कामिल पारखे' हे नाव कसे आहे?
म्हणजे ऐकायला कसे वाटते?
आपल्याकडे कुठलेही नाव ऐकल्यावर मनात तत्क्षणी काही तरंग, प्रतिक्रिया उमटतातच.
सुरुवातीलाच सांगतो, कामिल पारखे हे नाव आजच्या गुगल जगातही अगदी आगळेवेगळे आहे, अद्वितीय की काय म्हणतात तसे आहे.
काही दिवसांपूर्वी सायबर कॅफेमधल्या एका पोराने मला माझा ईमेल विचारला, मी म्हणालो माझे कामिल पारखे हे नाव आणि Gmail.com.. तर तो म्हणाला, लकी आहात नावाबाबत, आम्हा लोकांना नावासह काही आकडे टाकावे लागते तेव्हा कुठे ईमेल तयार होतो.
तेव्हा पुन्हा एकदा माझ्या नावाच्या युनिकपणाची जाणिव झाली.
आजही या घडीला या पृथ्वीतलावर `कामिल पारखे' या नावाची दुसरी असामी नाही, आहे की नाही गंमत?
काही नावे आणि आडनावे खूपच कॉमन असतात तशांपैकी हे नाव नक्कीच नाही.
नदीचे मूळ आणि ऋषीचे कूळ शोधू नये अशी आपल्याकडे एक म्हण आहे.
आम्ही पारखे मूळचे औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर तालुक्यातले. मात्र शेजारच्या अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपुरात माझे आईवडील चाळीसच्या दशकात स्थायिक झाले होते.
या जोडप्याच्या लहान बाळाला साठीच्या दशकाच्या उंबरठ्यावर बारशाच्या वेळी 'कामिल ' हे नाव कसे मिळाले असेल?
त्या बाळाच्या आईवडलांचे नाव अनुक्रमे मार्थाबाई जॉन पारखे आणि जॉन फिलीप पारखे होते असे सांगितले तर या विषयातील जाणकारांना 'कामिल ' या नावाची जन्मकथा कदाचित लगेच उलगडू शकेल.
थोडक्यात सांगायचे झाल्यास या बाळाचे आईवडील बाळाला घेऊन स्थानिक श्रीरामपुर चर्चच्या फादरांकडे बारशासाठी गेले तेव्हा बारसे म्हणजे बाप्तिस्मा करताना त्या युरोपियन धर्मगुरूंनी प्रचलीत प्रथेप्रमाणे `कामिल' हे नाव ठेवले.
कॅथोलिक चर्चच्या वार्षिक कॅलेंडरनुसार माझ्या जन्मदिवशी १७ जूनला सेंट कामिलचा सण होता, त्या संताचे नाव जर्मन जेसुईट धर्मगुरु फादर आयवो मायर (Ivo Myer) यांनी मला दिले.
बॅप्टिझम विधीला ख्रिश्चनिंग सेरेमनी असेही म्हणतात आणि यावेळी जे नाव दिले जाते त्याला ख्रिश्चन नेम म्हणतात.
काही युरोपियन राष्ट्रात आणि आपल्याकडे गोव्यात एकाच व्यक्तीची अशी चारपाच ख्रिश्चन नावे असतात. तिकडे मिडल नेम हा प्रकार नसतो.
उदाहरणार्थ, दक्षिण गोव्याचे विद्यमान खासदार फ्रान्सिस्को सार्दिन्हा यांचे पूर्ण नाव आहे कॉस्मे फ्रान्सिस्को कैतांनो सार्दिन्हा
मला मात्र एकच `कामिल' ख्रिश्चन नेम मिळाले. आपल्या मराठी पद्धतीनुसार मधले नावसुद्धा आहे.
तर अशाप्रकारे कामिल जॉन पारखे हे नाव तेव्हापासून मला कायमचे चिकटले.
जेसुईट धर्मगुरु होण्यासाठी मी गोव्यात प्रशिक्षण घेत होतो तेव्हा इटालियन साहित्यात सुपरिचित असलेली डॉन कामिलो ही व्यक्तिरेखा भेटली.
डॉन म्हणजे गॉडफादर किंवा माफिया किंग असेच अलीकडे समजले जाते. पण डॉन म्हणजे ख्रिस्ती धर्मगुरु, आदरणीय व्यक्ती असाही अर्थ आहे, उदा. डॉन बॉस्को
रोम शहरातील एका चर्चचे धर्मगुरु असलेले डॉन कामिलो आणि रोमचे महापौर असलेले कम्युनिस्ट कोम्रेड पेपनी यांच्यामध्ये सतत चाललेली जुगलबंदी आणि मग त्यामध्ये चर्चमध्ये असलेल्या येशू ख्रिस्ताने केलेली त्यांची कानउघाडणी, मध्यस्थी हा या विनोदी साहित्याचा गाभा आहे.
जिओवानीनो गुरेश्चि (Giovanni Guareschi ) या लेखकाची ` The Little World of Don Camillo ' ची अनेक पुस्तके प्रसिध्द आहेत.
श्रीरामपूर सोडून गोव्याला स्थायिक होईपर्यंत `कामिल' या नावाची व्यक्ती मला कधी भेटली नव्हती. गोव्यात कामिल हे नाव आपल्याकडल्या सतिश, मीना, संतोष यासारखे खूप कॉमन नाव आहे.
गोव्यात आमच्या 'द नवहिंद टाइम्स ' या इंग्रजी दैनिकातच दोन `कामिल' होते.
`कामिल' हे नाव अरेबिक, इंग्रजी, फ्रेच आणि इटालियन भाषांत कसे लिहितात हे नंतर समजले.
औरंगाबादला `लोकमत टाइम्स' ला असताना तेथे उर्दू भाषेची थोडीफार ओळख झाली. कामिल हे नाव मुसलमान लोकांतसुद्धा असते हे त्यावेळी कळाले, स्पेल्लिंग अर्थातच Kamil अशी.
औरंगाबाद येथेच एका ज्येष्ठ मुसलमान व्यक्तीकडून `कामिल' या नावाचे मूळ अरेबिक आहे हे कळल्यानंतर गंमतच वाटली.
अरबी भाषेत `कामिल' म्हणजे परीपूर्ण, परफेक्ट, पूर्ण उमललेला ..
जसे `बद्र कामिल' म्हणजे पौर्णिमेचा चंद्र !
मूळचे बेल्जियन असणारे जेसुईट फादर कामिल बुल्के हे हिंदी साहित्यातील प्रसिध्द नाव आहे. हिंदी भाषेत आणि त्याचप्रमाणे भारतीय भाषेत डॉक्टरेट मिळवणारी ही पहिलीच व्यक्ती. `रामचरित मानस' हा त्यांचा पीएचडी प्रबंधासाठी विषय होता.
तर हे फादर कामिल बुल्के यांच्या `कामिल' नावाची स्पेलिंग बेल्जियम भाषेत Camille अशी होती.
अगदी अलीकडच्या काळापर्यंत माझे कामिल हे नाव ख्रिस्तीधर्मिय आहे असे मला वाटत होते. हा भ्रम दूर झाला तो पुण्यातल्या बिबवेवाडी येथील युनियन बिबलिकल सेमिनरीला (UBS) मी भेट दिली तेव्हा.
तेथे बोलताना तिथल्या अधिकाऱ्याने मी ख्रिस्ती आहे का हे विचारल्यानंतर मी थक्क झालो. माझे नाव सेंट कामिलनुसार देण्यात आले असे मी सांगितल्यावर तो अधिकारी उत्तरला.. अच्छा, तुम्ही रोमन कॅथोलिक आहात तर."
ख्रिस्ती नाव म्हणजे बिबलिकल अर्थात बायबलमध्ये असलेल्या व्यक्तींची नावे, असे मग त्याने स्पष्टीकरण दिले. उदाहरणार्थ, मोझेस (मोशे), एलिया, रूथ, साराह, जेकब (याकुब), डेव्हिड (दावीद किंवा दाऊद) वगैरे.
तेव्हा लक्षात आले कुठलीही नावे एखाद्या धर्मातील नव्हे तर तिथल्या तिथल्या स्थानिक संस्कृतीतील असतात. आपण उगाच एखाद्या धर्माला कवटाळून त्याचा बाऊ करत असतो वा गर्व बाळगत असतो.
Camil हे पुलिंगी नाव तर Camila हे स्त्रीलिंगी नाव.
इंग्लंडचे राजे किंग चार्ल्स यांच्या पत्नीचे नाव कामिला पार्कर आहे. (त्या राजे असलेल्या चार्ल्स यांच्या पत्नी असल्या तरी चार्ल्सच्या आईप्रमाणे - राणी एलिझाबेथ यांच्याप्रमाणे- त्या स्वतः राणी नाहीत. )
विल्यम शेक्सपियर काहीही म्हणोत, नावात तसे भरपूर काही आहे.
Camil Parkhe
Comments
Post a Comment