पोप फ्रान्सिस सध्या कॅनडाच्या दौऱ्यावर आहेत आणि जगभरातील नियतकालिके त्यांच्या या दौऱ्यावर लक्ष ठेऊन आहेत. जगभर धर्म आणि शासन यांची फारकत होत असताना आजही कॅथोलिक पंथाचे सर्वोच्च धर्मगुरु असलेल्या पोपमहाशयांना आजही महत्त्व दिले जाते हे मान्य करावेच लागेल. पुण्यातल्या डेक्कन जिमखान्याहून लहान असलेल्या आणि सातशे नागरिक असलेल्या व्हॅटिकन सिटीला आज एक सार्वभौम देश म्हणून मान्यता आहे आणि या देशाचे पोप राष्ट्रप्रमुख आहेत.

जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीच्या दौऱ्यावर असताना मुद्दाम व्हॅटिकन सिटीला गेले आणि पोप फ्रान्सिस यांची भेट घेऊन त्यांना भारत भेटीचे अधिकृत निमंत्रण दिले आहे.
गेली काही दशके तीन पदांवरील व्यक्तींविषयीं जगातील अनेक लोकांमध्ये अपार कुतूहल असते. या तीन पदांवरील व्यक्ती वर्षभर या ना त्या कारणाने, निमित्ताने जगभरातील प्रसार माध्यमांत सतत झळकत असतात. या तीन व्यक्ती म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ दुसऱ्या आणि रोमन कॅथोलिक पंथाचे प्रमुख आणि व्हॅटिकन सिटी राष्ट्राचे प्रमुख पोप.
पोप हे ख्रिस्तमंडळाचे म्हणजे कॅथोलिक चर्चचे प्रमुख, येशू ख्रिस्ताच्या बारा प्रेषितांमध्ये एक असलेला सेंट पिटर किंवा संत पेत्र हा पहिला पोप. ख्रिस्ती धर्माच्या दोन हजार वर्षांच्या इतिहासात आतापर्यंत २६० पोप होऊन गेले आहेत.
पॅलेस्टाईन राष्ट्राची स्थापना होण्याआधीच पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन (पीएलओ) चे नेते यासर अराफत यांना या अस्तित्व नसलेल्या राष्ट्राचे प्रमुख म्हणून भारताने आणि इतर काही देशांनी मान्यता दिली होती. त्यांना राष्ट्रप्रमुख म्हणून शिष्टाचारानुसार वागवले जायचे. तीच गोष्ट तिबेटी बौद्धांचे नेते असलेल्या दलाई लामांची.
रोमविषयी ‘रोम वॉज नॉट बिल्ट इन ए सिंगल डे’ अशी एक म्हण आहे. सतराव्या शतकाच्या सुरुवातीस म्हणजे १६०४ साली मराठीतील महाकाव्य ‘क्रिस्तपुराण गोव्यात रचणाऱ्या ब्रिटिश धर्मगुरू थॉमस स्टिफन्स यांनी या म्हणीचे ‘एके दिवशी रोमनगरी I उभविली नाही I’ असे मराठमोळे भाषांतर केले आहे !
पोप पॉल सहावे यांनी १९६४ साली रोमहून इस्राएलकडे विमानाने प्रयाण केले तेव्हा त्यांनी चर्चच्या इतिहासातील अनेक नवे विक्रम प्रस्थापित केले. विमानाने प्रवास करणारे ते पहिले पोप.
पोप पॉल सहावे भारताच्या भेटीवर १९६४ साली आले तेव्हा मुंबई विमानतळावर जमिनीचे चुंबन घेऊन त्यांनी आपला दौरा सुरु केला होता.
राजीव गांधी पंतप्रधान असताना पोप जॉन पॉल दुसरे हे १९८६ साली भारत दौऱ्यावर आले होते तेव्हा त्यांच्या मिरामार बीचजवळच्या कंपाल ग्राऊंडवर झालेल्या मिस्साविधीला नवहिंद टाईम्सचा बातमीदार म्हणून मी हजर होतो. शाही विधी काय असतो याचा तो समारंभ उत्तम नमुना होता.
पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात १९९९ साली पोप जॉन पॉल दुसऱ्यांदा भारत भेटीवर आले. पोप यांना पंतप्रधान वाजपेयी भेटले होते.
पोप यांना संबोधित करताना आदराने `होली फादर' असे म्हटले जाते. मराठीत बिशपांना महागुरुस्वामी म्हटले जाते तसे पोप यांना परमगुरुस्वामी असे म्हटले जाते.
हरेगावला सेंट तेरेजा स्कुलच्या बोर्डिंगमध्ये असताना आणि श्रीरामपूरच्या देवळात मिस्सामध्ये वर्षांतून काही वेळेस खालील गायन गायले जायचे....

परमगुरुस्वामीला देव नित्य सुखी ठेवो

मेंढपाळ सद्गुरू तो चिरंजीवी जगी होवो //

काही वर्षांपूर्वी इटली येथील वास्तव्यात मला रोम आणि व्हॅटिकन सिटी येथे भरपूर फिरता आले. तेथील ती भव्य सेंट पिटर्स बॅसिलिका, तो जगप्रसिद्ध सेंट पिटर्स स्केअर, व्हॅटिकन म्युझियम, मायकल अँजेलो या चित्रकाराने रंगवलेले सिस्टाईन चॅपेल पाहताना मती गुंग होते.
या सेंट पिटर्स चौकातच एका इमारतीच्या उंच मजल्यावरील बाल्कनीतून सणासुदीला पोपमहाशय तेथे जमलेल्या हजारो भाविकांशी संवाद साधत असतात.
पोपपदाची निवडणूक हा खरे तर स्वतंत्र लेखाचा विषय आहे कार्डिनलची ही कॉन्क्लेव्ह (बैठक) चालू असताना सेंट पिटर बॅसिलिकाच्या चिमणीतून काळा धूर निघाला म्हणजे नव्या पोपसंदर्भात अजून मतैक्य झालेले नाही. ही बैठक अनेक दिवस चालू शकते. चिमणीतून पांढरा धूर येऊ लागला म्हणजे चौकात जमलेल्या हजारो लोकांना आणि संपूर्ण जगाला कळते कि नव्या पोपची निवड झाली आहे.
ताजे गवत जाळले कि काळा धूर येतो आणि सुकलेले गवत जाळल्यावर पांढरा धूर येतो.
असा पांढरा धूर चिमणीतून बाहेर आल्यावर काही क्षणांत पोपपदी निवड झालेल्या कार्डिनलना बाल्कनीत आणले जाते सेंट पिटर्स चौकात जमलेल्या आणि सर्व जगाला मग सांगितले जाते, ''वूई हॅव्ह अ पोप !''
आणि ते पोपपदी निवड झालेले कार्डिनल मग पोप म्हणून आपले नवे नाव सांगतात.
पोपपदाची निवड कशी होती याची माहिती देणारा `शूज ऑफ द फिशरमॅन' हा एक अत्यंत गाजलेला चित्रपट आहे.
इंग्लंडच्या गादीवर येणारा राजा अथवा राणी आपले नवे नाव धारण करतो, जसे आताची राणी एलिझाबेथ दुसरी, तसे पोपपदावर येणारे कार्डिनल आपली जुनी ओळख टाकून नवे नाव घेतात. याआधीचे निवृत्त पोप हे बेनेडिक्ट सोळावे तर अर्जेंटिनाचे कार्डिनल जॉर्ज बेर्गोग्लिओ यांनी पोप झाल्यावर फ्रान्सिस नाव धारण केले, ते फ्रान्सिस नावाचे पहिलेच पोप आहेत.
सोसायटी ऑफ जिझस (जेसुइटस ) या कॅथोलिक धर्मगुरुंच्या संघटनेचे पोपपदावर आलेले ते पहिलेच सदस्य आहेत. सोसायटी ऑफ जिझस (जेसुईट किंवा येशूसंघीय) या धर्मगुरुंच्या संघटनेचे जगभर शिक्षण, समाजकार्य वगैरे क्षेत्रांत मोठे योगदान आहे. दहशतवादाच्या आरोपात अलिकडेच तुरुंगात निधन झालेले फादर स्टॅन स्वामी हे सुद्धा जेसुईटच होते.
गॅलिलिओ आणि इतर वैज्ञानिकांविषयी चर्चची भूमिका, काही देशांत इन्क्विझिशनचा झालेला अतिरेक, दुसऱ्या महायुद्धात ज्यूंचा झालेला संहार याबाबत चर्चची बोटचेपी भूमिका तसेच गेल्या काही दशकांत युरोपात आणि अमेरिकेत धर्मगुरुंकडून मुलांवर झालेले लैगिक अत्याचार या प्रकरणांमुळे चर्चची मानहानी झाली, त्याबद्दल पोप जॉन पॉल दुसरे, पोप बेनेडिक्ट आणि पोप फ्रान्सिस यांनी खंत आणि खेद व्यक्त करुन संबंधित पिडीत व्यक्तींची आणि त्यांच्या नातलगांची माफी मागितली आहे.
राष्ट्रप्रमुख, पंतप्रधान परदेशदौऱ्यावर निघतात, तेव्हा त्यांच्याबरोबर निवडक पत्रकार असतात. दौरा आटोपल्यावर मायदेशी परतताना मग पत्रकारांशी मुक्त संवाद साधण्याची परंपरा आहे. आम्हा पत्रकारांसाठी अशा दीर्घकाळ चालणाऱ्या पत्रकार परिषदा म्हणजे मोठी पर्वणीच असते.
व्हॅटिकन सिटीतील ड्रेस कोड विषयीही सांगितले पाहिजे. चर्चच्या सर्व धर्मगुरुंचा, बिशपांचा, कार्डिनल्सचा आणि नन्सचाही विशिष्ट झगा असतो. धर्मगुरु आणि बिशप सफेद किंवा करड्या रंगाचा झगा घालतात. कार्डिनलांचा करड्या रंगाचा झगा, कमरेला लाल पट्टा आणि डोक्यावर छोटीशी लाल गोल टोपी (स्कल कॅप) असते.
पोप मात्र सदैव पूर्ण पांढऱ्या झग्यात असतात आणि त्यांच्यासमोर इतरांनी पांढरा पोशाख वा झगा घालू नये असा संकेत आहे.
गेली काही शतके फक्त इटलीच्या कार्डिनलचीच पोपपदावर निवड व्हायची, याचे कारण म्हणजे पोपपदाच्या निवडणुकीत भाग घेणाऱ्या कॉलेज ऑफ कार्डिनल्समध्ये इटलीच्या कार्डिनलांचाच अधिक भरणा असायचा.
मुंबईचे पहिले भारतीय बिशप व्हॅलेरियन ग्रेशियस हे १९५३ साली भारताचे आणि आशिया खंडातलेही पहिले कार्डिनल बनले, मुंबईचे सायमन पिमेंटा हे पहिले मराठीभाषक कार्डिनल.
सध्याचे मुंबईचे कार्डिनल ओस्वाल्ड ग्रेशियस हे तर पोप फ्रान्सिस यांच्या आठ-सदस्यीय सल्लागार मंडळात आहेत.
कार्डिनलांच्या संख्येत आशियाई, आफ्रिकन किंवा कृष्णवर्णीय कार्डिनल अगदी नगण्य असले तरी सेंट पिटर्स बॅसिलिकेच्या चिमणीतून येणाऱ्या पांढऱ्या धुरातून काही धक्कादायक निवडीचा संदेश येऊ शकतो.
गोव्याचे आर्चबिशप फिलिप नेरी फेराव यांची अलीकडेच कार्डिनल पदावर निवड झाली आहे. भविष्यात पोपपदासाठी ते सुद्धा एक उमेदवार असू शकतात.
एके दिवशी एखादा भारतीय म्हणजे अगदी मुंबईतील मराठीभाषक कार्डिनल सुद्धा व्हॅटिकन सिटीमध्ये पोप आणि या चिमुकल्या राष्ट्राचा राष्ट्रप्रमुख होऊ शकतो.
सोनियाचा तो दिवस लवकर यावा हीच अपेक्षा.
Camil Parkhe, July 25, 2022
May be an image of 4 people and people standing




Comments

Popular posts from this blog

Shakuntala Paranjape : Crusade of a lifetime

Dnyanodaya monthly enters 175th year

Fr. Rudolf Schoch. A Jesuit Looks back in satisfaction