गोव्याला पर्यटक म्हणून गेल्यावर तिथे काय करावे, काय पाहावे  


गोव्याला पर्यटक म्हणून गेल्यावर तिथे काय करावे, काय पाहावे असा प्रश्न मला अनेक जण विचारतात. माझा अनुभव असा आहे कि गोव्याला अनेकदा जाऊन आणि तिथे काही वर्षे राहूनही अनेक लोकांनी खराखुरा गोवा पाहिलाच नसतो किंवा अनुभवला नसतो. गोव्यात सुट्टीला गेले म्हणजे समुद्रकिनारी जायचे, मासे आणि इतर मांसाहारी पदार्थांचा यथेच्छ आस्वाद घ्यायचा आणि पिण्याचा कार्यक्रम करायचाअशीच अनेकांची कल्पना असते. खरे पाहिले तर याहून अधिक कितीतरी गोष्टी गोव्यात असताना पाहायच्या आणि अनुभवयाच्या असतात.

या महिन्यात चार सुट्ट्या सलग आलेल्या आहेत, आणि तेव्हापासून गोव्यात पर्यटक हंगामही जोमाने सुरु होईल. कोरोनाचा लॉकडाऊन संपला आहे. करोनामुळे दोनअडीच वर्षे घरात आणि शहरांत अडकलेली मंडळी यावेळी बाहेर पडणार आहेत.
गोव्यात पर्यटनासाठी पहिल्यांदाच जाणाऱ्या लोकांना गोव्याची तोंडओळख करून घेण्यासाठी मी त्यांना दोन दिवसांच्या गोवा दर्शन टूरमध्ये सहभागी होण्याचा सल्ला देत असतो. या दोन दिवसांत उत्तर आणि दक्षिण गोवा असे पूर्ण गोवा राज्यातील सर्व प्रमुख पर्यटनस्थळे, मंदिरे, चर्चेस, समुद्रकिनारे वगैरे प्रेक्षणीय स्थळे दाखविली जातात. पहिल्या भेटीतच लोक गोव्याच्या प्रेमात पडतात. त्यानंतर गोव्याची संस्कृती विविध अंगांनी पाहण्याची, अनुभवण्याची इच्छा निर्माण होते. अशा लोकांनी मग स्वतःच्या दुचाकीवर किंवा चारचाकीने गोवा भटकंतीवर अवश्य जावे.
गोव्यात येणाऱ्या पर्यटकांनी मंगेशी मंदिर आणि ओल्ड गोवा येथील चर्चेसला भेट द्यायलाच हवी. अगदी गुण्यागोविंदाने राहणाऱ्या गोमंतकातील दोन धार्मिक संस्कृतींची ही दोन प्रतिके आणि तीर्थक्षेत्रेही. त्याशिवाय वेळ असल्यास मग इतर ऐतिहासिक देवस्थाने आणि चर्चेसला भेटी देता येईल.
गोव्याला पर्यटक म्हणून येणारे बहुतेक सर्व जण जुन्या गोव्याला हमखास भेट देतात. याचे कारण म्हणजे त्याचे मध्ययुगीन काळातले स्थान आणि त्या ऐतिहासिक काळाच्या तिथे अजूनही सुस्थितीत असलेल्या खाणाखुणा आणि पाश्चात्य गॉथिक शैलीचा समृद्ध वास्तुशास्त्रीय वारसा. पोर्तुगीजांच्या राजवटीत १७व्या-१८व्या शतकांत गोव्याला ‘पूर्वेकडचे रोम’ म्हटले जाई. कारण म्हणजे येथील मोठमोठी कॅथेड्रल, चर्चेस. चर्चच्या गॉथिक शैलीच्या भव्य वास्तू, जुन्या काळातील या स्थळाच्या गौरवशाली पर्वाची साक्ष देणारे सेंट ऑगस्टीन टॉवरसारखे उंच आणि भव्य भग्न अवशेष पर्यटकांना आजही गोव्याच्या एका वेगळ्या संस्कृतीची, ऐतिहासिक ठेव्याची चुणूक दाखवून देतात.
जुना गोवा ही या पोर्तुगिजांच्या वसाहतीची सोळाव्या शतकाच्या सुरुवातीपासून राजधानी होती. सतराव्या शतकात बांधलेल्या सी कॅथेड्रल आणि बॉम जेजू बॅसिलिका. या दोन वास्तू पाहिल्याशिवाय जुना गोवा या पर्यटनस्थळाची भेट पूर्णच होऊ शकत नाही. कारण बॉम जेजू (बाळ येशू) बॅसिलिका येथे सोळाव्या शतकातील संत फ्रान्सिस झेव्हिअर यांच्या शरीराचे अवशेष (रिलिक) ठेवले आहेत. दहा वर्षांतून एकदा या संताच्या शरीराच्या अवशेषांचे प्रदर्शन किंवा एक्स्पोझिशन भरवले जाते.
जुन्या गोव्याच्या अगदी एका टोकाला मांडवी नदीच्या किनाऱ्यापाशी आजही चांगल्या स्थितीत असलेले पण छोटेशेच ‘व्हॉईसरॉय आर्च’ आहे. गोव्याच्या या सागरी प्रवेशद्वाराविषयी माहिती नसल्याने बहुतेक पर्यटक या निर्जन टोकाला फिरकतदेखील नाहीत वा त्यांचे पर्यटक गाईड त्यांना इकडे आणत नाहीत.
मांडवीच्या तीरावर नांगर टाकलेल्या गलबतातून लिस्बनहून आलेले वास्को द गामा आणि अफान्सो डी अल्बुकेर्क वगैरे व्हॉईसरॉय, गव्हर्नर जनरल या सागरी प्रवेशद्वारातून या ‘व्हॉईसरॉय आर्च’मधून लष्करी इतमामाने गोव्यात प्रवेश करत असत. या ‘व्हॉईसरॉय आर्च’वर म्हणजे कमानीच्या अगदी टोकावर आजही गोव्यात पाऊल ठेवणाऱ्या पहिल्या युरोपियन दर्यावर्दी वास्को द गामाचा छोटासा पण पूर्णाकृती पुतळा आहे.
गणेशोत्सव आणि नाताळ हे गोव्यातील दोन प्रमुख उत्सव. गोव्यात लोक प्रामुख्याने दीड दिवसांचा, तीन दिवसांचा वा पाच दिवसांचा गणपती बसवतात. मात्र दीड दिवसांच्या गणपती उत्सवालाही प्रचंड उत्साह असतो.
मात्र गोव्यातील गणेशोत्सव आणि ख्रिसमस हे दोन्ही गोयंकारांचे स्वतःचे, कौटुंबिकसण आहेत, त्याचे पर्यटनासाठी फारसे मार्केटींग केले जात नाही. मी कुटुंबासह ख्रिसमस साजरा करण्यासाठी गोव्यात असतो तेव्हा पणजीत आणि इतर शहरांतही पर्यटकांचे अस्तित्व जाणवतही नाही. पणजी चर्चला कोकणी भाषेतील ख्रिसमस मिडनाईट मिस्सेसाठी मी जॅकलिनसह गेलो तेव्हा चर्चसमोर ख्रिस्तजन्माचा मोठा देखावा केला होता मात्र भाविकांशिवाय मिस्सा होती, पर्यटक अजिबात नव्हते.
भाजीपाव हा गोयंकारांचा सर्वांत लोकप्रिय नाश्त्याचा पदार्थ. भाजीपाव ! या भाजीपावातीलपावांचे आणि भाजींचेही अनेक प्रकार आहेत. बटाटा भाजी, टमाटा भाजी, पातळ भाजी, मिक्स्ड भाजी, सुकी भाजी, उसळ भाजी, वाटाणा भाजी, मुगाची भाजी असे भाज्यांचे अनंत प्रकार असतात.
त्यामुळे गोव्यात सुटटीवर असलो बहिणीच्या घरी नाश्त्याला भाजी-पाव असतो आणिपावाबरोबर नारळ घालून केलेली घट्ट अशी उसळ किंवा वाटाणा भाजी, बटाट्याची सुकी किंवा पातळ भाजीअसते, एकाही भाजीची आठवड्यात कधी पुनरावृत्ती होत नसते.
गोव्याला अनेकदा जाऊनही गोव्याची खासियत असलेल्या भाजी-पाव या खाद्यपदार्थाची अनेकांना माहितीही नसते. याचे कारण म्हणजे या भाजी-पावची चव घेण्यासाठी तुम्हाला गोयंकाराच्याच हॉटेलांत जावे लागते.
कॅफे भोंसले, कॅफे तातों (Cafe Tato ) आणि कॅफे रिअल ही पणजी येथील गोयंकार पद्धतीची जेवण आणिनाश्ता देणारी सर्वांत प्रसिद्ध हॉटेल्स आहेत. यापैकी कॅफे तातोंने २०१३ ला आपल्या खाद्यसेवेचे शतक ओलांडले तर कॅफे भोंसलेने १८ फेब्रुवारी २०२० ला शतक पूर्ण केले. गोव्यात कधीही आला तर येथल्या भाजीपावचा आस्वाद घेण्याची संधी चुकवू नका असा माझा या सर्वांना आग्रह असतो !
गोव्याच्या खाद्यसंस्कृतीचा विषय निघाल्यावर तिथल्या पेयपानाबद्दल ( कि अपेयपान ?) कसे टाळता येईल ? गोव्यातल्या कुठल्याही मांसाहारी जेवणाच्या हॉटेलांत तुम्ही बसला कि वेटर ताबडतोब टेबलावर काचेचे रिकामे ग्लास ठेवतो. उडुपी हॉटेलांत टेबलावर पाण्याचे ग्लास ठेवतात तसे. याचे कारण म्हणजे गोव्यात परमिट रुम हा प्रकारच नाही.
पणजीत मी नवहिंद टाइम्स या इंग्रजी दैनिकाचा बातमीदार असताना दुपारी किंवा संध्याकाळच्या पत्रकार परिषदेत जेवणाआधी ड्रिंक्स असायचेच. गोव्यात सद्या उर्राकचा सिझन चालू आहे. पेयपानाविषयी कालच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार काहीतरी बोलले आहेत. कडक दारुबंदी असलेल्या बिहारमध्ये भाजपची नितीश कुमारांबरोबर सत्ता आहे. गोव्यातसुद्धा सत्तेवर असलेला भाजप मात्र या राज्यात दारुबंदीचा विचारही करणार नाही.
नवहिंद टाइम्सचा बातमीदार म्हणून १९८०च्या दशकात गोवा बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेतील टॉपर्सच्या घरी जाऊन मी त्यांना ही खुशखबरी द्यायचो तेव्हा त्या उन्हाळाच्या दिवसांत दुपारी अनेक कॅथोलिक कुटुंबांत मला फ्रीजमधल्या थंडगार बियरचा वा एखाद्या होम-मेड वाईनचा पाहुणचार व्हायचा !
गोव्यात फिश-करी राईस व्यतिरिक्त चिकन शाकुतीसारख्या इतर खास गोवन खाद्यपदार्थांचाहि आस्वाद घ्यायला हवा. मागे एकदा मी नावेली येथे बस स्टॉपपाशी उभा असताना शेजारच्या शाळेतून एक मुलगा धावत जवळच्या दुकानात आला आणि म्हणाला. अंकल, माका एक बिफ पॅटिस दी !
ते ऐकून मी चमकलो आणि नंतर लक्षात आले कि मी गोव्यात आहे आणि येथे महाराष्ट्राप्रमाणे बिफ पदार्थांवर बंदी नाही. गोव्यात कॅथोलिक व्यक्तींमार्फत चालविलेल्या हॉटेलांत बिफ-स्टीक वगैरे पदार्थ मिळतात. कॅथोलिक कुटुंबात पाहुणचाराचा योग्य लाभला तर डुकराच्या मांसाचे (पोर्क) केलेले सोरपोतेर, चिकन वा पोर्क विंदालू या मांसाहारी पदार्थांची चव घेता येईल.
मांसाहाराचे शौकीन असलेलया मंडळींनी चोरिस पाव हे पोर्कपासून बनवलेले चमचमित, मसालेदार सँडविच खायलाच हवे. याशिवाय पणजी चर्चपाशी असलेल्या मिस्टर बेकर- 1922 या दुकानात आणि म्हापसा मार्केटमध्ये अनेक दुकानांत गोव्याची खासियत असलेल्या बिबिन्का, काळ्या गुळापासून बनवलेल्या दोदलसारखे विविध बेकरी पदार्थ, केक वगैरे मिळतात.
गोव्यात असताना ``घे घे घे घेरे घे रे सायबा'' असे शब्द असलेले ते सुंदर देखणी नृत्य आणि गोव्याचे पारंपारिक वाद्य असलेल्या घुमटाचा नाद पणजीला बोट क्रूझवर गेले असताना अनुभवता येते. राज कपूरने आपल्या बॉबी या चित्रपटात या गाण्याच्या ओळी वापरल्या आहेत.
त्याशिवाय तुमच्या सुदैवाने गोवाभेटीच्या दरम्यान जवळपास कुठे तियात्र या कोकणी लोकनाट्याचा कुठे प्रयोग असेल तर ही लोककला अनुभवण्याची संधी सोडू नका. तियात्र नाट्य प्रामुख्याने ख्रिस्ती समाजात अधिक लोकप्रिय आहे.
गोव्यामध्ये खासगी बस वाहतूक आहे. गोव्यातील या खासगी बस वाहतुकीचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही रस्त्यावर, एखाद्या चौकात किंवा अगदी रस्त्यापाशी असलेल्या तुमच्या घरापाशी थांबून तुम्ही राव रे! अशी हाक दिली की नागमोडी रस्त्यावर कितीही वेगात असलेली ही खासगी बस तुमच्यासाठी हमखास थांबते.
१९७०च्या दशकात गोव्यातील बहुतेक समुद्रकिनारी निर्जन असायचे. कलंगुट आणि कोलवा हे बिच तेव्हाही लोकप्रिय असले तरी अंजुना-वागातोर, वारका वगैरे समुद्रकिनारी कुणी फिरकतही नसायचे. अंजुना बिचवर दर बुधवारी भरणारे ;फ्ली -मार्केट+'' त्याकाळीही एक आकर्षण असायचे. या फ्ली-मार्केट परदेशी पर्यटक आपल्याकडील विविध वस्तू विकायला काढीत असत आणि यापैंकी अनेक वस्तू दुर्मिळ किंवा कलात्मक असत.
मागे युरोपला सहलीला असताना पॅरीसमध्ये मोन्तमार्ट परिसरात भुयारी मेट्रोच्या वर असलेल्या वॉकिंग प्लाझावर असाच बाजार भरलेला दिसला. तेथे अनेक लोक आपल्या कुटुंबियांबरोबर घरातील कितीतरी नको असलेल्या वस्तू - पुस्तके, फर्निचर, कपडे - विकत होते. तो बाजार पाहिला आणि मला गोव्याच्या या फ्ली-मार्केटची लगेचच आठवण आली.
गोव्यात सुट्टीवर असल्यावर समुद्रात मनसोक्त डुंबायचे हा माझा आवडता छंद. मिरामार बीचवर हॉस्टेलात आणि नंतर जवळच्या ताळगावात अनेक वर्षे राहिल्याचा हा परीणाम. गोव्यात कुणाबरोबरही आलो तरी त्यांनी - अगदी लहान-मोठ्यांनीही - माझ्या देखरेखीखाली आणि खबरदारीच्या सूचनांचे पालन करत समुद्राच्या पाण्यात डुंबण्याचा आनंद घ्यावाच असा माझा आग्रह असतो, अर्थांत गोव्यातील कुठला समुद्रकिनारा सुरक्षित आहे,
समुद्रात कुठवर आत जाणे सुरक्षित आहे हे अनुभवाने मला माहित आहे. समुद्रात पोहोण्याचीं माहिती नसलेल्या इतर कुणाही व्यक्तीने समुद्रात न शिरलेले बरे. विशेषतः निर्जन स्थळी आणि लाईफ गार्डस नसलेल्या ठिकाणीकधीच हा धोका पत्करु नये.
गोव्यातील प्रवासी वाहतुकीचे आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे तेथील पायलट दुचाकी सेवा. अलीकडच्या काळात प्रवासी दुचाकीची एका नवी सेवा गोव्यात सुरू झाली आहे. तुमच्याकडे पॅनकार्डसारखा ओळखपत्र पुरावा असला की तुम्हाला एखादी दुचाकी दिवसाला साडेतीनशे किंवा चारशे रुपयांस भाडयाने मिळू शकते. मागे एकदा मी एका पेट्रोलपंपावर उभा होते तेव्हा पेट्रोल भरणाऱ्या युवकाने विचारले, गोव्यात फिरायला आला का? भाडेतत्त्वावर दिल्या जाणाऱ्या दुचाकीचे मडगार्ड व्यावसायिक वाहनाचे म्हणजे पिवळ्या रंगाचे असल्याने मी पर्यटक आहे हे त्याने ओळखले होते !
गोव्यात पाहण्यासारखे आणि अनुभवावे असे खूप आहे. मात्र पर्यटकांचे आकर्षण बनल्यावर साताऱ्याजवळच्या ठोसेघर धबधब्याचे किंवा बहुजैविकतेचा खजिना असलेल्या आणि असंख्य रंगीबेरंगी फुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या कास पठाराचे काय झाले याचा अनुभव घेतल्यावर गोव्यातील अशा काही स्थळांविषयी फार गाजावाजा न केला तर बरे असे वाटते. त्यामुळे काही गोष्टी आणि जागांविषयी मी मुद्दाम येथे काही सांगत नाही.
गोव्यात आजही अनेक ठिकाणी बेटे आहेत जिथे केवळ बोटीनेच ये-जा करावी लागते. पर्यटकांनी एक वेळ अवश्य या बोट राईडचे थ्रिल अनुभवावे आणि बेटावरचे लोकजीवनही पाहावे.
गोव्याचा दौरा करायला उत्सुक असणाऱ्या लोकांनी गोव्याची ही संस्कृती नव्याने अनुभवायला हवी
(चौफेर दिवाळी 2020)

Comments

Popular posts from this blog

Dnyanodaya monthly enters 175th year

Shakuntala Paranjape : Crusade of a lifetime

Fr. Rudolf Schoch. A Jesuit Looks back in satisfaction