तुम्ही कधी उघडी प्लास्टिक टोपली म्हणजे बास्केट किंवा कुलुपबंद, सील केलेलं दानपत्र घेऊन लोकांमध्ये, गर्दीत जाऊन रक्कम गोळा केली आहे का?

अशी कामे मी स्वतः अनेकदा करत आलो आहे.
या दोन्ही प्रकारांत नंतर गोळा केलेली नाणी, नोटा आणि मूल्यवान ऐवज यांची मोजदाद करावी लागते. गोळा झालेलूया रकमेची आणि ऐवजांची रीतसर नोंद करून त्यावर सह्या आणि शिक्का लावून ते नंतर मुख्य आयोजकांकडे सोपवावे लागते.
एकदा रक्कम आणि कागदपत्रे संबंधितांकडे सोपवल्यानंतर तुमची जबाबदारी संपते आणि ती जबाबदारी दुसऱ्या व्यक्तीकडे किंवा त्या संस्थेच्या विश्वस्तांकडे जाते.
कधीकधी देवळांत उपासनाविधीदरम्यान दानपात्र घेऊन भाविकांमध्ये फिरून दान गोळा करावे लागते. आता सवयीने अशावेळी कसे वागावे, कुणापुढे दानपत्र न्यावे याचे ज्ञान प्राप्त झाले आहे.
दानपत्र सभोवताली फिरत असताना एखाद्याची झाकलेली मूठ पाहून, एखादी व्यक्ती खिशांत किंवा पर्समध्ये हात घालताना पाहिल्यानंतरच तिकडे त्या दिशेने दानपत्र नेले जाते. एखादी व्यक्ती पॅन्टच्या आणि शर्टच्या खिशांत चाचपडून नंतर शांत बसते.
एखादी व्यक्ती मात्र अगदी स्थितप्रज्ञपणे बसून राहिली असली तर तिकडे दानपात्र न्यायचे नसते.
काही ठिकाणी ही उघडी किंवा कुलूपबंद दानपत्रे भाविकांमध्ये फिरवली जातात, या दानपात्रांत रक्कम टाकून भाविक ते पात्र शेजाऱ्याकडे देतात, त्यात रक्कम टाकून किंवा रक्कम न टाकता ते दानपत्र शेजारी हस्तांतरीत करतात. जवळ उभा असलेला माझ्यासारखे स्वयंसेवक मात्र दानपत्राकडे कायम लक्ष ठेऊन असतात,
दानपात्र परत आपल्याकडे घेऊन नंतर ते दुसरीकडे वळतात वा ते दानपात्र वेदीजवळ ठेवतात.
दान कसे असावे? दान कसे करावे? कुठल्याही दानाचे मूल्य कसे मोजता येईल?
काही श्रद्धावंत लोक नामवंत देवळांच्या भल्यामोठ्या दानपात्रांत मोठमोठ्या रकमेच्या नोटांच्या जुड्या टाकतात. काही लोक सोन्याचांदीच्या विटा दानपत्रात टाकतात.
काही जण सोने, रत्नजडित हार, मुकुट यासारखे दागदागिने आणि हिरेमोती आपली अनामिकता राखत देवाला किंवा देवस्थानाला दान करतात.
या दानाची त्यांना पावती मिळावी अशी त्यांची अपेक्षासुद्धा नसते.
काही जण भरगच्च गर्दीच्या उपस्थितीत आणि कॅमेऱ्यांच्या लखलखाटात मूल्यवान ऐवज देवाच्या मूर्तीला अर्पण करतात.
दानाविषयी आपण अनेकदा कीर्तन-प्रवचनांत ऐकत असतो.
अलीकडेच समाजमाध्यमांत एक व्हिडीओ खूप पसरला होता.
एका लग्नसमारंभात बहुधा आगंतुकपणे शिरलेल्या आणि तिथे बहुधा अत्यंत समाधानाने जेवलेल्या एका मळकट कपडे घातलेल्या भोळसट भासणाऱ्या व्यक्तीने आपल्या खिशातल्या तीनचार नोटा काढून त्यातील एक जुनी नोट दागदागिन्याने सजलेल्या नवरीच्या हातात आहेर म्हणून किंवा आपला आशीर्वाद म्हणून दिली आणि अत्यंत खुशीत तो तिथून निघतो असा तो काही क्षणांचाच व्हिडीओ आहे.
तिथले कुणीही लोक त्याच्या आगंतुक उपस्थितीबद्दल, त्याच्या घाणेरड्या कपड्याबद्दल आक्षेप घेत नाही आणि त्यावरही कड म्हणजे त्या भरगर्दीत नवरदेवाशेजारी असलेलीसुद्धा ती नवरीसुद्धा ती छोट्या रकमेची नोट अगदी आनंदाने स्वीकारते.
तो काही क्षणांचा व्हिडीओ कुणाही समंजस व्यक्तीच्या डोळ्याला लगेच पाणी येईल असाच आहे.
याला खरेखुरे दान म्हणता येईल.
अत्यंत धार्मिक म्हणता येईल अशा कुटुंबात मी वाढलो आहे, त्यामुळे धर्मग्रंथातली वचने सतत कानांवर पडत आलेली आहेत.
`एका हाताने दिलेले दान दुसऱ्या हाताला कळता काम नये' असे त्यापैकी एक वचन आहे.
पर्वतावर येशूने दिलेले प्रवचन (`द सर्मन ऑन द माऊंट') पवित्र शास्त्रात खूप महत्त्वाचे मानले जाते.
फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी आपल्या `सुबोध बायबलमध्ये या प्रवचनातील पहिली काही वाक्ये पुढीलप्रमाणे दिली आहेत:
येशू म्हणाला, ``लोकांना दाखवण्यासाठी धर्मकार्य करु नका. तुम्ही तसे केलेत तर देवाकडून तुम्हाला फळ मिळणार नाही. तुम्ही दानधर्म करताना गाजावाजा करुन इतरांचे लक्ष वेधून घेऊ नका.
ढोंगी लोक सिनेगॉगमध्ये (येशू स्वतः ज्यू होता, तो येथे आपल्या मंदिराबाबत बोलत आहे ) आणि रस्त्यांत तसे करतात. ते आपले फळ भरून पावले आहेत.
तुम्ही दानधर्म कराल तेव्हा आपला उजवा हात काय करतो ते डाव्या हातालाही कळू देऊ नका. गुप्तपणे फळ देणारा देव तुम्हाला त्याचे फळ दिल्याशिवाय राहणार नाही.''
दानासंबंधी आणखी एक दाखला सतत ऐकत आलो आहे.
मंदिरात बसून तेथील दानपात्रात लोक काय टाकतात हे येशू पाहत असतो. श्रीमंत लोक दानपत्रात मोठमोठ्या रकमा टाकत होते असे त्याला दिसले. इतक्यात एक गरीब विधवा बाई तेथे आली आणि एक तांब्याचे नाणे म्हणजे एक दमडी तिने दानपात्रात टाकली.
ते पाहून येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, '' या दानपात्रात पैसे टाकणाऱ्या त्या सर्वांपेक्षा त्या गरीब विधवेने सर्वाधिक रक्कम टाकली आहे. कारण त्या सर्वांनी आपल्या समृद्धीतून काही रक्कम दान केली परंतु हिने आपली सर्व कमाईच दान देऊन टाकली आहे.''
काही दिवसांपूर्वी हा दाखला माझ्या नजरेसमोर तरळला होता.
देवळांत दानपात्रांत लोक दहा, वीस, पन्नास आणि क्वचित शंभर रुपयांच्या नोटा टाकत असतात. दानपात्रांत रक्कम टाकताना आम्हा स्वयंसेवकांच्या नजरेस ते पडत असते.
भाविकांच्या रांगेत एका कोपऱ्यात एकटीच बसलेल्या महिलेकडे माझी नजर गेली, तिच्या एकूण व्यक्तिमत्त्वाकडे पाहून दानपात्रात ती काही रक्कम टाकणार नाही असे मला वाटले.
मात्र त्या महिलेकडे गेल्यानंतर तिने प्लास्टिकच्या पारदर्शी दानपात्रात टाकलेली नोट पाहून मी शरमलो.
पाचशे रुपयांची नोट तिने दानपात्राच्या बारीक फटीतून हळूच आत सरकवली होती.
सर्वच धर्मांतील श्रद्धावंत श्रद्धापूर्वक दानधर्म करत असतात. आपले हे दान, त्यागाची ही भावना परमेश्वराला कळेलच, या त्यागाचे पुण्य आपल्या गाठी लागेल ही त्यांची भावना असते.
आणि नेमके याचाच फायदा देवळांशी आणि तिर्थक्षेत्रांशी संबधित असलेले काही जण घेत असतात.
सर्वच धर्मांत आणि पंथांत पूजा आणि प्रार्थनास्थळी जमा झालेल्या रकमेवर, धान्य, फळे आणि इतर गोष्टींवर ते पौराहित्य करणाऱ्या पुरोहिताचा किंवा याजकाचा हक्क असतो. अशावेळी आपल्या पदरी जास्तीत जास्त रक्कम यावी अशी त्या पुरोहिताची लालच असणार हे साहजिकच आहे.
याबाबत मी ऐकलेला एक किस्सा मला आठवतो.
युरोपात काही काळासाठी एक धर्मगुरु महाराष्ट्रातून गेले होते. तिथल्या स्थानिक चर्चमध्ये सहाय्यक धर्मगुरु म्हणून त्यांची नेमणूक झाली होती. विविध प्रकारच्या उपासनाविधींसाठी लग्नकार्ये किंवा मयतविधीनिमित्त त्यांना अनेकदा चर्चबाहेरसुद्धा जावे लागत असे.
काही काळानंतर त्यांच्या लक्षात आले कि अंत्यसंस्कारांसाठी त्यांना शक्यतो चर्चबाहेर पाठवले जात नसे, मुख्य धर्मगुरुच अशाप्रसंगी जात असत.
एकदा मात्र या भारतीय धर्मगुरुंना अचानक मयतविधीसाठी जावे लागले आणि अंत्यसंस्काराच्या अखेरीस त्यांच्या हातात एक बंद लखोटा देण्यात आला तेव्हा त्यांना याबाबत एकदम उलघडा झाला.
अनेक प्रगत देशांत अंत्यविधीसाठी आधीच विमा उतारण्यात येतो किंवा त्यासाठी आर्थिक तजविज केलेली असते.
व्यक्तीचे निधन झाल्याझाल्या संबंधित एजन्सी लगेच कामाला लागते, हॉस्पिटलमधला मृतदेह शवागारात हलवला जातो,
नातेवाईकांच्या संमतीने काही दिवसांनी अंत्यविधी कधी, कुठे आणि कुणाकुणाच्या हजेरीत होईल हे ठरवले जाते. शवपेटी, मयतासाठी नवेकोरे मोजेबूट, कपडे, पुष्पचक्र, कबरस्थानातील नियोजन वगैरे सर्व आयोजित केले जाते.
यासाठी सर्व रक्कम ती एजन्सी देत असते आणि या रकमेत अर्थातच अंत्यविधीला आलेल्या धर्मगुरुसाठी असलेली घसघशीत रक्कमसुद्धा असते !
शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांचे आजोबा आणि आदित्य ठाकरे यांचे पणजोबा असलेल्या `प्रबोधन'कार केशव सीताराम ठाकरे विवेकवादी आणि पुरोगामी नेते होते.
अंधश्रद्धा आणि समाजातील अनिष्ठ प्रथा यावर त्यांनी आपल्या ठाकरी भाषेत अनेक छोटीमोठी पुस्तके लिहिली आहेत.
कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा `शिवाजी कोण होता?' हे एक छोटेखानी आणि अगदी कमी किमतीचे पुस्तक मराठीतील एक बेस्टसेलर पुस्तक आहे. ` देवळांचा धर्म आणि धर्मांची देवळे' या शिर्षकाचे प्रबोधनकार ठाकरे यांचे पुस्तकसुद्धा असेच मराठातील एक बेस्ट सेलर आहे,
कुठल्याही पुस्तक प्रदर्शनांत कॉम्रेड पानसरे यांचे `शिवाजी कोण होता?' आणि प्रबोधनकारांचे देवळांचा धर्म आणि धर्मांची देवळे' ही पुस्तके हमखास आढळतात.
`कॉपीराईट'चा मुद्दा आता निकालात निघाल्यामुळे `श्यामची आई' या पुस्तकाच्या आवृत्त्या अनेक प्रकाशकांनी काढल्या आहेत. प्रबोधनकारांच्या या पुस्तकाचेसुद्धा असेच झाले आहे.
खूप दशकांपूर्वी प्रबोधनकारांनी आपल्या या पुस्तकात लिहिलेले वर्णन आजही लागू पडते.
वारीमध्ये उन्हापावसांत अठरावीस वीस दिवस चालल्यानंतर बहुतांश वारकरी पंढरीत प्रवेशसुद्धा करत नाहीत.
वारीची औपचारिक सांगाता झाल्यानंतर पांडुरंगाच्या मंदिराच्या कळसाच्या दिशेने लांबूनच अगदी भक्तिभावाने नमस्कार करत ते लागलीच एसटीने आणि मिळेल त्या वाहनाने आपल्या घराची वाट धरतात.
या परतीच्या वाटेत आणि गावी पोहोचल्यानंतर इतर लोक या वारकऱ्यांचाच पायी पडून 'माऊली, माऊली' म्हणत साक्षात विठोबाचे दर्शन लाभल्याचे सुख अनुभवत असतात.
यालाच म्हणतात श्रद्धा.
देव कुठे असतो, कुणामध्ये वसती करत असतो याचे या लोकांना खरेखुरे भान असते.
जुन्या म्हणजे अगदी प्राचीन काळातील असलेल्या अनेक देवळांकडे आणि तिर्थक्षेत्रांकडे श्रद्धावंत पाठ फिरवतात आणि उत्तम मार्केटिंग जमलेल्या, मोठमोठ्या सेलीब्रेटी लोंकांचे श्रद्धास्थान असलेल्या देवळांसमोर अक्षरशः रांग लावतात.
तेथील देवाच्या किंवा देवीच्या दर्शनासाठी काहीही खस्ता खाण्याची त्यांची तयारी असते.
याच कारणांमुळे मग अशी देवस्थाने आणि तीर्थस्थळे भरभराटीला येतात. थोडयाच कालावधीत मग या तिर्थक्षेत्रांत अक्षरशः बाजार बसतो.
बाजार बनलेल्या येरुशलेममधील मंदिरात येशूने काय केले होते हे माहित आहे का? पुन्हा एकदा फादर दिब्रिटोंच्या `सुबोध बायबल'चा आधार घेतो.
``नंतर येशूने मंदिरात प्रवेश केला. तिथे जे खरेदीविक्री करत होते, त्या सर्वांना त्याने हाकलून दिले. पैसे बदलून देणाऱ्या सराफांची चौरंग आणि कबुतरे विकणाऱ्यांच्या बैठका त्याने उलथून टाकल्या.
त्याने त्यांना म्हटले,'' धर्मशास्त्रात लिहिले आहे कि, ''माझ्या घराला प्रार्थनामंदिर म्हणतील. परंतु तुम्ही त्याला लुटारूंचा अड्डा बनवला आहे.''
आपण श्रद्धापूर्वक दिलेले दान सत्पात्री जावे अशीच कुठल्याही भाविकांची मनोमन भावना असते.
प्रत्यक्षात काय होते?
तिर्थक्षेत्रांत धर्मस्थानाची मक्तेदारी असलेल्या दुकानांतच घेतलेली फुलेहारे, मेणबत्त्या, मेणाच्या पुतळ्या, श्रीफळ यांचे रिसायकलिंग होऊन परत त्याच वस्तू त्याच दुकानांत विक्रीसाठी जातात.
पुन्हापुन्हा हाताळलेल्या कोमेजलेल्या फुलांचे हार इतर भक्तांकडून पुन्हापुन्हा दैवताला वाहिले जातात.
दुधाचा, तेलाचा किंवा पंचामृताचा अभिषेक करून अन्नाची नासाडी केली जाते,
शेकडो मेणबत्त्या एकाच ठिकाणी पेटवल्या जातात.
साधारणतः असाच काही प्रकार सर्वच तीर्थक्षेत्रांत चालू असतो.
हे सर्व श्रद्धावंतांच्या डोळ्यांसमोर घडत असते. भाविक त्याकडे कानाडोळा करत असतात.
काही वर्षांपूर्वी युरोपात सहलीसाठी गेलो होतो. रोममध्ये व्हॅटिकन सिटीला दरवर्षी लाखो लोक भेट देतात. मात्र यापैकी बहुतांश लोक निव्वळ पर्यटक असतात,
ख्रिस्ती श्रद्धावंत म्हणावे अशा लोकांची युरोपात तरी आता फारशी संख्या राहिली नाही.
त्यामुळे त्या ऐतिहासिक सेंट पिटर्स बॅसिलिकामध्ये तिथले स्वयंसेवक जमलेल्या लोकांना एकसारखे 'शांतता राखा, हे मंदिर आहे' असे बजावत होते.
मायकल अँजेलो यांची जगप्रसिद्ध चित्रे छतावर आणि इतर सर्व भागांत असलेल्या आणि जेथे नव्या पोपमहोदयांची निवड होत असते तिथल्या सिस्टाईन चॅपेलमधील गोंगाटाबद्दल तर बोलायलाच नको.
`फोटोज नॉट परमिटेडेड'' अशा इटालीयन, फ्रेंच आणि इंग्रजी भाषांतील सूचनांकडे सर्रास दुर्लक्ष होते.
या गोंगाटात खूप एक्साईट झाल्यामुळे आम्हीसुद्धा सहभागी होतो.
जगातील प्रमुख `मेरियन डिव्होशन सेंटर असलेल्या फ्रान्समधल्या लुर्ड्स या तिर्थक्षेत्रातील परिस्थिती मात्र याहून खूप वेगळी होती.
पोर्तुगालमधील फातिमा हे शहर सुद्धा येशूची आई मारिया हिच्या भक्तीसाठी प्रसिद्ध असलेले एक `मेरियन डिव्होशन सेंटर' आहे.
दक्षिण भारतातील वेलंकणी माता बॅसिलिका तर महाराष्ट्रात वांद्रा येथील बॅसिलिका ऑफ अवर लेडी ऑफ द माउंट (मोतमाऊली) आणि नगर जिल्ह्यातील हरेगावची मतमाऊली यात्रा मारिया मातेच्या भक्तीसाठी प्रसिद्ध आहेत.


फ्रान्समधल्या लुर्डस या शहरानेसुद्धा गेल्या शतकातल्या बेर्नादेत या मुलीच्या जीवनात घडलेल्या घटनेचे भांडवल बनवून या शहराला आंतरराष्ट्रीय पातळीवर मेरियन डिव्होशन सेंटर बनवले आहे.
लुर्डस या तीर्थक्षेत्रात आलेला अनुभव मला खूप काही शिकवून गेला.
फ्रान्समधील लुर्डस हे एक महत्त्वाचे `पिलग्रिम टुरीझम सेंटर म्हणजे धार्मिक पर्यटन केंद्र बनले आहे, शहराची अर्थव्यवस्था या धार्मिक घटनेभोवती गुंफलेली आहे.
येथील स्थानिक लोक आणि हॉटेल आणि दुकाने चालवणारे लोक जगभरातून येथे येणाऱ्या भाविकांना विविध प्रकारच्या सेवासुविधा पुरवतात.
बेनार्देतच्या जीवनात घडलेल्या मदर मेरीच्या दर्शनाच्या त्या दैवी घटनेवर आताच्या स्थानिक लोकांचा आणि इतर व्यावसायिकांचा विश्वास असेलच याविषयी मला खरे तर शंका आहे.
गेल्या काही दशकांत युरोपमध्ये आणि एकूणच सर्वच पाश्चिमात्य राष्ट्रांत धर्माचे स्तोम एकदम कमी झाले आहे. जन्माने ख्रिस्ती असले तरी यापैकी बहुतेक जण आता नास्तिक बनले आहेत.
युरोपात आणि विशेषतः रोममधील प्राचीन चर्चेसला भेट देताना ही बाब मला प्रकर्षाने जाणवली.
फ्रान्समधल्या लुर्ड्स शहरात किंवा पोर्तुगालमधल्या फातिमा या शहरात मदर मेरीच्या दर्शनाबाबतच्या त्या दैवी घटनेशी स्थानिक रहिवाश्यांना आणि व्यवसायिकांना कदाचित काही देणेघेणेही नसेल.



लुर्ड्स शहराची (फ्रान्सची) आणि फातिमा शहराची (पोर्तुगालची) अर्थव्यवस्था या श्रद्धेवर अवलंबून आहे. लोकांच्या श्रद्धेमुळॆ त्यांना चरितार्थाचे साधन मिळते आहे यामुळे मात्र ते समाधानी आहेत.
जगातील कुठल्याही धर्मांच्या तीर्थक्षेत्रांतील स्थानिक रहिवाश्यांच्या आणि व्यावसायिकांच्या तीर्थक्षेत्रांबद्दल आणि धर्मांबाबत अशा प्रातिनिधिक भावना असू शकतील यात शंका नाही.
`दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए ' अशी एक म्हण आहेच.
Camil Parkhe

Comments

Popular posts from this blog

Dnyanodaya monthly enters 175th year

Shakuntala Paranjape : Crusade of a lifetime

Fr. Rudolf Schoch. A Jesuit Looks back in satisfaction