दोनशेचौदा वर्षांपूर्वी अमेरिकेतून दोन स्वतंत्र जहाजांनी काही प्रवाशी भारताच्या दिशेने एका आगळ्यावेगळ्या कामगिरीवर निघाले होते.

गॉर्डन हॉल, सॅम्युएल नॉट आणि त्यांच्या पत्नी रॉक्सना नॉट ११ फेब्रुवारी १८१३ रोजी मुंबई बंदरात पोहोचले आणि १२ तारखेला ते किनाऱ्यावर उतरले. सॅम्युएल न्यूवेल ७ मार्च १८१४ रोजी मुंबईत त्यांना सामिल झाले.
या मिशनरींच्या आगमनाने भारतात एका नव्या पर्वाची सुरुवात झाली.
या मिशनरींनी देशात आधुनिक शैक्षणिक, सामाजिक आणि वैचारीक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली गेली.
स्त्री-पुरुष असा लिंगभेद न करता, जात-धर्म म्हणजे उच्च जाती, शूद्र, अतिशूद्र किंवा अस्पृश्य असा विचार न करता शिक्षणाची कवाडे भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वांना उघडी केली होती आणि अशाप्रकारे आधुनिक सार्वत्रिक शिक्षणपद्धतीचा पाया रचला केला.
आजही गॉर्डन हॉल हे नाव तसे फारसे परिचित नाही.
आधुनिक भारताच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान असणाऱ्या गॉर्डन हॉल या महान व्यक्तीची इतिहास संशोधकांनी मुळी दखलच घेतलेली नाही.
बुधवार ८ एप्रिल रोजी गॉर्डन हॉल यांची जयंती आहे.
जडसन आणि सॅम्युएल न्यूवेल हे ९ फेब्रुवारी १८१२ रोजी कॅराव्हान या जहाजाने सालेम येथून निघाले. त्यानंतर गॉर्डन हॉल, सॅम्युएल नॉट आणि ल्युथर राईस हे १८ फेब्रुवारी रोजी फिलाडेल्फिया येथून हार्मनी या जहाजाने निघाले.
हे सर्वजण कोलकात्याकडे जात होते आणि ख्रिस्ती धर्माचा प्रसार हेच त्यांचे एकमेव उद्दिष्ट्य होते.
या सर्वांचा अमेरिकेत दीक्षा झालेल्या पहिल्या परदेशी मिशनरींमध्ये समावेश होतो.
त्या सर्वांना ६ फेब्रुवारी १८१२ रोजी अमेरिकेत मॅसॅच्युसेट्समधील सालेम येथे बिगरख्रिस्ती लोकांमध्ये मिशनकार्य करण्यासाठी मिशनरी म्हणून नियुक्त करण्यात आले होते.
सुरुवातीला हॉल आणि नॉट आजारपणामुळे काही काळ कोलकात्यात थांबले होते. तेथे कायमस्वरूपी राहणे अशक्य आहे असे लक्षात आल्यानंतर त्यांनी मग श्रीलंकेला जाण्याचा विचार केला. अशा अनिश्चिततेच्या वातावरणात मग ते मुंबईत आले होते.
तथापी मुंबईत राहण्यासंबंधित त्यांच्या अडचणी कोलकात्यातील अडचणींपेक्षा काही कमी नव्हत्या. इंग्लंडकडे निघणाऱ्या जहाजाने त्यांना परत जाण्याचा आदेश देण्यात आला होता.
जहाज सुटण्याची वेळ अगदी जवळ येत असताना हा आदेश अंमलात येऊ नये यासाठी त्यांना कोणताही मार्ग दिसत नव्हता. त्यामुळे त्यांनी शक्य असल्यास श्रीलंकेला पळून जाण्याचा निर्णय घेतला.
यासाठी केरळमध्ये कोचीकडे जाणाऱ्या एका जहाजावर ते शांतपणे चढले आणि तेथे पोहोचले देखील.
परंतु श्रीलंकेला जाण्यासाठी दुसऱ्या जहाजाची वाट पाहत असताना कंपनी सरकारच्या अधिकाऱ्यांनी त्यांना अटक केली आणि नंतर त्यांची पुन्हा एकदा मुंबईला परतावणी करण्यात आली.
रेव्हरंड सॅम्युएल बी. फेअरबँक यांनी लिहिले आहे:
``गॉर्डन हॉल आणि सॅम्युअल नॉट यांना मुंबईत राहू दिले जाईल याबद्दल शाश्वती नसली त्यांनी मराठी शिकण्यास तातडीने सुरुवात केली. सन १८१४ च्या अखेरीपूर्वी त्यांनी एक शाळा सुरू केली. ‘’
श्री. म. पिंगे यांनी `युरोपियनांचा मराठीचा अभ्यास व सेवा' या आपल्या ग्रंथात म्हटले आहे:
``हॉल व नॉट हे मुंबईत राहिल्यानंतर व मराठी शिकल्यानंतर सन १८१५ मध्ये त्यांनी इंग्रजी शाळा काढली. त्यात प्रथम २५ मुले होती. याशिवाय दोन व्हर्नाक्युलर शाळांत ४० मुले होती. पुढील वर्षी शाळांची संख्या वाढली व एकंदर ३०० विद्यार्थी झाले. इ. स. १८१८ मध्ये ११ शाळा व ६०० विद्यार्थी होते. ’’
अमेरिकन मिशनने मुलींची पहिली शाळा मुंबईत १८२४च्या मार्चमध्ये उघडली.
गंगा या नावाची एक स्थानिक तरुणी या शाळेत शिकवत असे.
दुदैवाने त्यानंतर लगेचच मे महिन्यात प्राणघातक कॉलराची भीषण साथ पसरली. या रोगाच्या साथीने मुंबईतील हजारो लोकांचा बळी घेतला. या लोकांमध्ये या मुलींच्या शाळेतील स्कुलमिस्ट्रेस असलेल्या गंगाबाई यांचाही समावेश होता.
गंगाबाईंची जागा घेण्यासाठी इतर कुणीही नसल्याने मुलींची ही शाळा बंद करावी लागली.
या मिशनरींना मुंबईत राहता येईल कि नाही याबाबत दोन वर्षांहून अधिक काळ अनिश्चितता होती.
एकदा तर त्यांना एका ठराविक जहाजाने इंग्लंडला परतण्याचा आदेश देण्यात आला होता. जहाजात चढण्याच्या तयारीत ते असतानाच त्यांच्या सुदैवाने त्यांना सांगण्यात आले की तो आदेश तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे.
ईस्ट इंडिया कंपनीचे मुंबईतील गव्हर्नर सर इव्हान नेपियन यांनी १८१५ मध्ये त्यांना एका पत्राद्वारे कळवले कि कंपनीच्या संचालक मंडळाने या मिशनरींना मुंबईत राहण्याची परवानगी देण्याचा त्यांना अधिकार दिला आहे.
गॉर्डन हॉल यांचा जन्म ८ एप्रिल १७८४ रोजी मॅसॅच्युसेट्समधील टोलंड येथे झाला होता.
कॉलेजमधील शिक्षणानंतर त्यांनी अँडोव्हर सेमिनरीत शिक्षण घेतले. येथे सॅम्युएल मिल्स, ल्युथर राइस, जडसन आणि इतर सहकाऱ्यांसोबत शिकत असताना परदेशात येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्याची तीव्र इच्छा त्यांच्यामध्ये निर्माण झाली.
अमेरिकेत ख्रिस्ती धर्मगुरू म्हणून सेवा करण्यासाठी असलेल्या अनेक आकर्षक संधी हॉल यांनी त्या नाकारल्या.
त्यांनी म्हटले होते : “ख्रिस्ती जगात, स्वगृही सेवा करण्यासाठी खूप लोक आहेत. देव मला बाहेर परदेशी जाण्यासाठी बोलावत आहे.''
गॉर्डन हॉल यांचा विवाह मुंबईतच १९ डिसेंबर १८१६ रोजी मार्गारेट लुईस यांच्याशी झाला.
या परदेशी मिशनरी कुटुंबांना त्यांच्या मुलांच्या मृत्यूंचे दुःख सहन करावे लागत असे. प्रत्येक घरात एकतरी अपत्याचे निधन झाले होते. सन १८३२ पर्यंत जन्मलेल्या ३० अपत्यांपैकी १८ जणांच्या मृत्यूंची नोंद झाली होती.
सावलीचा शोध' या आपल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत नरेंद्र चपळगावकर लिहितात:
``भारतात ज्या परिस्थितीत मिशनरींना राहावे लागत होते ती परिस्थिती फारशी सुखावह नव्हती. अनेक वेळा येथील रोगराईला आणि प्रतिकूल हवामानाला मिशनरी बळी पडत. प्रारंभीच्या काळात भारतात आलेल्या मिशनरींना सरासरीने पाच वर्षेच आयुष्य लाभले असा अंदाज करण्यात आला आहे.’’
इथल्या आरोग्याच्या समस्येमुळे गॉर्डन हॉल यांच्या पत्नीने आपल्या मुलांसह अमेरिकेला परतण्याचा निर्णय घेतला.
आपल्या पतीलासुद्धा त्यांनी तसा आग्रह केला, मात्र मायदेशी जाण्यास हॉल यांनी नकार दिला.
गॉर्डन हॉल यांचे एक नातू रेव्हरंड जॉर्ज ए. हॉल हे अमेरिकन मराठी मिशनच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त १९१३ साली मुंबईत मिशनरी म्हणून आले तेव्हा त्यांनी आपली आजी आणि आजोबा यांच्या शेवटचा निरोप घेतेवेळी झालेल्या हृदयद्रावक संभाषणाचे वर्णन केले आहे.
मुंबईतल्या आपल्या या भाषणात रेव्हरंड जॉर्ज ए. हॉल आपल्या आजोबांविषयी सांगतात :
``या प्रसंगी तुम्ही मला दिलेल्या सन्मानाबद्दल मी मनःपूर्वक आभार मानतो. हा सन्मान माझ्या स्वतःच्या गुणवत्तेमुळे नसून माझे आदरणीय आजोबा रेव्हरंड गॉर्डन हॉल यांच्या नावामुळे आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे.
हा त्यांच्या पवित्र स्मृतीला अर्पण केलेला आदर आहे, म्हणूनच तो मला शब्दात व्यक्त करता येणार नाही इतका अधिक मोलाचा वाटतो.
हा समारंभ माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे, हे सांगण्याची आवश्यकता नाही.
आज येथे उभे राहून या उल्लेखनीय कार्यक्रमात सहभागी होणे हे माझ्यासाठी अवर्णनीय सौभाग्य आहे.
या क्षणाची मी अतिशय उत्कंठेने वाट पाहत होतो. तुम्हा सर्वांना भेटताना माझ्या मनात जे विचार आणि भावना दाटून आले आहेत, त्या व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडतात.
अनेक वर्षांपासून माझ्या जीवनात एक स्वप्न होते—देवाच्या कृपेने कधीतरी या भारत देशाला भेट देण्याची संधी मला मिळावी. या देशाशी माझ्या अनेक प्रिय आठवणी जोडलेल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून भारत माझ्या मनात आणि हृदयात वसलेला आहे.
माझ्या आजोबांच्या मिशनरी जीवनातील प्रसंगांचा मी इतका विचार केला आहे की, मला भारत आणि येथील लोकांविषयी एक आत्मीयतेची भावना निर्माण झाली आहे.
जणू मी एखाद्या अपरिचित देशात नव्हे, तर आधीच परिचित असलेल्या भूमीत आलो आहे.
मला असे वाटते की मी यापूर्वी येथे आलो आहे आणि तुम्हा बांधवांना पूर्वीपासून ओळखतो. जसे एखादा मनुष्य आपल्या पूर्वजांच्या घरी परत येतो, आणि त्या जागेशी व लोकांशी पुन्हा संपर्क आल्याने त्याच्या मनात कोमल भावना जागृत होतात, तसेच काहीसे मला आता वाटत आहे आणि या शब्दांमध्ये कल्पनेपेक्षा अधिक सत्य दडलेले आहे.
कारण शंभर वर्षांपूर्वी माझे आजोबा या भारतात आले आणि त्यांनी आपले निवडलेले कार्य सुरू केले. येथेच त्यांनी आपले जीवन व्यतीत केले आणि मिशनकार्य चालवले.
येथेच कार्यरत असताना आयुष्याच्या ऐन उमेदीत त्यांचे निधन झाले. येथे या देशातच माझ्या वडिलांचा जन्म झाला होता.
आता मी जे काही सांगणार आहे त्यात कदाचित काही वैयक्तिक बाबी येतील आणि त्याबद्दल तुम्ही मला क्षमा करताल अशी मला खात्री आहे;
याचे कारण परिस्थितीच अशी आहे की तसे न करणे मी टाळू शकत नाही. जर मी या आद्य मिशनरीबद्दलआदराची भावना व्यक्त केली नाही आणि त्यांनी जपलेल्या ख्रिस्ती आदर्शांबद्दल माझे वैयक्तिक ऋण व्यक्त केले नाही, तर ते कृतज्ञतेचा अभाव ठरेल.’’
या साध्या देवाच्या भक्ताने आम्हाकडे सोपवलेल्या आध्यात्मिक वारशामुळे माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या जीवनात जे आशीर्वाद आले आहेत, त्यांची गणना करणे अशक्य आहे.
माझ्या बालपणातील घरात “मिशनरी गॉर्डन हॉल” हे नाव अत्यंत आदराने घेतले जाई, आणि भारतातील त्यांच्या जीवनाची कथा, त्यांचा विश्वास, त्याग, आणि ख्रिस्ताच्या कार्याप्रती निष्ठा ही आमच्या बालपणातील परिचित शिकवण होती आणि त्याचा आमच्यावर खोल परिणाम झाला.
त्यांचा वारसा माझ्या वडिलांकडे आला, माझे वडीलसुद्धा सुवार्तेचे सेवक होते आणि परदेशी मिशनच्या कार्याचे ठाम समर्थक होते.
त्या काळात फारच थोडे ख्रिस्ती लोक या कार्यात रस घेत होते. आमच्या घरी परदेशातून परतलेले मिशनरी नेहमीच आदरणीय पाहुणे असत आणि त्यांचा सन्मान करण्यास आम्हाला आनंद वाटे.
ख्रिस्ताचा सेवक आणि बोर्डाच्या समितीचा सदस्य म्हणून, ज्या बोर्डाचे गॉर्डन हॉल यांनी पहिले मिशनरी म्हणून कार्य सुरू केले, त्याच बोर्डाची सेवा करण्याचा मला मोठा आनंद प्राप्त झाला आहे.
या वेळी मी गॉर्डन हॉल यांच्या जीवनाचा सविस्तर आढावा घ्यावा अशी तुमची निश्चितच अपेक्षा नाही.
मात्र त्यांच्या जीवनातील काही ठळक गोष्टींचा थोडक्यात उल्लेख घेणे येथे पुरेसे ठरेल.
``माझ्या आजोबांच्या आयुष्यातील एकदोन प्रसंग मी येथे सांगेल.
सर्वप्रथम ती घटना जेव्हा त्यांना त्यांच्या स्वतःच्या कुटुंबापासून वेगळे व्हावे लागले.
त्यावेळी हयात असलेल्या त्यांच्या दोन मुलांची प्रकृती खूपच नाजूक होती.
त्यांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांना अमेरिकेला नेणे आवश्यक असल्याचे ठरले होते.
निरोप घेण्याची वेळ जवळ येत असताना माझ्या आजीने आपल्या पतीला त्यांच्यासोबत येण्याची विनंती केली.
त्यावर गॉर्डन हॉल यांनी उत्तर दिले: ''“तू काय म्हणते आहेस हे तुला माहीत आहे ना ? मी निरोगी आहे. माझ्या आसपास असलेल्या आत्म्यांना मी ख्रिस्ताचा संदेश सांगू शकतो. मी माझ्या स्वामीचे काम सोडून तुमच्यासोबत अमेरिकेत यावे असे तुला वाटते का?
तर मग तू आपल्या या आजारी बाळांना घेऊन अमेरिकेत जा. मी स्वतः येथेच राहून तुंम्हा सर्वांसाठी प्रार्थना करीन आणि आपल्या प्रभूच्या कार्यात येथे परिश्रम करीन.
आपण अशी आशा करु या की आपल्या या प्रिय मुलांचे जीवन वाचवण्यासाठी देव आशीर्वाद देईल.”
एव्हढे सांगून जॉर्ज हॉल म्हणतात: ``माझ्या आजीने म्हटले कि “त्या क्षणापासून मी त्यांना आमच्याबरोबर येण्याची विनंती करणे थांबवले.”
असा त्याग फार थोड्या लोकांना करता येतो. माझ्या आजोबांनी आपल्या मिशनकर्तव्याला प्राधान्य दिले आणि ते कार्य सुरू ठेवले.''
गॉर्डन हॉल यांनी नोव्हेंबर १८२४ मध्ये त्यांनी एक शोधयात्रा हाती घेतली.
आजारपणाच्या काळात मिशनरी कुटुंबांना स्थलांतर करता येईल, असे एखादे योग्य ठिकाण पर्वतरांगांमध्ये आहे का हे पाहण्यासाठी ते बोटीने कोकणात बाणकोट येथे गेले.
तिथे आधीच स्थायिक झालेल्या स्कॉटिश मिशनरींनी त्यांचे स्वागत केले. तेथून नदीमार्गे महाडला जाऊन त्यांनी एक घोडा मिळविला आणि त्या घोड्यावरून पोलादपूर गाठले, नंतर घाट चढून महाबळेश्वर येथे पोहोचले.
गॉर्डन हॉल यांनी आपल्या रोजनिशीत महाबळेश्वर येथील मंदिरे आणि पाच नद्यांचे उगमस्थान मानल्या जाणाऱ्या झऱ्याविषयी नोंदी केल्या आहेत.
तेथील हवामान उत्कृष्ट असल्याचे त्यांना आढळले; मात्र अन्नसामग्री व इमारती महाग होत्या, तसेच तेथे पोहोचण्याचे अंतर व अडचणी पाहता, एखाद्या मिशनरी कुटुंबाचे तेथे स्थलांतर करणे खर्चिक ठरेल, असे त्यांना वाटले.
कॉलऱ्याच्या साथीत रूग्णांना औषधोपचार देताना गॉर्डन हॉल यांचे नाशिक जिल्ह्यात सिन्नरजवळ दोडी दापूर येथे २० मार्च १८२६ रोजी मृत्युमुखी पडले.
दिनांक २० मार्च २०२६ पासून त्यांचे द्विशताब्दी स्मृतीवर्ष सुरु झाले आहे.
भारतात एक नवे आधुनिक युग सुरु करण्यास हातभार लावणाऱ्या गॉर्डन हॉल यांना त्यांच्या जन्मदिनी मानाचा मुजरा !
Camil Parkhe

Comments

Popular posts from this blog

Dnyanodaya monthly enters 175th year

Shakuntala Paranjape : Crusade of a lifetime

Muslim Reformist Sayyadbhai