ख्रिस्ती समाज : महाराष्ट्रातला आणि देशातल्या अनेक भागांतील ख्रिस्ती समाज फारच सोशिक, सहनशील आणि शांतताप्रिय समजला जातो.
'शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा' या बाबासाहेबांच्या संदेशातील शिकण्याबाबत या समाजाने मनावर घेतले तरी बाकी दोन बाबतींत आनंदीआनंद आहे.
या समाजावर अन्याय झाला, खूपच गळ्यापाशी आले तरच हा समाज रस्त्यावर येतो, मेणबत्ती पेटवून आणि शांतता मोर्चा घेऊन.
सुगावा प्रकाशनाचे प्रा विलास वाघ सर मला म्हणायचे, ``कामिल, तुमचे लोक फारच शांत, `एका गालावर मारले तर दुसरा गाल पुढे कर' हा येशूचा संदेश तुम्ही लोकांनी फारच मनावर घेतलाय !''
मला आठवते माझ्या लहानपणी खूप वर्षांपूर्वी हा समाज रस्त्यावर आला होता ते खासदार ओ पी त्यागी यांनी आणलेल्या धर्मांतर स्वातंत्र्य (म्हणजेच धर्मांतरविरोधी) विधेयकाला विरोध करण्यासाठी. (आता हा कायदा प्रॅक्टिकली देशात सगळीकडे अंमलातही आला आहे )
त्यानंतर ओडिशात ऑस्ट्रेलियन मिशनरी ग्रॅहम स्टेन्स आणि त्यांच्या दोन मुलांना जीपमध्ये ते झोपले होते तेव्हा जिवंत जाळून मारले होते तेव्हाही हा समाज एकवटला होता. तेव्हा तर इतिहासात पहिल्यांदा राष्ट्रपती के आर नारायणन असताना राष्ट्रपती भवनातून निषेधाचा खलिता काढण्यात आला होता !
नंतर मध्य प्रदेशातील झाम्बूआ येथील नन्सच्या बलात्कार प्रकरणी हा समाज रस्त्यावर आला होता.
खूप वर्षांनी पुन्हा एकदा धाडस करुन हा समाज पुण्यात शनिवारी, जुलै १ रोजी सकाळी दहा वाजता रस्त्यावर सायलेंट मोर्चा घेऊन येतो आहे.
पुण्यात क्वार्टर गेटपाशी असलेल्या ऑर्नेलाज स्कुल पासून कलेक्टर कचेरीपर्यंत .
निमित्त अर्थातच मणिपूर राज्यातील घटनाचे आहे.
देशात इतरत्रसुद्धा अशा शांतता रॅली निघणार आहेत .
अशी वेळ कुणावरही, कुठल्याही समाजघटकांवर कधीही न येओ !
Comments
Post a Comment