हरेगावची मतमाऊलीची यात्रा


अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव हे मराठी  ख्रिस्ती समाजाचे सर्वांत महत्त्वाचे तीर्थक्षेत्र. मदर मेरी किंवा मारियामातेच्या ८ सप्टेंबरच्या जन्मदिनाच्या निमित्ताने सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी आणि रविवारी हरेगावला होणाऱ्या मतमाऊलीच्या यात्रेस महाराष्ट्रात विखुरलेला मराठी ख्रिस्ती समाज लाखोंच्या संख्येने जमतो. यंदा कोरोनामुळे मुंबईच्या  येथील बांद्रा येथे माऊंट मेरीचा आठवडाभर चालणारा सण साजरा होणार नाही, त्याचप्रमाणे  १२ आणि १३ सप्टेंबरला हरेगावची मतमाऊलीची यात्राही होणार नाही.  यानिमित्त मतमाऊलीच्या यात्रेच्या या आठवणी.  

खूपखूप  वर्षांपूर्वी म्हणजे १९९०च्या दशकात  सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या  शुक्रवारी रात्री माझा रेल्वेप्रवास अगदी ठरलेला असायचा. त्या दिवशी  मी पुणे स्टेशनहून रात्री पाऊणे एकच्या दरम्यान सुटणाऱ्या दौंड-मनमाड या पॅसेंजरने श्रीरामपूरला जाण्यास निघायचो. माझ्याप्रमाणेच  नियमितपणे या दिवशी या गाडीने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूप असायची.  पुण्यातील तिकिट खिडकीवर अनेक वर्षे काम करणाऱ्या  रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनाही या दिवशी श्रीरामपूरला जाणाऱ्या प्रचंड गर्दीची सवय झालेली असायची.  श्रीरामपूरचे तिकिट मागितले कि ते अधिक काही प्रश्न न विचारता झटकन बेलापूर स्टेशनचे तिकिट देतात. श्रीरामपूरपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या बेलापूर गावाचेच नाव अजूनही श्रीरामपूर शहराच्या रेल्वेस्टेशनासाठी कायम ठेवण्यात आले आहे. नंतर शनिवारी सकाळी सातच्या पुणे- मनमाड पॅसेंजरलाही अशीच गर्दी असायची.

त्या शनिवारी सक़ाळपासून संपूर्ण  दिवसभर मग श्रीरामपूरच्या बसस्टँडवर आणि रेल्वेस्टेशनवर अहमदनगर, औरंगाबाद, पुणे, मुंबई,  नाशिक, मनमाड वगैरे अनेक ठिकाणाहून गर्दीचे लोंढेच्या ळोंढे उतरत असतात. वेगवेगळ्या दिशेने आलेले हे प्रवासी श्रीरामपूरात आल्यानंतर मात्र एकाच स्थळाच्या दिशेने प्रवास करू लागतात. हजारोंच्या संख्येने आलेल्या या प्रवाशांना घेऊन मग एसटीच्या बसेस दर मिनिटाला तेथून पाच किलोमीटर असलेल्या हरेगावच्या दिशेने  ’नॉनस्टॉप’  धावू लागतात. तरीही स्टॅडवर गर्दीचे लोंढे सारखे येतच राहतात. श्रीरामपूरच्या रहिवाशांना तालुक्याच्या या शहरात अचानक अवतरलेल्या या गर्दीबद्दल मुळीच आश्चर्य वाटत नाही. कुणा नवख्या  व्यक्तीने याबद्दल विचारले तर  बसस्टॅडच्या परिसरातील कुठल्याही धर्माची व्यक्ती पटकन म्हणेल,  ’आज  हरेगावच्या मतमाऊलीची यात्रा नाही का?’

सत्तर वर्षांपूर्वी येशूसंघीय जर्मन फादर गेरार्ड बादर यांनी हरेगावात धन्य कुमारी मारियेच्या वाढदिवसानिमित सण साजरा करण्यास सुरुवात केली, त्यानंतरच्या सात दशकाच्या काळात अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक, पुणे वगैरे जिल्ह्यातील आणि मुंबईत आणि महाराष्ट्रात इतरत्र स्थायिक  झालेल्या मराठी ख्रिस्ती भाविकांसाठी हे राज्यातील सर्वात महत्त्वाचे तीर्थक्षेत्र बनले आहे. एके काळी बेलापुर फॅक्टरी या खासगी साखर कारखान्यामुळे प्रसिद्ध असलेले हरेगाव आज मतमाऊलीचे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. 

हरेगाव या गावाशी अहमदनगर जिल्ह्यातील किंबहुना आज महाराष्ट्रात कानाकोपऱ्यांत नोकरीधंद्यांच्या निमित्ताने विखुरलेल्या मराठी ख्रिस्ती समाजाची नाळ जुळलेली आहे.  याचे कारण म्हणजे साठ, सत्तर आणि ऐंशीच्या दशकांत हे छोटेशे गाव येथील बेलापूर साखर कारखान्यामुळे पूर्ण जिल्ह्यात प्रकाशझोतात आले होते.  एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात ब्रिटिशांनी हरेगावात बेलापूर शुगर फॅक्टरी या नावाने आशिया खंडातील पहिला साखर कारखाना सुरु केला होता, संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातील आणि शेजारच्या मराठवाड्यातील हजारो लोक या कारखान्यात कामाला लागले. इथल्या या पहिल्याच औद्योगिक प्रकल्पातील  कामगारांमध्ये दलितांचे प्रमाण खूप मोठे होते. त्यांमध्ये नवख्रिस्ती लोकही होते.  त्यामुळे हरेगावचे त्याकाळातील महत्त्व लक्षात येईल. त्याकाळात श्रीरामपूर अस्तित्वातही नव्हते. त्यामुळे जवळ असलेल्या बेलापूर गावाचेच नाव या शुगर फॅक्टरीलाही देण्यात आले. या साखर कारखान्याच्या कच्च्या मालाच्या आणि साखरेच्या वाहतुकीसाठी जवळच सुरु केलेल्या रेल्वे स्टेशनला बेलापूर रेल्वे स्टेशन असे नाव दिले. आज श्रीरामपूर मोठे तालुका ठिकानासलें तरी तिथल्या रेल्वे स्टेशनचे बेलापूर हे नाव  आजही कायम आहे.   

येशूसंघीय (जेसुइट) फादरांनी अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीजवळच्या वळण या गावी १८८१ साली प्रेषितकार्य सुरु केले. या वळण धर्मग्रामाच्या ५०-६० गावांमध्ये हरेगावचा समावेश होता. येशूसंघीय धर्मगुरू वळणहून  येऊन हरेगावशेजारी असलेल्या उंदिरगाव येथे मिस्सा म्हणत असत.  रेजिनाल्ड गोन्सालवीस हे १९३०  ते १९३६ या काळात वळण येथे प्रमुख धर्मगुरु होते. गोन्सालवीस  उंदिरगाव येथे चर्चसाठी दोन एकर जागा विकत घेतली होती. मात्र तेथे चर्च उभे राहिले नाही. वळण येथे नंतरआलेल्या फादर विनिगर यांनी हरेगावात ठमा  धनगर याच्याकडून तीन बिघे  म्हणजे दिड एकर जमीन विकत घेतली. मात्र फादर विनिगर यांचा मृत्यू झाल्याने चर्चचें बांधकाम झाले नाही. १९३७ ला फादर पियुस गैसल हे वळणचे प्रमुख धर्मगुरु  बनले. फादर गैसल आणि त्यांचे सहाय्यक फादर लुस्टिंग हरेगावात मिस्सेसाठी येत असत. 

त्याकाळात उंदिरगावात फादर लॅटिन भाषेत मिस्सा म्हणत असत आणि जमलेले अशिक्षित खेडूत मराठीत भजने म्हणत असत. यासंबंधी एक गंमतीदार नोंद करण्यात  आली आहे.   

      लॅटिन मिस्सा आणि मराठी भजने

      केंदलला स्थायिक असलेल्या फादर जोसेफ कॅस्टनर यांना एकदा उंदिरगाव (हरेगाव ) येथे नाताळाची मिस्सा म्हणायचे आमंत्रण आलेराहुरी येथून रात्रीच्या रेल्वेने ते बेलापूर (श्रीरामपूरस्टेानवर उतरलेर्टक्सीने ते उंदिरगावला पोहोचलेआधीच ठरल्याप्रमाणे एक रूपयाचे नाणे त्यांनी टेक्सी ड्रायव्हरला दिलेरात्रीच्या त्या गडद अंधारात र्टक्सी ड्रायव्हरने ते नाणे जमीनीवर फेकलेनाण्याचा खणकन आवाज ऐकून ते खरे आहे याची खात्री झाल्यावर ड्रायव्हरने मग ते नाणे आपल्या खिशात टाकले.

      हरेगावातील संत तेरेजा देवालयात जमलेल्या भाविकांनी या गौरवर्णिय फादरांचे ‘ नाताळाचा देवदूत ’ म्हणून उत्साहाने स्वागत

करून मिस्सा केलेफादरांनी मग त्या नाताळाच्या मध्यरात्री त्या खेडूतांसाठी लॅटिन भाषेत मिस्सा साजरी केलीमिस्सा संपल्यानंतर खेडूतांची ताबडतोब आपापाल्या गावी जाण्याची इच्छा नव्हती. पहाटे तीन वाजेपर्यंत ते सर्वजण देवळात भजने गात होतेखेड्यातील ही मिस्सा आपण तोपर्यंत केलेल्या कुठल्याही कॅथेड्रलमध्यकेलेल्या मिस्सेपेक्षाही अधिक भव्यदिव्य होती असे फादर कॅस्टनर यांनी लिहून ठेवले आहे. (यात्रा पान 51

फादर गेराल्ड बादर आणि फादर रिचर्ड वासरर हे  १९४४ साली वळण धर्मग्रामात आले. मात्र १९४६साली  मुळा नदीला आलेल्या पुरात वळण धर्मग्रामाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे हे धर्मग्राम बंद करुन त्याचे स्थलांतर हरेगाव येथे केले. वळण येथे चालू असलेली मुलांची संत तेरेजा शाळेचेही हरेगाव येथे स्थलांतर करण्यात आले. नव्या हरेगाव धर्मग्रामात ७० गावे होती.        

त्याकाळात हरेगाव येथील काही भाविक मुंबईतील बांद्रा येथील माऊंट मेरी बॅसिलिका येथे आठ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या नऊ दिवसांच्या माऊंट मेरीच्या यात्रेला जात असत. अहमदनगर जिल्ह्यात ख्रिस्ती समाजाची संख्या लक्षणीय आहे. या समाजाच्या अनेक भाविकांना या यात्रेला जाण्याची इच्छा असली तरी प्रवासखर्च  पेलण्याची ऐपत नसे. काही जण ऐपत नसतानासुद्धा उसनवारीने पैसे गोळा करून बांद्रयाची वारी करत. असे म्हणतात कि सन 1948च्या ऑगस्ट महिन्यात एका गृहस्थाने बांद्रयाच्या माऊंट मेरीचा म्हणजे मारियामातेचा नवस फेडण्यासाठी तेथील यात्रेला जाण्यासाठी फादर बादरांकडे पैसे मागितले.  फादरांनी त्याला सांगितले, ''’मारियामाऊलीचा नवस फेडण्यासाठी बांद्रयाला जाण्याची तुम्हाला गरज नाही. तुमचा नवस येथे, हरेगावातच फेडला जाईल. तुमच्या नवसातून तुम्हाला मुक्त करण्याचा अधिकार मला आहे’.                        

या स्थानिक भाविकांच्या सोयीसाठी फादर  बादर यांनी  1948 साली ८ सप्टेंबरला म्हणजे मदर मेरीच्या जन्मदिनानिमित्त हरेगावातच मतमाऊलीची यात्रा सुरू केली. पहिल्या  मतमाऊली यात्रेत 300 भाविक उपस्थित होते आणि यापैकी 98 टक्के लोक स्थानिक पॅरीशनर होते असे फादर बादर यांनी सांगितल्याचे ब्रदर अपोनिअस पिंटो यांनी यात्रेच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त काढलेल्या स्मरणिकेत लिहिले आहे.

माऊंट मेरी या शब्दाचा मराठी अपभ्रंश म्हणजे मतमाऊली.  फ्रान्समधल्या लुर्ड्स येथील अवर लेडी ऑफ लुर्ड्स, पोर्तुगालमधल्या फातिमा इथल्या अवर लेडी ऑफ फातिमा,  तामिळनाडूमधल्या वेळकंणी येथील वेळकंणी माता, बांद्रयाची माऊंट मेरी अन त्याच धर्तीवर हरेगावची ही मतमाऊली !  या सर्व ठिकाणी आणि जगभर सगळीकडे मदर मेरीचा फिस्ट-डे म्हणजे सण व यात्रा अर्थातच ८ सप्टेंवर दरम्यानच होते. 

काही वर्षांपूर्वी युरोपच्या सहलीवर असताना फ्रान्समधल्या लुर्ड्स या जगप्रसिद्ध मेरियन डिव्होशन सेंटरला म्हणजे मारियेच्या भक्तिस्थळी मी कुटुंबासह चार दिवस मुक्काम केला होता. तेव्हा तेथील प्रार्थनेत आणि संध्याकाळीं कँडल लाईट प्रोसेशन किंवा मेणबत्तीच्या प्रकाशात होणाऱ्या मिरवणुकीत सहभागी होताना हरेगावच्या मतमाऊलीच्या यात्रेची आठवण होणे साहजिकच होते.

अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक मराठी कॅथोलिक ख्रिस्ती कुटुंबाने कधी ना कधी मतमाऊलीची यात्रा केलेली असतेच. श्रीरामपूर, राहता, सोनगाव, राहुरी, टिळकनगर, अहमदनगर, संगमनेर वगैरे धर्मग्रामांतील अनेक कुटुंबांचा  सप्टेंबरच्या दुसरया शनिवारचा मुक्काम हरेगाव येथेच असणार हे  त्याकाळात म्हणजे आतासारखी प्रवासव्यवस्था नसताना ठरुनच  गेले होते. 

त्याशिवाय या परिसरातील औरंगाबाद, नाशिक, पुणे जिल्ह्यांत आणि मुंबईत स्थायिक झालेले अनेक लोक संधी मिळेल तेव्हा मतमाऊलीचे दर्शन घेण्यासाठी हरेगावची वारी करत असतात. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात पंढरपुरच्या वारीचे  जे स्थान  आहे तेच स्थान मराठी ख्रिस्ती समाजाच्या बाबतीत मतमाऊलीच्या यात्रेचे आहे. त्यामुळॆच हरेगावला 'मराठी ख्रिस्ती समाजाची पंढरी'  म्हणून ओळखले जाते. 

ख्रिस्ती धर्मात कॅथोलिक पंथात येशू ख्रिस्ताची आई म्हणून मारियेला अत्यंत आदराचे स्थान आहे. तिला देवाचे स्थान नसले तरी येशूकडे मध्यस्थीसाठी मारियेकडे विनंती केली जाते. तामिळनाडूच्या वेळकंणी मंदिरात वेळकंणी  (मारिया ) मातेची साडीचोळी आणि नारळाने ओटी भरली जाते, पुण्यातील खडकीच्या सेंट इग्नेशियस चर्चच्या वेळकंणी यात्रेतही तामिळ ख्रिस्ती भाविक अशीच ओटी भरतात. हरेगावात मात्र मतमाऊलीची अशी ओटी भरण्याची प्रथा नाही. 

सन 1949 मध्ये पुण्यातील डी नोबिली कॉलेजात तत्त्वज्ञानाचे आणि ईशज्ञानाचे प्राध्यापक म्हणून बादर यांची नेमणूक झाली.  त्यानंतर फादर जॉन हाल्डनर   यांनी हरेगाव धर्मग्रामात त्यांची जागा घेतली. फादर   हाल्डनर यांनी नंतर हरेगावात हे आता अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध  झालेले हे टोलेगंज आणि उंच शिखर असलेले संत तेरेझा चर्च बांधले. या चर्चइतके उंच आणि प्रशस्त चर्च  अहमदनगर जिल्ह्यात वा महाराष्ट्रात इतरत्र  कुठेही नाही. या चर्चच्या उंच शिखरात दडलेल्या  जाडजूड घंटेचा नाद आसपासच्या खेड्यापाड्यांत आणि वाड्यांमध्ये  ऐकू जात असे. फादर  हाल्डनर यांनी शेवगाव आणि बीड येथेही देवळे बांधले. देवळाची शिखरे उंच का असे विचारले कि फादर  हाल्डनर म्हणायचे, ’देवळाची उंच शिखरे आपल्या ख्रिस्ती धर्माच्या प्रगल्भतेची जाणीव करून देतात.’

म्हणावे लागेल. दिनांक 22 डिसेंबर 1966 रोजी या आकर्षक देवळाचे उदघाटन झाले. या देवळाची डिझाईन मुंबईचे फादर कार्सी यांनी तयार केली होती.

‘ निरोप्या ’ मासिकाच्या जानेवारी 1964 च्या अंकात पुढील माहिती देण्यात आली होती.

      ‘ देवालयाची इमारत भव्य असून सुंदर व आधुनिक शिल्पकलेचा उतकृष्ट नमुना आहे. कामाकरता उ? दर्जाचे लाल दगड गुंजाळे येथून आणण्यात आले. ख्रिस्तयाग अर्पण करण्यास बांधलेली वेदी भिंतीपासून जरा दूरवर बांधलेली आहे. लोकांकडे तोंड करून ख्रिस्तयाग करता यावा हा त्यातला महत्वाचा उद्देश आहे. (दुसर्‍या व्हॅटिकन परिषदेच्या आधीच्या काळात देवळात धर्मगुरू लोकांकडे पाठ 


आता संपूर्ण महाराष्ट्रात आगळेवेगळे ठरलेल्या हरेगावातील भव्य देवळाचे बांधकाम फादर जॉन हाल्डनर आणि त्यांचे सहाय्यक फादर देसाई यांनी केले.खूप उंच शिखर असलेले.हे देऊळ १९५५ ते १९६४ याकाळात बांधण्यात आले. त्यानंतर तीनचार वर्षांतच हरेगावच्या बोर्डिंगमध्ये मी तिसरीला असताना आलो तेव्हा या नव्या देवळाची नवलाई आणि भव्यता मला समजली नव्हती. पण त्याकाळात उंचच उंच क्रेन नसताना हे देऊळ आणि शिखर कसे बांधले असेल याचा आता खरेच अचंबा वाटतो.     

साठीच्या दशकाअखेरीस माझे थोरले भाऊ मार्शल पारखे  आणि पेत्रस यांच्यासह मी हरेगावच्या संत तेरेझा शाळॆच्या बोर्डीगमध्ये  होतो. केवळ दोनच वर्षे म्हणजे तिसरी आणि चौथी इयत्तेला मी या शाळेत होतो.  तेथे दररोज सकाळी  मिस्सेआधी साडेसहा वाजता आम्ही मुले या उंच  शिखराच्या अगदी टोकाला असलेली ती मोठी घंटा वाजवायचो. त्या घंटेला बांधलेल्या जाड तारेच्या  खालच्या टोकाला आम्ही दोन-तीन मुले लोंबकळायचे तेव्हा कुठे घंटानाद सुरू व्हायचा. सणावाराला साफसुफी  करण्यासाठी, रंग देण्यासाठी  कामगार लोक टॉवरमध्ये असलेल्या शिडीचा वापर करुन अगदी वरपर्यंत जात. बोर्डिंगच्या मोठ्या मुलांसह या शिडीवरुन टॉवरच्या अगदी मध्यापर्यंत गेल्याचे मला आठवते.  तेथून आसपास पाहिल्यावर अगदी गरागरा फिरल्यासारखे झाले होते. त्यानंतर असे धाडस मी कधी पुन्हा केले नव्हते.  

हरेगावच्या बोर्डिंगमधला एक अनुभव माझ्या आजही स्मरणात आहे. त्यावेळी शाळेच्या इमारतीमागे एक पाण्याचा हौद नुकताच बांधण्यात आला होता. मोठ्या माणसाच्या जेमतेम गळ्यापाशी पाणी येईल इतकी खोली असलेल्या या हौदात फादर रिचर्ड वासरर हे ऑस्ट्रियन धर्मगुरु बोर्डिंगच्या आम्हा मुलांसह शाळा सुरु होण्याआधी भल्या पहाटे पोहत असत. पोहोता न येण्यासारख्या माझ्यासारख्या मुलांना आपल्या पाठीवर घेऊन वयाची साठी कधीच ओलांडलेले फादर वासरर पोहोण्याचे धडे देत असत. असेच एकदा सकाळच्या उबदार पाण्यात फादरांसह आम्ही मजेत पोहोत असताना शाळेच्या शेताच्या बाजूने असलेली हौदाची भिंतच कोसळली. सगळे पाणी वाहून गेले मात्र सुदैवाने कुणालाही काहीही दुखापत झाली नाही. 

संत तेरेझा शाळेचे प्रमुख असलेले जर्मन फादर हुबर्ट सिक्स्ट यांच्याभोवती नेहेमी त्यांचा अल्सेशियन कुत्रा असायचा. बोर्डिंगची मुले आजारी पडली कि ते त्यांना तपासत असत आणि गरज भासल्यास इंजेक्शन देत असत. या दोन्ही कारणांमुळे आम्ही बोर्डिंगची मुले त्यांना भिऊनच असायचो. नंतर कळाले कि दुसऱ्या महायुद्धात जर्मनीने सक्तीने लष्करात भरती केल्याने त्यांनी मेडिकल कोअरमध्ये काम केले होते आणि त्यामुळेच फादर सिक्स्ट यांना औषधोपचाराची चांगली माहिती होती.   

फादर हुबर्ट सिक्स्ट यांनी संत तेरेजा मुलांच्या शाळेसाठी दुमजली प्रशस्त इमारत बांधली. यासाठी फादरांना ऑस्ट्रिया येथील उर्सुला ग्रोल्ल यांनी अर्थसहाय्य्य केले होते.  मी या शाळेच्या बोर्डिंगमध्ये होतो तेव्हा म्हणजे १९६९ साली या इमारतीच्या पूर्णत्वाकडे जाणाऱ्या बांधकामाचा मी साक्षीदार ठरलो. जुन्या कौलारु शाळेतून या नव्या इमारतीत स्थलांतर करणाऱ्या मुलांच्या बॅचमध्ये मी होतो !  

याचकाळात हरेगावात फादर बेन्झ (वाहन क्षेत्रातील उद्योगपती बेन्झ यांचे जवळचे नातलग, फादर झेम्प) वगैरे युरोपियन मिशनरींना मी जवळून पाहिले. देशात मिशनरी कार्यासाठी येणारे हे अखेरचे धर्मगुरु. त्यानंतर फादर ज्यो (जोसेफ) पिंटो यांची हरेगावात पहिले भारतीय धर्मगुरु म्हणून नेमणूक झाली आणि त्यानंतर देशी धर्मगुरुंचे युग सुरु झाले.  

हरेगाव धर्मग्राम येशूसंघीयांनी  १९७४ ला पुणे धर्मप्रांताकडे हस्तांतर केल्यानंतर फादर जॉर्ज डिसोझा हे प्रमुख धर्मगुरु बनले.पुण्याचे  बिशप व्हॅलेरियन डिसोझा यांनी नव्यानेच गुरुदिक्षा झालेले धर्मगुरु फादर नेल्सन मच्याडो यांना खास कामगिरीवर हरेगावच्या संत तेरेजा शाळेचे प्राचार्य म्हणून नेमणूक केली. खूप जुन्या असलेल्या या प्राथमिक शाळेत दहापर्यंत म्हणजे माध्यमिक विभागास मान्यता मिळवणे हे फादर मच्याडो यांच्यावर बिशप व्हॅलेरियन यांनी सोपवलेले मिशन होते. फादर मच्याडो यांनी ही कामगिरी पूर्ण केली आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे  १९८० साली संत तेरेजा शाळेची दहावीची पहिली तुकडी बाहेर पडली. 

श्रीरामपूरजवळच्या हमरस्त्यापासून दूर असलेल्या या खेड्यातील या यात्रेला अहमदनगर जिल्ह्यातील  प्रमुख यात्रा बनविण्याचे श्रेय फादर हाल्दनर यांच्याकडेच जाते. या जिल्ह्यातील विविध मिशनकेंद्रातील धर्मगुरूंना, भाविकांना माऊलीच्या यात्रेला नियमितपणे हजर राहण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. 1998 साली या यात्रेचा सुवर्णमहोत्सव नाशिकचे बिशप थॉमस भालेराव आणि जवळच्या इतर धर्मप्रातांच्या बिशपांच्या उपस्थितीत लाखो भाविकांनी साजरा केला. या महोत्सवात या यात्रेचे जनक असलेले फादर बादर यांची अनुपस्थिती अनेकांना जाणवली. यात्रेच्या आठ महिने आधी म्हणजे 1997च्या नाताळाच्या दिवशी वयाच्या 94 व्या वर्षी त्यांना देवाज्ञा झाली होती. मात्र आपल्या हयातीतच  आपण लावलेल्या यात्रेच्या रोपाचा भलामोठा वटवृक्ष झाल्याचे भाग्य त्यांना लाभले होते.  

माझ्या लहानपणापासून म्हणजे अगदी शाळेत प्रवेश होण्याआधीच्या काळातील मतमाऊलीच्या यात्रेच्या आठवणी माझ्या मनात आजही ताज्या आहेत.  त्यावेळी म्हणजे 1960च्या दशकात श्रीरामपूरात जवळच्या ठिकाणी जाण्यासाठी टांग्याचा वापर होत असे. श्रीरामपूरातील रेल्वे स्टेशन आणि बसस्टँड  अगदी समोरासमोर आहेत. रेल्वेस्टेशनाच्या फाटकाजवळच  त्याकाळात पंधरा-वीस टांगेवाले असत. बेलापूर रस्त्यावर म्हणजे त्याकाळातील वसंत टॉकिजसमोर आणि संगमनेर नाक्यापाशीही टांगेवाले प्रवाशांची वाट पाहत असत. शनिवारी दुपारचे जेवण आटपून आणि रात्रीच्या जेवणाच्या शिदोरीचे, चटई आणि एखाद्या मोठ्या चादरीचे बोचके घेऊन आईवडील आम्हा सर्व मुलांना घेऊन  रेल्वे स्टेशनाजवळच्या  टांगा स्टॅडपाशी येत. या टांग्यात बसून आमचे सर्व कुटुंब मग हरेगावच्या दिशेने रवाना होई. त्याकाळात आम्ह्या मुलांचा  टांग्याच्या प्रवासाचा योग असा वर्षातून एकदाच येई. त्यामुळे टांग्यातील ही सवारी हेही या यात्रेचे एक आकर्षण असे.

मतमाऊलीच्या पुतळ्याची मिरवणूक सुरू होण्याआधी आम्ही हरेगावात पोहोचत असू. त्याकाळात यात्रेला येणारया लोकांची सं‘या दोन-तीन हजारांपर्यत मर्यादित असे आणि यात्रेत येणारे सर्वच जण मिरवणुकीत सामिल होत. मिरवणूक फादरबाडीतून बाहेर पडली कि मग शाळेचे मैदान जवळजवळ ओस पडत असे. नंतर येणारे भाविक मग वाटेवरच मिरवणुकीत सामील होत असत. मिरवणुकीच्या अग्रभागी  सजवलेल्या बैलगाडीत पवित्र मारीयेचा पुतळा आणि बिशपमहाशय असत.  पुतळ्याच्या पुढील आणि मागील  भागातील मिरवणुकीतील लोक गटागटाने पबित्र माळेची प्रार्थना, मारियेची लितानी आणि गीते गात असत.

दुपारी चारला सुरू होणारी ही मिरवणूक हरेगाव फॅक्टरीच्या अधिकाऱ्यांच्या आणि कामगाऱ्यांच्या क्वार्टर्सभोवती  फेरा मारुन साडेपाचच्या सुमारास देवळाकडे परतत असे. मिस्सा सुरू होण्याआधी  भाविक  मतमाऊलीच्या पुतळ्यासमोर  प्रार्थना करत.  माऊलीला नवस बोलले जाई, जुने नवस फेडले जाई. आजारी व्यक्ती बरी व्हावी म्हणून माऊलीला मेणाचा पुतळा वाहिला जाई.  हाताचे,पायाचे किंवा पोटाचे दुखणे असेल तर या दुखण्यातून बरे होण्यासाठी भाविक मेणाचे हात, पाय  किवा पोट  माऊलीच्या पुतळ्यासमोर अर्पण करत.

त्याकाळी  फादर हुबर्ट सिक्स्त यांनी संत तेरेजा शाळेच्या सध्याच्या दुमजली इमारतीचे बांधकाम सुरू केले होते. देऊळ आणि या इमारतीच्या मध्ये म्हणजे सद्याच्या फादरांच्या  निवासस्थानाच्या अगदी समोर  जुनी चार-पाच खोल्यांची कौलारी शाळा होती. ही कौलारी शाळा आणि  नवी इमारत यामधील छोट्याशा  मैदानात आरामात बसतील इतकीच त्यावेळेस भाविकांची संख्या असे. देवळाच्या पलिकडे बुचाची आणि इतर मोठी  झाडे  होती. तिकडे  मतमाऊलीच्या पुतळ्याशेजारीच लागून मिठायांचे, खेळण्यांचे स्टॉल्स लागत. वाढलेल्या गर्दीमुळे आज हे स्टॉल्स  मिशन कंपाऊंडच्या बाहेर लागतात.

पुणे धर्मप्रातांचे बिशप विल्यम गोम्स मैदानात मोठी संगीत मिस्सा म्हणत. भाविकांसमोर अर्धापाऊण तासाच्या प्रवचनाची संधी मात्र वकृत्वाची देणगी असलेल्या एखाद्या धर्मगुरुस दिली जाई. बिशप गोम्स यांचे  मराठी भाषेवर प्रभुत्व नसल्यामुळे कदाचित असे होत असे. मात्र त्यामुळे भाविकांना दरवर्षी नवनव्या चांगल्या  फर्ड्या  वक्त्याचे प्रवचन ऐकण्याचा योग लाभत असे.  मतमाऊलीच्या यात्रेला जमणाऱ्या   भाविकांची संख्या अहमदनगर जिल्ह्यातील इतर कुठल्याही धार्मिक कार्यक्रमापेक्षा  कितीतरी पटीने अधिक असते. त्यामुळे या यात्रेत प्रवचनाची संधी मिळणे हा त्या धर्मगुरूंच्या दृष्टीने मोठा सन्मान असे. याच यात्रेत फादर प्रभुधर, फादर फ्रान्सिस  दिब्रिटो यासारख्या पुढे मराठीत उत्तम  साहित्यरचना करणारया धर्मगुरूंचे प्रवचन मी या काळात ऐकले.

यात्रेच्या दरवर्षाच्या मोठ्या संगीत मिस्सेमध्ये ब्रदर अपोलिनारियस पिंटो यांचे भूमिका खूप महत्त्वाची असायची. संगमनेर येथे येशूसंघीयांच्या ज्ञानमाता शाळेत बोर्डिंग इन-चार्ज  असलेल्या ब्रदरांचा यात्रेआधी काही दिवस हरेगावात मुक्काम असायचा. या काळात येथील मुला-मुलींच्या  शाळेतील विद्यार्थ्यांकडून ते या संगीत मिस्सेची तयारी करून घेत. ढगाळ पांढऱ्या झग्यातही न लपणारे मोठे पोट असणारे, स्वत: पेटी वाजवित मुला-मुलींना भजनाचे, गायनाचे धडे देणारे, चिरुट ओढणारे ब्रदर अपोलिनारियस  किंवा अपो पिंटो ज्ञानमातेच्या माजी विद्यार्थ्यांना अजूनही चांगले आठवत असतील. कडक  शिस्तीच्या  ब्रदरांचा मुलांमध्ये मोठा दरारा असे. सन 1958 पासून अनेक वर्षे  मतमाऊलीच्या यात्रेत ब्रदर अपो  पिंटोंचा असा सक्रिय सहभाग असायचा. पंचमढी स्कूल ऑफ इंडियन डान्सिंग अँड म्युझिक येथे  खास प्रशिक्षण घेतलेल्या ब्रदर पिंटो यांची अहमदनगर जिल्ह्यातील कुठल्याही गावांतील देवळांच्या महत्त्वाच्या सणाच्या आणि यात्रेच्या संगीत मिस्सेमध्ये अशी महत्वाची भूमिका असायचीच. (मी शाळेत शिकत असेपर्यंत ख्रिस्ती मंदिरासाठी देऊळ हाच शब्द वापरला जायचा. आता या ख्रिस्ती देवळासाठी सर्रासपणे `चर्च' हाच शब्द रुढ झाला आहे.)      

  

मोठी संगीत मिस्सा झाल्यानंतर मैदानात त्याच जागेवर बसून मग संध्याकाळी भाविक आपले जेवण उरकून घेत असत. या दरम्यानच्या काळात  वेगवेगळ्या खेडेगावातून यात्रेसाठी जमलेल्या आपल्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना भेटण्याचा कार्यक्रम  होई.  भक्तीसाठी  मैदानावर बसण्यासाठी अनेक कुटुंबे  दरवर्षी ठराविक जागेचीच निवड करत असल्याने या गर्दीत कुणाला शोधणे फारसे अवघड नसायचे.

या यात्रेत मग औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील आपल्या माहेरातून म्हणजे माळीघोगरगावातून आलेल्या आपल्या भावांना, वहिणींना माझी आई भेटायाची. अनेकदा मतमाऊलीच्या यात्रेनिमित्त वर्षातून एकदाच अशा भेटीगाठी होत असल्याने सर्वांना एकमेकांची खुशी कळायची, सुखदु:खाच्या गप्पा व्हायच्या.  रात्री आठपर्यंत मैदानासमोरच्या स्टेजवर मराठी नाटकाची तयारी सुरू झाली असायची. या नाटकातील सर्व अभिनेते संत तेरेजा  शाळेचे शिक्षक आणि शिक्षिका असत. त्याकाळातील गाजत असलेले वसंत कानेटकर व इतरांचे कुठलेही सामाज़िक नाटक सादर केले जाई. संत तेरेजा शाळेतील शिक्षक एम. जे थोरात)(शाळा प्राचार्य फादर  जेम्स थोरात यांचे वडील), मास्तर, भिकाजी दिवे मास्तर, आणि अमोलिक मास्तर या नेहेमीच्याच यशस्वी कलाकारांच्या यात भूमिका असत. नंतरच्या काळात या शाळेत प्राचार्य म्हणून रूजू झालेल्या फादर नेल्सन मचाडो  हेही या नाटकांत भाग घेत असत. ’अश्रूंची झाली फुले ’ या नाटकातील त्यांची लाल्याची भूमिका प्रेक्षकांना  खूप पसंत पडली होती. थिएटरमध्ये जाऊन नाटके पाहण्याची ऐपत नसलेल्या मराठी ख्रिस्ती समाजाच्या दृष्टीने ही नाटके एक मोठी  मेजवानीच असत.

मध्यरात्रीच्या आसपास नाटक संपले  कि ताबडतोब त्याच स्टेजवर  भजनांच्या स्पर्धा होत.  विविध खेडेगावातून आलेल्या भजनीमंडळे आपली भजने पेटी, तबला, टाळ आणि चिपळ्यांच्या सुरात सादर करत. मात्र तोपर्यंत दिवसभराच्या श्रमाने थकलेली बहुतेक भाविक मंडळी आपल्या जागेवरच आडवी-तिडवी झोपलेली असत. तिकडे देवळात रात्री एकपासून दर एक तासाने दुसऱ्या दिवसाचे म्हणजे रविवारचे  मिस्सा सुरु झालेले सत. लवकर घरी जाण्याचे वेध लागलेले भाविक हे  मिस्सा करत आणि नंतर माऊलीच्या पुतळ्यापाशी पुन्हा प्रार्थना करून, काळ्या फुटाण्यांचा आणि गोड तिळांचा प्रसाद विकत घेऊन परतीची वाट धरत.

काही भाविक मात्र सकाळी बिशपांच्या उपस्थितीत सकाळी सातला होणारया मिस्सेत सहभागी होत. मिस्सा झाल्यानंतर कब्बडीच्या आणि व्हॉलीबॉलच्या स्पर्धा होत. पण सकाळी अकरापर्यंत बहुतेक भाविक परतीच्या वाटेवर असत आणि दिड दिवस अगदी गजबजलेले मिशन कंपाऊंडमध्ये मग अक्षरश: ओस पडायचे.


गेल्या काही दशकांत मतमाऊलीच्या यात्रेतील यात्रेकरुंचे संख्या अमर्याद वाढून लोकप्रिय तीर्थक्षेत्रांत असणाऱ्या नागरी आणि इतर समस्या इथेही दिसू लागल्या आहेत. तरीही विविध गैरसोयीना तोंड देत या पंढरीची वारी करणाऱ्या भक्तांच्या संख्येत दरवर्षी वाढ होतेच आहे. याचे कारण आध्यात्म्याबरोबरच या यात्रेमुळे साध्य होणाऱ्या नातेवाईक आणि मंडळींच्या भेटीगाठी आणि इतर कितीतरी गोष्टी ! यावर्षी मात्र कोरोनामुळे बांद्रा येथील माऊंट मेरीचा सण आणि हरेगावचीही मतमाऊलीची यात्रा होणार नाही.

संदर्भ 

 १) दैनिक सकाळ, अहमदनगर आवृत्ती, १० डिसेंबर २०१०  




Comments

Popular posts from this blog

Dnyanodaya monthly enters 175th year

Shakuntala Paranjape : Crusade of a lifetime

Fr. Rudolf Schoch. A Jesuit Looks back in satisfaction