तंत्रज्ञानाची अविश्वसनीय दौड -भवताल २७ मार्च २०२२ 

 ``कामिल सर, मी सोनाली बोलतेय. आमच्या न्यूज चॅनेलवर निवडणूक निकालाच्या दिवशी १० मार्चला बोलायला स्टुडियोत याल का?'

काही दिवसांपूर्वी असे फोनवर विचारले गेले आणि मी चमकलो. कशावर बोलायचे असे विचारल्यावर 'गोव्यातल्या निवडणूक निकालावर विश्लेषण ' असे उत्तर आले आणि मी काय ते समजून घेतले.
गेली दोनअडीच महिने म्हणजे निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याआधीपासून गोव्यातील राजकीय घडामोडींवर, तिथल्या राजकारणावर समाजमाध्यमांवर अनेक लेख टाकल्याचा हा परीपाक होता हे उघडच होते.
गोव्यातले राजकारण मी सत्तरच्या दशकापासून जवळून पाहत आलो आहे. गेली अनेक वर्षे सत्तेच्या खेळात केवळ तोंडी लावण्यापुरता उरलेला महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष तेव्हा गोवा, दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेशात सत्तेवर होता, पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांच्या कन्या शशिकला काकोडकर या तेव्हा मुख्यमंत्री होत्या.
पदवीशिक्षणानंतर लगेचच नवहिंद टाइम्सचा बातमीदार म्हणून रुजू झालो होतो त्यामुळे मग गोव्यातले राजकारण, समाजकारण आणि संस्कृती यावर वेळोवेळी लिहिणे झालेच.
पुण्याला राष्ट्रीय पातळीवरच्या इंडियन एक्सप्रेस, नंतर टाइम्स ऑफ इंडिया आणि अलिकडेच `सकाळ'च्या महाराष्ट्र हेराल्ड - सकाळ टाइम्स या इंग्रजी दैनिकांत काम करताना गोव्याशी जुळलेली नाळ कायम घेऊन वावरलो, माझ्या लिखाणातून याचे प्रतिबिंब पडतेच. आजकाल माझे राहणे पिंपरी चिंचवडला आणि गोव्याप्रमाणेच पूर्वी पोर्तुगीजांची वसाहत असलेल्या दादरा नगर हवेली येथे असले तरी गोव्यात नियमितपणे जात असल्याने तिथल्या घडामोडींवर लक्ष असतेच. त्यामुळेच मला आता गोव्यातल्या निवडणूक निकालावर बोलायला आमंत्रण आले होते.
गेली काही वर्षे मानसिक स्वास्थ बिघडते म्हणून देशातील कुठलेही न्यूज चॅनल्स पाहणे एकदम बंदच केले आहे, त्यामुळे `लाईव्ह प्रोग्रॅम'साठी कुठला ड्रेस कोड असतो याविषयी काही कल्पना नव्हती. टी-शर्टमध्ये मी कंपर्टेबल असतो म्हणून कारच्या प्रवासात टी-शर्ट घातला पण स्टुडियोत पाऊल ठेवल्यावर आजूबाजूला पाहिले अन मी गडबडलो. नशिबाने अमेरिकेच्या शैक्षणिक दौऱ्यावर परतताना जॅकलिनने माझ्यासाठी आणलेला निळा शर्ट सोबत बॅगमध्ये आणला होता, पटकन तो अंगात घातला आणि हुश्श केले. आपल्या टिव्ही प्रोग्रॅमच्या ड्रेस कोंडविषयी नंतर लिहितोच.
देशातल्या पाच विधानसभांच्या निवडणूक निकालाच्या त्या दिवशी भल्या सकाळी न्यूज चॅनेलच्या स्टुडिओत व्हिडीओ कॅमेरामॅनने शर्टाला मानेजवळ तो माईक अडकवला आणि खूप, खूप वर्षांपूर्वीची अशीच एक घटना माझ्या नजरेसमोर उभी राहिली.
गोव्यातल्या वॉस्को शहरात कुठल्याशा लष्करी संस्थेच्या कार्यक्रमात ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांच्या भाषणाच्या पूर्वी कुणी एकाने असाच रिमोट तंत्रावर चालणारा माईक त्यांच्या शर्टाला अडकवला होता आणि पत्रकारांसाठी असलेल्या पुढच्या रांगेत बसलेलो मी त्या छोट्याशा यंत्राकडे आ वासून पाहत होतो.
सन १९८५च्या आसपासची ही घटना. त्याकाळात व्यासपिठावर स्टेनलेस स्टिलच्या चारपाच फुटी स्टँडला लांबपर्यंत गेलेली वायर असलेला माईक अडकवल्यानगर वक्ता आपले बोलणे सुरु करी. तंत्रज्ञानात मोठी प्रगती होण्यास नुकतीच सुरुवात झाली होती आणि या नव्या युगातले अशाच प्रकारचे हे एक साधन - वायरलेस माईक - मी पहिल्यांदाच पाहत होतो.
सन १९८१ ला मी पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला तेव्हा डेम्पो उद्योगसमूहाच्या मालकीच्या नवप्रभा या मराठी दैनिकासाठी हॅन्ड कंपोझिंग असायचे म्हणजे समोरच्या खोक्यांत असलेली खिळ्यांवरची अक्षरे निवडून शब्द आणि वाक्ये तयार केली जायचे. मी बातमीदार असलेल्या इंग्रजी दैनिकासाठी त्याच इमारतीत तळमजल्यावर अवाढव्य आकाराची आणि अवजड लायनो ऑपरेटींग मशिन्सवर एक एक ओळींचे वितळलेल्या जस्ताच्या पट्टींवर शब्द आणि वाक्ये आकाराला यायचे. ही त्याकाळची मॉडर्न यंत्रणा देशातील बहुतेक इंग्रजी दैनिकांसाठी वापरली जायची.
तेव्हापासून आतापर्यंत संवादाच्या आणि संपर्काच्या साधनांत आणि एकूणच तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात किती बदल आणि प्रगती झाली आहे हे असे मागे वळून पाहताना माझ्यासारखी या क्षेत्रातच वावरणारी व्यक्ती एकदम थक्क होते. लँडलाईन टेलिफोनचा वेगाने झालेला सार्वत्रिक वापर, बाहेरगावांसाठी असलेली एसटीडी सुविधा आणि नंतर सर्वांच्या हातात आलेला मोबाईल, सरकारी मालकीच्या दूरदर्शनबरोबरच खासगी टेलिव्हिजन कंपन्यांचे आगमन आणि मग चोवीस तास बातम्यांचे दळण दळणारी ही न्यूज चॅनेल्स.
न्यूज चॅनेलच्या `लाईव्ह’ कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी माझ्या शर्टाला तो छोटासा माईक लटकवण्यात आला त्यावेळी अनिल काकोडकरांचा भाषणाचा तो प्रसंग डोळ्यांसमोर तरळला आणि मग त्यानंतरची तंत्रज्ञानातल्या वेगवान प्रगतीची ही विविध साधनेसुद्धा माझ्या डोळयांसमोर एकापाठोपाठ झळकून गेली.
सत्तरच्या दशकात दर बुधवारी रात्री आठ ते नऊ या वेळेत रेडिओ सिलोनवर अमिन सयानी यांनी सादर केलेला `बिनाका का गीतमाला' हा कार्यक्रम घरोघरी अक्षरशः कान देऊन ऐकला जायचा, या एक तासाच्या काळात शहरातली आणि गावांगावांतली वर्दळ एकदम ठप्प व्हायची, असाच काहीसा प्रकार रामानंद सागर यांच्या `रामायण’ आणि नंतर बी आर. चोप्रांच्या `महाभारत’ या दूरदर्शनवर दाखविल्या जाणाऱ्या मालिकांबाबत घडला होता.
दर रविवारी सकाळी दाखविल्या जाणाऱ्या या मालिकांच्या प्रसारणांच्या कालावधीत संपूर्ण देशातल्या शहरातील रस्ते `बंद’च्या काळासारखे अगदी ओस पडायचे यावर आजच्या पिढीतील लोकांचा विश्वास बनणार नाही. `बिनाका गीतमाला’ `रामायण’ आणि महाभारत या कार्यक्रमांच्या या जादूचे कारण म्हणजे त्याकाळात करमणुकीची साधने अगदीच मर्यादित होती.
दर महिन्याच्या पहिल्या तारखेला सकाळी सातच्या दरम्यान रेडिओवर '' खुश है जमाना आज पहिली तारीख है'' हे गाणे ऐकवले जायचे, माझ्या पिढीतल्या लोकांना हे गाणे त्यामुळे तोंडपाठ आहे.
ऐंशीच्या दशकात भारतात आधी कृष्णधवल आणि नंतर रंगीत टेलिव्हिजन युग सुरु झाले. त्याआधी देशातील जनता आकाशवाणी केंद्रातर्फे दिवसातून केवळ चारपाच वेळेस सांगितल्या जाणाऱ्या बातमीपत्रांवर अवलंबून असायची. आकाशवाणी केंद्रांवर नियमितपणे बातम्या वाचणाऱ्या व्यक्तींभोवती वलय निर्माण व्हायचे, यापैकी प्रत्येकाची बातमी वाचण्याची खास धाटणी असायची.
दररोज सकाळी साडेआठ वाजता आकाशवाणी केंद्रावरुन प्रसारित होणाऱ्या मराठीतील प्रादेशिक बातम्या महाराष्ट्रात रेडिओवर अगदी मोठ्या आवाजात घरोघरी ऐकल्या जायच्या ! . ``आकाशवाणी पुणे, सुधा नरवणे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहेत’’ हा एक ओळखीचा आवाज असायचा. दूरदर्शनवर अनेक वर्षे बातम्या देणारे दाढीधारी अनंत भावे यांचा परिचित चेहरा असायचा.
भारतात अनेक घरांत नवा दिवस आकाशवाणी रेडिओच्या त्या परिचित संगीतधुनीने आणि `वंदे मातरम’ गीताने उजाडायचा आणि रात्री साडेदहाच्या आसपास आकाशवाणीवरचे कार्यक्रम संपायचे अन मग लोक रेडिओ सिलोनवर पुढील एक तास 'भुले बिसरे गीत' ऐकत राहायचे.
तोपर्यंत वृत्तपत्रे शहरांत आणि गावोगावी घरोघर पोहोचली नव्हती त्यामुळे जगातील, देशातील आणि राज्यातील हालहवाल समजावून घेण्यासाठी सामान्य लोक आकाशवाणी म्हणजे सरकारी मालकीच्या रेडिओवरच अवलंबून असत.
अगदी तातडीने आणि विश्वनसीय बातम्या देण्याबाबत ब्रिटिश ब्रॉडकास्टींग कॉर्पोरेशन किंवा `बीबीसी’चा विशेष बोलबाला होता. उदाहरणार्थ, पंतप्रधान इंदिरा गांधींवर ३१ ऑकटोबर १९८४ साली सकाळी झालेल्या हल्ल्यात त्या ठार झाल्या ही बातमी बीबीसीने लगेचच सांगितली. राजीव गांधी यांचा पंतप्रधान म्हणून संध्याकाळी शपथविधी झाल्यावर सरकारतर्फे अधिकृतरित्या हे जाहीर करण्यात आले !
टेलिव्हिजनचा जमाना सुरु झाल्यानंतर त्याकाळात जगभरच्या लोकांनी त्या शतकातला शाही विवाहसोहोळा म्हणजे ब्रिटिश युवराज प्रिन्स चार्ल्स आणि लेडी डायना यांच्या लग्नाचा विधी या छोट्या पडद्यावर पाहिला. गोव्यात मी बातमीदार असलेल्या नवहिंद टाइम्स या इंग्रजी दैनिकाने लंडनमधल्या या राजघराण्यातल्या विवाहाची टेलिव्हिजनवर दाखवली जाणारी दृश्ये कॅमेऱ्यात टिपून हे फोटो दुसऱ्या दिवशीच्या दैनिकाच्या आवृत्तीत वापरले होते तेव्हा हा मोठा चमत्कार समाजाला गेला होता. कारण लंडनमधल्या त्या लग्नाचे फोटो अन्यथा चारपाच दिवसांनी मिळाले असते !
रेडिओवर आणि दूरदर्शनवर मनोरंजनाचे आणि प्रायोजित कार्यक्रमसुद्धा दिवसांतून ठराविक तासच असायचे, या क्षेत्रांत खासगीकरण झाल्यानंतरच लोकांना या सुविधा रात्रंदिन मिळू लागल्या.


मी शाळा-कॉलेजात असताना पोस्ट खात्यामार्फत पाठविली जाणारी टेलिग्राम किंवा तार हे सर्वाधिक जलद दळणवळणाचे साधन होते. सरकारच्या पोस्ट आणि नंतर टेलिफोन खात्याने अनेक वर्षे लोकांच्या निरोपांची देवाणघेवाण आणि संभाषण यात महत्त्वाची भूमिका पार पाडली. आज मोबाईल आणि ईमेलच्या मदतीने जगभर कुणाशीही झटपट संपर्क आणि संभाषण साधले जाते, शेकडो-हजारो पानांच्या मजकुरांची काही क्षणांत देवाणघेवाण होते आणि कितीही रक्कम दुसऱ्याच्या खात्यात जमा केली जाऊ शकते जाते. आणि हे सर्व करणे सहजशक्य आहे अशी दोन किंवा तीन दशकांपूर्वी कुणी कल्पनाही करू शकत नव्हते.
मुंबई विद्यापीठाचा माझा बीएचा निकाल लागण्याआधीच वयाच्या २१ व्या वर्षी म्हणजे १९८१ साली मी `नवहिंद टाइम्स'चा बातमीदार झालो, तेव्हा या इंग्रजी दैनिकासाठी आवश्यक असलेले टाइपिंग शिकण्यातच एक वर्ष धडपड करावी लागली. एक टाईपरायटर त्यावेळी संपादकीय विभागातील दहाबारा जण वापरायचे, बसायला स्वतंत्र टेबल किंवा खुर्ची म्हणजे फार, फारच पुढची गोष्ट.
आजच्या स्टुडिओमध्ये पत्रकारांमधली पार्थ एमएन, मंगेश कोळपकर, धनंजय बिजलेसारखी तरुण मंडळी `लाईव्ह प्रोग्रॅम'मध्ये निवडणुकीचे विश्लेषण अगदी लिलया करताना पाहिले आणि त्यांच्याबद्दल कौतुक वाटले.
त्या दिवशी अनिल काकोडकरांच्या शर्टाच्या कॉलरपाशी तो रिमोटपद्धतीचा माईक लावला गेला तेव्हा त्यांचा आवाज त्या हॉलमध्ये हजर असलेल्या आम्हा लोकांनाच ऐकू येत होता. केवळ तीस वर्षांनंतर कुणाही व्यक्तीचे संभाषण जगभर `लाईव्ह' पाहता येणे शक्य आहे असे तेव्हा आमच्यापैकी कुणीसुद्धा कल्पनाही केली नव्हती.
मानवजातीच्या हजारो नव्हे लाखो वर्षांच्या इतिहासात कधीही झाली नव्हती इतकी प्रगती गेल्या शतकाच्या नव्हे तर केवळ अर्धशतकाच्या अल्प कालावधीत झालेली आहे. आणि यापुढच्या काही वर्षांतसुद्धा तंत्रज्ञान आणि प्रगतीच्या बाबतीत अशीच खूप मोठी झेप घेतली जाणार आहे हे निश्चित.
(मूळ लेख `दिव्यमराठी' मधला) March 23, 2022

Comments

Popular posts from this blog

Shakuntala Paranjape : Crusade of a lifetime

Dnyanodaya monthly enters 175th year

Fr. Rudolf Schoch. A Jesuit Looks back in satisfaction