महारांना पौराहित्य द्यावे का? असे दचकावून जाऊ नका.
Fr. Gurien Jacquier (MSFS)
महारांना पौराहित्य द्यावे का? त्यांना धर्मगुरुची दीक्षा दिल्याने धर्मद्रोह होतो का? समाजातील अगदी खालच्या पातळीवर असलेल्या जातीच्या या लोकांना पौरोहित्याचे अधिकार दिल्यास समाजातल्या वरच्या जातींतले लोक त्यांना स्विकारतील का? याबाबत धर्मशास्त्रांचे मत अजमावून घ्यावे लागेल का? धर्माचार्यांचे याबाबत मार्गदर्शन आणि परवानगी घ्यावे लागेल का?
असे दचकावून जाऊ नका. हे प्रश्न एक शतकापूर्वी स्वातंत्र्यपूर्व काळात विदर्भात आणि मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यात विचारले गेले होते. आणि त्याबाबत नक्की काय निर्णय घ्यावा, त्याचे पडसाद काय उमटतील याविषयी प्रश्नचिन्ह होते. भारतातील समाजजीवनाविषयी, येथील अस्पृश्यांविषयी लोकांमध्ये असलेल्या तिरस्काराच्या भावनेची कल्पना असल्याने काही युरोपियन लोक याबाबत विचार करत होते. आणि त्यामुळे अस्पृश्य समाजातील एक महाराला पौराहित्याचे म्हणजे ख्रिस्ती धर्मगुरुची दीक्षा देणे कितपत औचित्याचे ठरेल याबाबत उहापोह चालू होता.
एकोणिसाव्या शतकात जर्मन प्रॉव्हिन्सच्या येशूसंघीय (जेसुईट) धर्मगुरुंनी मुंबईत आणि अहमदनगरसह मध्य महाराष्ट्रात मिशनकार्य सुरु केले. त्याचदरम्यान फ्रान्सच्या मिशनरीज ऑफ सेंट फ्रान्सिस डी सेल्स (एम एस एफ एम - फ्रान्सलियन) संस्थेच्या धर्मगुरुंनी विदर्भात आणि मराठवाड्यात चर्चेस आणि शाळा सुरु केल्या होत्या. काही काळानंतर ख्रिस्ती धर्मात आलेल्या महार जातीच्या कुटुंबांतील एका तरुणाने फ्रान्सलियन संस्थेत व्रतस्थ म्हणून सामिल होण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि त्यामुळे या संस्थेच्या फादरांसमोर आणि संस्थाअधिकाऱ्यांसमोर बाका प्रश्न उभा राहिला होता.
तोपर्यंत फ्रान्सलियन संस्थेने एकाही स्थानिक, अस्पृश्य समाजातील व्यक्तीला आपल्या सेमिनरीत प्रवेश दिला नव्हता. आता काय करावे असा ;प्रश्न होता.
अहमदनगर जिल्ह्यात येशूसंघीय धर्मगुरूंचे प्रेषितकार्य 1878 साली सुरू झाले तर एमएसएफएस संस्थेचे कार्य मराठवाड्यात घोगरगाव येथे 1892 साली सुरू झाले. येशूसंघीयांच्या तुलनेने फ्रान्सलियन संस्थेत धर्मगुरू वा ब्रदर होण्यासाठी स्थानिक तरूण अधिक लवकर आकर्षित झाले किंवा या संस्थेने त्यांना तशी संधी लवकर दिली असे म्हणावे लागेल.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1953 साली अहमदनगर जिल्ह्यातील एक तरूण, थॉमस भालेराव, यांनी येशूसंघात उमेदवार म्हणून प्रवेश केला आणि 1965 साली गुरुदिक्षा झाल्यानंतर ते पहिले स्थानिक येशूसंघीय धर्मगुरू ठरले. या जिल्ह्यात प्रेषितकार्य सुरू झाल्यानंतर जवळजवळ शंभर वर्षानंतर येशूसंघातील पहिले स्थानिक धर्मगुरू होण्याचा सन्मान त्यांना मिळाला. नंतर या समाजाचे पहिले कॅथोलिक बिशप होण्याचाही सन्मान त्यांना लाभला
मुंबई आणि वसई परिसर वगळता उर्वरित महाराष्ट्रातील स्थानिक तरूणांना प्रेषित कार्यासाठी आकर्षित करणारे, त्यासाठी त्यांना पाठबळ देणारे फादर गुरियन जाकियर हे पहिलेच धर्मगुरू म्हणावे लागेल. अहमदनगर जिल्ह्यातील जोसेफ मोन्तेरो हे फादर जाकियर यांच्या कार्याने प्रभावित होऊन धर्मगुरू बनले. विदर्भातील अमरावतीजवळील आचलपूर येथील पॅट्रिक तायडे यांनीसुध्दा जाकियरबाबांच्या सहवासात राहून पुढे स्वत:ला धार्मिक सेवेस वाहून घेण्याचा निर्णय घेतला.
फादर जोसेफ मुन्तोडे यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील चिंचोळे गावी 29 सप्टेंबर 1902 रोजी झाला. जोसेफला त्याचा थोरला भाऊ जॉन याने तेथून जवळच असलेल्या केंदळ गावातील फादरांच्या बोर्डिंगमध्ये ठेवले. मिशनरींच्या जीवनाचा त्याच्या मनावर प्रभाव पडला आणि आपणही धर्मगुरू होऊन समाजाची सेवा करावी असे त्याला वाटू लागले.
शिर्डीजवळच्या राहाता येथील येशूसंघीय जर्मन धर्मगुरू फादर हेन्री डिबेल्स यांनासुध्दा पहिल्या महायुद्धामुळे अटक झाली होती. त्यामुळे त्यावेळी बोरसर येथे असलेले फ्रेंच फादर जाकियर यांची राहाता मिशन केंद्रात बदली झाली होती. सन 1917 मध्ये जोसेफला राहाता येथे शिकायला आला. पुढे फादर जाकियर यांनी जोसेफला अहमदनगरच्या मिलिटरी स्कूलमध्ये इंग्रजीच्या अभ्यासासाठी पाठवले, नंतर येशूसंघीय धर्मगुरूंच्या पुण्यातील सेंट विन्सेंट हायस्कूलमध्ये दाखल केले.
जोसेफला धर्मगुरूपदाची दीक्षा देण्यास एमएसएफएस या संस्थेतील काही धर्मगुरूंचा विरोध होता. जोसेफ यांचे वडील हिंदू होते. जोसेफ एक महार होता आणि तोपर्यंत महार समाजातील एकाही व्यक्तीला धर्मगुरूची दिक्षा देण्यात आली नव्हती. त्याशिवाय नव्यानेच ख्रिस्ती झालेल्या तरुणाला गुरुदिक्षा देणे योग्य नाही असे काही धर्मगुरूंचे म्हणणे होते. मात्र जोसेफला आपल्या एमएसएफएस संस्थेत प्रवेश द्यावा याबाबत फादर जाकियरबाबा अगदी ठाम होते.
नागपूरचे बिशप कॉपेल यांनी आपल्या धर्मप्रांतासाठी धर्मगुरूपदाचे उमेदवार म्हणून जोसेफची निवड केली. जोसेफने त्रिचनापल्ली येथील सेंट पॉल सेमिनरीत धर्मगुरू होण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतला. मुंतोडे आडनाव मोन्तेरो झाले.
नागपूर येथे 8 डिसेंबर 1930 रोजी जोसेफ यांना धर्मप्रांतीय (डायोसिसन ) धर्मगुरूपदाची दिक्षा मिळाली. फादर मोन्तेरो यांची नागपूरच्या सेंट जॉन हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून नियुक्ती झाली. शाळेत ते इंग्रजी, लॅटिन आणि इतिहास विषय शिकवू लागले. याच काळात त्यांना परदेश दौऱ्याची संधी मिळाली. रोम, इटली आणि येशू ख्रिस्ताची जन्मभूमी असलेल्या पॅलेस्टाईनला त्यांनी भेट दिली.
नागपूरच्या बिशपांनीं त्यांची घोगरगाव येथे नेमणूक केली. फादर मोन्तेरोंचे मार्गदर्शक आणि गुरु असलेले फादर जाकियरही राहात्याहून आपली कर्मभूमी असलेल्या माळीघोगरगावात परत आले होते. आपल्या गुरुच्याच हाताखाली काम करण्याची संधी फादर मोन्तेरोंना मिळाली.
याच काळात अहमदनगर जिल्ह्यातील आणि मराठवाड्यातील पूर्वाश्रमीचा अस्पृश्य असलेला मराठी ख्रिस्ती समाज संघटीत होऊन राखीव जागा आणि इतर सवलतींची मागणी करु लागला होता. सन 1952 मध्ये वैजापूर तालुक्यातील वाहेगाव मांजरी येथे फादर मोन्तेरो यांच्या पुढाकाराने नव्यानेच स्थापन झालेल्या कॅथोलिक संघाचे अधिवेशन भरवण्यात आले. मराठी ख्रिस्ती समाजाच्या प्रगतीसाठी मिशनऱ्यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू कराव्यात अशीही मागणी या अधिवेशनात करण्यात आली.
त्याकाळात मराठवाड्यातील मिशनकेंन्द्रे नागपूरच्या बिशपांच्या अखत्यारीत होती. त्यांची परवानगी घेऊन फादर मोन्तेरो यांच्या प्रयत्नांनी औरंगाबाद येथे लिटल फ्लॉवर स्कूल ही शाळा सुरू झाली. अशाप्रकारे महाराष्ट्रातील दलित समाजातून आलेल्या ख्रिस्ती समाजासाठी पहिल्यावहिल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेची मुहूर्तमेढ रोवली गेली. औरंगाबादला बदली झाल्यानंतर या शाळेचा भक्कम पाया त्यांनी तयार केला.
18 जून 1979 रेाजी मराठी ख्रिस्ती समाजातील या पहिल्या मिशनरीचे निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार त्यांना त्यांच्या गुरुंच्या म्हणजे जाकियरबाबांच्या कबरेपाशीच चिरनिद्रा देण्यात आली. घोगरगावला जाकियरबाबांच्या समाधीला भेट देणारे भाविक या महान प्रेषिताच्या परमशिष्यालाही आदरांजली वाहतात.
पॅट्रिक तायडे यांचा विदर्भात अचलपूर येथे 1894 साली जन्म झाला. अचलपूर येथील कॅटेकिस्ट शाळेत शिकल्यानंतर तेथील मिशन केंद्रात त्यांनी काही काळ काम केले. घोगरगाव येथे फादर जाकियर यांच्या हाताखाली 1918 ते 1925 या काळात त्यांनी मिशन कार्य केले. तेथे काम करत असताना जाकियरबाबांप्रमाणे आपणही धर्मगुरू होऊन लोकांची सेवा करावी असे त्यांना वाटले. जाकियरबाबांच्या उत्तेजनामुळे त्यांनी 1924 साली एमएसएफएस संस्थेत दाखल होण्यासाठी अर्ज केला.
पॅट्रिक यांनी ब्रदर होण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा त्यावेळी एमएसएफएस संस्थेचे प्रांताधिकारी असलेल्या फादर अल्फॉन्स लारिवाझ यांनी संस्थेचे सुपिरियर जनरल फादर जुल्स को रसन यांना या संदर्भात 27 ऑक्टोबर 1924 रोजी पुढील पत्र लिहिले होते.:
“एका तरूणाने आपल्या संस्थेत ब्रदर म्हणून दिक्षा स्वीकारण्याची इच्छा व्यक्त केली आहे. फादर जाकियर यांनी त्याची शिफारस केली आहे. हा तरूण महार जातीचा आहे. तो अंगात धोतर घालतो, मराठी बोलतो आणि काही वाक्य इंग्रजीत बोलू शकतो. गेली अनेक वर्षे तो घोगरगाव मिशन केंद्रात काम करतो आहे. त्याच्या कामाविषयी सर्वच जण समाधानी आहेत.''
या पत्राचा अनुकूल परिणाम झाला. प्रतिकूल परिस्थितीची अडथळ्यांची ही शर्यंत पार केल्यानंतर पॅट्रिक एमएसएफएस या संस्थेत दाखल झाला. फ्रान्सलियन संस्थेच्या विशाखापट्टणम येथील मठात उमेदवार म्हणून पॅट्रिक यांनी 31 मार्च 1926 रोजी प्रवेश केला.
फ्रान्सलियन संस्थेच्या विशाखापट्टणम येथील मठात उमेदवार म्हणून पॅट्रिक यांनी 31 मार्च 1926 रोजी प्रवेश केला. ब्रदर म्हणून व्रतबंध स्वीकारल्यानंतर त्यांनी आपल्या गुरूंबरोबर, जाकियरबाबांबरोबर घोगरगावात 1943 पर्यंत या मिशन केंद्रात काम केले. पुढे नागपुरातील सेंट जॉन हायस्कूलमध्ये आणि टेक्निकल स्कूलमध्ये आपल्या आयुष्याच्या अखेरपर्यंत ब्रदर पॅट्रिक तायडे यांनी सेवा केली. वयाच्या 91व्या वर्षी म्हणजे 1985 साली त्यांचे निधन झाले.
मोन्तेरो आणि तायडे यांचा व्रतस्थ म्हणून सेमिनरीत समावेश ही एक अत्यंत मोठी महत्त्वाची सामाजिक घटना म्हणावी लागेल. उच्चवर्णियांनी झिडकारलेल्या, गावकुसाबाहेर हाकललेल्या आणि देवळांतही प्रवेश नाकारलेल्या स्थानिक अस्पृश्य समाजाच्या तसेच जागतिक ख्रिस्ती धर्मसंस्थेच्या इतिहासातील ही नक्कीच एक मोठी ऐतिहासिक घटना होती.
गोऱ्या वर्णाचे जागतिक पातळीवर प्रभुत्व असताना कॅथोलिक चर्चमध्ये काळ्या वर्णाच्या व्यक्तीची धर्मगुरूपदासाठी वा बिशपपदासाठी निवड झाली याला जितके महत्त्व आहे, तितकेच या घटनेसही महत्त्व आहे. त्याकाळात प्रचलित असलेली वर्णव्यवस्था वा वंशवाद झुकारून देणे जवळजवळ अशक्य होते.
पुढील काही दशकांच्या काळात महाराष्ट्रातील अनेक लोकांनी त्यांच्यावर लादलेले दलितत्व झुडकावून देण्यासाठी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. आज याच समाजातील अनेकजण ख्रिस्ती धर्मगुरू म्हणून महाराष्ट्रात आणि जगाच्या विविध भागांत काम करत आहेत. मीसुद्धा कॅथोलिक धर्मगुरु होण्यासाठी जेसुईटांच्या - येशूसंघाच्या संस्थेत - गोव्यात दाखल झालो होतो हे मी अनेकदा सांगितले आहेच.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्यघटनेमुळे आपल्या देशात पूर्वाश्रमीच्या अस्पृश्यांना सर्व क्षेत्रांतील दालने आणि पदे खुली करुन दिली आहेत. देशातील बहुतेक सर्व धर्मांतील देवळे आणि तिर्थक्षेत्रेही सर्वांसाठी खुली आहेत. गोव्यात साहित्यिक एन शिवदास आजही सर्व देवळे सर्वांसाठी खुले करा यासाठी गेली तीस वर्षे चळवळ चालवत आहेत हा अपवाद असू शकेल.
मात्र देशाच्या स्वातंत्र्यापूर्वीच महाराष्ट्रात ख्रिस्ती धर्मातील याजकपद किंवा धर्मगुरुपद अस्पृश्यांना देण्यासाठी फादर गुरियन जाकियर यांनी पुढाकार घेतला, खास प्रयत्न केले हे त्यांचे मोठेपण मान्य करायलाच हवे. असे जाणिवपूर्वक प्रयत्न न केल्याने मध्य महाराष्ट्रात आणि शेजारच्या अहमदनगर जिल्ह्यात स्थानिक समाजातील धर्मगुरू होण्यास आणखी तीन दशके लागली हे लक्षात घ्यावे लागेल
सत्तरच्या दशकात १९७२च्या सुमारास संगमनेरजवळ उंबरी या गावी फादर जेम्स शेळके यांच्या गुरुदीक्षेला श्रीरामपूरहून मी माझ्या आईवडलांसह आणि इतर लोकांसह ट्रंकने गेलो होतो. खूप लोकांनी त्यावेळी गुरुदीक्षा हा काय सोहोळा असतो ते पहिल्यांदा अनुभवले. भले धर्माचे महत्त्व आता कमी होत चालले तरी कुठल्याही समाजघटकातील व्यक्तीला धर्मगुरुपद मिळणे किती अस्मितादर्शक असते हे मला खूप काळानंतर कळाले.
आधीच्या धर्मात देवळात प्रवेश करण्याची मुभा नसलेले धर्मांतरित ख्रिस्ती लोक या नव्या धर्मात धर्मग्रंथ वाचू लागले, इतकेच नव्हे तर धर्मगुरुही बनले ही फार मोठी सामाजिक क्रांती होती. धर्मगुरु बनल्यामुळे ख्रिस्ती समाजातील सर्वच्या सर्व सांक्रामेंत (स्नानसंस्कार ) - बाप्तिस्म्यापासून लग्नविधी आणि अंत्यसंस्कार करण्याचे अधिकार त्यांना प्राप्त झाले. बिशपपदावर नेमणूक झाल्याने कालांतराने कार्डिनल आणि जागतिक सर्वोच्च पोपपदावर निवड हॊण्यास ते पात्र ठरतात हे लक्षात घेतले म्हणजे ख्रिस्ती धर्मगुरु होण्याची घटना या दलित समाजाच्या दृष्टीने किती मौलिक होते हे समजते.
फ्रेंच धर्मगुरु फादर गुरियन जाकियर यांना या सुप्तपणे झालेल्या महाराष्ट्रातील धार्मिक नव्हे, सामाजिक क्रांतीचे प्रणेते म्हणावे लागेल.
(घोगरगावचे जाकियरबाबा - लेखक कामिल पारखे या पुस्तकातील (2008) काही भाग)
Comments
Post a Comment