संजीवनी साखर कारखाना संस्थापक शंकरराव कोल्हे
''तुम्ही मुंबई-पुण्याकडची आणि इतर शहरांतले पत्रकार, तुम्हाला आमच्याकडच्या प्रश्नांची काय माहिती असते ? इकडे येण्याआधी तुम्ही चारदोन स्थानिक पत्रकारांशी बोलता, जुनी वार्तापत्रे नजरेकडून घालता आणि आमच्यासारख्या लोकांना तेच-तेच प्रश्न विचारता. शेतीसाठी पाणीवाटपाचा वाद, अहमदनगर जिल्ह्यातील उत्तर आणि दक्षिण वाद आणि शंकरराव काळे -शंकरराव कोल्हे वाद, बस्स, हे विषय सोडून तुमची गाडी पुढे ढळतच नाही. हा, घ्या तुम्ही तो नाश्ता आणि चहा,,,''
कोपरगावातल्या संजीवनी साखर कारखान्याच्या आवारात साखर कारखाना संस्थापक शंकरराव कोल्हे यांची मुलाखत घेताना अगदी सलामीला झडलेला हा संवाद.
माझ्यापेक्षा वयाने आणि कर्तृत्वाने तर खूप मोठे असलेल्या शंकरराव कोल्हे यांच्या समोर मी बसलो होतो आणि माझ्याकडून एकदोन प्रश्न विचारले गेल्यानंतर या साखरसम्राटांनी अशी तोफ डागली होती.
अर्थात `इंडियन एक्सप्रेस' या इंग्रजी आणि राष्ट्रीय पातळीवरच्या दैनिकाचे मी प्रतिनिधीत्व करत असल्याने समोरच्या व्यक्तीच्या कर्तृत्वाने किंवा नुसत्या बोलण्याने मी दबून जाण्याचा प्रश्नच नव्हता, तरी कोल्हे जे म्हणत होते त्यात तथ्य असल्याने मी गप्प बसलो होतो.
ही घटना आहे १९९० ची. कोल्हे पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात कोपरगावमधून उभे होते आणि निवडणुकीच्या वार्तांकनासाठी पुण्याहून
मी कोपरगावला आलो होतो.
सकाळी आठच्या दरम्यान मी तेथे पोहोचलो होतो आणि कोल्हे यांनी मुलाखतीसाठी आणि त्याचबरोबर नाश्त्यासाठी मला बोलावले होते.
ट्रेमधून नाश्ता आला तेव्हा माझ्यासाठी पोहे आणि इतर पदार्थ होते तर कारखान्याचे चेअरमन कोल्हे यांच्यासमोरच्या ताटात मात्र ज्वारीची भाकरी आणि कुठलीशी भाजी होती !
माझ्या प्रश्नार्थक चेहेऱ्याकडे पाहून कोल्हे म्हणाले, '' अहो तुम्हा पत्रकारांच्या आणि इतरांच्या भाषेत आम्हाला `साखरसम्राट' म्हणून हिनवले जाते पण आम्हाला कुठे ही साखर पचवता येते? मधुमेहाचे पेशंट म्हणून आम्हाला अशी साधी भाकरी भाजीच खावावी लागते. हा, होऊ द्या तुमचे सावकाश, आपण बोलत राहू,'' असे म्हणत कोल्हे यांनी समोरच्या गरमागरम भाकरीचा एक तुकडा मोडला.
जब्बार पटेल दिग्दर्शित ``सामना' चित्रपटात निळू फुले यांनी रंगवलेल्या पात्रामुळे ऐंशी आणि नव्वदच्या काळात सहकारी चळवळीतील नेते आणि विशेषतः साखरसम्राट यांची एक वेगळीच प्रतिमा जनमानसात रुढ झाली होती, कोल्हे यांच्या या वाक्यात हा संदर्भ होताच.
कोल्हे या वेळी निवडणुकीच्या रिंगणात शिरल्याबरोबर यावेळी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार अशी चर्चा होती. तुमची तेव्हढी स्टॅच्यूर आहे असे मी म्हणण्याचा अवकाश आणि कोल्हे यांनी लगेच इंग्रजीतून काही वाक्ये उच्चारली आणि मी गारद झालो.
धोतर, पांढरा सदरा आणि डोक्यावर गांधी टोपी असलेली ही व्यक्ती इंग्रजीतून बोलू शकेल अशी मी कल्पनाही केली नव्हती. त्यानंतर ग्रामीण व शहरी भागातील कुठल्याही व्यक्तीच्या इंग्रजी संभाषणाविषयी असा कुठलाही किंवा इतर कुठलाही समज / गैरसमज बाळगायचा नाही हे पथ्य मी नंतर नेहेमी पाळले.
त्या अर्ध्याएक तासाच्या मुलाखतीत आम्हा दोघांचे काय संभाषण झाले ते आता तीस वर्षांनंतर काहीच आठवत नाही, मात्र त्या मुलाखतीने अहमदनगर जिल्ह्यातील आणि एकूणच महाराष्ट्रातील ग्रामीण राजकीय नेतृत्वाविषयी मला खूप काही शिकवले हे नक्की .
आज सकाळी शंकरराव कोल्हे यांचे वयाच्या ९४व्या वर्षी निधन झाल्याची बातमी वाचली आणि मागची ही घटना डोळ्यासमोर उभी राहिली.
Comments
Post a Comment