नुकतेच छापून झालेले माझे नवे पुस्तक `Journalism Stories From Goa and Maharashtra' विनिता देशमुख यांच्या कॉर्पोरेट ऑफिसात काल जाऊन मी दिले.
बातमीदार आणि पत्रकार म्हणून माझी पूर्ण कारकीर्द ही केवळ इंग्रजी दैनिकांतली.
सुरुवातीला गोव्यात The Navhind Times, त्यानंतThe Navhind Times, Times of Inia, Lokmat Times, र फक्त एक वर्षांसाठी छत्रपती संभाजीनगरात Lokmat Times, नंतर पुण्यात एक दशकभर Indian Express. त्यानंतर फर्ग्युसन कॉलेज रोडवर The Times Of India आणि अखेरीस सकाळ वृत्तमाध्यमाच्या Maharashtra Herald नंतरचे Sakal Times मध्ये तब्बल चौदा वर्षे नोकरी. तिथेच निवृत्ती.
सन २००४ला शनिवारवाड्याशेजारच्या तेव्हाच्या त्या वाड्यावजा `सकाळ' संकुलात मी नोकरीला लागलो तेव्हा मी तेथे एव्हढा काळ टिकेल किंवा ते मला ठेवतील असे वाटलेही नव्हते, पण झाले ते खरे.
मी मूळचा श्रीरामपूरसारख्या अस्सल निमग्रामीण परिसरातला मराठी माध्यमातला.
असे असले तरी सुरुवातीपासून शेवटपर्यंत नोकरी मी केवळ इंग्रजी दैनिकांत केली ते केवळ योगायोगाने वा अपघाताने असे म्हणता येईल.
दहावीनंतर गोव्यात मी जेसुईट फादर होण्यासाठी गेलो, नंतर मी विचार बदलला हे यामागचे प्रमुख कारण.
गंमत म्हणजे मी इंग्रजी पत्रकारितेत असून माझी विविध विषयांवरची बहुसंख्य पुस्तके मात्र मराठीत आहेत.
पत्रकारिता या विषयावरील आणि त्याचप्रमाणे इंग्रजीतले माझे हे नवे पुस्तक चौथे आहे.
गोवा आणि महाराष्ट्रातील पत्रकारितेवरच्या चेतक बुक्सने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाला गोव्यातील माझे एक सहकारी फ्रेडरिक नोरोन्हा यांनी प्रस्तावना लिहिली आहे.
परवा मी विनिता देशमुख यांचा मोबाईल नंबर शोधून त्यांना फोन केला आणि त्यांना `भेटण्यास, माझे नवे पुस्तक देण्यास मी येत आहे' असे स्वतःला निमंत्रित करून त्यांना काल भेटलो.
`इंडियन एक्सप्रेस' मी सोडल्यानंतर तब्बल पंचवीस वर्षांनंतर आम्ही दोघे एकमेकांस भेटत होतो.
छोटेसे फोटोसेशन आणि एक पॉडकास्ट कार्यक्रमसुद्धा झाला.
``Oh you have not changed at all, you have almost remained the same ,'' अशा आम्ही एकमेकांना कॉम्प्लिमेंटस दिल्या तेव्हा आम्ही दोघे खोटे बोलत नव्हतो किंवा अतिशयोक्तीही करत नव्हतो हे आम्हा दोघांनाही माहित होते.
या भेटीनंतर झालेल्या फोनवर झालेल्या संवादाच्या देवाणघेवीत विनिता यांनी लिहिले होते. ``Thanks for visiting. I was thrilled.''
यातील शेवटचे वाक्य विनिता देशमुख यांच्या स्वभावास धरुनच आहे हे जे जे कोणी त्यांना ओळखतात त्यांना माहित आहे.
तर `I was thrilled' हे वाक्य विनिता देशमुख यांनी अगदी मनापासून लिहिले आहे यात शंकाच नाही.
मात्र नवीनच छापून झालेलं माझे हे पुस्तक पहिल्याप्रथम भेट देण्यासाठी मी त्यांचीच निवड का केली, हा प्रश्न राहतोच.
गेली काही वर्षे प्रत्येक वेळेस माझे नवे पुस्तक हाताशी आलो कि मी आमच्या `सकाळ' लायब्ररीत दोन पुस्तके परीक्षणासाठी आणि वाचनासाठी म्हणून देत असतो.
आणि मग `सकाळ' हापिसात आले कि तेथे कार्यरत असलेल्या आणि इंडियन एक्सप्रेसपासून माझे सहकारी असलेल्या माधव गोखले यांना एक प्रत देत असतो.
यावेळी मात्र नव्या आणि इंग्रजी पुस्तकाची पहिली प्रत देण्यासाठी मी विनिता देशमुख यांची निवड केली.
पुण्यात मी आलो ते १९८८च्या नोव्हेंबरात `इंडियन एक्सप्रेस'ला रुजू होण्यासाठी.
वृत्तपत्र कामगारांच्या चळवळीत त्यावेळी मी खूप सक्रिय असल्याने साहजिकच इंग्रजी दैनिंकांबरोबरच अनेक मराठी दैनिकांतल्या पत्रकारांची ओळख झाली.
त्यावेळी पुण्यात इंग्रजी आणि मराठी दैनिकांत काही मोजक्याच महिला पत्रकार होत्या.
त्या ऐंशींच्या दशकात गोव्यात आमच्या `द नवहिंद टाइम्स'मध्ये आणि जुळ्या मराठी `नवप्रभा'त संपादकीय खात्यात महिलांना नेमण्याची मुळी प्रथाच नव्हती.
तिथे गोव्यात पोर्तुगीज भाषेतल्या `ओ हेराल्डओ' ने नुसता `हेराल्ड' असा इंग्रजी अवतार घेतला, एका तरुणीची क्राईम रिपोर्टर म्हणून नेमणूक केली तेव्हा गोव्याच्या त्या चिमुकल्या वृत्तपत्रसृष्टीत काय हलचल माजली होती, काय प्रतिक्रिया आल्या होत्या ते मला आजही आठवते.
त्याआधी मुंबईतल्या इंग्रजी वृत्तपत्रात - इंडियन एक्सप्रेसमध्ये - काम करण्याचा अनुभव असलेल्या देविका सिक्वेरा या गोव्यातील एकमेव आणि बहुधा पहिल्या महिला पत्रकार होत्या,
पुण्यात मी आलो तेव्हा या शहरातल्या बहुतांश मराठी दैनिकांत यापेक्षा काही वेगळी प्रथा नव्हती.
त्याकाळात शहरातल्या महिला पत्रकारांची संख्या अगदीच मोजकीच आणि त्यामुळे ठळकपणे नजरेत भरण्यासारखी होती.
सकाळ माध्यमाच्या `साप्ताहिक सकाळ'मध्ये त्यावेळी संध्या टाकसाळे वरच्या पदावर होत्या.
पुणे कॅम्पातल्या `महाराष्ट्र हेराल्ड'मध्ये गौरी आठल्ये संपादकीय खात्यात असत, संपादकीय पानाचे काम त्या बघत असत. तिथेच बातमीदारांत अनुराधा मस्कारेन्हास होत्या.
दैनिक `सकाळ' मध्ये संपादकीय खात्यात असलेल्या ऋता बावडेकर आणि वर्षा कुलकर्णी त्याकाळात पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या (PUWJ ) कार्यकारिणीत माझ्याबरोबर होत्या.
`इंडियन एक्सप्रेस'मध्ये आमच्या बातमीदारांच्या चमूमध्ये शुभा गडकरी आणि संगिता जहागीरदार-जैन होत्या.
United News Of India (यूएनआय) या वृत्तसंस्थेत सुजाता देशमुख होत्या. मीरा जोशी, उषा सोमयाजी, अलका क्षीरसागर आणि सुधा मेनन इतर वृत्तपत्रांत होत्या.
विनिता देशमुख त्याकाळात इंडियन एक्सप्रेसच्या फिचर्स हेड पदावर होत्या, अनेक वर्षे त्या इंडियन एक्सप्रेसच्या `सिटीझन' या मासिकाच्या संपादक होत्या. गेली दहा वर्षे बालाजी युनिव्हर्सिटीच्या `कॉर्पोरेट सिटीझन' या मासिकाच्या त्या संपादक आहेत.
पुरोगामी चळवळीतील आघाडीचे नेते डॉ बाबा आढाव, ताहेर पूनावाला आणि मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे सय्यदभाई यांच्यावर त्याकाळात मी `सिटीझन' मासिकात लेख लिहिले आणि नंतर याच विस्तारीत लेखांचा माझा पुढील काही पुस्तकांत समावेश झाला.
नंतर मुंबईतल्या `टाइम्स ऑफ इंडिया'ने पुण्यात बस्तान मांडले तेव्हा `पुणे टाइम्स'च्या संपादकपदी फरीदा मास्टर होत्या आणि मुख्य `टाइम्स ऑफ इंडिया'च्या निवासी संपादकपदी शेरना गांधी (Gandhy) होत्या.
या दोन्ही महिला संपादकांच्या नेतृत्वाखाली मी काम केले आहे. महिला बॉसच्या हाताखाली काम करणे आम्हा इंग्रजी पत्रकारितेतील लोकांना काही नवे नाही.
मराठी भाषिक पत्रकारांसाठी असे अनुभव विरळेच..
हे मी ऐंशीच्या आणि नव्वदच्या दशकाबद्दल लिहितो आहे. बस्स, आता एव्हढीच नावे आठवतात.
सगळीकडेच पुरुष पत्रकारांची मक्तेदारी असल्याने त्यांची सगळ्यांची नावे आठवणे किंवा इथे देणे शक्यच नाही.
तरी इंग्रजी पत्रकारितेतील काही बुजुर्ग आणि नवोदित नावे सांगतो.
हॅरी डेव्हिड, व्ही के कृष्णमूर्ती, ताहिर शेख, ज्यो पिंटो, प्रकाश कर्दळे, किरण ठाकूर, आनंद आगाशे, अभय वैद्य, किरण डोणगावकर, प्रणव मुजुमदार, अमिताभ दासगुप्ता, पराग रबडे आणि आमच्या इंडियन एक्सप्रेसमधील नरेन करुणाकरन, माधव गोखले, विश्वास कोठारी, विश्वनाथ हिरेमठ आणि अनोष मालेकर. बस्स, एव्हढीच नावे सांगता येतील.
तर मागे म्हणजे या तीन जुलैला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माझे `सावित्रीबाई आणि जोतिबांचे शिक्षक दाम्पत्य मिचेल आणि स्त्रीशिक्षणातील पूर्वसुरी' हे पुस्तक प्रकाशित केले.
त्याआधीच हे पुस्तक या पुस्तकाच्या विषयातील जाणकार व्यक्तींना मी दिले होते,
या जाणकार व्यक्ती म्हणजे डॉ बाबा आढाव यांचे सहकारी नितीन पवार, मोहन वाडेकर, `लोकसत्ता'तले माझे तेव्हाचे सहकारी अरुण खोरे आणि केशव वाघमारे.
सावित्रीबाई आणि जोतिबांच्या संबंधित पुस्तकाचे प्रकाशन करण्यासाठी शरद पवार हे सर्वाधिक योग्य आणि अधिकारी व्यक्ती आहेत, याबद्दल शंकाच नसावी.
याच धर्तीवर माझे हे इंग्रजी भाषेतले आणि हे पत्रकारितेच्या विषयावरचे पुस्तक औपचारिक प्रकाशनाआधी पुस्तक कुणाकुणाला द्यावे असा विचार मनात आला तेव्हा काही नावे पटकन डोळ्यासमोर आली.
आणि मग फार विचार न करता विनिता देशमुख यांची अपॉइंटमेंट घेतली आणि काल ताथवडे येथील बालाजी युनिव्हर्सिटीच्या आवारातील त्यांच्या कॉर्पोरेट ऑफिसात ही भेट झाली.
त्यानिमित्त हा लेखनप्रपंच.
Camil Parkhe July 24, 2025
Comments
Post a Comment