजवळ कराडला दोन वर्षे राहावे. हायर सेकंडरीचा अभ्यास करावा. तोपर्यंत इंग्रजी पक्की करून घेऊ. ‘निरोप्या’चे थोडेफार काम करता येईल. भरपूर वाचन करता येईल. लिखाण करण्यास शिकता येईल. तरी आपल्या आईवडिलांच्या संमतीने आपला विचार पक्का करून ठेवावा आणि एसएससी रिझल्टची वाट बघत राहावे. तोपर्यंत मी आमच्या अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन ठेवतो. ”

जूनच्या एका सकाळी फादरांची जीप आमच्या घराच्या समोर उभी राहिली. .” कामिल, तयारी करून ठेव. आजच निघायचे आहे,” फादरांनी सांगितले. केवळ कपड्यांची एक बॅग घेऊन मी त्याच दुपारी फादरांच्या जीपमध्ये बसलो. वयाच्या सोळाव्या वर्षी येशूसंघीय धर्मगुरू, संन्यासी होण्यासाठी मी माझे घर आणि कुटुंब सोडून बाहेर पडलो होतो. माझे घर आणि कुटुंब मी सोडले ते जवळजवळ कायमचेच.

एक वर्ष कराडला फादर प्रभुधरांबरोबर राहून तेथील टिळक विद्यालयात अकरावी केली. पुढच्या वर्षी गोव्यात पणजीजवळ मिरामार येथे येशूसंघाने नव्यानेच उघडलेल्या लोयोला हॉल या प्री-नोव्हिशियटमध्ये मी दाखल झालो. सोसायटी ऑफ जिझस ही कॅथोलिक चर्चमधील सेवाव्रती धर्मगुरूंची अग्रगण्य संस्था आहे. नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी येशूसंघाच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन  आणि या संस्थेच्या घटनेच्या आधारावर आपल्या भारत सेवक संघाची (सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी) स्थापना केली होती. लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर हे दोघेही येशूसंघांच्या कार्याने प्रभावित झाले होते. यावरून येशूसंघाच्या कामाची थोडीफार कल्पना येऊ शकेल. गोवा, महाराष्ट्र आणि बेळगाव येथील हायर सेकंडरीचे आणि कॉलेजचे विद्यार्थी असणारे आणि धर्मगुरू होऊ इच्छिणाऱ्या युवकांसाठी येशूसंघाने हे प्री-नोव्हिशियट सुरू केले होते. मिरामार समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या डेम्पे कॉलेजात मी बारावीला प्रवेश घेतला. तेथे पदवीपर्यंतचे शिक्षण घेत असतानाच ख्रिस्ती धर्माचेही शिक्षण दिले जात होते. सज्ञान होऊन, पदवीचे शिक्षण घेऊन सारासार विचार करून नंतरच या तरुणांनीं आपणास संन्यासी धर्मगुरू होण्याचे पाचारण (व्होकेशन) आहे की नाही याचा निर्णय घ्यावा या हेतूने हे प्री-नोव्हिशियट किंवा प्री-सेमिनरी स्थापन करण्यात आले होते. पदवीधर झाल्यानंतरही धर्मगुरू होण्याबाबत ठाम असणाऱ्या तरुणांना मग नोव्हिशिएट किंवा सेमिनरीत पाठविले जाणार होते. त्यानंतर ‘गरीबी, ब्रह्मचर्य आणि आज्ञाधारकता’ हे तीन व्रत स्वीकारून आणि धार्मिक जीवनाचे चिन्ह असलेला पांढरा झगा मिळून खऱ्या अर्थाने त्यांचे धार्मिक जीवन सुरू होणार होते.

बीएची पदवी घेतल्यानंतर मात्र धर्मगुरू न हॉण्याचा मी निर्णय घेतला. धर्मगुरू होण्यासाठी सेमिनरीत जाऊन नंतर अशाप्रकारे निर्णय बदलणाऱ्या तरुणांचे प्रमाण खूप असते. धर्मगुरू होण्यासाठी बेंगलोरच्या सेमिनरीत प्रवेश करून नंतर विचार बदलणारे समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस हे यापैकी एक अधिक परिचित नाव. पणजीतच राहून एमए करण्याचे मी ठरविले होते. त्यासाठी नोकरीही करणे आवश्यक होते. वृत्तपत्रात होतकरू तरुणांना नोकरी मिळू शकते असे कळल्यामुळे मी नवप्रभा या मराठी दैनिकात नोकरी शोधण्यासाठी गेलो. तेथे बसलेल्या प्रकाश कणबर्गी या उपसंपादकाकडे चौकशी केली असता त्यांनी मला ‘ इंग्रजी येते का ?’ असे विचारले. होकारार्थी उत्तर दिल्यावर त्यांनी मला म्हटले. ”मराठी वृत्तपत्रात चांगला पगार मिळत नाही. या समोरच्या दाराने जा, तिथे आमच्याच डेम्पो ग्रुपचे इंग्रजी वृत्तपत्राचे ऑफिस आहे. तिथे नोकरी मिळते का पहा !”

त्यांच्या सांगण्यानुसार मी नवहिंद टाइम्सच्या ऑफिसात गेलो, तेथे वृत्तसंपादक एम एम मुदलियार यांना भेटलो. त्यांनी तेथे नोकरी मिळू शकते असे सांगितले. मात्र त्याआधी काही लेख लिहिण्यास त्यांनी मला सांगितले. त्यानुसार मी लिहिलेले तीनचार इंग्रजी लेख ( मिडल्स) त्यांनी संपादकीय पानावर छापलेसुद्धा. नोकरी मागण्यासाठी मी त्याच्याकडे तगादा लावत होतोच. एकदा मी असाच मुदलियार साहेबांच्या केबिनमध्ये बसलो होतो तॆव्हा विद्यार्थी युनियनचा एक नेता तक्रार घेऊन तेथे आला होता. रायबंदर येथील शाळेत प्राचार्यांनी एका विद्यार्थ्याला बेदम मारले होते. विद्यार्थ्याला शारीरिक शिक्षा देऊ नये या नियमाचा हा भंग आहे, असे त्या नेत्याचे म्हणणे होते. नवहिंद टाइम्सचे संपादक बिक्रम व्होरा यांनी लगेच मला त्या शाळेत पाठवले आणि प्राचार्यांशी बोलून बातमी लिहिण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशीच्या नवहिंद टाइम्समध्ये ती बातमी प्रसिद्ध झाली. त्यादिवशी पुन्हा मी मुदलियार साहेबांना भेटून नोकरीचे विचारले. ”तुला कामावर घेण्यास आले आहे. कालपासूनच!” त्यांनी सांगितले. सन १९८१ च्या ऑगस्ट महिन्याची ही घटना. नवहिंद टाइम्स या इंग्रजी वृत्तपत्रातली पत्रकारितेची माझी कारकीर्द सुरू झाली होती ती लोकमत टाइम्स, इंडियन एक्सप्रेस, टाइम्स ऑफ इंडिया, महाराष्ट्र हेराल्ड आणि आता सकाळ टाइम्स या मार्गे आजतागायत चालू आहे.

——————————

Comments

Popular posts from this blog

Dnyanodaya monthly enters 175th year

Fr. Rudolf Schoch. A Jesuit Looks back in satisfaction

A day at Mother Teresa’s Home for Destitutes