एकमेव प्रवेशद्वार पाटो ब्रिज

 गोव्याची राजधानी पणजी येथे चारशे-पाचशे वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या काही वास्तू आणि इतर बांधकाम आहेत. पोर्तुगीज राजवटीची पहिली राजधानी असलेल्या ओल्ड गोवा येथे तर त्याहून अधिक जुनेपुराणे बांधकामे आहेत. पोर्तुगिजांनीं आपली राजधानी नोवे गोवा किंवा पणजी येथे १८४३ या साली हलवली आणि त्यानंतर इथला आधीच असलेला आदिलशाहचा राजवाडा मग पोर्तुगीज इंडियाचे मुख्यालय बनला. त्यानंतर या पणजी येथे पोर्तुगीजांनी पाश्चात्य धर्तीच्या अनेक इमारती बांधल्या, पोर्तुगीज राजवटीच्या वेगवेगळ्या खात्यांची आणि संस्थांची कामकाज या इमारतींतून चालायचे.

पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी भारतीय लष्कर पाठवून गोवा, दमण आणि दीव पोर्तुगीज सत्तेतून मुक्त केला आणि मग पोर्तुगीजकालीन या इमारती विविध सरकारी खात्यांची, लष्करी विभागांची कार्यालये बनल्या. मांडवीच्या तिरावरचे आदिलशाह पॅलेस अनेक वर्षे गोवा, दमण आणि दिवचें सचिवालय आणि विधानसभा भवन होते. पणजी येथे फॉन्टइनेस, कंपाल आणि अल्तिन्हो येथे सहज एक फेरफटका मारला तर पोर्तुगीजकालीन तीनशे-चारशे वर्षे जुनी असलेल्या आणि आजही अगदी सुस्थितीत असलेल्या अनेक छोट्यामोठ्या वास्तू नजरेस पडतील.
यापैकी रायबंदर येथून (आणि नंतर उत्तर गोव्यातूनही) नोवे गोवे येथे येणाऱ्या पादचारी लोकांसाठी, घोडेस्वारांसाठी, बग्गी आणि आधुनिक काळात दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी एकेकाळी एकमेव प्रवेशद्वार असलेला पाटो ब्रिज आहे. आयुमान अवघे चारशे वर्षे !
पोर्तुगीजांनी १५१० साली गोव्यात सत्ता मिळवली आणि त्यानतर १६३२-३४ या काळात हा पूल बांधण्यात आला. घोडेस्वारांसाठी आणि घोड्यांच्या बग्गीसाठी या पुलाची रचना केली होती तरी गेल्या काही वर्षांत बसेस, ट्रक्स, लष्करी वाहने अशी अनेक अवजड वाहने या छोट्या पुलाने समर्थरीत्या पेलली आहेत.
विशेष म्हणजे या पुलाचं बांधकाम जेसुईट या कॅथोलिक धर्मगुरुंच्या संस्थेनं केलं. हा पूल पायी ओलांडण्यासाठी पाच मिनिटांहुन कमी कालावधी लागतो आणि पुलाची लांबी असेल फक्त तीनशे मिटर्स. या पुलानजिकचा परिसर पाटो नावाने ओळखला जातो म्हणून हा पाटो ब्रिज.
उत्तर गोव्यातून म्हणजे पर्वरी, म्हापसा या मार्गे तसेच रायबंदर, ओल्ड गोवा इकडून येणाऱ्या सर्व वाहनांना आणि लोकांना या पाटो ब्रिजचा वापर करावाच लागे. गोव्याच्या विविध भागांतून बसने येणारे लोक पणजी बस स्टँडवर उतरले की तेथून जवळच असलेल्या पाटो ब्रिजचा वापर करत पणजी शहराच्या दिशेने चालू लागत लांबवर म्हणजे पणजी मार्केट मिरामार डोना पावला वगैरे ठिकाणी जाणारे प्रवाशी बसने प्रवास करत त्या बसेस सुद्धा या पाटो ब्रिजचीच वाट धरत.
उत्तर गोव्यातून आणि रायबंदर येथून येणाऱ्या व्यक्तीला किंवा कुठल्याही वाहनाला पाटो ब्रिजचा वापर न करता पणजी शहरात पाऊल किंवा चाक ठेवणे शक्य नसायचे. ही परिस्थिती मी पणजीला हायर सेकंडरीला, पदवी शिक्षणासाठी धेम्पे कॉलेजात होतो आणि नंतर `द नवहिंद टाइम्स’चा बातमीदार म्हणून नोकरीला होतो त्या काळापर्यंत म्हणजे सत्तर ते नव्वदच्या दशकांपर्यंत होती.
पाटो ब्रिज ही पणजी शहर गोव्याच्या उत्तरेकडील इतर भागांना जोडणारी एकमेव दुवा होता.
तर हा चारशे वर्षांचा, अनेकांना आपल्या अंगावर वावरुन देणारा पाटो ब्रिज आजही अस्तित्वात आहे, मात्र त्याचे हे असणे आता दुर्लक्षित झाले आहे. आजही पाटो ब्रिज आपल्या जागीच उभा आहे, आजही त्याचा मर्यादित का होईना पण वापर होत आहे. पूर्वीसारखा पाटो ब्रिज आता वाहतुकीचा एकमेव आणि म्हणून महत्त्वपूर्ण दुवा राहिलेला नाही.
या जुन्या पुलाला कितीतरी पर्याय गेल्या वीस वर्षांत उभे राहिलेले आहेत. इतके कि मी लिहिलेलं हे वाचून नव्या पिढीतल्या लोंकांना आणि गोव्याला अनेकदा गेलेल्या पर्यटकांना हा पाटो ब्रिज नक्की कुठे असावा अशा प्रश्नही पडू शकतो.
एकेकाळी एकमेवाद्वितीय असलेल्या या पाटो ब्रिजविषयीच्या अनेक आठवणी माझ्या मनात दाटलेल्या आहेत. पणजीला विद्यार्थी असताना दररोज पणजी बस स्टॅण्डवर जाण्याचा प्रसंग येत नसायचा. मात्र कॉलेज संपल्यानंतर आणि मुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षेचा निकाल लागण्याआधीच `द नवहिंद टाइम्स; या इंग्रजी दैनिकाचा मी बातमीदार बनलो आणि या व्यवसायामुळे पायाला भिंगरी लागली आणि गोवाभर प्रवास करण्यासाठी पणजी बस स्टॅण्डवर नियमाने येणे आणि त्यासाठी या पाटो ब्रिजवरुन प्रवास करणे क्रमप्राप्त ठरले.
या पाटो ब्रिज संबंधातले आणि आज अनेकांना अविश्वसनीय वाटेल असे एक दृश्य माझ्या मनात आजही ठसलेले आहे. हा पूल पणजीला उत्तर गोव्याशी आणि रायबंदर, ओल्ड गोव्याला जोडणारा एकमेव दुवा असला तरी सत्तरच्या दशकात या पुलावरून जाणाऱ्या वाहनांची आणि उंचवटा असलेल्या पादचारी पथावरुन चालणाऱ्या लोकांची संख्या अगदीच नगण्य होती. पुलावरून दोन्ही बाजूंनी वाहतूक व्हायची आणि तरीही ट्रॅफिक जॅम असा कधी नसायचा.
सकाळी आणि संध्याकाळी वाहनांची गर्दी तुलनेने वाढायची तेव्हा पुलाच्या अगदी मध्यभागी असलेल्या जागी एक वाहतूक पोलीस गोलाकार असलेले दोन बोर्ड घेऊन वाहतूक नियंत्रित करायचा, एक लाल रंगाचा आणि दुसरा हिरवा रंगाचा. ज्या बाजूला हिरव्या रंगाचा बोर्ड दाखवला कि त्या बाजूची वाहने पुलावर यायची, दुसऱ्या बाजूची वाहने तोपर्यंत थांबायची. अर्ध्याएक तासांनंतर पुलावरची वाहतूक कमी व्हायची आणि वाहतूक पोलीस तिथून नाहीसा व्हायचा.
गोवा, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी असलेल्या पणजी शहरात सत्तर आणि ऐंशीच्या दशकापर्यंत केवळ एकाच ठिकाणी आणि तेथेही केवळ एकदोन तास वाहतूक नियंत्रित करण्यासाठी एकच वाहतूक पोलीस असायचा आणि ती जागा म्हणजे हा पाटो ब्रिज. या प्रदेशाचे सचिवालय असलेल्या आदिलशाह पॅलेसपाशीसुद्धा वाहतूक पोलीस नसायचा !
`द नवहिंद टाइम्स'चा मी क्राईम आणि कोर्ट रिपोर्टर होतो. दैनंदिन घडणाऱ्या गुन्ह्याच्या आणि पोलिसांशी संबंधित असलेल्या बातम्या गोळ्या करण्यासाठी मांडवीच्या तीरावरच्या आणि इन्स्टिट्यूट मिनिझेस ब्रागांझाला लागून असलेल्या गोवा पोलीस मुख्यालयात प्रत्येक संध्याकाळी जाणे व्हायचे.
पोलीस मुख्यालयाच्या पहिल्या मजल्यावर इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस (आयजीपी ) वगैरे ज्येष्ठ अधिकारी असायचे, खालच्या मजल्यावर प्रथमदर्शनी भागाला पणजी शहर पोलीस स्टेशन होते, कदाचित आताही असेल. तर या पोलिस स्टेशनचा मुख्य असलेला पोलीस इन्स्पेक्टर अलेक्स डिसोझा यांच्याबरोबर गप्पांबरोबर चहाही व्हायचा.
एकदा पणजी बस स्टॅण्डवरुन शहराच्या दिशेने मी येत होतो. पाटो ब्रिजच्या फुटपाथवर मी पाय ठेवणार तोच तिथंच असलेल्या पोलीस इन्स्पेक्टर अलेक्सने मला पाहिलं. कुठल्या तरी पोलिस कामगिरीवर ते निघाले होते आणि त्यांच्याबरोबर मीपण यावं असा आग्रह ते करत होते. मी नकार दिला तसं इन्स्पेक्टरनं माझा हात धरला आणि बळजबरीनं मला पोलीस जीपमध्ये बसायला भाग पाडलं.
अंगावर पोलिस गणवेश अन हातात ती बारीकशी केन असलेल्या इन्स्पेक्टर अलेक्सने भर रस्त्यात पोलीस जीपमध्ये मला जबरदस्तीने बसवावे हे मला आवडले नव्हते. पण मला दुसरा पर्यायच नव्हता. आमच्या दोघांचे चांगले संबंध होते. अशा प्रकारे काही पोलीस कामगिरीवर मी इन्स्पेक्टर अक्लेक्सबरोबर आधीही गेलो होतो.
यावेळी मात्र एक गडबड झाली.
गणवेशधारी पोलीस इन्स्पेक्टरने मला पोलिस जीपमध्ये घालून नेलं हे दृश्य आमच्या इंग्रजी दैनिकाचं मराठी जुळं भावंड असलेल्या `नवप्रभा'च्या वृत्त संपादकानं पाहिलं आणि ऑफिसात गेल्यावर ' पाटो ब्रिजपाशी असलेल्या कामिलला पोलिसांनी जीपमध्ये घालून नेलं' ही बातमी अनेकांना सांगितली !
संध्याकाळी मी ऑफिसात परतलो तेव्हा अनेकजण माझ्याकडं प्रश्नार्थक नजरेनं पाहत होते !
पाटो ब्रिजशी निगडित असलेली एक संस्मरणीय घटना म्हणजे १९८३ साली गोव्यात झालेली कॉमनवेल्थ संघटनेच्या राष्ट्रप्रमुखांची बैठक. पंतप्रधान इंदिरा गांधी यजमान असलेल्या या बैठकीचा पहिला टप्पा नवी दिल्लीत कॉमनवेल्थच्या पदसिद्ध अध्यक्ष राणी एलिझाबेथ द्वितिय यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला होता. त्यानंतर गोव्यात होणाऱ्या चार दिवसांच्या अनौपचारिक संवादासाठी कॉमनवेल्थचे सदस्य असलेल्या ३९ देशांचे राष्ट्रपती किंवा पंतप्रधान येणार होते. त्यामध्ये ब्रिटनच्या पंतप्रधान मार्गरेट थॅचर, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान बॉब (रॉबर्ट) हॉक, झिमाब्वेचे अध्यक्ष रॉबर्ट मुगाबे वगैरेंचा समावेश होता.
या राष्ट्रप्रमुखांचे दिल्लीहून गोव्यात दाबोळी विमानतळावर आगमन झाल्यानंतर त्यापैकी काही जण हेलिकॉप्टरने बैठकीचे ठिकाण असलेल्या फोर्ट आग्वाद ताज व्हिलेज रिसॉर्ट येथे जाणार होते. काही जणांच्या मोटारींचा ताफा मात्र दाबोळीहून पणजीमार्गे ताज व्हिलेज रिसॉर्टकडे जाणार होता आणि हा ताफा अगदी छोटा आणि अरुंद असलेल्या पाटो ब्रिजवरुनच जाणार होता. व्हिव्हिआयपी व्यक्तींच्या सुरक्षेच्या दृष्टीने या पाटो ब्रिजभोवती कडेकोट बंदोबस्त राखणे अत्यावश्यक होते.
गोव्यात होणाऱ्या या कॉमनवेल्थ हेड्स ऑफ गव्हर्नमेंट ( चोगम) राष्ट्रप्रमुखांच्या रिट्रीटसाठी गोव्यात वाहतुकीचे नियोजन करण्याची जबाबदारी गोव्याच्या त्यावेळच्या पोलीस उपायुक्त (वाहतूक) किरण बेदी यांच्याकडे होती. या काळात क्राईम रिपोर्टर म्हणून जवळजवळ दररोज बेदी यांना मी भेटायचो. दाबोळी विमानतळ, पणजीतला पाटो ब्रिज ते फोर्ट आग्वाद ताज व्हिलेज रिसॉर्ट येथे आणि परत त्याच मार्गाने त्या जिप्सी जीपमधून प्रवास करायच्या.
दोनतीन वेळेस मी किरण बेदी यांच्या वाहतूक सुरक्षेच्या रंगीत तालमीत सहभागी झालो होतो. जिप्सीमध्ये बेदी पुढे ड्रायव्हरच्या शेजारी बसायच्या, मागे एका पोलीस कॉन्स्टेबलसह मी बसायचो. जीपमध्ये मागे एक अवजड वॉकीटॉकी यंत्र असायचे. आपल्या हातात माईक घेऊन बेदी सतत आपल्या कनिष्ठ सहकाऱ्यांना सूचना देत असायच्या, ''धिस इज चार्ली वन. चार्ली टू कम ऑन ... चार्ली वन ओव्हर .. '' वॉकीटॉकीचे काम कसं चालतं हे मी तेव्हा पहिल्यांदा जवळून अनुभवलं.
याच काळात मडगाव -पणजी आणि पणजी- वॉस्को या मार्गावर झुआरी नदीवर पहिल्यांदा एक पूल बांधण्यात आला. तोपर्यंत या मार्गावर आगाशी आणि कोरतालिम येथे सर्व प्रवाशी आपल्या गाड्यांसह आणि ट्रक्स वगैरे वाहनांसह फेरीबोटने झुआरी नदी पार करत असत आणि नंतर पुन्हा आपल्या मार्ग धरत असत. चोगमच्या या गडबडीत कुठलाही औपचारिक उदघाटन कार्यक्रम न होता या झुआरी पूल वाहनांसाठी खुईला करण्यात आला होता.
हा झुआरी पूल नसता तर कॉमनवेल्थ देशांच्या या राष्ट्रप्रमुखांची वाहने पणजीकडे आणि पाटो ब्रिजकडे आणणे ही एक मोठी समस्या झाली असती !
या कॉमनवेल्थ राष्ट्रप्रमुखांच्या रिट्रीटच्या वेळी गोवा सरकारतर्फे पणजी आणि आजुबाजुच्या परिसरांत चार दिवस सर्व सरकारी आणि खासगी शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर केली होती, हेतू हा कि या काळात रस्त्यांवर कुणीही फिरू नये.
अशाप्रकारे या महत्त्वाच्या परिषदेच्या वेळी जगातील अनेक राष्ट्रप्रमुख दाबोळी विमानतळावरून हेलिकॉप्टरने थेट ताज व्हिलेज रिसॉर्टला पोहोचले तर अनेक जण आपल्या मोटारींच्या ताफ्यासह या छोट्या पाटो ब्रिजवरुन रिसॉर्टला रवाना
झाले !
रिट्रीट संपल्यावर अशाच पद्धतीने हे सर्व राष्ट्रप्रमुख दाबोळी विमानतळावर पोहोचले. अर्थात मोटारीने प्रवास करणाऱ्या या राष्ट्रप्रमुखांना पाहण्यासाठी पाटो ब्रिजवर वा इतर ठिकाणी उभे राहण्याची कुणालाही परवानगीदेखील नव्हती.
या पाटो ब्रिजवरुन दिसेल असा एक मोठा पूल मांडवी नदीवर गोवा मुक्तीनंतर बांधण्यात आला. गोवा पोर्तुगीज सत्तेतून मुक्त करणाऱ्या पंडित जवाहरलाल नेहरु यांचे नाव देण्यात आले. मात्र या नेहरु पुलामुळे पाटो ब्रिजचे महत्त्व कमी झाले नाही, कारण म्हापसा, पर्वरी येथून आणि रायबंदर मार्गे पणजी स्टॅन्डपाशी आल्यानंतर नदीची खाडी ओलांडण्यासाठी पाटो ब्रिजचा वापर व्हायचाच.
विशेष म्हणजे १९७२ साली उदघाटन झालेला हा नेहरू पूल सतरा वर्षातच खाली कोसळला आणि गोव्यातील लोकांना मग नवीन पूल बांधेपर्यंत फेरीबोटीने प्रवास करावा लागला. त्यावेळी तीन शतके पार केलेला पाटो ब्रिज मात्र अजूनही यौवनात होता. नव्यानव्या मोठ्या फ्लायओव्हर्समुळे आता एका कोपऱ्यात ढकलला गेलेला आणि त्यामुळे पूर्ण दुर्लक्षित असला तरी आजही पाटो ब्रिज माझ्यासारख्या काही लोकांना आकर्षित करतोच. गोव्यातल्या अनेक घडामोडींचा पाटो ब्रिज एक साक्षीदार आहे.
आजही या पाटो ब्रिजकडे गेले कि या पुलाशी निगडित असलेल्या अशा अनेक गोष्टी आठवतात.
उंच टेकडीवरच्या भव्य पणजी चर्चच्या शेजारी असलेल्या उतारावर असलेल्या रस्त्याने खाली गेले कि तेथून जवळच हा पाटो ब्रिज आहे. पणजीला तुम्ही कधी गेलात तर पाटो कॉलनी आणि फॉन्टइनेसच्या आसपास असलेल्या या पाटो ब्रिजला अवश्य भेट द्या.
Camil Parkhe,

Comments

Popular posts from this blog

Dnyanodaya monthly enters 175th year

Fr. Rudolf Schoch. A Jesuit Looks back in satisfaction

A day at Mother Teresa’s Home for Destitutes