पुढील नूतन वर्षारंभात सातारा येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि नाशिक येथे मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलने होत आहेत.
या निमित्ताने दोन्ही संमेलनांचे आयोजक लगीनघाईत असताना यानिमित्ताने गेल्या पंचवीस वर्षांत झालेल्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांच्या आणि स्वागताध्यक्षांच्या भाषणांचे मी संकलन करत आहे.
मराठी `ग्रंथकारांच्या' संमेलनाबाबत पहिला विद्रोही सूर लावला होता तो महात्मा जोतिबा फुले यांनी.
त्यावेळी नगरच्या अमेरिकन मराठी मिशनच्या `ज्ञानोदय' मासिकात प्रसिद्ध झालेले 'घालमोड्या दादां'ना उद्देशून लिहिलेले त्यांचे पत्र आता सर्वांना माहित आहेच.
या साहित्य संमेलनापासून पहिली वेगळी चूल मांडण्याचे धाडस ख्रिस्ती साहित्य संमेलनाने १९२७ साली झालेल्या नाशिकच्या संमेलनाद्वारे केले.
या १९२७ पासून सुरु झालेल्या ख्रिस्ती साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांच्या भाषणांचे दस्तऐवजीकरण २००१ सालच्या संमेलनापर्यंत सुनील आढाव यांनी केले आहे.
त्यानंतरच्या संमेलनाध्यक्षीय भाषणांचे संकलन आता मी करत आहे.
माझा हा प्रकल्प आता शेवटच्या टप्प्यात असताना दरम्यान त्यावेळचे महाराष्ट्राचे मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामती येथे १९७५ साली झालेल्या ख्रिस्ती साहित्य संमेलनाचा एक फोटो बारामतीचे डॉ. संजीव कोल्हटकर यांच्या सौजन्याने आजच मला मिळाला आहे.
या फोटोतील अनेक व्यक्तींची ओळख पटली आहे. इतर व्यक्तींची ओळख पटवण्यास जाणकारांनी मदत करावी.
बारामती येथील १९७५ सालच्या दहाव्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या उदघाटनाच्यावेळी : '
डावीकडून) स्वागताध्यक्ष डाॅ. कमलाकर क कोल्हटकर, हरिश्चंद्र उजगरे, हरीभाऊ वाघमोडे, बारामती संमेलनाध्यक्ष भास्करराव जाधव, फादर एलायस रॉड्रिग्ज, महाराष्ट्राचे मंत्री शरद पवार, माजी संमेलनाध्यक्ष फादर (नंतर औरंगाबाद धर्मप्रांताचे बिशप) डॉमनिक ऑब्रिओ, पुणे ख्रिस्ती साहित्य संघाचे फादर नेल्सन मच्याडो, सत्यवान नामदेव सूर्यवंशी, सुमंत दयानंद करंदीकर, भावी संमेलनाध्यक्ष विजया पुणेकर आणि अगदी उजवीकडे कमलाकांत ढवाण
Camil Parkhe
Comments
Post a Comment