पंडित नेहरु आणि गोवा .... ``गोवा के लोक अजीब है''


( मांडवीतून बोटीने पणजीत आलेल्या पंतप्रधान पंडित नेहरुंचा हा दुर्मिळ फोटो. पंडितजींनी गोव्याला २२ मे १९६३ रोजी पहिल्यांदाच भेट दिली. )

`` पोर्तुगीजांची वसाहत असणाऱ्या गोव्याच्या मुक्तीसाठी १९५५ साली गोव्यात आपला ऐतिहासिक सत्याग्रह करण्यापूर्वी समाजवादी नेते श्री. ना. ग. उर्फ नानासाहेब गोरे यांनी त्यावेळच्या गोव्यातील पोर्तुगीज गव्हर्नर जनरलला एक पत्र लिहिले होते. गोव्यात सत्याग्रह करण्यामागील आपली भूमिका त्यांनी या पत्रात स्पष्ट केली होती.
`आमच्या या कृतीने तुमची सत्ता मोडेल असे मानण्याचे अतिरेकी धाडस आम्ही करत नाही’ अशी स्पष्ट कबुली त्यांनी दिली होती पण या वाक्याला जोडूनच त्यांनी लिहिले होते.
``परंतु आमच्या प्रयत्नांचा काहीच परिणाम होणार नाही असे मात्र आम्हाला वाटत नाही. गोव्याच्या लढ्यात आम्ही (गोवेकर सोडून इतर भारतीय) सहभागी केल्यामुळे गोवा आणि भारत यामधील कृत्रिम सरहद्दीच्या दोन्ही बाजूस राहणारे लोक शाश्वत बंधुप्रेमाने एकत्र येतील. शिवाय ज्यांचा भविष्यकाळ सध्या पोर्तुगालच्या हातात आहे. त्यांच्या स्वातंत्र्याची सुप्रभात उगवण्याच्या प्रक्रियेला गती मिळेल.’’
पारतंत्र्याच्या बेडीतुन गोव्याची मुक्तता करण्यासाठी या पोर्तुगीज वसाहतीवर निःशस्त्र स्वारी करणाऱ्या या सत्याग्रहींस चुकूनही कल्पना आली नसेल कि पत्रातील वरील उतारा एक भविष्यवाणी ठरून त्यानंतर केवळ सहा वर्षातच गोव्यातील ४५० वर्षाची पोर्तुगीजांची सत्ता कोलमडून पडेल .
पण अखेर असेच घडले.
तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंच्या आदेशानुसार भारतीय सेनेने गोव्यात प्रवेश केला आणि जवळजवळ कुठल्याही प्रतिकाराविना गोवा १९ डिसेम्बर १९६१ साली मुक्त झाला.
कारवार येथे १९५४ साली भरलेल्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचे श्री. नानासाहेब गोरे अध्यक्ष होते. पारतंत्र्यात असलेल्या गोमंतकातील मराठी साहित्यिकांची संमेलने तोपर्यँत गोमंतकाबाहेरच भरत असत. यापुढील गोमंतकीय मराठी साहित्य संमेलन गोव्यातच व्हावे अशी इच्छा नानासाहेबांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली अन यातूनच गोवा मुक्तीसाठी भारतीयांनी गोवेकरांच्या खांद्यास खांदा लावून लढा उभारण्याची कल्पना जन्मास आली.
पुण्याला परतल्यानंतर नानासाहेबांनी आपले समाजवादी साथी एस. एम. जोशी यांची भेट घेतली आणि गोवा मुक्तीसाठी गोव्यात प्रवेश करून तेथे सत्याग्रह करण्याचा आपला मनोदय व्यक्त केला.
एसेम यांनी सत्याग्रहाच्या कल्पनेचे स्वागतच केले.
``पण त्याचवेळी पोर्तुगीजांच्या वसाहतीत स्वातंत्र्यासाठी अगदी शांततामय सत्याग्रह करणेही किती धोकादायक आहे याची मला स्पष्ट कल्पना दिली. ''
ब्रिटिश आणि पोर्तुगीज राज्यकर्त्यांमध्ये हाच फरक होता. गोव्यातील आपल्या सत्येला आव्हान देणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला - मग ती सशस्त्र असो वा निशस्त्र - पोर्तुगीज राज्यकर्ते दीर्घ कारावासाची शिक्षा देत असत. अनेक स्वतंत्रसैनिकांनी या लढ्यात तर प्राणही गमावले होते.
गोवा मुक्तीसाठी त्या काळात पुण्यात स्थापन झालेल्या गोवा विमोचन सहायक समितीचे नानासाहेब एक कार्यवाह होते. या समितीतर्फे गोव्यात पाठविण्यात येणाऱ्या भारतीय सत्याग्रहींच्या पहिल्या तुकडीचे नेते म्हणून नानासाहेबांची निवड करण्यात आली.
समितीतर्फे १५ ऑगस्ट १९५५ साली गोव्यात सामुदायिक सत्याग्रह आयोजित करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला होता. गोवा मुक्तीसाठी गोव्यात आणि गोव्याबाहेर कार्यरत असलेल्या गोवा नॅशनल काँग्रेसने त्यावेळेस श्री. नानासाहेब गोरे याना त्यांच्या सत्याग्रहप्रित्यर्थ निरोप देण्यासाठी मुंबईतील शिवाजी पार्क येथे सभा आयोजित केली होती.
आचार्य अत्रे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. श्री. पीटर अल्वारीस, त्रिस्ताव ब्रगांझा (टी. बी) कुन्हा वगैरे जेष्ठ गोवा स्वातंत्र्यसेनानांची याप्रसंगी भाषणे झाली होती.
नानासाहेबांच्या सत्याग्रहाच्या तुकडीने पुण्याहून गोव्याच्या दिशेने १२ मे १९५५ रोजी प्रस्थान केले. वयोवृद्ध स्वतंत्रसेनानी सेनापती बापट हेही या तुकडीत सहभागी झाले होते. सत्याग्रहींची संख्या सुरुवातीस ३२ होती तर वाटेत आणखी व्यक्ती या तुकडीत सामावून सत्याग्रहींची संख्या ६८ पर्यंत पोहोचली.
यापैकी चार सत्याग्रही गोमंतकीय होते. ५३ महाराष्ट्रीयन होते. ३ उत्तर प्रदेशचे आणि राजस्थान, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यातील प्रत्येकी एक व्यक्ती होती.
या सत्याग्रह मोहिमेचे वर्णन करताना नानासाहेब म्हणतात, ``गोव्यापर्यंतच्या आमच्या प्रवासात आम्हा सत्याग्रहींचे जयसिंगपूर, कोल्हापूर, बेळगाव आणि इतर ठिकाणी उत्साहाने स्वागत करण्यात आले. गोवा मुक्तीविषयी भारतीयांच्या भावना इतक्या तीव्र असतील अशी कुणी कल्पनाही केली नव्हती. `भारत छोडो’ या १९४२च्या चळवळीत निर्माण झालेल्या वातावरणासारखीच परिस्थिती यावेळीही आम्हाला दिसून आली.’’
आपल्या सत्याग्रहातील भूमिका स्पष्ट करताना नानासाहेबांनी गोव्याच्या पोर्तुगीज गव्हर्नर जनरलला लिहिले होते, ``ज्या परिस्थितीत गोवा, दमण आणि दिवला भारतात विलीन होणे शक्य होईल ती परिस्थिती निर्माण व्हायला आम्ही कारणीभूत होऊ इच्छितो. ज्याप्रमाणे शंभराहून अधिक वर्षे ब्रिटिशांनी भारतावर राज्य केले म्हणून आमचा देश ब्रिटिश होऊ शकला नाही. त्याचप्रमाणे या टीचभर तुकड्यावर तुम्ही कितीतरी वर्षे राज्य केले म्हणून तो प्रदेश पोर्तुगीज होऊ शकत नाही. आम्हाला माहित आहे कि गोवा- दमण- दिवच्या जनतेला तुमचे स्वामित्व नको आहे. तुमच्या स्वामित्वाविरुद्ध ती बंद करून उठली आहेत आणि त्या लोकांचे आम्ही (गोवेकरा व्यतिरिक्त इतर भारतीय) भाईबंद असल्यामुळे त्यांना स्वतंत्र मिळविण्याच्या बाबतीत मदत करणे आम्ही आमचे कर्तव्य समजतो.
गोव्याच्या लोकांनी तुमच्या प्रशासकीय दहशतीविरुद्ध दीर्घकाळ लढा दिलेला आहे आणि आपले रक्त सांडले आहे. जर या विषम, कठोर संघर्षात आम्ही स्तब्धपणे बघ्याची भूमिका घेतली आणि तुम्ही करीत असलेली पाशवी हिंसा अविरतपणे चालू दिली तर भावी पिढ्या आम्हाला अपराधी ठरवतील.’’
या पत्राची एक प्रत पंतप्रधान पंडित नेहरू यांना पाठविण्यात आली होती.
या सत्याग्रहींच्या तुकडीचे स्वागत गोव्यात डिचोलीजवळ सशस्त्र पोर्तुगीज पोलिसांनी केले. नानासाहेब, सेनापती बापट यांच्यासह सर्व सत्याग्रहींना यावेळी बेदम मारहाण करण्यात आली. नानासाहेब वगळता इतर सर्व सत्याग्रहींना नंतर गोव्याच्या सरहद्दीबाहेर नेऊन सोडण्यात आले. नानासाहेबांची तुरुंगात रवानगी करण्यात आली.
त्यांच्यानंतर गोव्यात सत्याग्रहींच्या तुकडीचे नेतृत्व करणाऱ्या श्री. शिरूभाऊ लिमये, श्री. जगन्नाथराव जोशी, श्री. मधू लिमये, खासदार श्री. त्रिदिब कुमार चौधरी या सर्वांवर लष्करी न्यायालयात खटला भरण्यात आला. यापैकी बहुतेक नेत्यांना दहा वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. परंतु `अम्नेस्टी इंटरनॅशनल’मुळे अडीच वर्षानंतर त्यांची मुक्तता करण्यात आली.
केवळ स्वातंत्र्याचे नारे लागवल्याबद्दल निशस्त्र सत्याग्रहींना दहा वर्षाच्या कारावासाची शिक्षा मिळाल्याच्या वृत्ताने त्यावेळेस भारतात मोठी खळबळ निर्माण झाली होती.
``या शिक्षेची बातमी कळताच माझ्या आई वडिलांना धक्काच बसला. माझी आणि त्यांची पुन्हा कधीही भेट होणार नाही असेच त्यांना वाटले,’’ असे नानासाहेब म्हणतात.
नानासाहेबांना दहा वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा फर्माविण्यात आली तेव्हा त्यांच्या वडिलांचे वय ८२ वर्षाचे होते.
नानासाहेब तुरुंगात असताना त्यांना कोणत्या प्रकारची पुस्तके वाचण्यास आवडतात, अशी विचारणा पंतप्रधान नेहरुंनी नानासाहेबांच्या पत्नीकडे केली होती. त्यानंतर पंडितजींनी पुस्तकांचा एक गठ्ठा नानासाहेबांना पाठविण्याची व्यवस्थाही केली.
``पण ही पुस्तके माझ्या तुरुंगाच्या कोठडीत कधीच पोहोचली नाहीत’’, नानासाहेबांनी मला हसत हसत सांगितले.
नानासाहेबांची तुरुंगातून मुक्तता झाली तेव्हा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीने जोर घेतला होता. या काळात झालेल्या (1957) निवडणुकीत नानासाहेब पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडून आले.
लोकसभेतील आपल्या पहिल्याच भाषणात नानासाहेबांनी गोवा मुक्तीचा विषय उपस्थित केला होता.
या काळात भारत सरकारने लष्करी कारवाई करून गोवा मुक्त करावा यासाठी राष्ट्रवादी मंडळी सरकारवर सतत दबाव आणत होती. त्यावेळी पंतप्रधान नेहरू यांनी श्री. पीटर अल्वारीस, बॅरिस्टर नाथ पै आणि श्री. नानासाहेब गोरे यांच्याशी प्रश्नावर चर्चा केली.
``गोवा मुक्त करण्यासाठी गोमंतकीय नागरिक पोर्तुगीज सरकारविरुद्ध तीव्र लढा करू शकतील काय’’ असा प्रश्न पंडितजींनी या बैठकीत आम्हाला विचारला.
‘’पण अहिंसा, सत्याग्रहासारख्या आंदोलनांनी पोर्तुगीजांवर दबाव आणण्याचा काळ कधीच मागे गेला आहे. आता एकच पर्याय राहिलेला आहे, तो म्हणजे लष्करी कारवाई’’ असे उत्तर मी पंडितजींना दिले,’’ असे श्री. गोरे म्हणतात.
``लष्करी कारवाईच्या आमच्या सल्ल्यानेच पंडितजींनी नंतर कारवाई केली असा दावा मी करत नाही. पण यानंतर वेळोवेळी घेतल्या भूमिकेवरून कारवाईचा त्यांनी ठाम निर्णय होता हे स्पष्ट झाले व पोर्तुगीज शासनालाही ह्याची स्पष्टता आली होती’’, श्री. गोरे पुढे म्हणतात.
स्वातंत्र्यसैनिकांचा निशस्त्र उठाव, आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिष्टाई वगैरे सर्व प्रयत्नानंतरही पोर्तुगीजांनी सोडण्यास नकार दिला.
नेहरुंच्या आदेशावरून भारतीय लष्कराने गोवा, दमण आणि दिवमध्ये प्रवेश केला अन गोवा स्वतंत्र झाला.
गोव्याच्या मुक्तीसाठी हुतात्मा सांडलेले रक्त आणि स्वातंत्र्य श्रम वाया गेले नाही अन ४५० प्रदीर्घ काळानंतर गोवा पुन्हा भारत भूमीशी संलग्न झाला. ‘’
-----
माझ्या वृत्तपत्रांच्या बायलाईनांची पोतडी काही दिवसांपूर्वी उघडली आणि गोव्यात `गोमंतक'ने आणि औरंगाबादला `मराठवाडा' च्या रविवारच्या पुरवणीत छापलेला वरचा हा लेख सापडला.
गोव्याच्या मुक्तिदिनाबद्दल हा माझा खूप जुना म्हणजे १९९१ सालचा म्हणजे वीस वर्षांपूर्वीचा हा लेख.
(गोव्यातील विद्यार्थीकाळातले माझे दोस्त संदेश प्रभुदेसाई यांनी अलीकडेच फेसबुकवर टाकलेला, मांडवीतून बोटीने पणजीत आलेल्या पंतप्रधान
पंडित नेहरुंचा हा दुर्मिळ फोटो. पंडितजींनी गोव्याला २२ मे १९६३ रोजी पहिल्यांदाच भेट दिली.
''गोवा के लोक अजीब है'' हे पंडितजींचे एक वाक्य प्रसिद्ध आहे. )
३० मे या दिवशी स्वतंत्र गोवा राज्याची स्थापना झाली. पंतप्रधान राजीव गांधी यांच्या उपस्थितीत मिरामारजवळील कंपाल मैदानावर ३० मे १९८७ रोजी झालेल्या या कार्यक्रमाला मी हजर होतो.
हा लेख नजरेखालून घालताना मीच तो लिहिलेला आहे यावर विश्वास बसेना. वीस वर्षांपूर्वी नानासाहेब गोरे यांना पुण्यातल्या सदाशिव पेठेतल्या त्यांच्या गढीवजा घरात घेतलेल्या मुलाखतीनंतर तो लेख मी लिहिला होता, हे मात्र स्पष्ट आठवते.
`गोमंतक'चे संपादक नारायण आठवले उर्फ अनिरुद्ध पुनर्वसु ( हे नंतर शिवसेनेच्या तिकिटावर १९९८ साली मुंबईतून लोकसभेवर निवडून गेले) यांनी गोव्याच्या मुक्तिदिनाच्या रौप्यमहोत्सवानिमित्त खास पुरवणीचा पहिला लेख म्हणून तो वापरला होता.
जयदेव डोळे यांनी हा लेख `मराठवाडा' पुरवणीत प्रसिद्ध केला होता.
वृत्तपत्रांच्या बायलाइनींच्या या पोतडीत कितीतरी बायलाईन्स आहेत कि ज्याभोवती अनेक महत्त्वाच्या व्यक्तींविषयी, घटनांविषयी आठवणी साचलेल्या आहेत.
एकएक बायलाईनवर नजर टाकली कि तो ३०, ४० वर्षांआधीचा काळ, त्या व्यक्ती नजरेसमोर उभ्या राहतात .
एक बायलाईन पाहिली कि चाकणजवळच्या आंबेठाण गावी जाऊन शरद जोशींची घेतलेली भेट आठवते. जिन्स पॅन्ट आणि कॉलर असलेल्या हाफ बाहींचा टी-शर्टवजा पांढरा शर्ट हा त्यांचा `ड्रेस कोड’ नकळत मी कधी स्विकारला ते मला कळालेही नव्हते.
गोव्यातल्या आणि पुण्यातल्या अशा कितीतरी व्यक्तींवर लिहिलेले लेख या पोतडीत आहेत.
कधीतरी एकदा मांड ठोकून यापैकी आजही relevant, संदर्भमूल्य असणारे काही लेख पुन्हा एकदा वाचकांसमोर आणावे म्हणतो.

Comments

Popular posts from this blog

Shakuntala Paranjape : Crusade of a lifetime

Dnyanodaya monthly enters 175th year

Fr. Rudolf Schoch. A Jesuit Looks back in satisfaction