गोव्यात पणजी येथे `द नवहिंद टाईम्स' या इंग्रजी दैनिकात आणि नंतर छत्रपती संभाजीनगरला `लोकमत टाईम्स'मध्ये एकूण दशकभर क्राईम आणि हायकोर्ट रिपोर्टर ही बिट मी सांभाळली.
तेव्हा वापरल्या गेलेल्या अनेक संज्ञांमध्ये `डायिंग डिक्लरेशन' किंवा मृत्यूपूर्व जबाब हा एक शब्दप्रयोग होता.
मुख्यतः एखादी नवविवाहित महिलेचे जळीत प्रकरण असते तेव्हा तिला जाळण्यात आल़े किंवा तिने स्वतःला जाळून घेतले हे तिच्याकडून दंडाधिकाऱ्यामार्फत वदवून घेतले जाते.
`डायिंग डिक्लरेशन'ला फौजदारी प्रकरणांत आगळेवेगळे महत्त्व असते.
याचे कारण साधारणतः मृत्यूपूर्वी दिलेला जबाब खरा असतो असे मानले जाते.
अर्थात मरणाला सामोरे जातानासुद्धा अनेक पतिव्रता महिला आपल्या नवऱ्याला वाचवण्यासाठी आपण स्वतःलाच जाळून घेतले किंवा स्टोव्हचा अचानक भडका होऊन आग लागली असे म्हणत असत.
याआधी श्रीरामपूरला असताना दैनिक `सकाळ' चे संस्थापक-संपादक नानासाहेब ऊर्फ ना. भि. परुळेकर यांनी मृत्युशय्येवर असताना `निरोप घेता' हे आत्मचरित्र लिहिले होते हे मला माहित होते.
त्यानंतर अशाच पद्धतीने समाजवादी नेते एस. एम जोशी यांनी इस्पितळात असताना `मी एसेम' या शिर्षकाचे आत्मचरित्र लिहिले होते.
पुण्यातील पर्वती मंदिर सर्व जातींच्या लोकांना खुले व्हावे यासाठी काकासाहेब गाडगीळ यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाने या छोटेखानी आत्मकथनाची सुरुवात होते. शेवटच्या प्रकरणात दवाखान्यात त्यांची शुश्रूषा करणार्या मल्याळी नर्सबाबत एसेम यांनी लिहिले आहे/
पुण्यात इंडियन एक्सप्रेसला रुजू झाल्यावर हे पुस्तक मी वाचले.
काल कोथरुडला गांधीभवनात जब्बार पटेल यांच्या मुलाखतीच्या कार्यक्रमानिमित्त आलो होतो, तिथे नामदेव ढसाळ यांचे `दलित पँथर - एक संघर्ष मृत्युशय्येवर लिहिलेला एक दस्तऐवज' हे पुस्तक दिसले.
एका क्षणाचाही विचार न करता किंमत विचारुन, विकत घेऊन मी ते पुस्तक लगेच बॅगेत टाकले.
जयदेव गायकवाड यांनी दलित पँथरवर लिहिलेल्या पुस्तकाचे समीक्षण नुकतेच वाचले आहे. त्या पुस्तकाचीही मी विचारणा केली तेव्हा आप्पा बळवंत चौकातील दुकानात ते मिळेल असे मला सांगण्यात आले.
मेट्रोने घरी परतताना पुस्तकाचा ब्लर्ब, प्रस्तावना आणि काही पाने वाचून झाली.
नामदेव ढसाळ यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेल्या या पुस्तकाचे संपादन त्यांच्या पत्नी मलिका अमर शेख ढसाळ यांनी केले आहे. अर्जुन डांगळे यांची दोन पानांची प्रस्तावना आहे.
महेश भारतीय यांच्या भाष्य प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
सत्तरच्या दशकात इनमिन अडीच वर्षांचे सक्रिय आयुष्य लाभले तरी दलित पॅन्थर चळवळ त्याचकाळात एक दंतकथा बनली.
आणि तिचे अनेक नेतेसुद्धा.
नामदेव ढसाळ आणि राजा ढाले या दोन नेत्यांच्या नावानेच काही काळ ही संघटना ओळखली गेली.
"Success has many fathers, failure is an orphan" या म्हणीप्रमाणे या संघटनेतील अनेक नेत्यांनी अनेक बाबतींत स्वतःकडे श्रेय ओढून घेण्याचा प्रयत्न केला आणि अपयशासाठी इतरांकडे बोट केले.
दलित पॅन्थर हे नाव प्रथम नेमके कुणाला सुचले, संघटनेचे खरेखुरे संस्थापक कोण आणि कानामागून येऊन तिखट होणारे कोण अशा विविध मुद्द्यांबाबत या संघटनेमध्ये प्रचंड सुंदोपसुंदी झाली.
त्याचे पर्यवसान संघटना एकतर्फी बरखास्त करण्यात झाले आणि या सर्व नेत्यांनी शेवटी सवतासुभा स्विकारला तो अखेरपर्यंत.
या नेत्यांपैकी अनेकांनी दलित पँथरबाबत लिहिले आहे. त्यात आपणच कसे खरे होते आणि इतर जण कसे आडमुठे वागत होते याचे वर्णन केले आहे.
नामदेव ढसाळ यांनी आपल्या या मृत्यूपूर्व जबाबात काय म्हटले आहे याची मला उत्सुकता आहे.
संपूर्ण पुस्तक वाचून झाल्यावर त्याबाबत इथे मी लिहिणार आहेच.
Camil Parkhe
Comments
Post a Comment