`बिशपांची स्कल कॅप, कार्डिनलची रेड कॅप आणि पुण्याच्या नूतन बिशपांची पुणेरी पगडी'
फक्त दीड वर्षांपूर्वी मी इथे ही पोस्ट लिहिली होती.
बिशप थॉमस डाबरे, कार्डिनल ओस्वाल्ड ग्रेशियस आणि पुण्याचे नूतन बिशप जॉन रॉड्रीग्स
नूतन बिशपांना पुणेरी पगडी का दिली ? असेही काहींनी विचारले होते.
या पोस्टमध्ये मी हे वाक्य लिहिले होते.
``पुण्यात बदली होऊन येण्याआधी वसईचे बिशप थॉमस डाबरे हे मराठी संत वाङमयाचे अभ्यासक म्हणून पुऱ्या महाराष्ट्राला परिचित होते. वय अवघे ५६ वर्षांचे असणाऱ्या नूतन बिशप रॉड्रिग्स यांची पाटी त्या तुलनेत तशी कोरी आहे आणि त्यामुळे सर्वांकडून अपेक्षाही खूप आहेत.''
तर बिशप जॉन रॉड्रिग्स यांची आता मुंबईचे कोॲडजुटेर (वारसाधिकारी) बिशप पदावर बढती झाली आहे.
पोप फ्रान्सिस यांनी काल ३० नोव्हेम्बरला पुणे धर्मप्रांताचे बिशप जॉन रॉड्रिग्स (५७) यांची मुंबई सरधर्मप्रांताचे कोॲडजुटेर (वारसाधिकारी) बिशप म्हणून नेमणूक केली आहे.
व्हॅटिकनच्या कॅनन लॉनुसार बिशप रॉड्रिग्स यांना मुंबई सरधर्मप्रांताचे विद्यमान आर्चबिशप ओस्वाल्ड ग्रेशियस यांचे वारस नेमण्यात आले आहे.
रोममध्ये म्हणजे व्हॅटिकन सिटीमध्ये आणि मुंबईत शनिवारी ३० नोव्हेंबर दुपारी एकाच वेळेस याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली .
कार्डिनल ग्रेशियस निवृत्त होतील तेव्हा त्यांचे वारस म्हणून आर्चबिशप हे पद रॉड्रिग्स स्वीकारतील.
बिशप रॉड्रिग्स यांना आर्चडायोसिसचे वारसाधिकारी बिशप होण्याचा सन्मान तुलनेने खूप तरुणवयात मिळत आहे.
वय अवघे ५७.
कॅथोलिक चर्चमध्ये बहुतांश वेळेस बिशप पदावर वयाची साठी ओलांडल्यानंतर नेमणूक होत असते.
मुंबई आर्चडायोसिस देशात आणि जगात खूप महत्त्वाचा आहे. या सरधर्मप्रांताचा प्रमुख कार्डिनल असतो.
देशात फक्त पाचसहा कार्डिनल्स आणि जगभर केवळ ११०च्या आसपास कार्डिनल्स असतात.
या कार्डिनल्सपैकी एकाची पोप म्हणून सिस्टाईन चॅपलमध्ये निवड होत असते.
कार्डिनल ग्रेशियस निवृत्त होतील तेव्हा त्यांचे वारस म्हणून आर्चबिशप हे पद रॉड्रिग्स स्वीकारतील.
कॅथोलिक चर्चच्या बिशपांचे निवृत्ती वय ७५ आणि कार्डिनलचे निवृत्ती वय ८० वर्षे असते.
मुंबईचे कार्डिनल ओसवाल्ड ग्रेशियस हे जगभरातील कार्डिनल्सपैकी एक सर्वाधिक ज्येष्ठ असून पोप फ्रान्सिस यांचे एक महत्त्वाचे सल्लागार आहेत.
बिशप हे खूप महत्त्वाचे पद आहे.
जिल्हाधिकारी आपल्या जिल्ह्याचा प्रमुख असतो, अगदी तसेच आपल्या डायोसिसमधील चर्चच्या सर्व संस्थांचा, शाळाकॉलेजांचे बिशप प्रमुख असतात.
अडीचशे वर्षांच्या इतिहास असलेल्या मुंबई सरधर्मप्रांतात मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांचा समावेश होतो. या क्षेत्रात पाच लाख कॅथोलिक लोक आहेत.
पुण्याचे निवृत्त बिशप थॉमस यांच्याप्रमाणेच बिशप जॉन रॉड्रिग्स यांचे मराठीवर प्रभुत्व आहे.
बिशप रॉड्रिग्स यांची पुण्यात बदली झाली तेव्हा माझ्यासह या डायोसिसमधील अनेकांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या.
रेस कोर्सजवळच्या सेंट पॅट्रिक कॅथेड्रलमधल्या बिशप हाऊसमध्ये त्यांना प्रत्यक्ष भेटायचे अन बोलण्याचे राहूनच गेले.
आता तर ते खूप मोठ्या पदावर पोहोचत आहे. देशवासियांच्या त्यांच्याविषयीच्या अपेक्षा तर खूपच उंचावल्या असतील.
त्यांना नव्या पदासाठी आणि कामासाठी शुभेच्छा !!
Camil Parkhe, December 1, 2024
Comments
Post a Comment