फार जुनी परंपरा असलेली दोन साहित्य संमेलने यंदा २०२६च्या आरंभालाच लागोपाठ होणार आहेत. मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात तर त्या पाठोपाठ शंभर वर्षांची परंपरा असलेले मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन नाशिकला सायमन मार्टिन यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
विशेष म्हणजे एक शतकापूर्वी नाशिकलाच पहिले ख्रिस्ती साहित्य संमेलन भरले होते. मराठी साहित्य संमेलनांपासून वेगळे अस्तित्व मांडणारी ही पहिली भुमिका होती.
पहिले मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन १८ आणि १९ एप्रिल १९२७ रोजी नाशिकमध्ये शरणपुरातल्या चर्च मिशनरी सोसायटीच्या मराठी शाळेत येथे पार पडले.
आणि या संमेलनाचे अध्यक्ष होते `पुण्यनगरीचे मुनी' निकल मॅक्निकल.
रेव्हरंड डॉ. निकल मॅक्निकल हे चर्च ऑफ स्कॉटलंडचे मिशनरी होते.
डॉ. अनुपमा निरंजन उजगरे यांनी आपल्या `मराठी ख्रिस्ती वाङमयाचा इतिहास १८१०-१९२७ ‘’ या संपादित पुस्तकात लिहिले आहे कि मराठी आणि संस्कृत या भारतीय भाषांचा निकल मॅक्निकल यांचा दांडगा व्यासंग होता.
महाराष्ट्रीय संत ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, एकनाथ त्यांच्या व्याख्यानांचे विषय होते.
मॅक्निकल यांचे वास्तव्य पुण्यात असल्याने त्यांना `पुण्यनगरीचे मुनी' असे म्हणत असत.
``पुण्यातील गोखले हॉल, टोरेन्स मेमोरियल हॉल अशा सभागृहांमध्ये त्यांची विद्वत्ताप्रचुर व्याख्याने ऐकायला श्रोते गर्दी करीत असत आणि पुण्यातील नाना पेठेतील चर्चमध्ये त्यांचे प्रवचन ऐकायला लांबलांबून लोक येत असत.''
रेव्हरंड नारायण वामन टिळक यांच्या 'भक्तिनिरांजन'चा इंग्रजी अनुवाद मॅक्निकल यांनी केला आहे.
विशेष नोंद घेण्याची बाब म्हणजे या पुस्तकाचे मुखपृष्ठ शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या कुंचल्यातून साकार झाले होते.
मॅक्निकल यांनी `द पोएट्री ऑफ डिव्होशन' य शिर्षकाचा संत वाङमयावर एक लेख लिहिला आहे.
`साम्स ऑफ मराठी सेंट्स' या १९१९ साली प्रकाशित झालेल्या पुस्तकात मॅक्निकल यांनी ज्ञानेश्वर, जनाबाई, मुक्ताबाई, नामदेव, एकनाथ व तुकाराम या सहा संतांच्या मराठी अभंगांचे इंग्रजीत भाषांतर केले आहे. यात एकूण १०८ अभंग आहेत.
या पुस्तकात तुकारामांच्या अभंगांची संख्या सर्वात जास्त म्हणजे ७६ असून उरलेले ३२ अभंग इतर पाच संतांचे आहेत.
डॉ. मॅक्निकल यांनी सुमारे २३ पृष्ठे या पुस्तकाचा उपोद्घात लिहिला आहे.
या भाषांतरावरून पाहता डॉ. मॅकनिकल यांना त्यातील मर्म चांगलेच कळले होते हे स्पष्ट दिसून येते असे अनिल दहिवाडकर यांनी आपल्या `स्वदेशी आणि विदेशी ख्रिस्ती लेखकांची मराठी ग्रंथसंपदा' या ग्रंथात म्हटले आहे.
त्याशिवाय `मराठी वाड्मय व ख्रिस्ती समाज' या शीर्षकाचा मॅक्निकल यांचा एक शोधनिबंध 'मराठी ख्रिस्ती वाङमयाचा इतिहास' या मनोहर कृष्ण उजगरे संपादित पुस्तकात आहे.
मराठी संतांची चरित्र लिहिणाऱ्या रेव्ह. जस्टिन अँबट यांना मॅक्निकल यांनी मदत केली होती.
मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे मॅक्निकल पहिले अध्यक्ष झाले तेव्हा त्यांच्या निवडीबाबत सर्वत्र समाधान व्यक्त झाले होते. मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे ते एकमेव परदेशी अध्यक्ष होत.
रेव्हरंड भास्कर कृष्ण उजगरे हे स्वतः कधीही संमेलनाध्यक्ष बनले नाही. मात्र त्यांनी लागोपाठ चार मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांचे आयोजन केले, यामुळे अनुपमा उजगरे यांनी त्यांना `ख्रिस्ती साहित्य संमेलनांचे जनक’ असे संबोधले आहे.
रेव्ह. जे. एफ. एडवर्ड्स हे अमेरिकन मराठी मिशनचे पदाधिकारी मराठी संत वाङमयाचे पंडित होते आणि त्यांनी 'संत तुकाराम आणि ख्रिस्ती समाज' या विषयावर या संमेलनात शोधनिबंध वाचला होता.
त्यात त्यांनी नारायण वामन टिळकांचा संत तुकाराम यांच्यावरील पुढील अभंग उदगृत केला होता:
भक्तिमार्गे तुका गेला । मान्य तुम्हा आम्हां झाला ।।
साधु सुंदर त्याचे शील । थोरथोरां लाजवील ।।
'तुका !' म्हणताच कोणी । प्रेमलहरी माझ्या मनीं ।।
तुका करी उपकार । धर्मज्ञाला घरोघर ।।
अपस्तांना देई चक्षु । करि जिज्ञासु, मुमुक्षु ।।
तुकानिर्मित सेतुवरुनी । मीहि आलो ख्रिस्तचरणीं ।।
दास म्हणे साधूसंत । देवे निर्मियेले पंथ ।।
मराठी साहित्य संमेलनाच्या मुख्य प्रवाहातून पहिल्यांदा वेगळी चूल मांडणाऱ्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनास दाद द्यायला हवी.
याचे कारण त्यानंतर अनेकांना असा वेगळा संसार मांडण्याचे धाडस झाले आहे. त्यानंतर अनेक दशकांनी मराठी साहित्य संमेलनापासून वेगळे होण्याचे, विद्रोह करण्याचे आणि आपण मुख्य प्रवाहापासून वेगळे आहोत असे स्पष्टपणे सांगण्याची हिंमत दाखवली.
मॅक्निकल यांना ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवडण्याबाबत भास्कर कृष्ण उजगरे यांनी लिहिले आहे:
` या साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारण्यास कोण लायक होईल या संबंधाने काही साहित्यप्रेमी बंधुभगिनींशी मी बरीच वाटाघाट केली. पण हा बिकट प्रश्न मनाजोगा सुटेना. याचा अर्थ ख्रिस्ती समाजात लायक माणसे नाहीत असा मुळीच नाही. तरी ख्रिस्ती समाजाची एकंदर परिस्थिती, बदललेला नवीन मनु वगैरे गोष्टींचा पूर्ण विचार करता, ही माळ आपण माझे परमपूज्य गुरू रेव्हरंड निकल मॅक्निकल एम.ए.डी.लिट्. यांना घातली हे पाहून माझ्या मनास परम संतोष झाला.''
या संमेलनास एस. पी. जी., सी. एम. एस., वेस्लीयन, मेथाडिस्टस एपिस्कोपल, काँग्रीगेशनल, युनायटेड फ्री चर्च, सेव्हन्थ डे अँडव्हेन्टिस्ट अशा सात निरनिराळ्या प्रोटेस्टंट पंथांचे सरासरी पन्नास देशी व परदेशी स्त्रीपुरुष शरणपुरात आले होते.
एकूण दिडशे लोक हजर होते. कॅथोलिक साहित्यिकांचा मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांत सहभाग १९७२ नंतर सुरु झाला.
या संमेलनाविषयी `ज्ञानोदय' मासिकाचे संपादक देवदत्त नारायण टिळक यांनी `ज्ञानोदया’च्या २८ एप्रिल १९२७च्या अंकात पुढीलप्रमाणे लिहिले होते:
``मराठी भाषेची सेवा करणारे हिंदी, स्कॉच, इंग्लिश व अमेरिकन त्या दिवशी एकत्र जमले होते. मराठीची महती तीन खंड पृथ्वीवरील लोकांनी त्या दिवशी गायिली, संमेलनात काही काही अत्यंत मननीय विचार पुढे मांडण्यात आले. हिंदू संस्कृती व ख्रिस्ती धर्म ह्यांचा संबंध किती व कसकसा येतो हे रे. डॉ. एन. मॅक्निकल व रे. जे. एफ, एडवर्डस ह्यांनी अप्रत्यक्ष परंतु अत्यंत मार्मिक रीतीने व स्पष्टपणे पुढे मांडले.
ता. १८ व १९ एप्रिल रोजी शरणपुरास भरलेले खिस्ती साहित्य संमेलन अनेक दृष्टींनी महत्वाचे झाले. पहिली गोष्ट अशी, की हिंदुस्थानात ख्रिस्ती समाजाची स्थापना झाल्यापासून आजपर्यंतच्या शंभर वर्षाच्या काळात आम्हांला वाटते, निरनिराळ्या पंथांच्या ख्रिस्ती लोकांनी अशा रीतीने एकत्र जमून दोन सुखाचे दिवस कधीही घालविले नसतील. ''
अशा या पहिल्यावहिल्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचा एक ग्रुप फोटो लक्ष्मीबाई आणि नारायण वामन टिळकांच्या नाशिक-स्थित पणती मुक्ता अशोक टिळक यांनी मला काल पाठवला.
त्यामुळे या फोटोसह माझ्या आगामी `शतकातील ख्रिस्ती साहित्य संमेलने' या पुस्तकातील वरील काही भाग इथे देण्याचा मोह मला आवरता आला नाही.
या ग्रुप फोटोमध्ये पहिल्या रांगेत संमेलनाध्यक्ष रेव्ह. निकल मॅक्निकल, स्वागताध्यक्ष रावबहादूर बापूजी नारायण आठवले, लक्ष्मीबाई टिळक, रेव्ह. जे. एफ. एडवर्ड्स तसेच मागे उभे असणाऱ्यांमध्ये `स्मृतीचित्रा'तला दत्तू अर्थात देवदत्त टिळक असतील.
मुक्ताताई म्हणतात की त्यांच्या पणजीबाई लक्ष्मीबाई टिळक आपले संपूर्ण कुटुंब- मुलगा सून आणि चार नातवंडे - यांच्यासह या छायाचित्रात आहेत.
Camil Parkhe
Comments
Post a Comment