भारतीय ठशातील ख्रिस्ती कला
भिन्न धर्मपरंपरा आणि संस्कृती असलेल्या लोकांचा
परस्परांशी संबंध आला कि या संबंधातून नकळत एकमेकांच्या धार्मिक मूल्यांची आणि सांस्कृतिक
ठेव्यांची देवाणघेवाण होते. मध्ययुगीन काळात ख्रिस्ती धर्मपरंपरेतील कलेचे भारतात आगमन
झाले. तेव्हा असाच प्रकार घडला. खास युरोपियन ठसा असलेल्या ख्रिस्ती धर्मपरंपरातील
कला आणि भारतीय कला यांचा या वेळेस सुंदर मिलाप घडला आणि त्यातून जन्मास आली भारतीय
ठशातील ख्रिस्ती कला.
ख्रिस्ती धर्माचा उगम इस्राएल राष्ट्रात झाला व
त्यामुळे हा धर्म मूळचा आशिया खंडातलाच. पण मध्ययुगीन काळापूर्वीच यूरोपातील सर्व
राष्ट्रांत या धर्माचा खूप प्रचार झाला व भारतात हा धर्म मोठ्या प्रमाणात स्वीकारला
गेला तो युरोपिअन मिशनरींमार्फतच . त्यामुळे
ख्रिस्ती धर्म म्हटलं की तो पाश्चिमात्य संस्कृतीत
घडलेला अशीच बहुतेकांची समजूत असते. युरोपियनांनी हा धर्म भारतात आणला. त्याबरोबरच
त्यांनी आपापल्या देशातील परंपरेत वाढलेली कलादेखील येथे आणली. या पाश्चिमात्य कलेचा
स्थानिक कलापरंपरेशी संबंध आल्यानंतर परस्पर प्रभावातून उगम पावलेल्या भारतीय ख्रिस्ती
कलेची मुळे भारताच्या संपन्न विविधतापूर्ण संस्कृतीत सजलेली आहेत हे अनेक उदाहरणांनी
स्पष्ट होते.
भारतात
मुस्लिम समाजानंतर दुसऱ्या क्रमांकाचा अल्पसंख्य समाज म्हणून ख्रिस्ती समाज गणला जात
असला तरी बहुसंख्य हिंदूंच्या इतर अल्पसंख्य मुस्लिम समाजाच्या मानाने भारतीय भारतीय
ख्रिस्ती लोकसंख्येचे प्रमाण खूप नगण्य आहे. विशेष म्हणजे देशातील ख्रिस्ती समाजातील बहुतांश लोक मूळचे
मागासवर्गीय जातीतील आणि मूळचे आदिवासी जमातीतील आहेत. म्हणजेच भारतीय
ख्रिस्ती समाजातील बहुतांश लोक मूळचे एकतर मागासवर्गीय व आदिवासी जमातीतील
आहेत. धर्म बदलला तरी संस्कृतीपरंपरेने इतर समाजासारखेच असल्याने व त्यातच धार्मिकदृष्ट्या
अल्पसंख्य असल्याने या समाजाच्या कलेवर बहुसंख्यांकाच्या कलेचा प्रभाव पडणे साहजिकच
होते. गोव्यातील चर्चेस मधून प्रकट झालेली इंडो-पोर्तुगीज शिल्पकला आणि ख्रिस्ती धर्मसंकल्पनेवर
आधारित ख्रिस्ती आणि अख्रिस्ती चित्रकारांनी रेखाटलेली चित्रे यातून भारतीय ख्रिस्ती
कलेचे प्रदर्शन घडते.
पुण्यातील स्नेहसदन या आंतरधर्मीय संशोधनकेंद्राचे
संस्थापक आणि गोवा - पुणे येशूसंघीय धर्मप्रांताचे धर्माधिकारी दिवंगत डॉ. मॅथ्यू लेदर्ले हे भारतीय ख्रिस्ती कलेचे अलीकडील काळातील एक खंदे समर्थक. मूळचे जर्मन असलेल्या पण
नंतर भारतीयत्व स्वीकारलेल्या फादर लेदर्ले यांनी भारतीय ख्रिस्ती धर्मियांनी आपल्या
धर्माचरणात भारतीय संस्कृती परंपरेचे आणि मूल्यांचे अवलंबन करावे यासाठी आयुष्यभर प्रयत्न
केले. ख्रिस्ती धर्माच्या भारतीयाकरणाचा वा सांस्कृतिकीकरणाचा एक भाग म्हणून ख्रिस्ती धर्मसंकल्पनेवर आधारित
पण पूर्णतः भारतीय संस्कृतीच्या छापत असलेली चित्रे रेखाटण्यास यांनी अनेक ख्रिस्ती
आणि अख्रिस्ती चित्रकारांना प्रोत्साहन दिले.
भारतीय कलेवर सामन्यांमध्ये तर ही काही अगदी काळातील नाही. येशू ख्रिस्त बारा प्रेषितांपैकी
संत थॉमसने पूर्व काळात ख्रिस्ती धर्माचा केरळमध्ये प्रसार केला. त्याकाळात या कलेच्या
अर्थाने उगम झाला. दुर्दैवाने चित्रकला व शिल्पकला माध्यमातून प्रकट झालेली ख्रिस्ती
कला जवळ जवळ अस्तित्वात नाही. केरळमध्ये आणि या राज्याच्या मध्ययुगीन काळापूर्वी बांधले
व सध्या अस्तित्वात असलेले काही ख्रिस्ती धर्ममंदिरामध्ये या कलेची काही रूपे पाहण्यास
मिळतात.
भारतात पोर्तुगीजांचे आगमन होण्यापूर्वी म्हणजे
सोळाव्या शतकाआधी केरळातील ख्रिस्ती समाजाचा पाश्चिमात्य जगाशी प्रत्यक्ष तास कहीच
संबंध नाही. यामधील ख्रिस्ती धर्ममंदिरे स्थानिक
कारागिरांनी व त्यापैकी बहुतेक जण हिंदुधर्मीय होते. त्यामुळे या मंदिराच्या बांधकामावर
हिंदू धर्ममंदिरांच्या बांधकामाची शैली आढळते.
मात्र भारतीय ख्रिस्ती कला विकसित झाली. ती मध्ययुगीन
मुघल काळातच सम्राट अकबराने आपल्या दरबारात भिन्न धर्माच्या पंडितांना निमंत्रित केले
होते. या पंडितांमध्ये ख्रिस्ती धर्मगुरूंचाही
समावेश होता. त्यावेळेस पोर्तुगीजांच्या अमलात असलेल्या गोव्यातून रुडाल्फ अक्वाविवा
आणि त्यांचे इतर सहकारी येशूसंघीय धर्मगुरू मुघल दरबारात गेले त्यावेळेस त्यांनी आपल्याबरोबर
ख्रिस्ती धर्मकथावर आधारित अनेक चित्रे गेली होती. ही सर्व चित्रे युरोपिअन शैलीत रेखाटलेली
होती.
मुघल दरबारात यावेळेस अशा प्रकारे प्रथमतःच पाश्चात्य
आणि भारतीय चित्रकलेचा परस्पर संबंध आला या दोन्ही चित्रकलांची स्वतःची अशी खास वैशिष्ट्ये
होती. सम्राट अकबराच्या दरबारातील चित्रकारांनी या पाश्चात्य चित्रांची नक्कल केली
तर इतर काही चित्रकारांनी ख्रिस्ती धर्मकथातील प्रसंग कायम ठेऊन त्या प्रसंगातील पात्रांना
भारतीय पेहराव दिला. अश्या प्रकारे मुघल शैलीत रेखाटलेल्या ख्रिस्ती धर्मकथेवर आधारलेल्या
या चित्रांना भारतीयत्व प्राप्त झाले.
विशेष म्हणजे मुघल दरबारातील चित्रकारांनी ख्रिस्ती
धर्मावर आधारित चित्रे रेखाटताना त्यात नवा आशय ओतण्याचा प्रयत्न केलेला आढळतो. उदाहरणार्थ
बाळ येशूच्या दर्शनासाठी पूर्वेकडून आलेल्या तीन मागी अथवा राज्याचे चित्र मुघल शैलीत
रेखाटलेल्या व अजून उपलब्ध असलेल्या या चित्रात तीन राजाऐवजी तीन राण्या रेखाटण्यात
आल्या आहेत.
ख्रिस्ती धर्मकथावर आधारित या मुघल शैलीतील बहुतेक
चित्रे मात्र आज केवळ यूरोप आणि अमेरिकेतील प्रदर्शनगृहात आहेत. स्वातंत्र्यापूर्वी
हैद्राबाद संस्थानात अशा प्रकारची अनेक चित्रे उपलब्ध होती असे म्हणतात पण आता ती चित्रे
कुठे आहेत याबद्दलची माहिती उपलब्ध नाही.
ख्रिस्ती धर्मकथावर भारतीय शैलीत चित्रे रेखाटण्याची
प्रथा सर्वप्रथम ख्रिस्ती चित्रकारांनी नव्हे तर मुघल दरबारातील अख्रिस्ती चित्रकारांवर
केली होती. हे फादर लेदले यांनी मुद्दामच नमूद केले आहे. एखाद्या विशिष्ट धर्माच्या
चित्रकारानेच त्या धर्मावर आधारित चित्रे काढावीत असे नाही. पुष्कळदा चित्रकार इतर
धर्माच्या संकल्पनेने प्रेरित होऊन त्याआधारावर चित्र रेखाटतात अन भारतीय ख्रिस्ती
कलेच्या बाबतीतही असेच घडले आहे.
इंडो-पोर्तुगीज शैलीमध्ये बांधलेल्या गोव्यातील
ख्रिस्ती धर्ममंदिर शिल्पकलेचा एक सुंदरसा ठेवाच आहे. या शिल्पकलेला भारताच्या सांस्कृतिक
ठेव्याचाच एक भाग न मानण्याच्या प्रवृत्तीबद्दल फादर लेदले यांनी आपली खंत अनेकदा व्यक्त
केली होती. गोव्यातील ख्रिस्ती कलेला पोर्तुगिजांकडूनच प्रेरणा मिळाली हे सत्य मान्य
केले तरी या कलेमध्ये भारतीय कारागिरांनी आणि चित्रकारांनी भारतीय संस्कृतीच्या ठेव्याची
फार मोठी भर घातलेली आहे. त्यामुळेच गोव्यातील ख्रिस्ती कलेला पूर्णतः पाश्चात्य व
परदेशी संबोधन योग्य ठरणार नाही असे त्यांचे म्हणणे होते.
ग्रीक प्रेरित गांधारशैलीतील कला वा इस्लामप्रेरित
ताजमहाल सारखी कलाकृती जर भारतीय परंपरेचा एक अमूल्य ठेवा ठरतो. तर इंडो-पोर्तुगीज
शिल्पकला शैलीतून गोव्यात निर्माण झालेली धर्ममंदिरे व इतर शिल्पकालना भारतीय परंपरेचाच
एक भाग मानण्यास अडचण काय असा फादर लंडलेच प्रश्न होता. इंडो-पोर्तुगीज शिल्पकलेला
भारतीय परंपरेचाच भाग मानले तर आधीच व्यापक असलेल्या भारतीय संस्कृतीच्या सरितेत आणखी
एका छोट्याश्या आणि सुंदरशा ओहोळाची भर पडेल असे फादर लेदले म्हणत.
आधुनिक काळात रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतनात
भारतीय ख्रिस्ती कलेत अनेक चित्रकारांनी भर टाकली. विशेष या चित्रकारापैकी अनेक जण
ख्रिस्तीधर्मीय नव्हते. बायबलमधील कथावर आधारित पण भारताच्या विविधतेने नटलेल्या संस्कृतीच्या
लेण्यातील या चित्रातील आशय आणि सौंदर्याचे आकलन ख्रिस्ती धर्मियांनीच काय पण अख्रिस्ती
जनतेलाही ताबडतोब होते.
जेमिनी रॉय अरुप दास के.सी.एस. पाणीकर अँजेलो फोन्सेका
सिस्टर जेनेव्हिव्ह सिस्टर क्लेर फ्रान्सिस न्यूटन सोझा यांनी भारतीय ख्रिस्ती कलेत
भरपूर योगदान केले आहे. ख्यातनाम चित्रकार एफ. एम. हुसेन यांनाही नोबेल पारितोषिक विजेत्या
मदर तेरेसा यांच्या कार्यावर चित्रांची एक मालिकाच निर्मिली आहे. या कलेतील विषय ख्रिस्ती
धर्मग्रंथातील घटना व ख्रिस्ती संकल्पना असल्यातरी या कलेत अख्रिस्ती चित्रकारांनीही
योगदान केल्याने हि कला विशिष्ट धर्मापुरती मर्यादित राहिलेली नाही. खऱ्या अर्थाने
हि कला भारतीय बनली आहे.
Comments
Post a Comment