आता मी जो अनुभव सांगणार आहे तसा अनुभव फार कमी लोकांच्या आयुष्यात आलेला असेल.

अलीकडच्या अती सुरक्षेच्या काळात तर असे अनुभव फारच दुर्मिळ.
आणीबाणीच्या काळातली ही घटना. इंदिराबाईंनी घोषित आणीबाणी शिथिल करुन लोकसभेच्या निवडणुका घेतल्या होत्या. निवडणुका पार पडल्या होत्या आणि मतदान मोजणीची वेळ आली होती.
त्याकाळी देशभरातील लोकसभा निवडणुका दोनतीन टप्प्यांत होऊन लगेच मतदान मोजणी होत असे.
या काळात म्हणजे १९७८ ला मी सातारा जिल्ह्यात कराड येथे जेसुईट प्री-नॉव्हिस म्हणून टिळक हायस्कूलमध्ये अकरावीत शिकत होतो.
त्या आधीच घटनाक्रम आता काहीच लक्षात नाही, मात्र निवडणूक पार पडल्यानंतर त्या दिवशी अगदी भल्या पहाटेच एका ट्रकने काही लोकांसह मी कराडहून सातारा येथे मतदान मोजणी केंद्रात पोहोचलो होतो हे आठवते.
हा, एक स्पष्ट आठवते. ट्रकने प्रवास करणारे आम्ही सर्व जण जनता पक्षाचे आणि पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काँग्रेस पक्षाचे विरोधक होतो.
मतदान मोजणी केंद्रात जनता पक्षाचे पाठीराखे म्हणून आमची भुमिका असणार होती.
आम्ही जनता पक्षाचे पोलिंग एजंट म्हणून काम करणार होतो.
आम्ही लोक कराडच्या मतदार संघातील जनता पक्षाचे आणि शेकापचे पोलींग एजंट होतो
शेतकरी कामगार संघाच्या (शेकाप) उमेदवाराला कराड येथे जनता पक्षाने पुरस्कृत केले होते.
सकाळी सातच्या दरम्यान आम्ही सातारा येथील प्रशस्त मतदान मोजणी केंद्रात पोहोचलो. मांडव घालून तेथे टेबले मांडून मोजणीची व्यवस्था केली होती.


विशेष म्हणजे आम्हापैकी कुणालाही मतदान अधिकाऱ्यांनी ओळखपत्र मागितली नाही किंवा आमचे नावगाव लिहून घेतले नाही.
त्याकाळात कुणाकडेच कुठलेही अगदी शाळाकॉलेजचे ओळखपत्र नसायचे. तेव्हा (कृष्णधवल) फोटो क्वचित काढले जात असत. मी माझा पहिला फोटो श्रीरामपूरच्या गुळस्कर आर्ट स्टुडिओत आठवीला असताना पहिल्यांदा काढला होता.
रेशनकार्ड मधील नोंद हिच केवळ बहुसंख्य सामान्य लोकांच्या अस्तित्वाची खूण असायची.
अगदी सुरुवातीला मतदानाची चारपाच खोकी आमच्या टेबलावर आणण्यात आली, त्यावरचे सिल आम्हाला दाखवून नंतरच ते सील तोडून ती खोकी टेबलावर मोकळी करण्यात आली, मतदान पत्रिकांची सरमिसळ करण्यात आली.
त्यानंतर प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराची मते वेगळी करण्यात आली. उमेदवाराच्या नावासमोर असलेला शिक्का आम्हा सर्व पोलिंग एजंट्सना दाखवून नंतरच हे वर्गीकरण व्हायचे.
प्रत्येक फेरीच्या शेवटी एकेक उमेदवाराचे मत मोजले जायचे, तो मोजणी संपली की एक फेरी संपायची.
आमच्या मतदान मोजणी केंद्रात सातारा जिल्ह्यातील दोन लोकसभा मतदार संघातील मतमोजणी होती, सातारा आणि कराड मतदारसंघ.
सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचे उमेदवार होते तत्कालीन केंद्रीय मंत्री यशवंतराव चव्हाण आणि कराडच्या उमेदवार होत्या प्रेमलाबाई चव्हाण. (नंतरचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आई)
त्या दिवसभराचा कार्यक्रम किंवा काही घटना आता आठवत नाही.
आठवते फक्त एकच की आमचे मत मोजणीचे काम उशिरा रात्री संपले.
कराडला काँग्रेसच्या प्रेमलाबाई चव्हाण निवडून आल्या होत्या, शेजारच्या दालनात साताऱ्यात काँग्रेसचेच यशवंतराव चव्हाण निवडून आले होते.


(केवळ दोनतीन महिन्यांत काँग्रेसचे हे दोन्ही उमेदवार एकमेकांचे विरोधक म्हणून उभे ठाकले ! यशवंतराव चव्हाण प्रभुतींनी इंदिराबाईंची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी केली आणि प्रेमलाकाकी इंदिरा काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा बनल्या. पुढे आघाडी सरकारमध्ये त्या मुख्यमंत्री बनल्या असत्या तर महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळाला असता. )
सर्वांत मोठी महत्त्वाची बाब आजही लक्षात राहिली आहे.
रात्री एकदोनच्या सुमारास कुणीतरी बातमी आणली कि बीबीसीने बातम्यात जाहीर केले कि रायबरेलीतून पंतप्रधान इंदिरा गांधी आणि अमेठीतून संजय गांधी निवडणूक हरले आहेत.
गायवासरु इंदिराबाईंच्या काँग्रेसचे चिन्ह.. गाय आणि वासरु दोघे पराभूत झाले होते.
मतदान मोजणी केंदाच्या मांडवातल्या मोकळ्या आवारात त्यावेळी आम्ही केलेला जल्लोष आजही आठवतो.
साताऱ्याहून कराडला ट्रकने पहाटे चारपाचला पोहोचलो तो अगदी हवेत तरंगतच..
त्यानंतर गोव्यात आणि पुण्यात अनेक निवडणुकांच्या वेळी मतदान मोजणी केंद्रात गेलो ते बातमीदार म्हणून. तेथील मतमोजणी होत असताना साताऱ्याचा तो अनुभव नेहेमी डोळ्यांसमोर यायचा...
Camil Parkhe

Comments

Popular posts from this blog

Dnyanodaya monthly enters 175th year

Shakuntala Paranjape : Crusade of a lifetime

Fr. Rudolf Schoch. A Jesuit Looks back in satisfaction