मराठी ई-बुक्स



या दोन घटना लागोपाठ घडल्या. पुण्यातल्या शनिवार पेठेतल्या जेसुईट फादरांच्या `स्नेहसदन' येथे `निरोप्या' मासिकाच्या (वय अवघे १२० वर्षे ) ऑफिसात गेलो होतो.

तेथून बाहेर पडल्यावर समोरच असलेल्या `मॅजेस्टिक' बुक स्टॉलमध्ये गेलो. माझा हा नेहमीचा शिरस्ता आहे. पुस्तक घ्यायचे नाही, असा दुसरा शिरस्त्याचा निर्धार असतानाही शेवटी खरेदी ही झालीच.
गोविंद तळवलकर यांचे `पुष्पांजली' खंड दुसरा हे पुस्तक बॅगेत टाकून आलो आणि परतीच्या मेट्रो प्रवासात वाचायला सुरुवातही केली.
`महाराष्ट्र टाइम्स'मध्ये १९८० च्या दशकात प्रसिद्ध झालेल्या मृत्युलेखांचे हे संकलन आहे. काही ठराविक, मला परिचित आणि आवडीच्या क्षेत्रांतील व्यक्तींवर असलेलेच लेख वाचायचा उद्देश होता.
त्यामुळे एका परदेशी दांपत्याविषयी असलेला लेख टाळून मी पुढील लेख वाचत गेलो. थोड्या वेळाने पुन्हा त्याच लेखावर नजर गेली आणि पहिली ओळ वाचताच थबकलो.
तो लेख विल ड्युरंट आणि त्यांची पत्नी एरीयल ड्युरंट यांच्याविषयी होता. विल ड्युरंट यांनी लिहिलेल्या `हिस्टरी ऑफ फिलॉसॉफी' या जाडजूड ग्रंथाची गोव्यात शिकताना मी अक्षरशः पारायणे केली होती.
पणजी येथील मिरामारच्या धेम्पे कॉलेजात बीए आणि एमए साठी तत्त्वज्ञान हे माझे स्पेशलायझेशन होते आणि त्यासाठी ड्युरंट यांचा हा ग्रंथ मुख्य संदर्भ होता.
महत्त्वाचे म्हणजे या ग्रंथाचा साने गुरुजींनी `पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाची कहाणी' या नावाने मराठीत अनुवाद केला होता हे अलीकडेच मला कळाले.
मी पुस्तक वाचत होतो तेव्हा सहज आसपास नजर फिरवली.
सहा बोगींच्या त्या अख्ख्या मेट्रोमध्ये पुस्तक वाचणारा मी एकमेव होतो, इतर बहुतेक जण आपल्या मोबाईल मध्ये गुंतलेले होते.
सत्तर, ऐंशी आणि अगदी नव्वदच्या दशकापर्यंत बसने प्रवास करताना माझ्या शबनम बॅगेत हमखास एक पुस्तक असायचे. बसमध्ये इतर प्रवासीही वर्तमानपत्रे वाचत असायचे, दुसऱ्या सहप्रवाशांच्या वर्तमानपत्राचे एखाद-दुसरे पान इतर लोक वाचायला मागवून घ्यायचे.
मोबाईलच्या आजच्या जमान्यात आता हा इतिहास झाला. आता बसमध्ये, विमानात किंवा इतर वाहनांत प्रवासात आणि इतर फावल्या वेळात कुणी पुस्तक वाचत असताना दिसेल का?
आजच्या जमान्यात वर्तमानपत्राची दहाबारा पाने दोन्ही हातांत घेऊन, ती पाने उलघडत त्यातील मजकूर वाचणारी एखादी व्यक्ती नक्कीच गावंढळ, अप्रगत असणार. कारण मोबाईलच्या उपकरणाचा वापर करणाऱ्या व्यक्तीला त्या दिवाशी काही क्षणांपूर्वी घडलेली बातमी काळात असते, कुठल्याही वृत्तपत्रांत हे शक्यच नाही.
तंत्रज्ञानाच्या एका प्रगत माध्यमाचा मेट्रोतील बहुतेक लोक वापर करत असताना पुस्तक वाचणारा मी एक गावंढळ व्यक्ती असणार होतो.
अर्थात तेव्हा मला हे जाणवले नाही, हे माझ्या लक्षात आले ते दुसऱ्या दिवशी मी माझ्या प्रकाशकांना भेटलो तेव्हा.
या भेटीत चेतक बुक्सचे कुणाल हजेरी यांनी मला त्यांनी प्रकाशित केलेल्या माझ्या सगळ्या पुस्तकांच्या ई-बुक्सच्या लिंक्स दिल्या !
एक खरे सांगतो, आतापर्यंत मी एकसुद्धा ई-बुक वाचलेले नाही.
मराठी पुस्तक प्रकाशनाचा व्यवसाय हल्ली अत्यंत डबघाईला आलेला आहे, हे सर्वज्ञात आहे. हल्ली अनेक प्रकाशने हौशी लेखकाकडून खर्च .घेऊन पुस्तके छापत असतात.
यावर एक उपाय म्हणून चेतक बुक्सने अलीकडेच आपली सर्व पुस्तके छापील, ऑडिओ आणि व्हिडीओ स्वरुपात आणण्यास सुरुवात केली आहे.
मराठी ई-बुक्स, ऑडिओ बुक्स किंवा व्हिडीओ बुक्स ही काही नवी बाब नाही.
मात्र मराठी प्रकाशन उद्योगक्षेत्रात एखाद्या प्रकाशन संस्थेनेच आपली सर्व पुस्तके आता स्वतःच ई-बुक्स स्वरुपात आणण्याची आणि स्वतः वितरीत करण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असावी.
माझी स्वतःची चेतक बुक्सने प्रकाशित केलेली सर्व पुस्तके आता ई-बुक स्वरुपात उपलब्ध आहेत.
ही पुस्तके म्हणजे `गोवा आणि महाराष्ट्रातील पत्रकारितेतल्या कथा', `गोवा आणि महाराष्ट्रातील पत्रकारिता', `गावकुसाबाहेरचा ख्रिस्ती समाज', गोवा ऍज आय सॉ इट', `संस्कृतीची विविध रुपे' आणि `क्रुसाभोवतालचा मराठी समाज''.
अर्थात ही ई-बुक्स वाचण्यासाठी चेतक बुक्सचे ऍप इन्स्टॉल करावे लागेल, एक वर्षासाठी उपलब्ध असलेली सर्व ई-पुस्तके वाचण्यासाठी १८० रुपये भरुन वर्गणीदार व्हावे लागेल किंवा एखादे पसंतीचे ई-बुक खरेदी करावे लागेल.
याचा अर्थ मेट्रोमध्ये किंवा इतरत्र लोक मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये गुंतलेले असतील तर ते केवळ टाईमपास करत असतील असे नाही.
कदाचित यापैकी काही जण आपल्या व्यवसायाचे, नोकरीचे ऑनलाईन काम करत असतील किंवा इतर काही जण बातम्या, वृत्तपत्रे आणि पुस्तकेही वाचत असतील.
जाईल तेथे बरोबर पुस्तके नेण्याची सवय मोडून ई-बुक वाचण्याची नवी सवय मी आता लावून घेणार आहे.
Camil Parkhe

Comments

Popular posts from this blog

Shakuntala Paranjape : Crusade of a lifetime

Dnyanodaya monthly enters 175th year

Fr. Rudolf Schoch. A Jesuit Looks back in satisfaction