पॅरीसहून आम्ही रेल्वेने लुर्ड्स\च्या दिशेने निघालो. ग्रामीण फ्रान्सचे या प्रवासातून ओझरते दर्शन घडले..आपल्याकडे असते तशी घनदाट वस्तीची गावे व शहरे या प्रवासात अजिबात दिसली नाही.

लुर्ड्स रेल्वेस्टेशनवर उतरलो तेव्हा फ्रान्समधल्या वाटेरवरच्या इतर रेल्वे स्टेशनांपेक्षा मोठ्या संख्येने येथे लोक उतरले होते.
कारण स्पष्टच होते, लुर्ड्स हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे एक महत्त्वाचे धार्मिक पर्यटन क्षेत्र आहे.
मेरीयन डिव्होशन म्हणजे मदर मेरीच्या भक्तीसाठी जगात काही प्रसिद्ध तिर्थक्षेत्रे आहेत, त्यापैकी लुर्डस हे एक महत्त्वाचे जागतिक धार्मिक स्थळ आहे ..
युरोपच्या दौऱ्यावर जॅकलिन आणि आमची मुलगी अदितीसह मी आलो होतो.
रेल्वे स्टेशनवर उतरुन टॅक्सीने आम्ही आधीच आरक्षण केलेल्या हॉटेलकडे आलो. हॉटेलची रुम पॅरीसच्या हॉटेलच्या मानाने आधीच ऐसपैस आणि स्वस्त होती.
लुर्ड्स शहरात आमच्या या हॉटेलमधल्या वास्तव्यात घडलेली ही घटना येथे सांगायलाच हवी.
हॉटेलच्या रिसेप्शन काऊंटरपाशी मी उभा होतो तेव्हा एक महिला तेथे क्लार्कशी बोलत होती, आमच्याप्रमाणे तीही आशियाई देशातील होती हे नक्कीच होते.
का कुणास ठाऊक, त्या महिलेने मला एकदम विचारले, ``Are you from India?''
मी `Yes ’ म्हणताच तिने विचारले, " Which city ?
परदेशात त्या महिलेच्या या प्रश्नाला `पिंपरी चिंचवड' असे उत्तर कसे द्यावे म्हणून मी पटकन म्हटले, " Bombay ! "
माझ्या त्या उत्तरावर त्या महिलेचा चित्कारुन दिलेला प्रतिसाद ऐकून मी एकदम थंडगार पडलो..
"हो का, किती छान ! आम्ही पण मुंबईचेच, चेंबूरहून आमचा वीस जणांचा ग्रुप आताच आलाय ! "
फ्रान्समध्ये लुर्ड्स शहरातल्या हॉटेलात मराठीतून बोलणारे कुणी भेटेल अशी मी कल्पनाच केली नव्हती.
भारताप्रमाणेच अनेक देशांतील कॅथोलिक भाविक मोठ्या संख्येने या तीर्थक्षेत्राला मोठ्या संख्येने भेट देत असतात असे यावेळी माझ्या लक्षात आले.
मदर मेरीच्या जन्मदिनाच्या सणानिमित्त किंवा फेस्टनिमित्त आठ सप्टेंबरच्या दरम्यान जगभरातील सर्व मेरियन डिव्होशन सेंटरांत मोठा उत्सव साजरा केला जातो.
पुण्यात खडकी येथे आठ सप्टेंबरपूर्वी दहा दिवस आधी वेलंकणी मातेची मोठी यात्रा भरते. मुंबईत बांद्रा येथील बॅसिलिकात मात्र आठ सप्टेंबरनंतर माऊंट मेरीची मोठी यात्रा भरते.
अहमदनगर जिल्ह्यातल्या हरेगाव या छोट्याशा गावात सप्टेंबरच्या दुसरी शनिवारी मतमाऊलीची - मदर मेरीची- यात्रा भरते. यंदा ही यात्रा १४ सप्टेंबरला आहे.
भारतीय संस्कृतीत विविध राज्यांत आणि प्रदेशांत एकाच देवीचे विविध नावे, अवतार आणि रुपे आढळतात, तसेच येशू ख्रिस्ताची आई असलेल्या मारियामातेची अनेक नावे किंवा विशेषणे आणि रुपेही आहेत.
उदाहरणार्थ, लुर्ड्स येथील मदर मेरीची प्रतिमा ही फातिमा किंवा वेलंकणी या तीर्थक्षेत्रांतील मदर मेरीच्या प्रतिमेतून अगदी वेगळी आहे.
मदर मेरीच्या भक्तीसाठी लुर्ड्स हे एक महत्त्वाचे जागतिक स्थळ आहे. इथल्या मदर मेरीला `अवर लेडी ऑफ लुर्ड्स’ या नावाने संबोधले जाते.
प्रत्येक तीर्थक्षेत्रातील मदर मेरीला त्या शहराच्या नावाने ओळखले जाते.
पोर्तुगालमधले फातिमा शहर हे मेरीयन डिव्होशनसाठी युरोपमधले दुसरे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र. तिथली मारियामाता `अवर लेडी ऑफ फातिमा’ या नावाने ओळखली जाते.
भारतातील तामिळनाडूमधले वेलंकणी शहर हे आपल्या भारतातले सर्वांत मोठे मारीयामातेचे तीर्थक्षेत्र आहे.
इथली मदर मेरी `अवर लेडी ऑफ वेलंकणी’ या नावाने प्रसिद्ध आहे.
मुंबईतील बांद्रा येथील `बॅसिलिका ऑफ अवर लेडी ऑफ द माऊंट’ देशपातळीवर प्रसिद्ध आहे.
कॅथोलिक चर्चने अधिकृतरीत्या Shrine म्हणजे तीर्थक्षेत्रांचा दिलेल्या अनेक स्थळांमध्ये भारतातील वेलंकणी आणि बांद्रा येथील धर्मस्थळांचा समावेश होतो.
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथल्या मतमाऊलीच्या सप्टेंबर महिन्यातील यात्रेला चारपाच लाखांची गर्दी होत असली तरी या गावाला कॅथोलिक चर्चकडून तीर्थक्षेत्राचा दर्जा आतापर्यंत मिळालेला नाही.
लाखो मराठी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या "हरेगावची मतमाऊली' या नावालासुद्धा चर्चमध्ये अजूनही अधिकृत मान्यता मिळालेली नाही.
बांद्रा येथील मदर मेरी माऊंट मेरी या नावाने प्रसिद्ध आहे. बांद्रा येथे जाणाऱ्या ग्रामीण भागातील भाविकांसाठी हरेगावला १९४८ साली मारिया माऊलीची यात्रा फादर जेराल्ड बादर यांनी सुरू केली. माऊंट मेरी या शब्दाचा मराठी अपभ्रंश झाला मतमाऊली.
जागतिक पातळीवर चर्चमध्ये पोर्तुगालच्या फातिमा मातेला, अवर लेडी ऑफ फातिमा, फ्रान्समधल्या लुर्डस मातेला अवर लेडी ऑफ लूर्डस आणि भारतीय पातळीवर वेलंकणी मातेला अवर लेडी ऑफ वेलंकणीला स्वतंत्र अस्तित्व आहे.
तसे आगळेवेगळे अस्तित्व ग्रामीण भागातल्या हरेगावच्या मतमाऊलीला आहे हे कॅथोलीक चर्चने अद्याप मान्य केलेले नाही.
इथल्या मारीयामाऊलीला जागतिक पातळीच्या कॅथोलिक चर्चमध्ये `मतमाऊली ऑफ हरेगाव' वा `अवर लेडी ऑफ हरेगाव’ असे ओळखले गेले तर माझ्यासारख्या असंख्य मराठी ख्रिस्तीजनांना आनंदच वाटेल.
Camil Parkhe

Comments

Popular posts from this blog

Dnyanodaya monthly enters 175th year

Shakuntala Paranjape : Crusade of a lifetime

Fr. Rudolf Schoch. A Jesuit Looks back in satisfaction