फ्रान्सिस न्यूटन सोझा

मुंबईतल्या सेंट झेव्हियर्स स्कूल या एका नावाजलेल्या शाळेतील मुलांच्या मुतारीत काही अश्लील चित्रे रेखाटलेली दिसून आली आणि हे प्रकरण शाळेच्या उपप्राचार्यांपर्यंत पोहोचले.

ही आताची नाही, खूप जुनी, स्वातंत्र्यपूर्व काळातली घटना आहे.
सेंट झेव्हियर्स हायस्कूल ही जेसुईट फादरांची संस्था. त्याकाळात ही शाळा स्पॅनिश जेसुईट्स चालवत होते. जेसुइटस फादर्स शिस्तीबाबत किती कडक असतात हे सांगायलाच नको.
या शाळेतला तेरा वर्षांचा एक विद्यार्थी चित्रकलेत पारंगत होता आणि त्याचे हे कसब जेसुईट फादरांनाही चांगले माहित होते.
त्यामुळे जेव्हाजेव्हा मुतारींत अशी काही रेखाटने यायची तेव्हातेव्हा या मुलावर कायम संशय असायचा.
यावेळीही असेच झाले होते.
साहजिकच त्या मुलाला - फ्रान्सिस न्यूटन सोझा त्याचे नाव - बोलावण्यात आले.
मुतारीतली ही अश्लील भित्तीचित्रे म्हणजे मुलांमुलींच्या अवयवांची रेखाटणी होती.
Anatomical designs
मात्र त्या मुलाने यासंदर्भात त्याच्यावर केलेले आरोप पूर्णतः मान्य केले नाही अथवा फेटाळलेसुध्दा नाही.
त्या मुलाचा याबाबतीतले स्पष्टीकरण किंवा बचाव मात्र धक्कादायक होता.
``मुतारीत आधी रेखाटलेली चित्रे खूपच वाईट होती, म्हणून आपण त्यात फक्त सुधारणा केली.'' असे त्याचे म्हणणे होते.
``मुतारींमध्ये अशी काही रेखाटने पाहिली की मला ती खटकायची आणि मग मी त्या रेखाटनांत सुधारणा करायचो. वाईट पद्धतीने काढलेल्या रेखाटनांचा मला खूप तिटकारा आहे, I hate bad drawing !'' असे त्या मुलाचे स्पष्टीकरण होते.
खरे पाहिले तर जेसुईटस लोक जगभर मानव्यशास्त्र, साहित्य,, कला, संस्कृती, विज्ञान वगैरेंच्या विविध शाखांत महत्त्वाच्या योगदानासाठी प्रसिद्ध आहेत.
त्यापैकी एक असलेल्या या शाळेचे व्हॉईस-प्रिन्सिपल फादर अग्नेल्स सोलग्रान यांनी मात्र या सुधारीत भित्तीचित्रांसंदर्भात त्या मुलाबाबत कौतुकाचा किंवा सहानुभुतीचा दृष्टिकोन ठेवला नाही.
त्यामुळे ही अश्लील रेखाटने काढणाऱ्या या मुलाला शाळेतून काढून टाकण्यात आले.
सेंट झेव्हियर्स स्कूलमधले शिक्षण अशाप्रकारे आणि या कारणाने खंडीत झाले तरी या मुलाने चित्रे काढण्याचे सोडले नाही.
उलट चित्रकलेत प्रावीण्य मिळवण्यासाठी हा मुलगा काही काळानंतर मुंबईतच जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये दाखल झाला.
हे शिक्षण सुद्धा अपूर्ण राहिले कारण महात्मा गांधीच्या नेतृत्वाखालील १९४२ च्या `भारत छोडो' आंदोलनात भाग घेतल्याबद्दल त्याला निलंबित करण्यात आले.
चित्रकलेचे औपचारिक शिक्षण घेतले नाही तरी या तरुणाने भारतात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चित्रकार म्हणून मोठे नाव कमावले.
फ्रान्सिस न्यूटन सोझा हे मुंबईतल्या प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रुप या नावाजलेल्या गटाचे सचिव होते.
या ग्रुपचे इतर सभासद होते मकबूल फिदा हुसेन, सैय्यद हैदर रझा, कृष्णाजी हौळाजी आरा, सदानंद बाकरे आणि हरी अंबादास गाडे.
अश्लील चित्रे रेखाटण्याचे आरोप फ्रान्सिस न्यूटन सोझा यांच्यावर त्यानंतरही अनेकदा होत राहिले.
मुंबईत आर्ट सोसायटी ऑफ इंडियात १९४८ साली भरलेल्या त्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन असेच वादाच्या भोवऱ्यात सापडले.
त्यांची ही अश्लील चित्रे - त्यात एक सेल्फ न्यूड पोर्ट्रेट सुद्धा होते - जप्त करण्यात आले.
वैतागलेल्या सव्वीस वर्षांच्या सोझा यांनी १९४९ साली अधिक उदारमतवादी परिसराच्या शोधात भारत सोडले आणि लंडन मधील आपले एक मित्र इब्राहिम अल्काझी यांच्या घरात काही काळ आश्रय घेतला. तेव्हापासून त्यांची परदेशातील चित्रकलेतील कारकीर्द सुरु झाली.
फ्रान्सिस न्यूटन सोझा हे मूळचे गोव्यातील सालीगाव इथले. सालीगाव म्हटले की तेथील वास्तुशास्त्राचा एक अत्यंत सुंदर नमुना असलेले गॉथिक वास्तुशैलीतील चर्च माझ्या डोळ्यांसमोर लगेच येते.
शिक्षक असलेल्या सोझा यांच्या वडलांचे जुझे व्हिक्टर ॲनिसेटो डिसोजा यांचे निधन झाले तेव्हा फ्रान्सिस केवळ तीन महिन्यांचा होता. झाल्यानंतर त्यांची आई लिला मारिया सेसिलिया अंतुमीस आपल्या लहानग्या मुलासह गोवा सोडून मुंबईला स्थायिक झाली होती. गोव्यात असतानाच सोझाला देवीचा रोग झाला होता. या आजारातून तो आश्चर्यकारकरीत्या वाचला होता.
देवीच्या आजारातून फ्रान्सिस जिवानिशी वाचला तरी या रोगाचे व्रण त्याच्या चेहेऱ्यावर कायम राहिले.
तर मुंबईत सेंट झेव्हियर्स हायस्कूलमध्ये फ्रान्सिस शिकत असताना वर सांगितलेली घटना घडली होती.
फ्रान्सिस न्यूटन सोझा यांचे चरित्रकार व्हिक्टर रंजेल रिबेरो यांनी या घटनेचे वर्णन केले आहे. Souza : The man, the artist, his loves and his times' - Victor Rangel - Ribeiro, Goa Publications (2019)
फ्रान्सिस न्युटन सोझा यांचे जन्मशताब्दी वर्ष यंदा एप्रिल १२ पासून सुरु झाले. त्यानिमित्त इंडियन एक्स्प्रेसच्या २१ एप्रिलच्या रविवार पुरवणीत वंदना कालरा आणि यशोधरा दालमिया यांचे लेख प्रसिद्ध झाले आहेत.
सोझा यांचे एक `बर्थ' या नावाचे १९५५ सालाचे चित्र २००८ साली २५ दशलक्ष अमेरीकन डॉलर्स या किंमतीला विकले गेले.
तोपर्यंत एखाद्या भारतीय चित्रकाराच्या कलाकृतीला मिळालेली ही जागतिक पातळीवरची सर्वाधिक रक्कम होती. हेच चित्र पुढे २०१५ साली ४८ दशलक्ष अमेरीकन डॉलर्स या किंमतीला विकले गेले.
एका छोट्या जिल्ह्याच्या आकाराच्या असलेल्या गोव्याने अनेक प्रख्यात गायक, साहित्यिक, चित्रकार, शिल्पकार, खेळाडू दिलेले आहेत. अशा नावांची खूप मोठी यादी होईल.
फ्रान्सिस न्युटन सोझा ( १२ एप्रिल १९२४ - २८ मार्च २००२) हे या यादीतील एक नाव.
मकबूल फिदा हुसेन यांच्या खास शैलीमुळे त्यांची चित्रे जाणकारांनाच नव्हे तर सामान्य लोकांनासुद्धा लगेच ओळखता येतात. सोझा यांच्याबाबतीत सुद्धा असे म्हणता येईल.
सोझा फोटो सौजन्य : फ्रेड्रीक नोरोन्हा Frederick Noronha
Camil Parkhe

Comments

Popular posts from this blog

Dnyanodaya monthly enters 175th year

Shakuntala Paranjape : Crusade of a lifetime

Fr. Rudolf Schoch. A Jesuit Looks back in satisfaction