पगारी नोकरीतील लॉगआऊट

 


त्या दिवशी सकाळी मुंबई-पुणे हमरस्त्यावरील पिंपरीचिंचवडच्या मोरवाडी इथल्या `सकाळ’च्या ऑफिसात जाऊन `pcamil’ या नावाने लॉग इन केले. डेस्क टॉपवर असलेला माझा वैयक्तिक मराठी आणि इंग्रजी मजकूर, लेख, वगैरे स्वतःला मेल केला, काही मजकूर आणि फोटो पेन ड्राईव्हवर सेव्ह करुन मग तिथले सर्व डिलीट केले. डेस्कमधील सगळ्या ड्रॉवर्सतील पुस्तके वगैरे बॅगांत भरल्या. त्या जवळजवळ नव्या, वातानुकूलित ऑफिसमध्ये या टोकापासून त्या टोकापर्यंत, मधल्या त्या माझ्या आवडत्या टिव्हीसेटकडे, स्वतःच्या खुर्चीवरुन एकदाचे भरभरुन पाहून घेतले.
पुन्हा एकदा आता कोऱ्या झालेल्या डेस्कटॉपवर अखेरची नजर टाकली आणि `pcamil’ या सकाळ माध्यमसमूहातील एका व्यक्तीला कायमसाठी लॉगआऊट केले.
गेली सोळा वर्षे म्हणजे २००४च्या फेब्रुवारीपासून हा `pcamil’ सकाळच्या शनिवारवाड्याजवळच्या इमारतीत, शिवाजीनगरच्या वातानुकूलित आणि बाहेर हिरवागार परीसर असलेल्या सुंदर संकुलात, नंतर बाणेर येथे एसआयएलसीच्या हिरव्यागर्द परिसरात आणि मागील दोन वर्षांपासून पिंपरीच्या मुंबई-पुणे हमरस्त्यावरच्या ऑफिसात कार्यरत होता.
खरे म्हटले तर तीन वर्षांपूर्वीच सकाळ माध्यमसमूहातून तेरा वर्षांच्या नोकरीनंतर मी म्हणजे pcamil रितसर निवृत्त झालो होतो. मात्र नोकरीच्या शेवटच्या दिवशी `सकाळ टाइम्स’चे संपादक रोहित चंदावरकर आणि सकाळ माध्यमसमूहाचे मुख्य संपादक श्रीराम पवार यांनी मला बाणेरच्या `एसआयएलसी’त पाठवून तेथे अपूर्वा पालकर यांच्याबरोबर एका नव्या प्रकल्पावर काम करण्यासाठी पाठविले होते.
या माध्यमसमूहात माझा मुक्काम वाढविण्यात आला होता. ''Camil, we need
you !'' असे जरी संपादक रोहित चंदावरकर म्हणत होते तरी मलाच ते मदत करीत होते हे मला माहीत होते. नंतर तानाजी खोत यांनी राजिनामा दिल्याने त्या जागेवर आजपर्यंत पिंपरी चिंचवडचा `सकाळ टाइम्स’चा बातमीदार म्हणून काम करत होतो. (पुन्हा एकदा सौजन्य संपादक रोहित चंदावरकर ! ) १९८१ मध्ये बातमीदारीच्या सुरुवातीच्या काळात जे काम केले होते, तसेच हे `पुनश्च हरी ओम' होते, मात्र पूर्वीसारखे कुठलेही टेन्शन नव्हते. या पुनर्जीवनाच्या आनंदाचा मी पुरेपूर अनुभव घेतला.
सकाळ माध्यमसमूहाने पुणे कॅंम्पातला अतुर संगतानी-नलिनी गेरा कुटुंबाचा `महाराष्ट्र हेराल्ड’ विकत घेतला, तो दिवस मला आजही ठळकपणे आठवतो. ही घटना आहे नोव्हेंबर २००३ ची. त्यावेळी मी `टाइम्स ऑफ इंडिया’च्या पुणे आवृत्तीत काम करत होतो. शहर बातम्या आणि महाराष्ट्र पानाची जबाबदारी माझ्याकडे होती. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वाटपसेवेतर्फे आलेल्या पत्रकांमध्ये असलेले `महाराष्ट्र हेराल्ड’च्या त्या बातमीचे प्रसिद्धीपत्रक मी वाचले आणि चमकलो.
ते पत्रक मी ताबडतोब ब्युरो चिफ अभय वैद्य यांच्याकडे दिले आणि त्यांच्या सवयीप्रमाणे काहीही प्रतिक्रिया न देता त्या पत्रकासह ते तडक निवासी संपादक रवी श्रीनिवासन यांच्याकडे गेले होते.
नानासाहेब परुळेकर यांनीं १९३२ साली स्थापन केलेल्या सकाळ वृत्तसमूहाने आता पुण्यातील इंग्रजी वृत्तपत्र उद्योगात यावे, ही मोठी बातमी त्या प्रसिद्धीपत्रकात होती. `सकाळ’तर्फे त्याकाळात गोव्यात मराठी दैनिक `गोमंतक'चे इंग्रजी भावंड गोमंतक टाइम्स' प्रसिद्ध व्हायचे. मी गोव्यात `नवहिंद टाइम्स’मध्ये असतानाच ही दोन्ही दैनिके चौगुले उद्योगसमूहातर्फे चालविली जायची. १९९९ मध्ये `सकाळ’ने ती दोन्ही दैनिके विकत घेतली होती. `सकाळ’ दैनिक वृत्तपत्र उद्योगातील प्रतिस्पर्धी असूनही `महाराष्ट्र हेराल्ड’च्या टेक-ओव्हरची ही बातमी वापरण्याचा निर्णय `टाइम्स ऑफ इंडिया’च्या संध्याकाळच्या संपादकीय बैठकीत झाला.
`टाइम्स ऑफ इंडिया’च्या दुसऱ्या दिवशीच्या अंकात ती बातमी आणि अभिजित पवार किंवा एपी सर यांचा महाराष्ट्र हेराल्डच्या प्रतिनिधींसोबतचा फोटो मी पान दोनवर टळकपणे वापरला होता.
तेव्हा `सकाळ’ने विकत घेतलेल्या या इंग्रजी दैनिकात सोळा वर्षे नोकरी करुन मी माझ्या चार दशकांच्या पत्रकारितेच्या नोकरीची इतिश्री करेल अशी कल्पनाही करता आली नसती.
या घटनेनंतर एक महिन्यातच `महाराष्ट्र हेराल्ड’चे संपादक आनंद आगाशे यांनी या दैनिकात नोकरीची मला ऑफर दिली आणि `टाइम्स ऑफ इंडिया’ची नोकरी सोडून सकाळ माध्यम समूहाच्या या दैनिकात रुजू होणारा मी पहिला पत्रकार ठरलो.
``टाइम्स ऑफ इंडिया’ची नोकरी सोडून तू `सकाळ' समूहात का आला?’’ असा प्रश्न आश्चर्याच्या स्वरात त्यानंतर सकाळ वृत्तसमूहात असेपर्यंत मला कितीतरी जणांनी विचारला. 'गोव्यातील नोकरी सोडून तू औरंगाबादला /पुण्याला आलास ? असा प्रश्न त्याआधी मला नेहेमी विचारला जायचा.
‘महाराष्ट्र हेराल्ड’चा संपादकिय विभाग २००४ साली सकाळ इमारतीत तिसऱ्या मजल्यावर होता. आमच्यासमोरच प्रतापराव पवार (पीजीपी) सरांच्या आणि अभिजित पवार म्हणजे एपी सरांच्या केबिन्स होत्या. त्याकाळात एपी सर न्युज डेस्कवर असलेल्या आमच्याकडे येत असत. एकदा मोबाईलवर कुणाशी तरी ते संभाषण करत असताना त्यांनी तो आपला भल्यामोठ्या आकाराचा मोबाईल सेट माझ्याकडे दिला आणि त्या व्यक्तीशी बोलण्यास मला सांगितले. त्याकाळात तसा मोठा आणि महागडा मोबाईल सेट फक्त आमचे संपादक प्रदुमन महेश्वरी यांच्याकडेच होता.
त्यावेळी एकदोन सहकारी माझ्याकडे तोंडाचा आ वासून पहात असताना एपी सरांनी शांतपणे मी उलटा धरलेला तो मोबाईल सेट सरळ केला आणि सांगितले `हं, कामिल, बोला आता !’
आम्ही समवयस्क पत्रकार मंडळी एकमेकांना अरेतुरे करत असलो तरी पीजीपी किंवा एपी सरांनी कधीही कुणा कर्मचाऱ्याला अरेतुरे करताना मी पाहिले नाही.
`महाराष्ट्र हेराल्ड’मधील माझे पहिले वर्ष म्हणजे २००४ साल अगदी आनंदात गेले. याचे कारण म्हणजे या वर्षी झालेल्या महाराष्ट्राच्या आणि नंतर लोकसभेच्या झालेल्या निवडणूका. कुठल्याही निवडणुका म्हटले कि बातमीदार या नात्याने माझ्या अगदी `अंगात येत' असते असे काहीजण गंमतीने म्हणत त्यात तथ्य होते. `इंडियन एक्सप्रेस’मध्ये असताना १९८९ च्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मी कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्हा पिंजून काढला होता. संपादक महेश्वरी यांनी निवडणुकीचे दोन खास पाने दीपक उपाध्ये आणि माझ्यावर सोपविली होती.
यानिमित्ताने खूप राजकीय बातम्या बायलायनीसह मी लिहिल्या. त्यावेळी `वसईचा छोरा’ असलेला चित्रपट नायक गोविंदा केंद्रिय मंत्री राम नाईक यांच्याविरुद्ध मुंबईत लोकसभा निवडणूक लढवत होता. खूपखूप वर्षांपूर्वी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असलेल्या हेमवती नंदन बहुगुणा यांना अलाहाबादच्या निवडणुकीत त्यावेळी पंतप्रधान राजीव गांधी यांचे आणि नेहरु-गांधी कुटुंबाचे जवळचे असलेले अभिनेते अमिताभ बच्चन यांनी हरविले होते, त्याची पुनरावृत्ती हा गोविंदा उर्फ `चिची’ करेल का अशा शिर्षकाची एक बातमी केली होती. आणि झालेही तसेच. रेल्वे मंत्री राम नाईक त्या निवडणुकीत हरले.
देशात आणि पुण्यात तोपर्यंत सर्वच वृत्तपत्रांनी आपल्या कामगारांना श्रमिक पत्रकार आणि वृत्तपत्र कामगार कायद्यानुसार आणि प्रचलीत वेतन आयोगानुसार नोकरी आणि पगार देणे बंद केले होते. आणि याचकाळात २००४ ला `कन्स्लटंट' म्हणून नोकरीवर घेतलेल्या आणि मालक-कर्मचारी असे कुठलेही संबंध नसलेल्या आम्हा सर्वांना `सकाळ' कंपनीत २००६ला चक्क नोकरीवर घेतले गेले !
आम्हा सर्वांना नवी अपॉइंटमेंट लेटर्स दिली गेली, आणि सर्वांना प्रॉव्हिंडट फंड, पगारी सुट्ट्या, ग्रॅच्युइटी वगैरे सुविधा सुरु झाल्या. वयाच्या ५८ व्या वर्षीच्या निवृत्तीपर्यंत नोकरी असणार होती.
याआधी १९८० आणि १९९०च्या दशकांत पालेकर आणि नंतर बच्छावत वेतन आयोगानुसार पगार घेतलेल्या आणि वार्षिक पन्नासच्या आसपास पगारी सुट्ट्या असलेल्या मला या नवीन अपॉइंटमेंट लेटरचा सर्वाधिक आनंद झाला. `टाइम्स ऑफ इंडिया’ने आम्हाला चांगला पगार दिला होता तरी नोकरीचे कंत्राट केवळ तीन वर्षांचे असल्याने डोक्यावर गच्छतीची कायम टांगती तलवार असते.
`सकाळ टाईम्स’मधल्या आम्हा अनेकांची आणि `सकाळ'मध्ये नव्याने आलेल्या इतर अनेकांचीही `सकाळ' समूहात मध्ये रुजू होण्याची १ मे २००६ अशी एकच तारीख आहे. याचे कारण म्हणजे सकाळ व्यवस्थापनाची ही कामगार-फ्रेंडली योजना १ मे २००६ पासून अंमलात आली.
इतक्या मोठ्या साठ-सत्तरच्या आसपास संख्येतील कंत्राटी किंवा तात्पुरत्या सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्याचा निर्णय त्याकाळात अमलात आणणारा सकाळ एकमेव वृत्तपत्रसमूह असावा. मात्र `सकाळ’ने याच काळापासून नवीन कुणाही व्यक्तीला वेतन आयोगाची वेतनश्रेणी देणे बंद केले. टाइम्स ऑफ इंडिया आणि इंडियन एक्सप्रेस समूहांतर्फे तर वेतन आयोगानुसार वेतन देणे खूप आधी बंद केले होते.
काही वर्षांतच `महाराष्ट्र हेराल्ड’ (पूर्वाश्रमीचा `पूना हेराल्ड' ) ने आपले नाव टाकून दिले आणि `सकाळ टाइम्स’ नावाने नवी कात पांघरली.
`सकाळ टाइम्स’चा पगार बहुधा मला मानवला होता. अर्थात आमच्या लग्नापासूनचा नेहेमीप्रमाणे जॅकलीनचा पगार यावेळीही माझ्यापेक्षा तरी पटीने अधिक होता. `सकाळ टाइम्स’मध्ये असतानाच २०११ साली स्वखर्चाने (म्हणजे आम्हा उभयतांच्या खर्चाने ) जॅकलीन, आदिती आणि मी युरोपला ( पॅरिस, लुर्ड्स, रोम, व्हॅटिकन आणि व्हेनिस इ) तीन आठवड्यांच्या सुट्टीवर गेलो.
त्यानंतर फेब्रुवारी २०१७ ला म्हणजे थायलंडमध्ये दहा दिवसांच्या आंतरराष्ट्रीय पत्रकार दौऱ्यात भारताचा आणि `सकाळ टाइम्स’चा प्रतिनिधी म्हणून मी सहभागी झालो. `सकाळ’ समूहाच्या नोकरीतून अधिकृतरीत्या निवृत्त होण्याच्या केवळ सहा महिने आधी हा दौरा पार पडाला. जगभरातून सत्तरच्या आसपास पत्रकार असलेल्या त्या परीषदेत माझ्यासह भारताचे फक्त सहा प्रतिनिधी होते.
`कामिल पारखे, सकाळ टाइम्स, पुणे, इंडिया' असे छापलेले माझे ते गळ्यात अडकवण्याचे ओळखपत्र मी आजही जपून ठेवले आहे.


पत्रकारितेच्या सुरुवातीला गोव्यातल्या `नवहिंद टाइम्स'ने मला सात-आठ महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी लखनौ, रशिया आणि बल्गेरियाला पाठवले होते, नोकरीपेशाची इतिश्री अशीच थायलंडच्या दौऱ्याने झाली. .
१ जानेवारी २०१८ रोजी `सकाळ'च्या वर्धापनानिमित्त निवृत्त झाल्याबद्दल चेअरमन प्रतापराव पवार यांच्याहस्ते श्रीफळ आणि शाल देऊन माझा सत्कार झाला आणि दुसऱ्या दिवशी आमचा तो ग्रुप फोटो भरपूर खपाच्या `सकाळ'मध्ये ठळकपणे प्रसिद्धही झाला !
असे सन्मानपूर्वक निवृत्त होण्याचे भाग्य पत्रकारितेच्या क्षेत्रात हल्ली खूप कमी लोकांना लाभते, हे मला माहित आहे
तर मागच्या वर्षी कोरोनामुळे आधी महाराष्ट्र सरकारने आणि नंतर केंद्र सरकारने लोकडाऊन जाहीर केल्यावर पिंपरीच्या मोरवाडी येथील `सकाळ’ ऑफिसमध्ये जाणे एकदम कमी केले, त्याऐवजी घरातूनच `सकाळ टाइम्स’साठी पिंपरी चिंचवडच्या बातम्या देऊ लागलो. आणि काही आठवड्यातच ही घटना घडली.
सकाळीच एक बातमी मिळाली होती. सिएस्ता चुकवू नये म्हणून जेवणाआधीच एक बातमी इमेलने पाठवून दिली.
ASM-ASMA host Faculty Development Programme
Camil Parkhe
reporters@sakaaltimes.com
Pimpri:
दुपारी झोपेतून उठल्यावर कॉम्पुटर सुरु केला आणि तो धक्कादायक निरोप वाचला. आमच्या न्युज ब्युरोमध्ये असलेल्या माझ्या एका सहकारीने ती मेल पाठविली होती.
Wed, 27 May 2020, 17:30
Sorry Sir. Bad timing, I would say, but ST (Sakal Times) has shut, it seems.
माझ्यासाठीही ती वाईट बातमी होती, पण अधिकृतरीत्या मी अडीच वर्षांपूर्वीच निवृत्त झालो होतो. माझ्या टिममधल्या तरण्याताठ्या मुलां-मुलींचे काय? `सकाळ टाइम्स’ मध्ये बातमीदारांमध्ये नेहेमी तरुण मंडळींचाच भरणा अधिक असायचा.
मी उलटपावली निरोप पाठविला.
``Anamika.... Oh No...
Very sad for the fraternity...
Camil ''
दुसऱ्या दिवशी सकाळ ऑफिसला कार घेऊन गेलो, टेबलाच्या ड्रॉवरांमधून, कपाटांमधून खूप काही पुस्तके आणावयाची होती.
सकाळच्या ऑफिसात जाऊन `pcamil’ या नावाने लॉग इन केले, डेस्क टॉपवर असलेला माझा वैयक्तिक मराठी आणि इंग्रजी मजकूर, लेख, वगैरे स्वतःला मेल केला, काही मजकूर पेन ड्राईव्हवर सेव्ह करुन डेस्कमधील सगळ्या ड्रॉवर्सतील पुस्तके वगैरे बॅगांत भरल्या.
पत्रकारितेमधला माझा अनुभव चाळीस वर्षांचा. इतकी वर्षे सहसा कुणी नोकरीत नसतात, पण मी वयाच्या एकविसाव्या वर्षीच पणजीला कामाला लागलो होतो. या दीर्घ कालावधीत किती तरी जणांना मी आतापर्यंत असे आपले टेबल आवरताना मी पाहिले होते, काही जण आनंदाने मोठ्या दैनिकांत मोठ्या पगारांवर जात होते, काहींना तडकाफडकी घरी पाठवण्यात आले होते. मी स्वतः किती तरी वेळा असे टेबल आवरले होते !
पुन्हा एकदा डेस्कटॉपवर अखेरची नजर टाकली आणि `pcamil' या सकाळ माध्यमसमूहातील एका घटकाला कायमसाठी लॉगआऊट केले.
पत्रकारितेच्या मासिक पगारी नोकरीतील `दि एन्ड’ अखेरीस असा अवचित आला होता, आधी दोनदा पुन्हा कामावर ठेवण्यात आले होते, तसे एक्सटेंशन या कोरोना साथीच्या काळात मिळणे अशक्य आहे.
खूप खूप अनुभवले होते या व्यवसायात. आनंदी आठवणीच जास्त. अपेक्षाही केली नव्हती असे खूप काही !
Oh, What a feeling...!
मात्र खंत, खेद ठेवण्यासारखे प्रसंग तसे मला या क्षणाला मुळी आठवतच नव्हते.

Comments

Popular posts from this blog

Dnyanodaya monthly enters 175th year

A day at Mother Teresa’s Home for Destitutes

Fr. Rudolf Schoch. A Jesuit Looks back in satisfaction