महाबळेश्वरचे होली क्रॉस चर्च
महाबळेश्वरचे होली क्रॉस चर्च
महाबळेश्वरला तुम्ही कधी भेट दिली असेल तर या पर्यटक स्थळाच्या मुख्य बाजारपेठेत अगदी मध्यवर्ती ठिकाणी असलेले एक छोटेसे टुमदार बंगलीवजा बांधकाम तुम्ही नक्कीच पाहिले असणार. गेटपाशीच मदर मेरीचा डोंगर म्हणजे ग्रोटो आहे आणि बंगलीच्या शिखरवजा टोकावर क्रूस आहे. यावरुन हे एक कॅथोलिक चर्च आहे हे माहितगार व्यक्तीला लगेच कळते. महाबळेश्वर एसटी बसडेपोपासून एक मिनिटाच्या अंतरावर आणि टुरिस्ट टॅक्सींच्या वाहनतळापाशी हे महाराष्ट्रातील एक वैशिष्ट्यपूर्ण आणि अनेक कारणांनी आगळेवेगळे असलेले असलेले होली क्रॉस चर्च आहे.
मुंबई आणि वसई परीसर वगळता उर्वरित महाराष्ट्रातील हे सर्वात जुने कॅथोलिक चर्च आहे. ब्रिटिश अमदानीत 1831 साली या चर्चची स्थापना झाली होती.
जुन्या वास्तुशास्त्राच्या धर्तीवर बांधलेले हे चर्च या हिलस्टेशनवर सुट्टीसाठी आलेल्या पर्यटकांचे लक्ष वेधून घेते. या प्रसिध्द थंड हवेच्या ठिकाणी उन्हाळ्याच्या सुट्टीत आणि अगदी दिवाळीच्या सुट्टीतही हजारो लोक एकदोन दिवसांच्या पिकनिकसाठी कुटुंबियांसह वा मित्रमंडळीसह येत असतात. पुण्या-मुंबईहून, गोव्यातून, वसईतून किंवा भारताच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यातून येणारे ख्रिस्ती लोक या चर्चमध्ये आवर्जून शिरतात, क्रुसाची खूण करुन एकदोन मिनिटे प्रार्थनेत स्तब्ध होतात. येथे दर शनिवारी संध्याकाळी आणि रविवारी सकाळी मिस्सा होत असते.
पर्यटनाच्या हंगामात आठवड्याच्या इतर दिवशी येथे मिस्सा साजरी केली जात नसली तरी हे देऊळ दररोज सकाळी आणि संध्याकाळी खुले ठेवण्यात येते. त्यामुळे महाबळेश्वरला आलेले बालगोपाळ आणि इतर मंडळी येथील बाजारपेठेत फिरतफिरत या देवळासमोर आले तर त्यापैकी अनेकांना देवळाच्या खुल्या असलेल्या फाटकातून आत शिरुन देवळात डोकावण्याचा मोह होतोच.
ख्रिस्ती शाळा-कॉलेजांत शिकलेली आणि त्यामुळे ख्रिस्ती प्रार्थनामंदिरांची ओळख असलेले लहानमोठ्या वयाचे बिगरख्रिस्ती पर्यटकसुध्दा या देखण्या देवळात प्रवेश करतात. अनेक जण मग आपल्या ग्रुपचा या चर्चमध्ये फोटोही काढतात. एक गोष्ट येथे आवर्जून सांगायला हवी, जगभरातील कुठल्याही चर्चमध्ये, तिथल्या उपासनेत सहभागी होण्यास बिगरख्रिस्ती व्यक्तीला मुभा असते.
महाराष्ट्रातील सर्वांत जुन्या चर्चेसपैकी एका असलेल्या या होळी क्रॉस चर्च या चर्चचे कामकाज कसे चालते याची माहिती मजेशीर आहे.
महाबळेश्वरसारख्या नावाजलेल्या पर्यटनस्थळी असलेल्या या होली क्रॉस चर्चचे महाराष्ट्रातील ख्रिस्ती देवळांच्या इतिहासात एक आगळेवेगळे स्थान आहे. हे ख्रिस्तमंदिर आणि महाबळेश्वर हा धर्मग्राम किंवा पॅरीश महाराष्ट्रातील इतर ख्रिस्तमंदिरांमध्ये आपल्या काही खास वैशिष्ट्यांमुळे आपले वेगळेपण राखून आहे. यातील एक वैशिष्ठ्य म्हणजे मुंबई-पुणे ही शहरे वगळता महाराष्ट्रातील हे सर्वांत जुने चर्च आहे. या चर्चने यावर्षी २०२१ला दोनशेनव्वद वर्षे पूर्ण केली आहेत.!
दुसरे एक वैशिष्ठय म्हणजे महाबळेश्वरला पावसाळ्यात अतिवृष्टी होत असल्याने जूनपासून वर्षातील चारपाच महिने हे चर्च पूर्ण बंद असते, या देवळाच्या एकूणएक भिंती, दरवाजे आणि खिडक्या ताडपत्र्यांच्या सहाय्याने या दिवसांत आच्छादित केलेल्या असतात. मे महिन्याच्या अखेरीस हे देऊळ अगदी छतापासून तो थेट भिंतीच्या तळापर्यंत जाड ताडपत्र्यांनी पूर्ण झाकून ठेवले जाते आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातच हे आच्छादन काढले जाते.
वर्षातील चारपाच महिने अशाप्रकारे पूर्ण स्वरुपात आच्छादित केलेले हे जगातील एकमेव ख्रिस्ती देऊळ असणार.
सन 1831 साली या चर्चची स्थापना झालेली असली तरी 2009 सालीही या चर्चचे सदस्य असलेल्या कुटुंबांची संख्या दोन आकडीही नाही . पॅरिशनरांची म्हणजे या चर्चच्या सभासदांची संख्या चाळीसच्या आसपास आहे. (प्रत्येक चर्चचे नोंदणीकृत स्थानिक कुटुंबे आणि सभासद असतात आणि त्यांनी त्याच चर्चच्या विधीला जावे अशी अपॆक्षा असते. ) धर्मग्राम सदस्यांची इतकी कमी संख्या असली तरी ज्या काळात येथे मिस्सा होतात तेव्हा आणि विशेषत: सुट्टीच्या हंगामात हे चर्च भाविकांच्या म्हणजेच पर्यटकांच्या गर्दीने तुडुंब भरलेले असते.
त्यामुळे भरपूर संख्येचे पॅरिशनर्स असणाऱ्या इतर ख्रिस्ती देवळांपेक्षा येथील दानपत्रात रक्कम बऱ्यापैकी असायला हवी. अर्थांत या चर्चच्या देखभालीचा खर्चही भरपूर आहे. आतबाहेर रंगरंगोटी वारंवार करावी लागते.
पुण्यातील क्वार्टर गेटपाशी असलेले अवर लेडी ऑफ इमॅक्युलेट कन्सेप्शन चर्च किंवा सिटी चर्च हे मुंबईउर्वरित महाराष्ट्रातील सर्वांत जुने कॅथोलिक चर्च. पेशवे माधवराव दुसरे यांनी 1792 साली दान म्हणून दिलेल्या जमिनीवर हे चर्च 1794 साली बांधण्यात आले. पेशवे सैन्यात रुजू झालेल्या मूळच्या आयरिश किंवा गोवेकरी कॅथोलिक सैनिकांसाठी हे देऊळ बांधण्यात आले होते. त्यानंतरचे महाबळेश्वर होली क्रॉस चर्च हे कॅथोलिक पंथियांचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वांत जुने देऊळ.
महाबळेश्वर हे सातारा जिल्ह्यातील हिलस्टेशन समुद्रसपाटीपासून 1672 मीटर्स उंचीवर आहे. त्यामुळे येथील तापमान जवळजवळ पूर्ण वर्षभर नजिकच्या परिसरांच्या तुलनेने कमी असते. उन्हाळ्यात उत्तर हिंदुस्थानातील कमाल तापमानापासून बचाव करण्यासाठी दिल्लीतील ब्रिटिश अधिकाऱ्यांनी सिमला हे थंड हवेचे ठिकाण हिंदुस्थानची "समर कॅपिटल' किंवा उन्हाळ्यातील राजधानी बनवले होते त्याचप्रमाणे मुंबईतील ब्रिटिश सरकारी अधिकारी आणि इतर श्रीमंत लोक उन्हाळ्यात महाबळेश्वरकडे धाव घेत असत.
महाबळेश्वरला 1791 साली भेट देणारे सर चार्लस मॅलेट ही पहिली ब्रिटिश व्यक्ती. त्यानंतर ब्रिटिशांच्या दृष्टीने हे गिरिस्थान एक अत्यंत लोकप्रिय सुट्टीने स्थळ बनले. मुंबईचे गव्हर्नर सर जॉन मॅल्कम यांनी 1828ला महाबळेश्वरला भेट दिली. त्यानंतर मॅल्कम यांनी या प्रेक्षणीय स्थळात अनेकदा मुक्काम केला असावा. या पर्यटन शहराच्या मुख्य बाजारपेठेतील रस्त्याला मॅल्कम पेठ हे नाव देण्यात आले आहे.
थंड हवामानाचे स्थळ म्हणून महाबळेश्वर ब्रिटिश अधिकाऱ्यामध्ये लोकप्रिय बनल्यानंतर तेथे अनेक टुमदार बंगले आणि घरे उभी राहू लागली. या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या नोकरवर्गामध्ये कॅथोलिक लोकांचा अधिक भरणा होता. सन 1828 मध्ये या लोकांनी येथे एका क्रुसाची उभारणी केली. या क्रुसाभोवती उभे राहून ते दररोज पवित्र माळेची (रोझरी) प्रार्थना म्हणत असत. सध्याच्या होली क्रॉस चर्चची ही साधीसुधीशी सुरुवात.
आता महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे ऊन्हाळी हंगामातील मुख्यालय महाबळेश्वर असते .
कोकणातील रत्नागिरी या शहरातील एका धर्मगुरुच्या प्रयत्नांनी महाबळेश्वरला सन 1831 मध्ये एक चॅपेल बांधण्यात आले. येथील कॅथोलिकांची संख्या वाढत गेल्यामुळे 1837 पासून येथे एका पूर्णवेळ धर्मगुरुची नेमणूक करण्यात आली. येथील जूनपासून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या महिन्यांतील अतिवृष्टी संपल्यानंतर ते धर्मगुरु महाबळेश्वरला राहण्यासाठी येत असत. हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात येथे राहून स्थानिक कॅथोलिकांसाठी ते मिस्सा म्हणत, इतर आध्यात्मिक सेवा पुरवत असत. मात्र पावसाळा सुरु होण्याआधीच आपल्या सामानासुमानासह चार महिन्यांच्या वास्तव्यासाठी ते पुन्हा रत्नागिरीला परतत असत.
महाबळेश्वरच्या होली क्रॉसचे धर्मगुरु असलेल्या फादर डी एल कार्व्हालो यांनी 1876 साली जवळच असलेल्या पांचगणी येथे चॅपेल बांधले. सन 1895 साली पांचगणी हे महाबळेश्वर धर्मग्रामापासून अलग झाले, आणि तेथे स्वतंत्र पॅरीश म्हणजे धर्मग्रामाची स्थापना करण्यात आली.
गेली कित्येक दशके महाबळेश्वर येथील होली क्रॉस चर्चच्या निवासथानात एक धर्मगुरु ऑक्टोबर ते मे महिन्याअखेरीस राहत असत. रविवार वगळता येथे आठवडाभर फारसे काम नसल्याने तेथे वृद्ध किंवा निवृत्त धर्मगुरुंची नेमणूक केली जात असे. अलिकडच्या काही वर्षात मात्र वर्षांच्या आठ महिन्यांसाठी येथे पूर्णवेळ राहण्यासाठी धर्मगुरुंची नेमणूक केली जात नाही. पुणे धर्मप्रांताचे मुख्यालय असलेल्या सेंट पॅट्रिक कॅथेड्रल येथील एखाद्या धर्मगुरुंकडे महाबळेश्वरचे पॅरिश प्रिस्ट म्हणून अतिरिक्त जबाबदारी सोपविली जाते.
पुण्यातील कुठल्याशा चर्चचे पॅरिश प्रीस्ट किंवा शाळेचे धर्मगुरु म्हणून आपली पूर्णवेळ जबाबदारी सांभाळून दर शनिवारी सकाळी हे धर्मगुरु महाबळेश्वरला बसने जातात. तेथे शनिवारी संध्याकाळी आणि रविवारी सकाळी मिस्सा साजरी करुन रविवारी दुपारी ते पुण्याला जाणारी बस पकडतात.
महाबळेश्वरला आता पुन्हा कधी गेला तर महाराष्ट्रातील एक सर्वांत जुने असलेल्या या चर्चला अवश्य भेट द्या.
Comments
Post a Comment