निवडणूक चिन्हे



टी एन शेषन निवडणूक आयुक्त होण्याआधीची ही गोष्ट आहे. काळ साधारणतः सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीचा. श्रीरामपुरात काही मोक्याच्या जागी आणि रेल्वे रुळांच्या बाजूला असलेल्या घरांच्या भिंतींवर आणि इतर बांधकामांवर पांढऱ्या रंगाच्या पार्श्वभुमीवर काही चिन्हे आणि घोषणा लिहिलेल्या असायच्या. त्यापैकी एक बैलजोडी असायची, गायवासरू असायचे, शहरी भागांत मिणमिणता दिवा असायचा. अनेक चित्रांत लाल रंगातलं विळा-कणीस हें चिन्ह असायचं, काही ठिकाणी विळा आणि हातोडा हे चिन्ह असायचं.

देशातल्या लोकसभा आणि महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीत रंगवलेल्या या चित्रांवर विविध पक्षांची ही निवडणूक चिन्हे, पक्षांची आणि उमेदवारांची नावे असायची.
तर यापैकी बैलजोडी हे चिन्ह होतं मोरारजी देसाई वगैरे नेत्यांच्या संघटना काँग्रेसचं. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच काँग्रेसमध्ये फार मोठी म्हणजे सरळसरळ उभी फूट पडली होती आणि पंतप्रधान इंदिरा गांधी यांना आपल्या गटासाठी बैलजोडीऐवजी नवे गायवासरू हे चिन्ह घ्यावं लागलं होतं. सन १९७१च्या सार्वत्रिक निवडणुका इंदिरा गांधींनी हे नवे निवडणुक चिन्ह घेऊन लढवल्या आणि जिंकल्या सुद्धा. त्यावेळी नव्यानेच स्थापन झालेल्या इंदिरा गांधी यांच्या पक्षाला नवकाँग्रेस असं संबोधलं जायचं. 'गायवासरू, नका विसरु' ही नवकाँग्रेस पक्षाची तेव्हा घोषणा होती.
आमचा अहमदनगर जिल्हा एकेकाळचा लाल निशाण पक्षाचा, डाव्या आणि कम्युनिस्ट चळवळीचा बालेकिल्ला होता. त्यामुळं कम्युनिस्ट पक्षांची निवडणुक चिन्हं अनेक ठिकाणी दिसायची.
दिवा हे निवडणूक चिन्ह होतं जनसंघ या पक्षाचं.
त्याकाळात साक्षरतेचं प्रमाण आतापेक्षा खूप कमी असल्यानं ही निवडणूक चिन्हं फार महत्त्वाची असत. मात्र असं असुनही इंदिरा गांधींच्या नव्या पक्षानं नवकाँग्रेसनं गायवासरु या चिन्हासह पूर्ण देशभर आणि राज्याराज्यांत निवडणुका जिंकल्या होत्या हे महत्त्वाचं आहे.
नव्या नावानिशी आणि नावे निवडणुक चिन्ह घेऊन या पक्षाला थोडक्या काळात आपल्या पारंपरिक, नवसाक्षर आणि निरक्षर मतदारांशी जवळीक कायम राखणे शक्य झालं होतं हे आश्चर्यकारक होतं.
जून १९७५ ला देशात अंतर्गत आणिबाणी लागू झाली, पावणेदोन वर्षांत पंतप्रधान इंदिराबाईंनी आणीबाणी शिथिल केल्यावर लगेच निवडणूक जाहीर झाल्या आणि देशातल्या राजकीय पक्षांत, या राजकीय पक्षांच्या नावांत आणि निवडणूक चिन्हांत प्रचंड उलथापालथी झाल्या.
आणिबाणीपर्वात तुरुंगात विशेषतः पुण्यातल्या येरवडा तुरुंगात विविध राजकीय पक्षांचे आणि संघटनांचे नेते एकत्र होते. आजकाल तुरुंगांत ठेवल्या जाणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांसारखं त्यांना गुन्हेगारांची वागणूक न देता राजकीय कैदी म्हणून वागवले जात असे. त्यामुळे संघटना कांग्रेस, समाजवादी पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट, भारतीय लोक दल, जनसंघ या पक्षांच्या आणि तसेच त्यावेळी बंदी घातली गेलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांना एकमेकांना भेट यायचे, त्यांच्यात चर्चासंवाद व्हायचा. यामुळेच परस्परविरोधी असलेल्या या राजकीय पक्षांच्या आणि आरएसएस नेत्यांचे मतपरिवर्तन आणि मनोमिलन झालं असं म्हणतात.
आणि या मनोमिलनातून जन्माला आला एक नवीन पक्ष आणि त्यांचं समान निवडणूक चिन्ह !
मनोमिलन झालेल्या या प्रमुख राजकीय पक्षांमध्ये आणि त्यांच्या नेत्यांमध्ये सर्वोदयी नेते जयप्रकाश नारायण, संघटना काँग्रेसचे मोरारजी देसाई, समाजवादी पक्षाचे जॉर्ज फर्नांडिस, मधू दंडवते, मधू लिमये, एस एम जोशी, जनसंघाचे लाल कृष्ण अडवाणी आणि अटल बिहारी वाजपेयी, भारतीय लोक दलाचे चरण सिंग आणि राज नारायण तसेच काँग्रेस मधल्या तरुण तुर्क गटाचे चंद्र शेखर, मोहन धारिया यांचा समावेश होता.
या नेत्यांची तुरुंगातून सुटका झाल्या आणि लगेचच निवडणुकीची तारीख जाहीर झाली होती. विरोधी पक्षांकडे फार कमी वेळ होता.
इंदिरा गांधींच्या काँग्रेस पक्षाविरुद्ध एकत्र होऊन लढायचं यावर विरोधी पक्षांमध्ये एकमत होतं. मात्र ते कसं यावर जोरदार मंथन झालं आणि त्यातून निर्णय झाला कि त्यावेळी देशात विरोधी पक्षांत सर्वात अधिक प्रबळ असलेल्या म्हणजे गायपट्ट्यात लोकप्रिय असलेल्या चरण सिंग यांच्या भारतीय लोक दलाच्या हलधर - नांगरधारी शेतकरी- या निवडणूक चिन्हासह सर्वांनी निवडणूक लढवायच्या.
याचं कारण म्हणजे औपचारिकपणे जनता पक्ष हे नाव असलेल्या नव्या पक्षांची स्थापना करण्यास आता त्यांच्याकडं खूप कमी अवधी होता.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा राजकीय पक्ष नसल्यानं या संघटनेनं या नव्या जनता पक्षात सामील होण्याचा प्रश्नच नव्हता. डाव्या पक्षांनी आणि शेतकरी कामगार पक्षानं या नव्या पक्षात आपल्या पक्षाचं विलीनीकरण करण्यास नकार दिला, मात्र शेकाप सारख्या पक्षांनी नांगरधारी शेतकरी हे निवडणूक चिन्ह घेऊन निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला.
आणिबाणी शिथिल होऊन निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा मी सातारा जिल्ह्यातल्या कराड येथे टिळक हायस्कुलात अकरावीला होतो आणि या सर्व घटना जवळून पाहत होतो, वृत्तपत्रांतून वाचत होतो.
कराडला निवडणूक झाली, कराडमधून काँग्रेसच्या प्रेमलाकाकी चव्हाण (माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मातोश्री) तर शेजारच्या सातारा मतदारसंघातून केंद्रिय मंत्री यशवंतराव चव्हाण होते. सातारा जिल्ह्यात मतमोजणीला जनता पक्षाचे समर्थक असलेल्या लोकांसह मी ट्रकने कराडहून साताऱ्याला भल्या पहाटे पोहोचलो होतो. तिथं जनता पक्षाचा पोलिंग एजंट मी काम केलं.
आमच्या पक्षाच्या उमेदवारांचा दोन्ही मतदारसंघात म्हणजे कराड आणि सातारा येथे पराभव झाला, मात्र त्या रात्री निवडणूक मतमोजणीच्या मांडवात
आम्ही जनता पक्षाच्या समर्थकांनींच जल्लोष केला. याचं कारण म्हणजे बीबीसीनं रात्री उशिरा बातमी दिली कि पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा रायबरेलीत आणि संजय गांधी यांचा अमेठी येथे पराभव झाला होता.
निवडणुकीत औपचारिकरीत्या अस्तित्वात नसलेल्या जनता पक्षाचा विजय झाला, मोरारजी देसाई पंतप्रधान झाले आणि त्यानंतर जनता पक्षाची औपचारिकरीत्या घटना तयार झाली, या पक्ष उदयास आला आणि चंद्र शेखर पक्षाध्यक्ष झाले.
केवळ दोनअडीच महिन्यांच्या काळात नव्या पक्षाची अनौपचारिक स्थापना, नवे नाव आणि निवडणूक चिन्हावर निवडणूक लढून केंद्रात सत्ता मिळवणे अशी प्रचंड राजकीय उलथापालथ झाली होती.
मात्र या नव्या जनता पक्षाचा खेळ अडीच वर्षांपुरता राहिला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी बांधिलकी ठेवण्याच्या म्हणजे दुहेरी निष्ठेच्या मुद्द्यावरून हा पक्ष फुटला आणि पूर्वाश्रमीच्या जनसंघ नेत्यांनी भारतीय जनता पक्ष या नावाने नवी चूल मांडली. जनता पक्षाच्या यशामुळे `जनता' या नावाची भुरळ कायम राहिली,
त्यामुळे अनेक फुटीर नेत्यांनी आपल्या नव्या पक्षांच्या नावांत जनता हा शब्द कायम ठेवला. जसे अखिल भारतीय काँग्रेसमधून फुटणारे गट आपल्या पक्षांच्या नावांत काँग्रेस नाव कायम ठेवून आपली नाळ आणि भूमिका दर्शवतात.
जनता पक्षाचे नाव, निवडणूक चिन्ह हे सुब्रह्मणम स्वामी यांनी अनेक वर्षे कायम ठेवलं होत आणि अलीकडे ते भाजपमध्ये सामील झाले तेव्हा जनता पक्ष खऱ्याखुऱ्या अर्थानं नामशेष झाला.
आणिबाणीपर्वानंतर देवराज अर्स यशवंतराव चव्हाण, स्वर्ण सिंग प्रभुतींनी काँग्रेसमधून इंदिरा गांधींची हकालपट्टी केली तेव्हा इंदिराबाईंनी हाताचा पंजा हे निवडणूक चिन्ह घेतलं आणि त्यांच्या पक्षाला इंदिरा (आय) काँग्रेस असं म्हटलं जाऊ लागलं. कालांतरानं त्यांचे सर्व विरोधक पक्षात परत आले आणि चिन्ह वेगळं असलं तरी तो पक्ष पुन्हा अखिल भारतीय काँग्रेस पक्ष बनला.
शरद पवार यांनीं काँग्रेसमधून फुटून नवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला, त्यानंतर सहा महिन्यांतच नव्या नावाने आणि नव्या निवडणूक चिन्हासह त्यांनी लोकसभेच्या आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका लढवल्या. त्यावेळी महाराष्ट्रात शिवसेना-भाजपच्या युती सरकारचा पराभव करून राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेससह सत्ता काबीज केली आणि तीन टर्म्स म्हणजे पंधरा वर्षे सत्ता राखली.
हा तसा अगदी अलीकडचा इतिहास.
गोवा महाराष्ट्रात विलीनीकरण करण्याच्या उद्दिष्टानं तिथं दयानंद बांदोडकरांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षानं निवडणूक लढवली, सत्ता स्थापन केली. मात्र विलीनीकरणाच्या मुद्द्यावर गोवा, दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेशात पंतप्रधान इंदिरा गांधींनी सार्वमत घेतलं तेव्हा गोंयकारांनी स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षानं मतदारांचा हा निर्णय शिरोधार्थ मानला.
मात्र पक्षाचं नाव तेच कायम राखून मगो पक्षानं गोव्यात पुन्हा सत्ता मिळवली. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचं नाव आणि झेंडा आजही गोव्यात कायम आहे, भले त्या पक्षाचा तिथं आता एकमेव आमदार आहे.
तसं नावांत फार असतं आणि तसं काही नसतंही.

^^^
Camil Parkhe October 11, 2022

Comments

Popular posts from this blog

Shakuntala Paranjape : Crusade of a lifetime

Dnyanodaya monthly enters 175th year

Fr. Rudolf Schoch. A Jesuit Looks back in satisfaction