- Get link
- X
- Other Apps
एके काळी भारतात आणि जगातील अनेक भागांत ख्रिस्ती धर्मगुरु आणि नन्स विविध क्षेत्रांत सेवाभावी वृत्तीने कार्यरत होते.
अव्वल ब्रिटिश अमदानीत तर देशातील अनेक समाजसुधारकांनी ख्रिस्ती मिशनरी लोकांनी सुरु केलेल्या शाळांत शिक्षण घेतले.
पुण्यात स्कॉटिश मिशनरी रेव्हरंड जेम्स मिचेल यांच्या शाळेत शिकलेले जोतिबा फुले हे त्यापैकी एक प्रमुख नाव.
त्याशिवाय शहरांत आणि ग्रामीण भागांत अनेक छोटेमोठे दवाखाने ख्रिस्ती मिशनरी चालवत असत. येथे आजारी लोकांना नाममात्र खर्चात आरोग्य सेवा मिळायची.
त्या काळात शिक्षण क्षेत्रांचे आणि आरोग्य सेवांचे आजच्यासारखे बाजारीकरण किंवा खासगीकरण झालेले नव्हते.
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील संत लूक इस्पितळ किंवा शेवगाव येथील नित्य सेवा हॉस्पिटल ही काही वानगीदाखल नावे.
या शाळांचा किंवा दवाखान्याचा धर्मांतरासाठी वापर केला जातो असा सर्रास आरोप केला जातो त्याकडे दुर्लक्ष करायचे.
दिल्लीतील सेंट स्टीफन्स कॉलेज, मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेज, विल्सन कॉलेज, सेंट कोलंबा स्कूल, नागपुरातले हिस्लोप कॉलेज किंवा रांची येथील सेंट झेवियर सेंटर फॉर लेबर मॅनेजमेंट , पुण्यातली सेंट व्हिन्सेंट किंवा लोयोला स्कूल्स या आजही देशांतील अत्यंत नावाजलेली शिक्षण संस्था आहेत.
विविध क्षेत्रांत हे धर्मगुरु आणि नन्स कार्यरत होते आणि आहेत. विविध भारतीय भाषांतील साहित्य, इतिहास, मानसशास्त्र, आरोग्य, जीवशास्त्र, वकिली (कायदा), समाजसेवा, कामगार कल्याण, आदिवासी विकास, कामगार संघटना, महिला सबलीकरण, कुष्टरोगी, वगैरे वगैरे..
या लोकांच्या नावांची जंत्री मी येथे देणार नाही.
विल्यम कॅरी, ओडिशा राज्यात आपल्या दोन मुलांसह जिवंत जाळले गेलेले आदिवासी लोकांमध्ये काम करणारे ग्रॅहॅम स्टेन्स, मदर तेरेसा किंवा अगदी अलीकडेच झारखंड येथे आदिवासी लोकांमध्ये काम करणाऱ्या आणि ' दहशतवादी' म्हणून महाराष्ट्र सरकारने मुंबईत जेलमध्ये टाकल्यानंतर तेथेच हुतात्मे झालेले जेसुईट फादर स्टँन स्वामी ही नावे इथे पुरेशी ठरतील.
ही भारतातली काही नावे, जगभर तर विविध देशांतली कितीतरी नावे देता येईल.
तर आता मूळ मुद्द्याकडे येतो.
लोकांच्या जीवनाशी स्पर्श करणाऱ्या विविध क्षेत्रांत या ख्रिस्ती धर्मगुरु आणि नन्स एका क्षेत्रात मात्र पाय ठेवत नाही, त्यांना मुळी तशी परवानगी नाही.
हे निषिद्ध क्षेत्र म्हणजे राजकारण.
भारतीय घटना समितीचे जेसुईट फादर जेरोम डिसोझा हे सभासद होते, देशाने स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या सुरुवातीच्या काळातील त्यांनी महत्त्वाचें योगदान दिले. भारताच्या इतिहासातले ते एकमेव राजकारणी ख्रिस्ती धर्मगुरु म्हणता येईल,
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या घटनेचा स्वीकार झाल्यानंतर त्यानुसार १९५२ साली देशात पहिल्यांदा सार्वत्रिक निवडणुका झाल्या तेव्हा मात्र फादर जेरोम डिसोझा यांनी संसदेची निवडणूक लढविली नाही.
त्या आजपावेतो नंतर कुठल्याही ख्रिस्ती धर्मगुरु किंवा नन्सने देशातली संसदेची किंवा कुठल्याही राज्यातल्या विधान सभेची निवडणूक लढविली नाही, आमदार किंवा खासदार हे पद भूषवले नाही.
याचे कारण म्हणजे कॅथोलिक चर्चच्या कॅनन लॉ नुसार जगातल्या कुठल्याही अभिषिक्त धर्मगुरु वा ननला राजकीय, सत्तेचे पद घेता येत नाही किंवा राजकारणात प्रत्यक्ष सहभाग घेता येत नाही.
कॅथोलिक चर्चचे सर्वोच्च धर्मगुरु असलेले पोप हे स्वतः व्हॅटिकन सिटी या जगातल्या सर्वात छोट्या राष्ट्राचे प्रमुख आहेत, त्या नात्याने पोप हे संयुक्त महासंघाच्या सभेत भाषण देऊ शकतात.
पोप इटलीबाहेर आपल्या दौऱ्यावर बाहेर पडतात तेव्हा राजकीय शिष्टाचारानुसार त्यांना राष्ट्रप्रमुखाचा सन्मान आणि त्यानुसार वागणूक दिली जाते.
मात्र पोप यांच्या कॅथोलिक चर्चच्या धर्मगुरु आणि नन्स यांना राजकारण हे मज्जाव क्षेत्र आहे. हा तसा विरोधाभास किंवा विसंगती म्हटली पाहिजे.
राजकारणात शिरायचे असले तर या धर्मगुरु किंवा नन्स यांना आपल्या झग्याचा म्हणजे कॅसक. अथवा हॅबिटचा त्याग करावा लागतो, चर्चचे नियम याबाबत खूप कडक आहेत.
कॅथोलिक पंथ ही जगातली सर्वांत मोठी संघटीत आणि नियमबद्ध संस्था असल्याने हे शक्य झाले आहे.
भारतात गेल्या काही दशकांच्या काळात अनेक साधू, संत, महंत, योगी, साध्वी, आचार्य आणि धर्माचार्य प्रार्थनास्थळे किंवा आपले कार्य सोडून निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत.
यापैकी काहींनी संसदेत किंवा विधानसभेत प्रवेश केला आहे तर काहींनी सत्तेची पदेसुद्धा स्वीकारली आहेत.
समाजाच्या विविध क्षेत्रांत सक्रिय असणारे ख्रिस्ती धर्मगुरु आणि नन्स मात्र राजकारणात, आमदार, खासदार किंवा मंत्री म्हणून कुठेही दिसत नाही त्यामागचे हे कारण आहे.
Camil Parkhe
Christianity
Graham Staines
Jerome D'Souza
Mother Teresa
Nitya Seva Hospital
politics
Pune
Shevgaon
Shrirampur
St Luke Hospital
Stan Swamy. Jesuits. Stephens College
Xavier's College
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment