सिसिलिया कार्व्हालो

केरळमध्ये ख्रिस्ती धर्माची दोन हजार वर्षांची परंपरा असली तरी मल्याळी साहित्यात ख्रिस्ती मल्याळी साहित्य असा काही प्रकार अस्तित्वात नाही, अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त असलेल्या तामिळ भाषेत मध्ययुगीन काळापासून ख्रिस्ती धर्मगुरूंनी अभिजात दर्जाचे साहित्य निर्माण केले आहे. त्या तामिळ भाषेतसुद्धा स्वतंत्र ख्रिस्ती तामिळ साहित्य असे काही नसते.

भारताच्या इतर कुठल्याही राज्यांत, प्रदेशांत असे धर्माच्या नावावर ओळखले जाणारे साहित्य नाही.
गोव्यात अनेक परदेशी ख्रिस्ती धर्मगुरूंनी कोकणी आणि मराठी साहित्य समृद्ध केले त्याचप्रमाणे अनेक नीज गोंयकारांनी लिस्बन, पॅरिस आणि रोम येथे जाऊन पोर्तुगीज, फ्रेंच वगैरे भाषांच्या साहित्यात मोलाची भर घातली. मात्र गोव्यातसुद्धा कोकणी ख्रिस्ती साहित्य, पोर्तुगीज ख्रिस्ती साहित्य असा काही वेगळा प्रकार नसतो.
महाराष्ट्र देशी आणि मायमराठी भाषेत मात्र अगदी पुरातन काळापासून नसले तरी मध्ययुगीन काळापासून मराठी ख्रिस्ती साहित्य अशी स्वतंत्र ओळख आहे.
सतराव्या शतकाच्या सुरुवातीला १६१६ साली मराठी महाकाव्य `क्रिस्तपुराण' हे रोमी लिपीत छापणारे ब्रिटिश जेसुईट फादर थॉमस स्टीफन्स हे या आगळ्यावेगळ्या मराठी ख्रिस्ती साहित्याच्या प्रवाहाचे जनक.
मराठी भाषेची खालीलप्रमाणे स्तुती करून फादर थॉमस स्टीफन्स यांनी आपल्या ‘क्रिस्तपुराण’या ग्रंथाची निर्मिती केली.
जैसी हरळांमाजी रत्नकिळा की रत्नांमाजी हिरा निळा ।
तैसी भाषांमाजी चोखळा । भाषा मराठी ॥
जैसी पुष्पांमाजि पुष्प मोगरी । की पदिमळांमाजी कस्तुरी ।
तैसी भाषांमाजी साजिरी । मराठिया ॥
पखिया माजी मयोरू । वृखिआंमध्ये कल्पतरू ।
भाषांमध्ये मानु थोरू । मराठियेसी ॥
तारांमध्ये बारा रासी । सप्तवारांमाजी रवी शशी ।
या दीपीचेआ भाषांमध्ये तैसी । बोली मराठिया ॥
‘ओं नमो विश्वभरिता’ या नमनापासून सुरू होणारे फादर थॉमस स्टीफन्स यांचे हे हे पुराण पुढील दहा हजार ओव्यांमध्ये आपला हा एतद्देशीय थाट कायम राखते.
अनेक दिग्गजांनी मराठी ख्रिस्ती साहित्य हा स्वतंत्र प्रवाह आहे हे वेळोवेळी आपल्या संशोधनात्मक ग्रंथातून आणि लेखांतून सिद्ध केले आहे. अ. का. प्रियोळकर हे त्यापैकी एक महत्त्वाचे नाव.
मराठी ख्रिस्ती साहित्य या प्रवाहातील साहित्यकृतींची नोंद घेणारे लेख आणि ग्रंथ वेळोवेळी प्रकाशित झालेले आहेत. `युरोपियनांचा मराठीचा अभ्यास व सेवा' लेखक श्री. म. पिंगे, व्हीनस प्रकाशन, पुणे (१९६०) हा त्यापैकी एक दुर्मिळ ग्रंथ.
त्यानंतर गंगाधर मोरजे यांचे `ख्रिस्ती मराठी वाङमय' (१९८४), अनिल दहिवाडकर यांचे `स्वदेशी आणि विदेशी ख्रिस्ती लेखकांची मराठी ग्रंथसंपदा' (२०२०) आणि फादर टोनी जॉर्ज (येशूसंघ) यांचा `गोष्ट एका सांस्कृतिक अपूर्व संगमाची' ग्रंथ (२०२१) याच प्रकारचे आहेत.
मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे एक माजी अध्यक्ष असलेल्या सुभाष पाटील यांनी 'विदर्भातील ख्रिस्ती साहित्य परंपरा' या विषयावर संशोधन केले आहे.
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात `साहित्यातील प्रवाह' या शीर्षकांतर्गत विविध धर्मातील साहित्याचा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये मराठी ख्रिस्ती साहित्य हा एक विभाग आहे
या वाहत्या आणि सतत खळखळत राहिलेल्या साहित्यप्रवाहात समकालीन साहित्यिकांनी केलेल्या योगदानाबद्दल अलीकडेच डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांनी आपल्या‘प्रसादचिन्हे’ या ग्रंथात लिहिले आहे.
या पुस्तकाचे उपशीर्षक ‘मराठी भाषक ख्रिस्ती साहित्यिकांच्या साहित्यकृतींचा परिचय’असे आहे.
`ख्रिस्ती साहित्य' म्हणजे काय, या साहित्याची व्याख्या कशी करणार? या प्रश्नाने ख्रिस्ती समाजांतर्गत आणि बाहेरही अनेक वर्षे धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे ख्रिस्ती साहित्य संमेलनांतसुद्धा प्रचंड वाद झालेले आहेत. त्यामुळे या संमेलनाचे नावसुद्धा एकदा बदलण्यात आले होते.
तर अशाप्रकारे या `ख्रिस्ती साहित्य' आणि `ख्रिस्ती साहित्यिक' अशा संज्ञांच्या व्याख्या करणे खूपच अवघड आहे.
ख्रिस्ती लोकांनी ख्रिस्ती धर्मविषयक केलेले लिखाण म्हणजे ख्रिस्ती साहित्य कि ख्रिस्ती म्हणून जन्माला आलेल्या लोकांनी निर्माण केलेल्या साहित्यकलाकृतींना ख्रिस्ती साहित्य म्हणावे?
आणि बिगरख्रिस्ती लोकांनी ख्रिस्तविषयक लिहिलेल्या साहित्याला काय म्हणणार?
पुण्यातल्या `स्नेहसदन' आश्रमाचे संस्थापक जर्मन जेसुईट फादर मॅथ्यू लेदर्ले यांनी मकबूल फिदा हुसेन यांनी मदर तेरेसा तसेच येशू ख्रिस्तावर रेखाटलेल्या चित्रांच्या मालिकांचा `भारतीय ख्रिस्ती कला' मध्ये समावेश केला आहे.
देवळात दर रविवारी किंवा फक्त सणांनिमित्त नाताळ-गुडफ्रायडे- ईस्टरला हजेरी लावणारे लेखक-कवी `ख्रिस्ती साहित्यिक' म्हणता येईल पण जे ख्रिस्ती लोक या देवळांकडे कधी ढुंकूनही पाहत नाहीत, त्यांना ख्रिस्ती साहित्यिक म्हणता येईल का?
जॉर्ज फर्नांडिस हे भाषाकोविन्द होतो, मातृभाषा कोकणी, तुळू, कन्नड याव्यतिरीक्त मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांनी यदाकदाचित मराठीत लिहिले असते तर हे लिखाण `ख्रिस्ती साहित्य' म्हणून समाविष्ट करता आले असते का ?
कार्व्हालो यांच्या या ग्रंथात यशोदा पाडगावकर यांच्या 'कुणास्तव कुणीतरी' या धर्मनिरपेक्ष म्हणता येईल अशा आत्मकथनाचा समावेश आहे.
मात्र यशोदा पाडगावकर यांचे पती असलेल्या कवी मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेले 'बायबल : नवा करार, भाषांतर व मुक्तचिंतन' या ख्रिस्ती धर्मविषयक पुस्तकाचा या ग्रंथात उल्लेख नाही. याचे उघडउघड कारण यशोदा पाडगावकर जन्माने आणि बाप्तिस्मा घेतलेल्या ख्रिस्ती आहेत हे स्पष्ट आहे.
हे साहित्यिक धर्मश्रद्धा मानत असतील किंवा नसतील, त्यामुळे त्यांचा ते ख्रिस्ती साहित्यिक असण्यावर काही फरक पडत नाही असे एकूण मानले जाते असे दिसते.
नंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झालेले फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे पुण्यात १९९२ साली भरलेल्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
या पुस्तकाच्या लेखिका कार्व्हालोसुद्धा २००० सालच्या ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होत्या.
आता सव्वीसावे मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन नाशिक येथे भरवण्याची तयारी सुरु झाली आहे.
तर मराठी ख्रिस्ती साहित्याला अशी खूप जुनी आणि गौरवी परंपरा आहे. त्यामुळे या आगळ्यावेगळ्या साहित्यप्रवाहाबद्दल असलेल्या सिसिलिया कार्व्हालो यांच्या या पुस्तकातील मजकुराविषयी मला भरपूर उत्सुकता होती.
`ग्रंथाली'ने प्रकाशित केलेले कार्व्हालो यांचे हे पुस्तक खूप वाचनीय झाले आहे.
``साहित्य हे साहित्यच असते ते अमुकतमुक धर्माचे वा पंथाचे नसते, त्याची कलात्मकता महत्त्वाची असते, हे खरे असले तरी साहित्याचे आशयद्रव्य ज्या समाजातून निर्माण होते, त्या समाजाच्या गुणधर्माचा. संस्कृती विशेषांचा, जीवनदृष्टीचा त्या लेखकाच्या जाणीवानेणिवांमध्ये वावर असतो हे पण खरे असते,'' असे या पुस्तकाच्या प्रस्तावनेत ज्येष्ठ समीक्षक अविनाश सप्रे यांनी लिहिले आहे.
``कुठल्याही साहित्य प्रवाहातील सर्वच साहित्य उत्तम दर्जाचे असत नाही, `बरे', `चांगले', `उत्तम' अशी प्रतवारी त्यामध्ये असते. मराठी भाषक ख्रिस्ती लेखकांच्या साहित्याबद्दलही असे म्हणता येते. मुख्य म्हणजे एक समाज आणि त्याची संस्कृती मराठी भाषेतून व्यक्त होते हे महत्त्वाचे, '' असे अविनाश सप्रे यांनी म्हटले आहे. हे महत्त्वाचे आहे.
संशोधकांच्या दृष्टीने असे ग्रंथ खूप मौल्यवान असतात. कारण याच ग्रंथमित्रांना वाट पुसत नंतरचे संशोधक आपली पुढची वाटचाल चालू ठेवत असतात. कार्व्हालो यांचे हे नवे पुस्तक याच जातकुळातले असल्याने त्याला वेगळे महत्त्व आहे.
मराठी ख्रिस्ती साहित्यात गेल्या दोनअडीच शतकांत अनेक जणांनी भरपूर भर घातली आहे. यापैकी एकूण २५० साहित्यिक आणि त्यांच्या ४८४ कलाकृती या ग्रंथात कार्व्हालो यांनी विचारात घेतल्या आहेत.
या ग्रंथात धार्मिक,अनुवादित,आधारित अशा स्वरूपाचे साहित्य जाणीवपूर्वक बाजूला ठेवण्यात आले आहे. तसेच ऐतिहासिक, मानसशास्त्र, समाजशास्त्रीय अशा अन्य ज्ञानशास्त्रांतील ग्रंथही समाविष्ट करण्याचे टाळले आहे.
केवळ वाड्मयीन मुल्ये सांभाळलेल्या कलाकृतींचा समावेश करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे ख्रिस्ती धर्मियांचे मराठी साहित्य या विषयावरचा हा ग्रंथ असला तरी कुठल्याही प्रकारचे ख्रिस्ती धर्मावर आधारलेले साहित्य या पुस्तकातून पूर्णतः वगळण्यात आले आहे.
``येशू ख्रिस्त जीवनविषयक नाटके, कादंबऱ्या, चरित्रग्रंथ यातही नवीन आणि वेगळे आढळत नसल्याने त्यांचाही समावेश या ग्रंथात नाही'', असे लेखिकेने म्हटले आहे.
अपवाद फादर थॉमस स्टीफन्सरचित `क्रिस्तपुराण', नारायण वामन टिळककृत `ख्रिस्तायन', देवदत्त नारायण टिळक यांचा संगममनेरचे स्विस जेसुईट फादर फ्रान्सिस शुबिगर यांचे चरित्र `आणखी एक प्रकाशझोत’, तसेच फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी लिहिलेली पोप जॉन पॉल दुसरे यांची दोन चरित्रे अशा काही मोजक्या पुस्तकांचा.
याचा अर्थ या धार्मिक आणि इतर निकषांमुळे अनेक ख्रिस्ती लेखक आणि त्यांची पुस्तके या पुस्तकाच्या परिघाबाहेर राहिली आहेत.
उदाहरणार्थ, ख्रिस्ती वर्तुळाबाहेर चांगली ओळख असलेले सनी पाटोळे हे समकालीन ख्रिस्ती साहित्यिकांमधील एक महत्त्वाचे नाव आहे.
येशू ख्रिस्तावर आधारीत `सुताराचा पोर', `मुक्तिदाता मोशे', आणि राष्ट्रपिता अब्राहाम, योहान (जॉन) असे जाडजूड चरित्रग्रंथ त्यांच्या नावावर आहेत आणि कॉन्टिनेन्टल प्रकाशनसारख्या नामवंत संस्थेने ही पुस्तके प्रकाशित केली आहेत. या सर्व कादंबऱ्यांतील पात्रे अर्थात बायबलमधील आहेत.
मात्र सनी पाटोळे यांचा या पुस्तकात उल्लेख नाही. याचे कारण हे सर्व धार्मिक ग्रंथ आहेत.
`धार्मिक साहित्य विचारात घ्यायचे नाही' या निकषाला `काव्य' या विभागात मात्र कार्व्हालो यांना केवळ नाईलाजानेच मुरड घालावी लागली असे दिसते. काही मोजके अपवाद वगळता दखल घेण्यात आलेल्या सर्वच कविंचे काव्य भक्तिभावाने ओसंडून जाणारे आहे. या विभागातील उल्लेख केलेल्या बहुतेक काव्यसंग्रहांतून येशू ख्रिस्त बाजूला ठेवणे जवळजवळ अशक्य आहे.
अनुवादित, आधारित, संकलीत, संपादित वगैरे लिखाणांत साहित्यमूल्य किंवा इतर कुठलेही मूल्य नसते काय? पु . ल. देशपांडे यांचे `ती फुलराणी' हे जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्या पिग्मॅलियन या नाटकाचे रूपांतरण आहे, तर `तीन पैशांचा तमाशा' या हे बर्टोल्ट ब्रेख्तच्या `थ्री पेनी ऑपेरा'चे स्वैर रूपांतर आहे.
त्याचप्रमाणे वि. वा. शिरवाडकर `कुसुमाग्रज' यांचे `नटसम्राट' हे नाटक शेक्सपियरच्या `किंग लियर' या नाटकावर आधारित आहे. या गाजलेल्या साहित्यकृती आधारित आहेत म्हणून वगळता किंवा दुर्लक्षित करता येईल का?
हे खरे आहे कि कुठल्याही ग्रंथकाराला आपल्या ग्रंथात विषयासाठी निकष ठरवण्याचे स्वातंत्र्य नक्कीच असते. एकदा या निकषांवर अमुक पुस्तक विचारात घेता येणार नाही असे म्हटले कि त्याबाबत वाद नसावा.
महाराष्ट्रात मराठी ख्रिस्ती समाज हा मुंबई, वसई, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, मनमाड, अहिल्यानगर, सोलापूर, मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, लातुर, जालना, बीड, कोकणात सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ला, येथे आणि कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतो.
विशेष म्हणजे वेगवेगळ्या प्रदेशांत विखुरलेल्या या मराठी ख्रिस्ती समाजाची सामाजिक, ऐतिहासिक, भाषिक, धार्मिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी आणि चालीरीती एकमेकांपासून पूर्णतः भिन्न आहे. त्यांच्या मूळच्या जातीजमातीसुद्धा अगदी वेगळ्या आहेत.
उदाहरणार्थ, कोल्हापुरातल्या घाटमाथ्यावर आढळणारा बार्देसकर समाज हा मराठवाड्यातल्या किंवा वसईतील ख्रिस्ती समाजापासून खूपखूप वेगळा आहे. त्यामुळे या समाजातून येणाऱ्या साहित्यांत भिन्नता आढळते.
या सर्व आगळ्यावेगळ्या साहित्यांचे अशाप्रकारच्या ग्रंथांत प्रातिनिधिक स्वरूपात प्रतिबिंब पडायला हवे.
`विश्वासकुमार' या नावानेच अधिक प्रसिद्ध असलेले बहुआयामी साहित्यिक असलेल्या संपत विश्वास गायकवाड (१९२८-१९९३) यांचा या पुस्तकात अनुल्लेख ठळकपणे जाणवतो.
`पाणी लाजले’, `कवि’ हे दोन काव्यसंग्रह, `पतंगाच्या पाठीवर’ (बालकविता), `जाता साताऱ्याला’ अशा पंधरा साहित्यकृती त्यांच्या नावावर आहेत, अनिल दहिवाडकर यांच्या `स्वदेशी आणि विदेशी ख्रिस्ती लेखकांची मराठी ग्रंथसंपदा' कोशात ही पूर्ण यादी आहे. मात्र सं. वि, गायकवाड यांच्या बालकविता अधिक गाजल्या.
सत्तरच्या दशकात मी शाळेत असताना श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत सं. वि,गायकवाड हेडमास्तर होते. दर शुक्रवारी श्रीरामपूरच्या आठवड्याच्या बाजाराला सायकलने आल्यावर हमखास आमच्या `पारखे टेलर्स’ या दुकानात येत असत.
धोतर, सफेद फुल्ल शर्ट आणि गांधी टोपी असा पेहेराव असणारे गायकवाड मास्तर वेगळे व्यक्तिमत्व आहे हे माझ्या बालबुद्धीला समजायचे, मात्र ते मोठे लेखक आहेत, त्यांच्या बालकविता मराठी पाठ्यपुस्तकांत आहेत हे मात्र मी श्रीरामपूर सोडून फादर व्हायला गोव्याला गेल्यानंतरच उमजले.
`सशाचे कान, झालेत लांब' हा सं. वि,गायकवाड यांचा मराठी बालभारती पाठ्यपुस्तकांतला एक विशेष गाजलेला धडा.
`निरोप्या'चे तत्कालीन संपादक फादर प्रभुधर यांनी सं. वि,गायकवाड यांच्या साहित्यिक गुणांना आणि प्रगल्भतेला आपल्या मासिकांतून भरपूर चालना दिली. त्यांच्या कविता आणि हंस पत्रे त्याकाळात `निरोप्या'च्या वाचकांना एक मोठी मेजवानीच असे.
विश्वासकुमार यांची लोणावळा येथे होणाऱ्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली होती, मात्र संमेलनाआधीच त्यांचे निधन झाले.
ग्रंथलेखिका सिसिलिया कार्व्हालो या वसईच्या आहेत. या ग्रंथात दाखल घेण्यात आलेल्या २५० साहित्यिकांमध्ये मूळचे वसईचे असलेल्या साहित्यिकांची संख्या लक्षणीय आहे.
पालघर जिल्ह्यातील एका तालुक्याच्या आकाराच्या असलेल्या आणि विशिष्ट ऐतिहासिक आणि समृद्ध धार्मिक वारसा लाभलेल्या वसई भूभागातील ख्रिस्ती लोकांनी साहित्य आणि इतर विश्वांत मोठे योगदान दिले आहे यात शंकाच नाही. याच वैशिष्ट्यांमुळे अनिल दहिवाडकर यांच्या याच धर्तीच्या ग्रंथातसुद्धा साहित्यिक वसईकरांनी बाजी मारली आहे.
यानिमित्ताने आणखी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. महाराष्ट्रात वसई येथे मराठी ख्रिस्ती साहित्यिकांची एक मोठी खाण आहे. ही संख्या दिडशेहून अधिक असावी. वसईतील मध्ययुगीन पोर्तुगीज राजवटीचा वारसा असल्याने हे सर्व साहित्यिक अर्थातच कॅथोलिक आहेत.
याउलट कोकण, कोल्हापूर जिल्ह्यातील बार्देसकर लोक वगळता वसईउर्वरित महाराष्ट्रात जे साहित्यिक आहेत ते काही अपवाद वगळता सर्व प्रोटेस्टंट आहेत, अगदी पंडिता रमाबाई, नारायण वामन टिळक, निळकंठशास्त्री गोरे, बाबा पदमनजी यांच्यापासून तो समकालीन अनेक नामांकित ख्रिस्ती साहित्यिकांपर्यंत.
यात जे काही कॅथोलिक साहित्यिक असतील ते एका हाताच्या बोटांवर मोजक्याइतके नगण्य आहेत. यालाही वेगळी ऐतिहासिक, धार्मिक आणि सामाजिक पार्श्वभूमी कारणीभूत आहे. यामागची काय कारणे असावीत हा सामाजिक इतिहास लिहिणे गरजेचे आहे.
अशा प्रकारचा कोणताही ग्रंथ उपलब्ध साधने, आम्हा पत्रकारांचा एक परवलीचा असलेला शब्द म्हणजे `डेडलाईन' किंवा कालमर्यादा आणि खुद्द संशोधकाच्या वैयक्तिक मर्यादा या सर्व बाबींमुळे असा कोणताही ग्रंथ सर्वार्थाने परिपूर्ण असूच शकत नाही हे पण खरे आहे.
कोशासारख्या प्रकल्पाला डेडलाईन किंवा पूर्ण विराम नसते, हे कार्य निरंतर चालू असते.
`ज्ञानकोश'कार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकरांनी अशा प्रकारे एकाहाती कोश निर्माण केला होता. (केतकरांच्या पश्चात त्यांच्या पत्नी शिलवती केतकर (मूळच्या इंडिथ व्हिक्टोरिया कोहन) यांनी या प्रकल्पाचे खंड दारोदारी नेऊन विकले होते.)
सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांनी प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन असे तीन जाडजूड ग्रंथ रचले.
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी विविध क्षेत्रांतील अनेक विद्वानांच्या मदतीने वाई येथे अनेक वर्षे राबवून मराठी विश्वकोशाचे अनेक खंड तयार केले होते.
हे प्रकल्प एकखांबी तंबू असले तर मग त्यात खूप मर्यादा येतात. अशा प्रकारचे प्रकल्प हाती घेणे म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखे असते. अनेकदा साहित्यिक मंडळी आपली पुस्तके किंवा त्याबाबतची माहिती अशा संशोधकांना देण्याबाबत टाळाटाळ करतात किंवा अनास्था दाखवतात असा अनुभव असतो.
शिवाय आर्थिक कारणे संशोधकांना नाउमेद करतात. साहित्य-संस्कृतीविषयक संस्था किंवा इतर कुणी अशा प्रकल्पांना पाठबळ देणे गरजेचे असते. त्यामुळेच सिसीलिया कार्व्हालो यांच्या या ग्रंथाचे कौतुक करणे आवश्यक आहे.
सिसिलिया कार्व्हालो यांच्या या ग्रंथाची आणखी एक उल्लेखनीय बाब आहे.
जगभर पसरलेल्या ख्रिस्ती धर्मात कॅथोलिक, प्रोटेस्टंट, ऑर्थोडॉक्स असे आणि पुन्हा त्यामध्ये विभागलेले खूपखूप पंथ आहेत. त्यापैकी दहा पंथाचीसुद्धा मला नावे सांगता येणार नाहीत. अशा अनेक पंथांत विखुरलेल्या या साहित्यिकांना ग्रंथाच्या या एकाच मंचावर लेखिकेने आणले आहे, त्यांच्या श्रद्धा, सिद्धांत आणि मतभेदांचा या ग्रंथात मागमूसदेखील लागत नाही अशा निकोप हेतूने लेखिकेने या सर्वांची मराठी साहित्यविश्वाला ओळख करून दिली आहे.
या ग्रंथाला प्रसिद्धीपूर्व विक्री नोंदणीसाठी सवलत जाहीर केली होती, त्याला संपूर्ण महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळाला. ग्रंथ प्रकाशनानंतरसुद्धा या साहित्यकृतीला वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
पहिली आवृत्ती लवकरच संपेल अशी चिन्हे आहेत. त्यामुळे लेखिकेने आता स्वतःलाच डेडलाईन वाढवून घेऊन आणि आधी न मिळालेल्या साहित्यकृती मिळवून या ग्रंथात भर घालणे उचित ठरेल.
या ग्रंथात आता असलेल्या २५० साहित्यिकांची संख्या आताचेच निकष पाळले तरी पाचशेच्या वर आणि साहित्यकृतींची संख्या हजारावर सहज जाऊ शकते.
सिसिलिया कार्व्हालो हे नाव गेली अनेक वर्षे मराठी साहित्यविश्वात आणि समाजजीवनात सुपरिचित आहे. त्यांचे लिखाण - कादंबऱ्या, काव्य, संशोधन, वैचारिक साहित्य - विविध समाजघटकांत वाचले जात आहे.
प्रस्तावनाकार अविनाश सप्रे यांनी म्हटल्यामुळे कार्व्हालो यांनी लिहिलेल्या या ग्रंथामुळे आता एका महत्त्वाच्या पण अलक्षित साहित्य प्रवाहाकडे लक्ष वेधले जाणार आहे.
त्याबद्दल लेखिकेला धन्यवाद.
Camil Parkhe August 28, 2025

Comments

Popular posts from this blog

Dnyanodaya monthly enters 175th year

Fr. Rudolf Schoch. A Jesuit Looks back in satisfaction

Shakuntala Paranjape : Crusade of a lifetime