Mother Mary Comes To Me दोन दिवसांपूर्वी वाचून हातावेगळे केले.
बुकर प्राईझ विजेत्या आणि भारतातल्या एक आघाडीच्या `लेखिका आणि कार्यकर्त्या' अरुंधती रॉय यांचे हे आत्मचरित्रावजा हार्ड बाऊंड पुस्तक बुक फेस्टिव्हलमध्ये डिसेंबरात विकत घेतले होते.
अनेक आणि भरपूर (आणि स्वस्तातली) जाडजूड पुस्तके मी त्या बुक फेस्टिव्हलमध्ये घेतली.
त्यासाठी जवळजवळ आठवडाभर दररोज काही तास मी पाय तुडवत अनेक स्टॉल्स पालथी घातली होती. आता ही पुस्तके कधी वाचून होतील ते देव जाणे.
सर्वात आधी नारायण विष्णू जोशी यांचे 'पुणे शहरचे वर्णन' (प्रकाशन वर्ष १८६६ !) हे पुस्तक जोतिबा आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबत माझ्या चालू असलेल्या
संशोधन कामामुळे सर्वात आधी वाचून काढले आणि त्यावर येथे लिहिलेसुद्धा.
वर उल्लेख केल्याप्रमाणे अरुंधती रॉय यांची अनेकदा Writer-Activist अशी ओळख दिली जायची, तेव्हा हा शब्दप्रयोग त्यांना विचित्र वाटायचा.
म्हणजे `पिवळा पिंताम्बर' या शब्दासारखी पुनरुक्ती आहे असे त्यांनी या पुस्तकात म्हटले आहे.
To me, `writer-activist' sounded like a sofa-bed', असे त्यांनी लिहिले आहे.
Mother Mary Comes To Me थोडक्या काळात वाचून झाले याचे कारण फिरंगी पोर्तुगिजांच्या तब्बल चार शतके वसाहती असलेल्या दोन प्रदेशांत जानेवारीत आणि फेब्रुवारीत दीर्घ मुक्काम झाला.
तिथल्या फावल्या वेळांत सलगतेने हे पुस्तक हातात धरता आले.
पुस्तक भन्नाट आहे.
अरुंधती रॉय यांची आधीची कुठलीही पुस्तके मी वाचलेली नाही, त्यांच्यावर छापून आलेले मात्र सतत वाचत असतो.
हे पुस्तक वाचतानासुद्धा या सेलीब्रीटी लेखिका त्यांच्या In which Annie Gives It Those Ones या जुन्या फिल्मची प्रसार माध्यमांत चर्चा होती.
या शिर्षकातील `मदर मेरी' आहेत मिसेस मेरी रॉय, लेखिकेच्या आई.
पुस्तक पूर्णतः आत्मचरित्रात्मक आहे, मात्र पुस्तकाच्या केंद्रस्थानी लेखिका नसून ``मिसेस रॉय' आहेत.
संपूर्ण पुस्तकात लेखिकेने आपल्या आईला `मिसेस रॉय' अशा दूरस्थ भावनेनेच संबोधले आहे.
त्याचे कारण पुस्तकाच्या पहिल्या काही प्रकरणांतच वाचकांना उलघडते.
हे पुस्तक प्रकाशित होणार होते त्याच सुमारास देशातील काही आघाडीच्या इंग्रजी नियतकालिकांत अरुंधती रॉय यांच्या मुलाखती पान एकवर किंवा अगदी ठळकपणे प्रकाशित झाल्या होत्या.
अर्थात हे सर्व लेखिकेच्या लिटररी एजंटने नियोजनपूर्वक जुळवून आणले असणार.
लेखिकेच्या अगदी पहिल्या पुस्तकापासून - द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स- पासून लेखिकेचा स्वतःचा लिटररी एजंट होता हे तिने या पुस्तकात सांगितले आहेच.
इंग्रजी साहित्यात नावाजलेल्या - प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळालेल्या - साहित्यिकाला किती रग्गड रक्कम मिळते हे या पुस्तकातून दिसते.
ही रक्कम किती असते, त्या रकमेतून दरवर्षी किती व्याज मिळत जाते याची कल्पनासुद्धा करता येणार नाही
.बुकर प्राईझ मिळाल्यानंतर काही काळानंतर लेखिका एका ठिकाणी लिहिते
``Not even in my dreams could I have imagined that a single book could earn the kind of money the God of Small Things did. ''
पुस्तकातील एक पात्र गोलक म्हणते: Thank God we are rich !
या रकमेचा सकारात्कम विनियोग कसा करायचा याचेही लेखिका नियोजन करते.
पुस्तक आत्मचरित्रावजा आहे, मात्र मिसेस रॉय केंद्रस्थानी आहे.
पुस्तकाची सुरुवात मिसेस रॉय आपल्या दोन चिल्ल्यापिल्ल्यांसह केरळला परतते आणि घरदार, उत्पनाचे कुठलेही साधन नसताना आपल्या अतिशय संघर्षात्मक आणि अखेरीस खूप यशस्वी ठरलेल्या कारकिर्दीस सुरुवात करते अशी होते.
पुस्तकाच्या काही प्रकरणांत तर या मिसेस रॉयचा केवळ एकदोन वाक्यांतच उल्लेख होतो आणि शेवट मिसेस रॉयनेच होतो.
या मिसेस रॉय नंतर आपल्या आयुष्यात इतक्या यशस्वी असतात कि `द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स' चे आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव झाले तेव्हा एका अपरिचित महिलेने 'तुम्ही अरुंधती रॉय यांच्या आई ना?'' असे मिसेस रॉय यांना विचारण्याचे धाडस केले होते.
ते ऐकून मिसेस रॉय यांच्या अंगाचा तिळपापड झाला होता.
`` I felt as though she had slapped me,'' असे मिसेस रॉय यांनी आपल्या लेकीला नंतर सुनावले होते.
याचे कारण म्हणजे या मिसेस रॉय काही साधारण महिला नव्हत्याच.
महिलांना वाडवडिलोपार्जित मालमत्तेत हक्क असायला हवा यासाठी त्यावेळच्या प्रचलित त्रावणकोर ख्रिश्चन वारसा हक्क कायदयाविरुद्ध लढाई सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढवून हा महिलांविरोधी कायदा रद्दबातल करण्यात मिसेस रॉय यांनी यश मिळवले होते.
मिसेस रॉय आणि त्यांची लेक यांच्या नात्याचे रसायन खूप अजब होते.
उदाहरणार्थ, Get out of my car, किंवा You are a millstone around my neck, यासारखी काही चिडून उदगारलेली काही वाक्ये.
पुस्तकाच्या शेवटी मात्र डोळे पाणावतातच.
पुस्तकाची लेखनशैली खूप रोचक आहे हे सांगायलाच नको.
आपल्या कारकिर्दीत आपण कुणाकुणाशी साथ केली आणि कुणाकुणाशी पंगा घेतला हे अरुंधती रॉय यांनी या पुस्तकात लिहिले आहे.
त्यादृष्टीने अरुंधती रॉय हे निश्चितच एक असामान्य व्यक्तिमत्व आहे याची जाणिव होते.
मिसेस रॉय यांच्याप्रमाणेच.
पुस्तकाच्या मुखपृष्ठावर लेखिकेचा सिगारेट ओढणारा फोटो छापला याविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. ती याचिका अर्थात फेटाळण्यात आली होती.
पुस्तकातील मजकूर त्या मुखपृष्ठावरील फोटोपेक्षाही खूप बोल्ड आहे.
Camil Parkhe




Comments

Popular posts from this blog

Shakuntala Paranjape : Crusade of a lifetime

Dnyanodaya monthly enters 175th year

Fr. Rudolf Schoch. A Jesuit Looks back in satisfaction