भारतीय ठशातील ख्रिस्ती कला
भिन्न धर्मपरंपरा आणि संस्कृती असलेल्या लोकांचा परस्परांशी संबंध आला कि या संबंधातून नकळत एकमेकांच्या धार्मिक मूल्यांची आणि सांस्कृतिक ठेव्यांची देवाणघेवाण होते. मध्ययुगीन काळात ख्रिस्ती धर्मपरंपरेतील कलेचे भारतात आगमन झाले. तेव्हा असाच प्रकार घडला. खास युरोपियन ठसा असलेल्या ख्रिस्ती धर्मपरंपरातील कला आणि भारतीय कला यांचा या वेळेस सुंदर मिलाप घडला आणि त्यातून जन्मास आली भारतीय ठशातील ख्रिस्ती कला. ख्रिस्ती धर्माचा उगम इस्राएल राष्ट्रात झाला व त्यामुळे हा धर्म मूळचा आशिया खंडातलाच. पण मध्ययुगीन काळापूर्वीच यूरोपातील सर्व राष्ट्रांत या धर्माचा खूप प्रचार झाला व भारतात हा धर्म मोठ्या प्रमाणात स्वीकारला गेला तो युरोपिअन मिशनरींमार्फतच . त्यामुळे ख्रिस्ती धर्म म्हटलं की तो पाश्चिमात्य संस्कृतीत घडलेला अशीच बहुतेकांची समजूत असते. युरोपियनांनी हा धर्म भारतात आणला. त्याबरोबरच त्यांनी आपापल्या देशातील परंपरेत वाढलेली कलादेखील येथे आणली. या पाश्चिमात्य कलेचा स्थानिक कलापरंपरेशी संबंध आल्यानंतर परस्पर प्रभावातून उगम पावलेल्या भारतीय ख्रिस्ती कलेची मुळे भारताच्या संपन्न विवि...