सत्तरच्या दशकात गोव्यात मिरामारला धेम्पे कॉलेजात तत्त्वज्ञानाचा अभ्यास करताना मला पहिल्यांदा `नक्षलबारी’ या शब्दाची ओळख झाली.
गंमत म्हणजे तत्त्वज्ञानाचा विद्यार्थी म्हणून कार्ल मार्क्सच्या विचारांचा अभ्यास करत असलेला मी त्यावेळी आजन्म अविवाहित राहून ख्रिस्तीधर्मिय जेसुईट फादर होण्यासाठी प्रशिक्षणही घेत होतो.
सत्तरच्या दशकात (आणि त्याकाळाआधीसुद्धा) उच्चशिक्षणाच्या कॉलेज-विद्यापीठ आवारांत आम्हा झेन झी पोरांपोरींना डाव्या विचारसरणीने मोठ्या प्रमाणात भुरळ घातली होती
साठीच्या आणि सत्तरच्या दशकांत नक्षलबारी हे नाव देशात गाजू लागले.
आतापर्यंत हे नाव विविध संदर्भांत या ना त्या कारणांनी कायम येत राहिले आहे.
खरे पाहता पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यातील नक्षलबारी हा छोटासा परीसर होता.
येथील शोषक जमीनदारी वर्गाविरुद्ध काही कम्युनिस्ट नेत्यांनी सशस्त्र उठाव केला आणि देशात नक्षलबारी चळवळीचा उगम झाला. चारू मजूमदार आणि कानू सन्याल ही या चळवळीतील दोन प्रमुख नावे.
जातपात, हिंदू, मुसलमान आणि ख्रिश्चन असले धर्म तसेच लिंगाधारित कुठलेही भेद न मानता केवळ आर्थिक प्रश्नांवर सामाजिक आणि राजकिय संघर्ष उभारण्याच्या मार्क्सवादी विचारसरणीने त्याकाळात देशातील तरुणाईला आणि बुद्धिजीवी वर्गाला आकर्षित केले होते.
नक्षलबारी या गावाच्या नावांत मूळ असलेल्या `नक्षलाईट' आणि नक्षल या शब्दांनी इंग्रजी भाषेच्या शब्दकोशात लवकरच प्रवेश मिळवला.
इंग्रजी पत्रकारितेतील आम्ही लोक `मिलिटन्टस' या शब्दाऐवजी सरळसरळ `नक्सल’ `नक्सलाईट्स’ हे शब्द वापरु लागलो.
दरम्यानच्या काळात मराठी साहित्यविश्वात नाव कमावणारी कवी नारायण सुर्वेसारखी अनेक मंडळी उघडउघड डाव्या विचारसरणीची होती.
नारायण सुर्वे आणि शाहीर अण्णा भाऊ साठे यासारख्या अनेक साहित्यिकांनी त्याकाळात सोव्हिएत रशियाच्या सरकारच्या आमंत्रणावरून मॉस्को वारी केली होती. अण्णा भाऊ साठे यांचा अलीकडेच रशियात मॉस्को येथे अर्धपुतळा उभारण्यात आला आहे.
महाराष्ट्रात सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला उदयास आलेल्या दलित पँथर चळवळीतील काही नेत्यांवर डाव्या चळवळीचा प्रभाव होता.
नामदेव ढसाळ आणि राजा ढाले वगैरेंच्या पुढाकारातून सुरु झालेली ही चळवळ फुटण्यास निमित्त होण्याला डावी विचारसरणी हे एक कारण दिले जाते.
त्याकाळी मुंबईत कामगारविश्वात लाल बावट्याचे महत्त्वाचे स्थान होते.
स्वातंत्र्योत्तर काळात आमचा नगर जिल्हा लाल बावट्याचा म्हणजे डाव्या चळवळीचा एक बालेकिल्ला होता हे वाचून अनेकांना धक्का बसेल.
माझ्या आयुष्यातील अत्यंत उमेदीचा जवळजवळ एक तपाचा काळ कॉम्रेड म्हणूनच गेला.
दरम्यानच्या काळात ख्रिस्ती धर्मगुरु किंवा फादर होण्याचा विचार मी सोडून दिला होता.
बी. ए. परीक्षा दिल्यानंतर लगेचच मी पणजीला `द नवहिंद टाइम्स' या इंग्रजी दैनिकात कॅम्पस रिपोर्टर म्हणून रुजू झालो होतो. त्याचबरोबर तत्त्वज्ञान विषयातच पदव्युत्तर शिक्षणासाठी अँडमिशन घेतली होती.
त्याकाळी पणजीत १८व्या जून रोडवर सुशीला बिल्डिंगमध्ये मुंबई विद्यापीठाचे पी. जी. म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट सेंटर होते. तिथे शि. स. अंतरकर तत्त्वज्ञान विभागाचे प्रमुख होते. ए. व्ही. अफोन्सो दुसरे एक शिक्षक होते.
अंतरकर सरांनी त्यावेळी मुंबई विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागाचे मे. पु. रेगे यांची व्याख्यान मालिका आम्हा पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली होती.
मे. पु. रेगे सर आणि शि. स. अंतरकर सर ही पूर्णतः कडवी नास्तिक मंडळी. अंतरकर सर स्वतःला लॉजिकल पॉझिटीव्हिस्ट म्हणजे ब्रिटिश तत्त्वज्ञानी सर ए. जे. अय्यर यांचे अनुयायी म्हणवत असत.
एम. ए. च्या दुसऱ्या वर्षांसाठी ए, व्ही. अफोन्सो सरांनी मला लघुप्रबंधासाठी `नक्षलबारी चळवळ' हा विषय दिला होता.
त्यानिमित्त दोन पानांचा ऑफिसच्या टाईपरायटरवर टाईप केलेले हे डेझर्टेशन मी सबमिट केले होते. माझ्या कागदपत्रांच्या चोपडीत हे डेझर्टेशन अनेक वर्षे होते.
सत्तर आणि ऐशीच्या दशकांत पत्रकार आणि वृत्तपत्र कर्मचारी संघटनांमध्ये मार्क्सवादी आणि समाजवादी नेत्यांचा दबदबा होता.
सिटूचे अध्यक्ष कॉम्रेड एस. ए. कोल्हटकर हे आम्हा पत्रकार आणि बिगरपत्रकार वृत्तपत्र कर्मचारी संघटनेचे अनेक वर्षे राष्ट्रीय अध्यक्ष तर साथी जॉर्ज फर्नांडिस यांचे सहकारी के विक्रम राव हे इंडियन फेडरेशन ऑफ वर्किंग जर्नालिस्टचे (IFWJ) अध्यक्ष होते.
मी स्वतः गोवा युनियन ऑफ वर्किंग जर्नालिस्टचा (GUJ) सरचिटणिस होतो.
पत्रकार चळवळीतील आम्ही लोक एकमेकांना कॉम्रेड म्हणूनच संबोधित असू.
पुण्यात इंडियन एक्सप्रेसला रुजू झाल्यावर इथल्या वातावरणात ही उपाधी साहजिकच गळून पडली.
डाव्या विचारसरणीच्या प्रभावामुळे भारतातील अनेक पत्रकारांचे प्रशिक्षण आणि इतर दौरे सोव्हिएत ब्लॉकमध्ये किंवा रशिया प्रभावित पूर्व युरोपियन देशांत त्या काळात होत असत, जर्मनी, युगोस्लाव्हाकिया, झेकोस्लाव्हाकिया, पोलंड वगैरे.
मीसुद्धा रशिया आणि बल्गेरियात पत्रकारितेचे प्रशिक्षण घेतले. तिथेच रशियन म्हणजे स्लाव्हिक लिपी वाचण्यास मी शिकलो.
मॉस्कोहून भारतात परतताना मी आणलेल्या ब्लादिमीर लेनिन याने सुरु केलेल्या `प्रावदा' दैनिकाची स्लाव्हिक लिपीतील एक प्रत मी अनेक वर्षे जपून ठेवली होती.
त्याकाळात मॅक्झिम गॉर्की यांच्या `आई' (द मदर) या हार्डबाऊंड कादंबरीची प्रत अनेक घरांघरांत असायची.
एक मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन कामगार चळवळीसाठी एक महत्त्वाचा दिवस असे.
पश्चिम बंगालमधील तत्कालीन काँग्रेस सरकारने नक्षलबारी, नक्षलवादी चळवळ दाबून टाकण्याचे अथक प्रयत्न केले, नंतर राज्यात सत्तेवर आलेल्या मार्क्सवादी आघाडीनेसुद्धा तेच केले.
नक्षलवादी चळवळीचा बिमोड करण्यात अथवा ही चळवळ इतरत्र पसरवू न देण्यात सरकारला बऱ्याच प्रमाणात यश आले.
यथावकाश नक्षलवादी अथवा डाव्या चळवळीत सक्रिय असलेल्या अनेक तरुणांचा भ्रमनिरास झाला आणि सरकारी किंवा खाजगी नोकऱ्या स्वीकारून ते प्रस्थापित समाजव्यवस्थेचा एक भाग बनले.
मात्र डाव्या किंवा समतावादी विचारसरणीचा प्रभाव रोखण्यात सरकारी यंत्रणा यशस्वी ठरल्या नाही. कष्टकरी आणि कामगार वर्गात, विद्यापीठ आवारांत डावे नेतृत्व कायम प्रभावी राहिले.
नक्षलबारी चळवळीला नंतर केवळ नक्षल या नावानेच संबोधले गेले. अलीकडच्या काळात तर नक्षल या नावाला एक वेगळाच संदर्भ लाभला.
`देशद्रोही', `परदेशी शक्तींचे हस्तक', जंगलात सक्रिय न राहता शहरांत राहून सत्ताधाऱ्यांच्या विचारसरणीला, प्रस्थापित व्यवस्थेला विरोध करणारे लोक म्हणजे `अर्बन नक्षल’ !
नर्मदा सरोवर आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांना `अर्बन नक्षल' हे लेबल सर्वप्रथम लावले गेले. ही यादी खूप मोठी होईल.
कालांतराने हेच लेबल अभिमानाचे आणि विद्रोहाचे प्रतीक बनले.
ज्ञानपीठ पारितोषक विजेते साहित्यिक गिरीश कर्नाड यांनीसुद्धा स्वतःला अभिमानाने `अर्बन नक्षल' म्हणवून घेतले होते.
नक्षलवादी लोकांना भेटून त्यांच्यावर अरुंधती रॉय यांनी पुस्तकही लिहिले. एक प्रमुख `अर्बन नक्षल' म्हणून त्यांचे नाव नेहेमी घेतले जाते. अत्यंत प्रतिष्ठेच्या बुकर प्राईझ विजेत्या अरुंधती रॉय या जन्माने केरळच्या सिरियन ख्रिश्चन.
आपल्या `मदर मेरी कम्स टू मी' या आत्मकथनपर पुस्तकात अरुंधती रॉय यांनी नक्षल चळवळीवर एक प्रकरणच लिहिले आहे.
नक्षलबारी, नक्षलवादी, अर्बन नक्षल ते दिमागी नक्षल !
साठीच्या दशकातील `नक्षलबारी’ ते अमृतकाळातील `दिमागी नक्षल’ हा निश्चितच थक्क करणारा प्रवास आहे.

Camil Parkhe August 20, 2026


Comments

Popular posts from this blog

Dnyanodaya monthly enters 175th year

Shakuntala Paranjape : Crusade of a lifetime

Fr. Rudolf Schoch. A Jesuit Looks back in satisfaction