बारामतीकर.
तसे पाहिले तर आम्ही मूळचे बारामतीकर.
अगदी अलीकडच्या काळापर्यंत पुणे जिल्ह्यात तीन लोकसभा मतदारसंघ होते. पुणे, बारामती आणि खेड.
तर या बारामती लोकसभा मतदारसंघात आमच्या पिंपरी चिंचवड शहराचा अंतर्भाव होता.
लग्नानंतर मात्र सेटल व्हावे लागले. जॅकलिनची नोकरी चिंचवडला म्हणून तेथेच घर घेतले आणि अशाप्रकारे आम्ही निदान लोकसभा मतदार संघापुरते बारामतीकर बनलो.
त्यावेळी खेड मतदारसंघात अशोक मोहोळ, विदुरा नवले, निवृत्ती शेरकर खासदार होते, नंतर किसनराव बाणखेले खासदार बनले, पुण्यातले खासदार मंडळी तर सर्वपरिचित आहेत. आमच्या बारामती मतदारसंघात मात्र खासदारांचे नेहेमीच एकच आडनाव असायचे.
फक्त पहिले नाव बदलायचे.
शरद पवार, अजित पवार, पुन्हा शरद पवार.
पण एकदा ती वेळ आली.
त्याआधीची ही घटना सांगतो.
उन्हाळ्याचे दिवस होते, सुट्टीला बहिणीकडे गोव्यात आलो होतो. दुपारी प्रवासात असताना अचानक कानावर आले की काँग्रेसचे लोकसभेतील नेते शरद पवार यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.
त्यानंतरचा इतिहास सर्वाँना ठाऊक आहे.
तर यावेळी 1999 च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार पहिल्यांदाच काँग्रेस पक्षातर्फे नव्हें तर आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उभे होते.
त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे प्रा. रामकृष्ण मोरे होते. तिसरा भाजपचा उमेदवार कुणाच्या खिजगणतीत नव्हता.
यावेळी पहिल्यांदाच शरद पवार यांच्यासमोर उभे ठाकलेले उमेदवार स्वयंभू होते, पवारांचे विरोधक होते.
मुख्य म्हणजे पुणे महापालिका जशी सुरेश कलमाडी यांच्या ताब्यात होती तशी शेजारची पिंपरी चिंचवड महापालिका रामकृष्ण मोरे यांच्या ताब्यात होती.
प्रश्न होता काँग्रेसची पारंपरिक म्हणजे काँग्रेस विचारसरणीच्या मतदारांची मते कुणाच्या पारडीत जाणार होती?
केंद्रात पवारांचा नवा पक्ष सत्ता स्थापन करणार नव्हता.
तिथे सत्तास्थापनेसाठी अगदी अटीतटीचा लढा अटल बिहारी वाजपेयी आणि लाल कृष्ण अडवाणी यांच्या भाजप आणि सोनिया गांधी यांच्या काँग्रेसमध्ये असणार होता.
या दोन मुख्य राष्ट्रीय पक्षांमध्ये कुणाची तरी निवड करायची होती.
स्वतःच्या आवडीनिवडी बाजूला ठेवत आणि कोण निवडून येण्याची अधिक शक्यता आहे हे समजून उमजूनसुद्धा स्पष्ट भुमिका घेणे गरजेचे होते.
निर्णय सोपा होता.
याआधी शरद पवार किंवा अजित पवार यांनी बारामती मतदारसंघात निवडणूक एकतर्फी जिंकली होती.
पवार चुलते-पुतणे यांनी तोपर्यंत लढविलेल्या निवडणुकीत त्यांच्या प्रतिस्पर्धी रामकृष्ण मोरे यांनी मिळविलेल्या मतांची संख्या लक्षणीय होती.
निवडणुकीत जागृत मतदारांनी असा सारासार विचार करणे अत्यंत गरजेचे असते.
Camil Parkhe,
Comments
Post a Comment