नावात काय नाही?

                 कामिल पारखे हे माझे नाव ऐकून अशा अनेक व्यक्तींची उत्सुकता चाळवली गेल्याचे मी अनेकदा अनुभवतो. या नावाचा अर्थ काय येथपासून मग  प्राथमिक चौकशी सुरू होते. प्रत्येक नावामागे, आडनावामागे विशिष्ट भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि  धार्मिक  संदर्भ असतो आणि तो जाणून घेण्याच्या उत्सुकतेने विचारलेल्या या  प्रश्‍नाला मला नेहेमीच सामोरे जावे लागते. मात्र ही सर्व पूर्वपिठिका सांगण्याच्या मूडमध्ये  मी प्रत्येकवेळी असतोच असे नाही.  त्यामुळे आमच्याकडे मराठी ख्रिस्ती कुटुंबात त्याकाळी असलेल्या प्रथेप्रमाणे मला ये नाव मिळाले हा सारा इतिहास अशावेळी सांगत बसणे प्रत्येक वेळी शक्य नसते. अशावेळी समोरची व्यक्ती कोण आहे आणि अशा चर्चेसाठी त्याप्रसंगी माझ्याकडे किती वेळ आहे हे पाहून मग मी प्रत्येक वेळ निभावून घेत असतो.

                गोव्यात बारा वर्षे स्थायिक असतांना मला माझ्या  ’कामिल’ या नावामुळे कधीच अवघडल्यासारखे झाले नाही कारण तेथे हे नाव आपल्याकडील  रमेश, वसंत या नावांसारखे. बसमध्ये कुणी कामिल म्हणून हाक मारली तर  हाक मारणारया व्यक्तीच्यादिशेने लगेच  चार डोकी वळून  पाहणार इतके सर्वसामान्य नाव ! अर्थात त्यामुळे  माझ्यापुढील समस्या पूर्ण मिटली होती असे नव्हे. कारण तिथे  माझ्या ’पारखे’ या आडनावाने अनेकांची उत्सुकता चाळवली जायची. तेथे माझे  पहिले नाव ऐकले मी कॅथोलिक आहे हे समोरच्याला पटकन कळायचे पण माझे आडनाव ऐकले मग पुन्हा तो नेहेमीचाच गोंधळ सुरू व्हायचा.

                औरंगाबादमध्ये मी एक वर्ष असतांना तेथील एका मुस्लीम मित्राच्या वडिलांनी माझ्या नावामुळे मी मुस्लीम आहे हे गृहीत धरून मला कामिल या शब्दाचा अर्थही समजावून सांगितला होता. त्यांचा गैरसमज दूर करणे मला जिवावर आले आणि तसे करण्याची जरूरीही भासली नाही.

                भारतीय समाजात कुठल्याही व्यक्तीचे नाव आणि आडनाव कळाले कि ती व्यक्ती कोणत्या धर्माची,  जातीची वा पोटजातीची, राज्यातील किवा त्या राज्यातील कुठल्या प्रदेशातील आहे हे चाणाझ लोकांना चटकन लक्षात येते.  जाधव, कुलकर्णी, कणबर्गी,   भट्टाचार्य, मेहता, नेने,  मेनन, परीट, शर्मा, यादव, सोनार, कन्नमवार,  शाह  वर्गैरे नावे ऐकली कि मग त्याव्यक्तीच्या पार्श्‍वभूमीबद्दल काही विचारायची गरज भासत नाही. आपण संभाषण करतो ती व्यकी  नक्की कोण आहे हे जाणून घेण्याची कुणाचीही सुप्त इच्छा असतेच. मात्र क्वचितप्रसंगी  नाव आणि आडनाव  कळूनही हा बोध झाला नाही तर मग काही व्यकींना चैन बसवत नाही आणि मग आडपडद्याने आणि क्वचित उघडपणे चौकशी करूनच मग त्या व्यक्ती स्वस्थ बसतात.

                भारतात अनेक राज्यांत ख्रिस्ती धर्मिय असले तरी या एकधर्मिय समाजात एकाच पध्दतीची नावे, आडनावे आढळत नाही. देशातील हिंदु समाजात जसे विविध प्रांतातील संस्कृतीनुसार वेगवेगळी नावे,  आडनावे आढळतात, तसेच ख्रिस्ती  समाजाचेही आहे. त्यामुळे मराठी, गोवेकर,  नैऋत्य भारतातील, उत्तर भारतीय, तमिळ आणि मल्याळी ख्रिस्ती व्यक्तींची पार्श्‍वभूमी त्यांच्या केवळ आडनावांनुसार ओळखता येते.

                गोव्यात, केरळ, तामिळ नाडू आणि नैऋत्य भारतात  मिशनरयांनी ख्रिस्ती धर्माचा प्रसार केला तेव्हा  या सर्वच प्रांतातील नवख्रिस्ती समाजाने आपल्या पुरातन काळापासून चालत आलेल्या स्वत:च्या नावांत वा आडनावात पूर्णत: बदल केला नाही असे दिसून येते. गोव्यात काही काळ तरी नवख्रिस्ती समाजातील लोकांची नावे, आडनावे, आणि इतर सांस्कृतिक बाबींबद्दल  अनावश्यक असणारी कडवी भूमिका स्विकारली होती. त्यामुळेच तेथे उ?वर्णिय सारस्वत तसेच खालच्या समजल्या जाणारया समाजातील लोकांना धर्मांतरांनंतर  मिंगेल, जुजे, जॉन,  मायकल, अशी नावे आणि  डिसोझा, गोन्साल्वीस, फर्नांडीस, अल्वारीस अशी पोर्तुगीज लोकांमध्ये  प्रचलीत असलेली आडनावे मिळाली. धर्मांतरानंतर या लोक़ांची मूळ हिंदू म्हणून असलेली ओळखच मिटविण्याचा हा एक केविलवाणा प्रकार होता.

                पोर्तुगिजांच्या अंमलाखालील एके काळी असलेल्या गोव्यात आणि महाराष्ट्रातील वसई तालुक्यातील ख्रिस्ती समाजात डिसोझा,  डिकून्हा कार्व्हालो अशी आडनावे आढळतात. यामागची पार्श्‍वभूमी रजीन डिसिल्वा यांनी ’वसईतील ख्रिस्ती धर्म व ख्रिस्तमंदिरे’ या आपल्या पुस्तकात दिली आहे. वसईतील बहुसं‘य कॅथोलिक समाज हा पूर्वाश्रमीचा  सोमवंशी क्षत्रिय (पानमाळी) व सामवेदी ब‘ाह्मण या दोन जातीमधून ख्रिस्ती धर्मात आला.  ज्यावेळी एखाद्या व्यक्तीस बाप्तिस्मा देण्यात येई  त्यावेळी वसईच्या किल्ल्यअतील एखाद्या पोर्तुगीज सरदार या दिक्षेच्यावेळी त्या व्यक्तीचा गॉडफादर (धर्मबाप) म्हणून उभा राहत असे. आपल्याकडे लग्नाच्यावेळी नवरयामुलीचा वा नवरया मुलाचा मामा म्हणून मामा नसल्यास इतर कुणास उभा करतात तसे. या सरदारांची नावे डिमेलो, डिसोझा किंवा डि क‘ॅस्ट्रो अशी असत. मेलो, सोझा ही पोर्तुगीज देशातील गावांची अथवा धर्मग‘ामांची नावे. पोर्तुगीज  भाषेत डि या शब्दाचा अर्थ  ’चा’ किंवा इंग‘जी भाषेत ’ऑफ’ असा होतो.  आपल्याकडे  नगरकर म्हणजे नगर या गावचे तसे. त्यामुळे सेंट इग्नेशियस डि लोयोला म्हणजेच सेंट इग्नेशियस ऑफ लोयोला किंवा संत इग्नाती लोयोलाकर . सिल्वा, सोझा, मोन्ते  ही पोर्तुगालमधील मिन्ह्यू  जिल्ह्यातील गावांची नावे आहेत. आपल्याकडे विविध रंगांची, व्यवसायांची आणि प्राणीपक्ष्यांची  नावे ( कोल्हे, वाघ, बगळे,  लांडगे, काळे, गोरे, कुलकर्णी, लोहार  वगैरे) आडनावे असतात तशीच युरोपियन देशांतही असतात. उदाहरणार्थ,  स्मिथ,  फरेरा (लोहार),   लोबो (लांडगा), फलकाव (बहिरी ससाणा), मुरझेलो (गडद रंग), सिल्व्हेरा (काळे बोर).  (पान 175, 176)

                तामिळनाडू आणि केरळ मध्ये मात्र असा प्रकार झाला नाही. केरळ येथील ख्रिस्ती समाज तर  येशू ख्रिस्ताचा शिष्य संत थॉमस याच्यापासून म्हणजे दोन हजार वर्षांपासून आपली ख्रिस्ती धर्माची परंपरा आहे असे मानतो. तेथील ख्रिस्ती समाजात  थॉमस, जॉर्ज , मॅथ्यू वगैरे नावे असली तरी अनेक़ांनी स्थानिक बहुसं‘य समाजाप्रमाणे आपल्या गावांची वा मूळ हिंदू जातीतील आडनावे अजूनही कायम राखली आहेत. उदाहरणार्थ, बिशप नायर, बिशप नंबुद्रिपाद, न्याराकट्टील,  पाईनुमकल, संत्यागो वगैरे .

                अहमदनगर जिल्ह्यात धर्मांतर करताना धर्मांतरितांचे मूळ हिंदू नाव अथवा आडनाव बदलण्याचा जर्मन  वा स्विस मिशनरयांनी आग‘ह धरला नाही हे विशेष म्हणावे लागेल.  हे येशूसंघीय धर्मगुरू त्याबाबतीत अधिक प्रागतिक विचारसरणीचे होते असेच म्हणावे लागेल.  महाराष्ट्रात कार्य करणारया प्रोटेस्टंटपंथीय परदेशी  मिशनरयांनीदेखील हीच प्रथा पाळली होती. त्यामुळेच ख्रिस्ती असूनही रेव्ह. नारायण वामन टिळक, रेव्ह. नीळकंठशास्त्री नेहेम्या गोरे,  रेव्ह्. सावरकर, आपण’कार सत्यवान नामदेव सूर्यवंशी किंवा अहमदनगर कॉलेजचे संस्थापक भास्करराव पांडुरंग हिवाळे यांना आपली मूळ नावे अथवा आडनावे वदलून आपला सांस्कृतिक वा धार्मिक भूतकाळ गाडून टाकण्याची आवश्यकताच भासली नाही.

                मुलांना हिंदी नावे  द्यायची नाहीत कारण ती हिंदू देवतांची नावे असतात. पण जॉर्ज, चार्ली, जिमी या नावांना तरी कोठे अर्थ असतो ? जॉर्ज व चार्लस ही नावे तरी मी ख्रिस्ती शास्त्रात वाचलेली आठवत नाहीत.  मग  या नावावर एवढे  प्रेम का?’ असा प्रश्‍न 1933 साली भरलेल्या मराठी  ख्रिस्ती साहित्य संमेलनात लक्ष्मीबाई टिळकांनी विचारला होता. (आढाव, पान  150)

                नंतरच्या काळात काही ख्रिस्ती कुटुंबांनी ख्रिस्ती संकल्पनेशी आणि त्याचबरोबर भारतीय परंपरेशी नाते कायम राखतील अशा स्वरुपाची नावे आपल्या अपत्यांना देण्यास सुरुवात केली. सतराव्या शतकातील मराठी महाकवी थॉमस स्टीफन्स यांनी आपल्या ’कि‘स्तपुराण’ या महाकाव्यात येशू ख्रिस्ताला संबोधून भगवान,  वगैरे नावे वापरली आहेत. ही संबोधने हिंदू धार्मिक परंपरेतील असली तरी ख्रिस्ती परंपरेशी अगदी चपखल  बसतात. तशाच स्वरुपाचा दोन भिन्न संस्कृतीचा मिलाप करून पुढे ही नावे ख्रिस्ती समाजात अल्पशा स्वरुपात का होईना  वापरली जाऊ लागली. त्यामुळे केवळ मायकल, जेम्स वगैरे परदेशी नाव धारण केल्याने  बहुसं‘य समाजत  उपरे  ठरण्याचा धोका टळला.

                सन 1970 नंतर फादर प्रभुधर यांनी ’निरोप्या’ या ख्रिस्ती मासिकाची संपादक म्हणून सुत्रे हाती घेतल्यांनतर या मासिकाच्या मलपृष्टावर बायबलचे दैनंदिन वाचनाच्या उतारयांच्या यादीबरोबरच ख्रिस्ती  संताची नावे आणि त्यांची ’भारतीय’  नावे देण्यास सुरुवात केली. त्यामुळे अनेक ख्रिस्ती कुटुंबे बाप्तिस्याच्यावेळी अपत्यांना नावे देण्यासाठी या संताच्या मूळ अथवा भारतीय नावांची निवड करू लागली. बहुतांश ख्रिस्ती दांपत्य निरक्षर असल्याने बाप्तिस्यासाठी अपत्यास चर्चमध्ये घेऊन येण्यापूर्वी नाव ठरवाण्याबाबत पति-पत्नींमध्ये साधी चर्चा वा विचारमंथन झालेले नसायचे. अशावेळी बाप्स्तिमा देणारया धर्मगूरूंच मग त्या दिवशी ज्या संताचा सण असेल ते नाव त्या बाळास द्यायचे. उदाहरणार्थ, संत जॉर्ज, संत  तेरेसा, वा मार्था.

                उपलब्ध कागदपत्रांनुसार माझा जन्म 18  जूनचा. माझा जन्म घरीच झालेला असल्याने आणि माझ्यापूर्वी घरात अनेक मुले जन्माला आलेली असल्याने माझ्या जन्माची तारीख  आवर्जून लिहून ठेवण्याची गरज कुणाला वाटण्याची शक्यता कमीच होती.  कॅथोलिक सणदर्शिकेनुसार या दिवशी सन्त्त कामिल याचा सण येतो. त्यामुळे त्यावेळी श्रीरामपुरात प्रमुख धर्मगुरू असलेल्या  फादर आयवो मायर यांनी या सणाचे नाव सुचविले असणार आणि बाई-दादांनी त्यावर मान डोलावली असणार.  माझ्या समयस्कर असणारया इतर  ख्रिस्ती व्यक्तींच्या नावाची पार्श्‍वभूमी नक्कीच अशाच स्वरूपाची  असणार. नामदेव,  सुरेश,  मारूती, कमल, मारूती, धोंडिबा, सुभद्रा अशाच नावांची तोंडओळख असणारया अशिक्षित पालकांना रॉबर्ट,  राफायल,  सिंथिया, फिलोमीना अशा नावे  आपल्या मुलांना देण्याचा विचार सुचणेच त्याकाळी शक्य नव्हते. अर्थात आडनावात बदल करण्याची गरज कुणालाच भासली नाही.

                बायबलचे मराठीत वा इतर भारतीय भाषांत रूपांतर करतांना सर्वच भाषांतरकारांनी बायबलमधील ब्यक्तीची आणि स्थळांची नावे मूळ  हिब‘ू आणि लॅटीन भाषांतील उ?ारांप्रमाणे ठेवली आहेत. उदाहरणार्थ,  जे’ या रोमन लिपीतील शब्दांचा उ?ार या भाषांमध्ये ’य’ असा होतो. त्यामूळे, ’जिझस’  हे नाव मराठीत ’येशू’  या मूळ रूपात अवतरले.  इतर व्यक्ती आणि स्थळांची नावे पुढील स्वरूपात आहेत. जॉन (योहान), पीटर (पेत्र किंवा पेत्रस), सायमन (शिमोन), जेरुसलेम (येरुसलेम), जॉर्डन (यॉर्दन), जेकब (याकोब) आणि जोसेफ (योसेफ), वगैरे. अनेकांनी मात्र  अधिक प्रचलीत स्वरूपाची म्हणजे इंग‘जी भाषेत वापरली जाणारी नावे स्विकारली आहेत. मूळेच या समाजात दानियल भोसले,  लुकस आढाव, पौलस पाळंदे,  दाविद कोळगे,  चार्ल्स क्षिरसागर,  जेम्स दिवे, वंदना बागुल,  किंवा अगदी पारंपारिक स्वरुपाची तुकाराम गणपत पारंधे अशी नावे आढळतात.

                यासंदर्भात या ’विचित्र’ नावांबद्दल निरोप्या’ च्या 1976च्या सप्टेंबर महिन्यात  ’आम्ही आणि आमची नावे’ या शिर्षकाखाली जे. बी. अभंग यांचा पुढील लेख प्रसिद्ध झाला होता:

                ’’आम्हा मराठी माणसांत ख्रिस्ती धर्माचा जेव्हा प्रसार झाला तेव्हा आमच्या पुरोहितांनी धर्मकार्याच्या उत्साहात या समाजाला ख्रिस्ती धर्मात असतील तेवढी संताची नामवली उदारहस्ते बहाल केली. आणि यातूनच चमत्कारीक नावाची मालिका आमच्या समाजात रूढ झाली. माथूस भिकाजी, योसेफ बाळाजी, पेत्रस दगडूजी, थोमास शंकर, मारीया नामदेव, फिलोमिना ज्ञानेश्‍वर, एलिसाबेथ तुकराम वगैरे नावे ख्रिस्ती आणि हिंदू धर्माचा समसमासंयोग झाल्याची द्योतक वाटतात. जोपर्यत ख्रिस्ती समाज भारतातील बहुजन ख्रिस्तेतर समाजापासून अलिप्त राहत होता, तोपर्यंत या नावाचा ताप त्याला जाणवत नव्हता. पण दिवसेंदिवस समाजात फरक पडू लागला आणि आमची तरूण पिढी  नोकरीपेशाच्या निमिताने ऑफिसात, कारखान्यात आणि इतरत्र भारतीय समाजात मिसळू लागली. तेव्हा या नावाचे चटके सर्वांना बसू लागले. आपल्या नावातील हा गोंधळ इतरेंजनांस समजावून सांगताना धर्मांतराचा सारा इतिहासच सांगण्याची त्यांच्यावर पाळी आली. या संताच्या नावांचे भारतीयीकरण केल्यामुळेही अनेक घोटाळे उडाले. जोसेफचा जेव्हा योसेफ झाला, तेव्हा काही त्याला चक्क युसुफ म्हणून मुसलमान समजू लागले. शिवाय पीटरचा पेत्रस, जॉनचा योहान किंवा पॉलचा पौलस करण्यात कोणते औचित्य साधले गेले कोण जाणे !

                यावर कोणी म्हणेल कि नावात काय आहे? काही धर्ममार्तंड तर याही पुढच्या पायरीवर जाऊन ओरडतील कि  ‘ख्रिस्ती माणसाला ख्रिस्ती नावाची लाज वाटण्याचे कारणच काय?‘  यात लाजेचा वगैरे प्रश्‍न नाही. प्रश्‍न आहे तो बदललेल्या जमान्याशी मिळतेजुळते आणि सोज्वळ नावे असण्याचा. पेशवाई काळातील यमुना, गोदावरी, अक्काबाई, धोंडोपंत, ज़िवाजी ही नावे जाऊन वासंती, नूतन, रजनी, वसंत, दिलीप, शैलेष ही नवी नावे लोकांनी उगाच तर दिली नाहीत ना! आमच्या समाजात भारतीय नावांची परंपरा जर आम्हाला निर्माण करवयाची असेल तर  निरोप्याच्या शेवटच्या पानावर संतांची मराठी नावे देण्याची जी योग्य प्रथा अलिकडेच सुरू झाली आहे, तिचा योग्य वापर करून समाजाच्या शहाण्या लोकांनी आपल्या मुला-मुलींचे बाप्तिस्मे करावेत. कारण बाप्तिस्मा कोणत्या नावाने द्यावयाचा हक्क पालकांचा असतो.’’

                अलीकडच्या काळात मात्र अनेक ख्रिस्ती पालक आपल्या पाल्यांसाठी  बहुसं‘य समाजाप्रमाणे  ’सेक्युलर’ धर्तीची नावे  निवडतात असे दिसते.


 

ख़ि‘स्ती समाजातील आडनावे पुदीलप्रमाणे आढळतात, 

आदाव (केन्दळ)आवारे, आवताडे (ओउताडे)- (मिरी), ओहोळ (उम्बरगाव)

कदम (पाथ‘े सात्राळ,  राजुरी आणि पानवडी) ,  कसबे.   काम्बले,  केदारी (खेरडे परमानन्द आणि दुर्गापुर), कोलगे, साळवे (सोनइ, राहुरी),

खन्डागळे, ख़रात (पिम्परी लोउकी)

चक‘नारायन, चक‘े, चाबुकस्वार, चोरवार (निम्भेरे),

जगताप, त्रिभुवन अस्तगाव), जाधव (आरन्डगाव),

ग़ायकवाड (माळ वाडगाव, आम्भोरे   आणि खडके),गुढवळे (ताम्भेरे), चव्हाण, तोरणे(पढेगाव, श्रीरामपुर तालुका),  

ठोम्बे, ठोम्बरे,

ताम्बे (ताम्भेरे),

थोरात (लासुर)

 दिवे (क़णगर आणि चिन्चपुर), दारोळे (सन्गमनेर बुद्रुक), दुशिन्ग, 

 धीवर,

पवार (खडाम्बे)  पन्डीत (नीम्बगाव खैरी, आणि उन्दिरगाव, श्रीरामपुर तालुका),  पलघड्मल (सात्राळ्),  पठारे (बोरसर), पगारे (कनोली), पाळन्दे (आम्बी)  पारखे (उक्कलगाव (श्रीरामपुर) आनि  वाहेगाव मान्जरी (वैजापुर तालुका, जि‘ा ओरन्गबाद्), पाचारणे, पाटेकर, पाटोळे,  पारधे (दाढ बुद्रुक  आणि चिन्चपुर)  पारगे,

फुलपगार

बागुल, बोरुडे (शिरेगाव),  बोर्दे, ब‘ाम्हणे (लोणी आणि सोनगाव), बोधक (नान्दुर),

भगत, भालेराव (तान्दुळवाडी आणि डिग‘स),भोसले (कोल्हार खुर्द, वरवन्डी,  आणि भामाठाण) ,

मगर,  मकासरे (वळण), मेढे, म्हन्काळे (सिलेगाव), म्हस्के, मिसळ (हिवरगाव),- मोरे, मुन्तोडे (आश्‍वी खुर्द आणि सिपलापुर) ,

रनवरे

वाघ, वाघमारे (घान्ट शिरस आणि पिम्पळस)

षो

शिनगारे (ंमाली घोगरगाव, वैजापुर तालुका, ओरन्गाबाद जि‘ा) ,शिरसाठ,  शिन्दे( खाम्बे) शेलार. शेळके (गोन्धवनी, श्रीरामपुर तालुका आनि उम्बरी),

क्षीरसागार (खुडसनगाव),

साठे, सान्गळे, सोनावाणे, सात्रालकर, सूर्यवंशी

उजगरे (?)  उबाले, फुलपगार,

रनदिवे, रुपटक्के (मुठे वाडगाव), रोहोम (देवगाव),

लोन्ढे, 

हिवाळे,


Comments

Popular posts from this blog

Shakuntala Paranjape : Crusade of a lifetime

Dnyanodaya monthly enters 175th year

Fr. Rudolf Schoch. A Jesuit Looks back in satisfaction