बार्देसकर समाजाच्या स्थलांतराची, त्यामागच्या कारणांची आजपर्यंत इतिहासकारांनी दखल घेतली नव्हती…
‘अक्षरनामा’
पडघम
 - सांस्कृतिक
कामिल पारखे
  • ‘द बार्देसकर्स - द हिस्टरी ऑफ मायग्रेशन’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Thu , 20 May 2021
  • पडघमसांस्कृतिकख्रिस्ती धर्मरोमन कॅथोलिकद बार्देसकर्स - द हिस्टरी ऑफ मायग्रेशनफादरबिशप

ही १९७६ची गोष्ट आहे. दहावीची परीक्षा दिल्यानंतर श्रीरामपूर येथील घर सोडून मी फादर प्रभुधर यांच्यासारखा जेसुईट (येशूसंघीय) धर्मगुरू होण्यासाठी कराड येथील त्यांच्या ‘स्नेहसदन’ या निवासस्थानी दाखल झालो. सोसायटी ऑफ जिझस या कॅथोलिक धर्मगुरूंच्या संस्थेच्या सदस्यांना ‘जेसुईट’ म्हणतात. कॅथोलिक चर्चमध्ये अशा फादरांच्या आणि नन्स वा सिस्टरांच्या शेकडो संस्था आहेत. उदा. डॉन बॉस्को (सॅलेशियन) फादर्स, मदर टेरेसा सिस्टर्स, फ्रान्सिलीयन फादर्स. सध्याचे पोप फ्रान्सिस हे सर्वोच्च पदावर पोहोचलेले जेसुईट संस्थेतील पहिले धर्मगुरू आहेत.

कराडला आल्यावर एका वेगळ्याच ख्रिस्ती समाजाची मला ओळख झाली. फादर प्रभुधर मला कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज, आजरा, राधानगरी, गारगोटी, कागल व चंदगड आणि कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी, कुकेरी व खानापूर तालुक्यांत घेऊन गेले. या प्रवासात बार्देसकर समाजाचा मला पहिल्यांदा परिचय झाला. गोव्यातील बार्देस तालुक्यातून तीन शतकांपूर्वी हे कॅथोलिक स्थलांतरित होऊन वरील ठिकाणी स्थायिक झाले आहेत. 

नव्यानेच ओळख झालेल्या या बार्देसकरांच्या विविध पैलूंनी मला भुरळ घातली. या समाजाची सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक आणि आर्थिक वैशिष्ट्ये औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, बीड आणि जालना जिल्ह्यांतील ख्रिस्ती समाजापेक्षा अगदी वेगळी होती. एक ख्रिस्ती धर्म वगळता या बार्देसकर समाजाचे मराठवाड्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील माझ्या ख्रिस्ती समाजाशी कुठलेही साधर्म्य नव्हते, याचे मला आश्चर्य वाटले.

पहिली गोष्ट म्हणजे बार्देसकर आपल्या कुटुंबांत आणि आपापसांत एक वेगळी भाषा बोलत होते. ती होती- ‘कोकणी’. गोव्यातील त्यांच्या पूर्वजांची ही भाषा त्यांनी जपली होती. त्या वेळेस यापैकी बरेचसे लोक बार्देसकर या आडनावाने ओळखले जायचे. गोव्यातल्या बार्देस तालुक्यातील म्हणून ‘बार्देसकर’. गेल्या काही दशकांत म्हणजे १९७०नंतर यापैकी अनेकांनी डिसोझा, फर्नांडिस, गोन्सालवीस, मोन्तेरो, डिकुन्हा, मस्कारेन्हास, लोबो, अशी त्यांची मूळ आडनावे पुन्हा लावायला सुरुवात केली आहे. आता या समाजाच्या नव्या पिढीला ‘बार्देसकर’ म्हणून संबोधणे आवडणारही नाही. त्याऐवजी आपला ‘गोयंकार’ म्हणून गोव्याचा वारसा सांगणेच ते अधिक पसंत करतील.

बार्देसकरांच्या या स्थलांतरामागच्या कारणांबाबत इतिहासकारांत मतैक्य नाही. गोव्यातील राजकीय सत्तास्पर्धा, पोर्तुगीज सत्तेविरुद्ध केलेले उठाव किंवा कॅथोलिक चर्चने पाखंडी मतांविरुद्ध जगभराप्रमाणेच गोव्यातही राबवलेले इन्क्विझिशन, अशी याबाबत विविध मते मांडली जातात.    

आपली कोकणी मातृभाषा – ‘आमची भास’ - आणि त्यांची नावे व आडनावे याशिवाय बार्देसकरांनी गोव्यातील आपल्या पूर्वजांचा कॅथोलिक ख्रिस्ती धर्माचा वारसाही जपला होता, ही खरोखर एक अविश्वसनीय  बाब होती. पण ख्रिस्ती धर्माच्या तत्त्वांची, शिकवण देण्यासाठी या नव्या भूमीत कॅथोलिक धर्मगुरू किंवा कॅटेकिस्ट (धर्मशिक्षक) नव्हते. दर रविवारी, नाताळ, गुड फ्रायडे अशा सणानिमित्त मिस्साविधी आणि इतर प्रार्थना करण्यासाठी या परिसरांत एकही ख्रिस्ती धर्मगुरू नव्हता.  

ख्रिस्ती समाजात फादर, पास्टर किंवा धर्मगुरू यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. पोप यांच्या नेतृत्वाखालचा रोमन कॅथोलिक हा जगातील सर्वांत संघटित धर्म. या धर्मात दर रविवारचा सामुदायिक मिस्सा विधी, त्याशिवाय नाताळ, गुड फ्रायडे वगैरे सणांनिमित्त भाविकासांठी चर्चमधील उपस्थिती बंधनकारक असते. या प्रार्थनांचे पौराहित्य फादर करतात. रोमन कॅथोलिक धर्मात बाप्तिस्मा, पवित्र कम्युनियन, प्रायश्चित, लग्न, अंत्यविधी वगैरे सप्तसंस्कार किंवा सात सांक्रामेंत केवळ धर्मगुरूच देऊ शकतात. थोडक्यात धर्मगुरूविना कॅथोलिक समाजाचे आध्यात्मिक, धार्मिक जीवन अशक्य आहे.

स्थानिक धर्मगुरू नसतानाही बार्देसकरांनी आपल्या धर्माचे काटेकोरपणे पालन केले, याचे मला नवलमिश्रित कौतुक वाटले होते. ख्रिस्ती धर्मगुरूंच्या अनास्थेमुळे किंवा दीर्घकालीन गैरहजेरीत मराठवाड्यात, अहमदनगर, नाशिक आणि पश्चिम महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमधील अनेक गावांत ख्रिस्ती धर्मच गायब झाला, हे मी अनुभवले आहे. एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकांत युरोपियन प्रोटेस्टंट आणि कॅथोलिक मिशनरींच्या प्रभावाखाली ख्रिस्ती धर्म स्वीकारणाऱ्या या परिसरांतील लोकांना काही काळानंतर पुरेशी धार्मिक, आध्यात्मिक पाळकीय किंवा पास्टरल सेवा मिळाली नाही. त्यामुळे एकतर ते पुन्हा हिंदू धर्मात - आपल्या मूळ जातींत - परतले किंवा डॉ.  बाबासाहेब  आंबेडकर यांच्या हजारो अनुयायांसह त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. बार्देसकरांची पाळेमुळे त्यांच्या पूर्वजांच्या धार्मिक श्रद्धेत खोलवर रुजलेली आहेत. त्यामुळे आपला धर्म टिकवणे, त्यात टिकून राहणे त्यांना शक्य झाले. 

एकदा मी फादर प्रभुधर यांच्यासोबत गडहिंग्लजला गेले होतो. तिथे जे. बी. बार्देसकर यांचे ‘साधना विद्यालय’ होते. ते त्या वेळी या समाजातील सर्वांत आदरणीय व्यक्ती होते. याशिवाय काही बार्देसकर स्थानिक महाविद्यालयांत आणि शाळांत शिक्षक होते, तर काही सरकारी विभाग आणि खासगी कंपन्यांमध्ये मोठ्या पदावर होते.

सुमारे १५ वर्षांपूर्वी मी फादर नेल्सन मच्याडो यांच्याबरोबर कौटुंबिक सुट्टीवर असताना राधानगरी धरणाच्या सरकारी गेस्ट हाऊसमध्ये थांबलो होतो. संध्याकाळी आमच्या लक्षात आले की, पार्किगमध्ये आमच्या गाडीशेजारी एक सरकारी गाडी उभी आहे. विशेष म्हणजे आमच्याप्रमाणेच त्या गाडीतही समोरच्या बाजूला रोझरी माळ अडकवलेली होती. ते एक कॅथोलिक कुटुंब आहे, हे त्यावरून स्पष्ट होत होते. त्यांनाही आमच्याबद्दल हे कळलेले असणार. (फक्त कॅथोलिक समाजात मदर मेरीकडे प्रार्थना केली जाते, प्रोटेस्टंट समाजात मारिया मातेला इतके आदराचे स्थान नसते.) दुसऱ्या दिवशी सकाळी जेवणाच्या खोलीत नाश्ता झाल्यावर ती महिला आली आणि फादर मच्याडो यांना म्हणाली, “तुम्ही फादर आहात का?” त्यांनी ‘हो’ म्हटले तसे ती म्हणाली, “तर मग आपण नक्कीच फादर नेल्सन मच्याडो असणार!” 

तेव्हा आम्हाला धक्का बसला. आपले बोलणे चालू ठेवत पुढे ती म्हणाली, “फादर, मी लहान बाळ होते, तेव्हा गडहिंग्लजला तुम्ही माझा बाप्तिस्मा केला होता. फादर, मी जे. बी. बार्देसकर सरांची मुलगी!”

ते पती-पत्नी मुंबईतील मंत्रालयात सचिवपदांवर अधिकारी म्हणून कार्यरत होते. या घटनेने बार्देसकर समाजाने विविध क्षेत्रांत मारलेली मजल पुन्हा एकदा माझ्या लक्षात आली.

बार्देसकरांनी स्थानिक मराठी आणि कन्नड भाषेला आपली ‘मायमावशी’ म्हणून स्वीकारले आहे, मात्र  तरीही त्यांनी त्यांची मातृभाषा कोंकणी आणि ख्रिस्ती श्रद्धा, विश्वास जपून आपली वेगळी ओळख कायम ठेवली आहे.

कोल्हापूर आणि बेळगावजवळील आजरा, वाटंगी, हेब्बाळ, चंदगड, संतीबस्तवाड आणि इतर ठिकाणी प्रवास करताना मला जाणवले की, बार्देसकरांनी आपल्या नवीन, स्थलांतरित प्रदेशात जमिनी आणि शेती घेतल्या आहेत, बैठी घरे बांधली आहेत. त्यामुळे त्यांना स्थानिकांशी एकजीव होण्यास मदत झाली आणि आपल्या उदरनिर्वाहाची संधीही मिळाली. १९७०-८०च्या दशकात बार्देसकर तरुणांनी शाळा-कॉलेजांत शिकून आपली क्षितिजे विस्तारली. गडहिंग्लजमधील साधना विद्यालय आणि आजरा येथील रोझरी स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमुळे त्यांना आधुनिक युगातील भाषेत प्रावीण्य मिळवण्यास मदत झाली. साहजिकच ही तरुण पिढी पुण्या-मुंबईसारख्या मोठ्या शहरांतील हिरव्या कुरणांकडे आकर्षित झाली.

बार्देसकरांच्या तरुण पिढ्यांनी शिक्षण मिळवून बेळगाव आणि कोल्हापूर जिल्ह्यांतून मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांत स्थलांतर केले. पुण्यात आणि पिंपरी-चिंचवड औद्योगिक शहरात बार्देसकरांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती आहे.

एकदा मी बार्देसकरांच्या एका कुटुंबातील लग्नाला गेलो होतो, बहुदा आजराजवळ वाटंगी येथे. तेव्हा या समाजात ज्या विवाहविधी आणि परंपरा पाळल्या जातात, ते मी जवळून, अगदी उत्सुकतेने अनुभवले. लग्नसोहळ्यासाठी वधू-वर आपापल्या घरांतून बाहेर पडले, तेव्हा कोकणी लोकगीते गायली जात होती. पुरुष-स्त्रिया कोकणी गाणी गाण्यात सहभागी झाले. लग्नाची वरात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेली आणि नंतर चर्चमध्ये पोहोचली, तेव्हा फादरांनी जोडप्याचे कोकणी भाषेत कॅथोलिक रितीरिवाजानुसार लग्न लावले. 

बेळगावजवळच्या संतीबस्तवाड येथील जेसुईट फादर कारीदाद द्रागो यांच्या गुरूदीक्षा विधीला मी हजर होतो. विधी सोहळ्यापूर्वी अशाच पारंपरिक प्रथांचा आणि कोकणी गीतांचा कार्यक्रम पार पडला. कॅथोलिक कॅनन लॉनुसार या विधी सोहळ्याचे पौराहित्य केवळ बिशप यांनाच करता येते. त्यानुसार बेळगाव धर्मप्रांताचे म्हणजे डायोसिसचे बिशप हजर होते.

त्याच्या आधी काही वर्षांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरजवळच्या उंबरी या गावी पार पडलेल्या जेसुईट फादर जेम्स शेळके यांच्या गुरूदीक्षा विधीलासुद्धा उपस्थित होतो. श्रीरामपूर आणि जवळच्या पॅरिशमधल्या आम्हा लोकांच्या जाण्या-येण्यासाठी ट्रकची व्यवस्था करण्यात आली होती. त्याचे पुणे धर्मप्रांताचे बिशप विल्यम गोम्स यांनी पौराहित्य केले असावे.

१९७०च्या दशकात अहमदनगर जिल्ह्यात ख्रिस्ती धर्म केवळ १०० वर्षं जुना होता. अहमदनगर जिल्ह्यातील पहिले जेसुईट फादर थॉमस भालेराव (नंतर नाशिक धर्मप्रांताचे पहिले बिशप) यांच्या १९६५ सालच्या गुरूदीक्षेनंतर या जिल्ह्यात आणखी एका धर्मगुरूचा दीक्षाविधी होत होता. त्या काळात या ख्रिस्ती समाजात मोजकेच धर्मगुरू होते. उंबरीत सोहळ्याआधी स्थानिक मराठी लोकगीते गायली गेली नव्हती. बहुधा तिथे ख्रिस्ती धर्मही नवा होता. आणि विधी सोहळा तर माझ्यासह अनेक जण पहिल्यांदाच पाहत होते.

ही कोकणी लोकगीते, दीक्षाविधी, लग्न आणि समारंभ सोहळ्याशी संबंधित इतर परंपरा बार्देसकरांनी बार्देस तालुक्यातली मूळ गावे सोडली, तेव्हा सोबत आणल्या. त्यांचे जतन केले, याचे मला आश्चर्य वाटले. ही गाणी अजूनही गायली जातात. गोव्यातल्या त्यांच्या मूळ गावांत आजमितीला ही कोकणी लोकगीते गायली जात असतील काय, या लोकपरंपरा पाळल्या जात असतील काय, याबद्दल मला शंका वाटते.

बार्देसकरांच्या शब्दसंग्रहात कोल्हापूर जिल्ह्यात काही मराठी किंवा बेळगाव जिल्ह्यात कन्नड शब्ददेखील घुसले आहेत. कॅथोलिकांमध्ये बोलल्या जाणाऱ्या कोकणीत, विशेषत: दक्षिण गोव्यामध्ये, पोर्तुगीज भाषेतील अनेक शब्द असतात. उदा. खुर्चीसाठी कदेल. गाण्यासाठी कांतार (मराठीत गायन किंवा गाणी) लग्नासाठी काजार, चर्चसाठी इगरज, चॅपेलसाठी कपेल इत्यादी.

या स्थलांतरित बार्देसकरांनी गोव्यातल्या आपल्या गावांशी असलेली नाळ जपण्यासाठी खूप कष्ट घेतले. त्यामुळे गोव्यातल्या त्यांच्या वाडवडिलोपार्जित घरांवर जमिनीवर आणि इतर मालमत्तांवर त्यांचा हक्क कायम राहिला आहे. पोर्तुगीज राजवटीचा गोव्यात आजही असलेला एक वारसा म्हणजे तेथील कम्युनिदाद ही शेतकऱ्यांची सहकारी संस्था. तिच्यात असलेल्या झोण किंवा शेअर्सचे त्यांनी वेळोवेळी नूतनीकरण केले. आपल्याकडे जमिनीचा सात-बाराचा असतो, त्याप्रमाणे हा ‘झोण’ असतो. त्यावर आपल्या मुलांचे नाव घालण्याबाबत ते जागरूक राहिले. त्यामुळे बार्देसकर आपल्या मूळ भूमीत, गावांत ‘भायलें’ (उपरे) ठरलेले नाहीत.

कोल्हापूर आणि बेळगाव जिल्ह्यांतील अनेक गावांतल्या भेटीदरम्यान हळूहळू माझ्या लक्षात आले की, प्रथम लक्षणी दिसतो तसा बार्देसकर हा एकसंध, एकजिनसी समाज नाही. या गावांत असलेल्या बार्देसकरांच्या सर्व कुटुंबांमध्ये वैवाहिक संबंधांची म्हणजे सर्रास रोटीबेटीची परंपरा नव्हती. एखाद्या खेड्यातील काही कुटुंबांचे केवळ विशिष्ट खेड्यांमधील कुटुंबांशी वैवाहिक संबंध जुळले जाऊ शकत होते.

गोव्यातून येताना बार्देसकरांनी कोकणी भाषा, रोमन लिपी, रोमन कॅथोलिक धर्म याबरोबरच कॅथोलिक ख्रिस्ती समाजात असलेली जातिप्रथा आणि जातीभेदही सोबत आणले होते. सोळाव्या शतकात गोव्यात पोर्तुगीज आल्यानंतर तिथे ख्रिस्ती धर्मांतर झाले, तेव्हा हिंदू धर्मातील सारस्वत, क्षत्रिय वगैरे मूळ जाती या लोकांनी आपल्यासोबत आणल्या होत्या आणि त्या या समाजात आजतागायत कायम राहिल्या आहेत. त्यामुळेच बार्देसकरांमध्ये रोटीबेटीचे व्यवहार सर्रासपणे होत नव्हते.

ख्रिस्ती धर्मात जातींना व जातीभेदास बिलकूल स्थान नाही, असे कॅथोलिक वा ख्रिस्ती धर्माधिकारी कितीही सांगत असले तरी अनेक शतकांपासून गोव्यात आणि भारतातल्या इतर प्रदेशांत ख्रिस्ती समाजातही जातीव्यवस्था ठाण मांडून राहिली आहे. गोव्यातल्या त्यांच्या भाऊबंदाप्रमाणेच बार्देसकारांनीही हा वारसा जतन केला होता.

अस्पृश्यतेचा आणि जातीवादाचा हा भारतीय संस्कृतीतला शाप किंवा कलंक भारतातल्या ख्रिस्तीही समाजात खूप शतकांपासून आहे. सोळाव्या शतकात मदुराई, तामिळनाडू परिसरात ख्रिस्ती धर्माचा प्रसार झाला, तेव्हापासून हा जातिभेद आढळतो. इटालियन जेसुईट धर्मगुरू रॉबर्ट डी नोबिली यांच्या चरित्रात याविषयी माहिती मिळते. नोबिली यांनी हिंदू धर्मातील वरच्या-खालच्या जातींमध्ये ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्याच्या हव्यासापायी त्यांचे जातिभेद आणि अस्पृश्यता यांचेही ख्रिस्ती धर्मात स्वागत करून जातिप्रथा आणली असे म्हटले जाते. मराठीत फादर बर्टी रोझारिओ यांनी रॉबर्ट डी नोबिली यांचे छोटेखानी चरित्र लिहिले आहे.

पुण्यातल्या सेंट व्हिन्सेंट आणि लोयोला स्कूलचे माजी प्राचार्य असलेले फादर बर्टी रोझारिओ हेसुद्धा एक बार्देसकरच. इंग्रजी पत्रकारितेतील ज्येष्ठ पत्रकार असलेले मायकल गोन्सालवीस हे बार्देसकर समाजातील आणखी एक प्रमुख व्यक्तिमत्त्व. 

महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात, मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रातील ख्रिस्ती समाजात जातीव्यवस्था आणि रोटीबेटी व्यवहारात पाळले जाणारे नियम आहेत. पालघर जिल्ह्यातील वसई येथील ख्रिस्ती समाजसुद्धा यास अपवाद नाही. मध्ययुगीन काळात वसईमध्येसुद्धा पोर्तुगीजांची सत्ता होती.

गोव्यातील ‘नवहिंद टाईम्स’ या इंग्रजी दैनिकात वार्ताहर असताना बार्देसकरांविषयी लिहिण्याचा योग आला. ओल्ड गोवा येथील सेंट फ्रान्सिस झेवियरच्या तीन डिसेंबरच्या ‘फेस्ता`ला म्हणजे सणाला फादर प्रभुधर कोल्हापूर जिल्ह्यातील बार्देसकर यात्रेकरूंसह पदयात्रा करत आले होते. ‘Their ways of reaching Him’ या मथळ्यासह माझी बातमी ३ डिसेंबर १९८२ रोजी प्रसिद्ध झाली. 

मूळ गोयंकार असलेल्या आणि बार्देसकर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या समाजाविषयी गोव्यातील वाचकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आणि ते ‘वाचकांचा पत्रव्यवहार’ या सदरातून दिसून आले.  इतिहासाचे ज्ञान असलेल्या एका वाचकाने बार्देसकर समाजाचे इतक्या मोठ्या प्रमाणात स्थलांतर का झाले, याविषयी एक सिद्धान्त मांडला होता.

त्यामुळे मला बार्देसकारांच्या प्रचलित सामाजिक, आर्थिक, धार्मिक व भाषिक परिस्थिती आणि त्यांच्या स्थलांतराच्या विविध सिद्धान्तांविषयी ‘नवहिंद टाईम्स’मध्ये दोन लेख लिहिण्यास प्रेरणा मिळाली. हे दोन लेख वाचून मडगाव मतदारसंघाचे तेव्हाचे अपक्ष आमदार आणि कोकणी लेखक  उदय भेंबरे यांनी बार्देसकर समाजाच्या आत्तापर्यंतच्या अज्ञात पैलूंवर प्रकाश टाकल्याबद्दल अभिनंदनही केले होते. त्याचबरोबर बार्देसकरांनी त्यांच्या नवीन भूमीत आपली मातृभाषा जपली, याबद्दल या समाजाची विशेष प्रशंसा केली होती.

माझ्याशी बोलताना आमदार भेंबरे म्हणाले होते की, गोव्याबाहेर स्थायिक झालेला बार्देसकर समाज हा समाजशास्त्रज्ञ, इतिहासकार, मानववंशशास्त्रज्ञ, भाषातज्ज्ञ आणि इतर विविध विद्याशाखांमधील संशोधकांसाठी एक उत्कृष्ट ‘केस स्टडी’ आहे.

मानवी इतिहासात एखाद्या समाजाची अशी ‘मास एक्सडोड्स’ किंवा ‘एकगठ्ठा स्थलांतरे’ अनेकदा झालेली आहेत. त्यापैकी ज्यू लोकांचे इस्राएल या आपल्या मायभूमीतून (प्रॉमिस्ड लँड- देवाने वचन दिलेल्या भूमीतून) अडीच हजार वर्षांपूर्वी जबरदस्तीने झालेले स्थलांतर हे एक खूप गाजलेले उदाहरण. या स्थलांतराच्या वेळी ज्यु लोकांनी केलेल्या विलापासंबंधी ‘बाय द रिव्हर्स ऑफ बॅबिलॉन’ हे बायबलवर आधारित ‘बॉनी-एम’ या ग्रुपने गायलेले खूप गाजलेले गीत आहे. ज्यूंच्या या स्थलांतरामुळे मानवी इतिहासात जगभर अनेक घडामोडी झालेल्या आहेत. आजही इस्राएल-पॅलेस्टाईन संघर्षातून त्याचे चटके सर्व जगाला भोगावे लागत आहेत.

केरळ, गोवा, गुजरात, पश्चिम बंगाल, पंजाब वगैरे राज्यातील लोकांनीही देशात आणि परदेशांत मोठ्या प्रमाणात स्थलांतर करून तेथे आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे.

बार्देसकरांच्या स्थलांतराची, त्यामागच्या कारणांची मात्र आजपर्यंत इतिहासकारांनी दखल घेतलेली नव्हती. पुण्यातील एक उद्योजक आणि बार्देसकर असलेल्या अल्फी मोन्तेरो यांनी ही उणीव भरून काढली आहे. त्यांनी अलीकडेच ‘द बार्देसकर्स - द हिस्टरी ऑफ मायग्रेशन’ या नावाने एक इंग्रजी पुस्तक लिहिले आहे. बार्देसकरांची मातृभाषा कोकणी आणि मायमावशी मराठी या दोन्ही भाषांत त्याचे लवकरच अनुवाद होतील.   

Comments

Popular posts from this blog

Dnyanodaya monthly enters 175th year

A day at Mother Teresa’s Home for Destitutes

Fr. Rudolf Schoch. A Jesuit Looks back in satisfaction