Sorpotel 

गोव्यात पणजीला हायर सेकंडरी आणि पदवीचे शिक्षण घेताना आमच्या हॉस्टेलात ही प्रथा होती.
दरदिवशी आमच्या हॉस्टेलात किचनमध्ये भरपूर ओला आणि सुका कचरा निर्माण होई तो सिंकच्या खाली असलेल्या एका मोठ्या डब्यात जमा होई.
दररोज रात्री नवाच्या आसपास आमची जेवणे उरकल्यावर शेजारच्या एका घरातली लोक हा गच्च भरलेला डबा नेत आणि त्याजागी दुसऱ्या दिवसासाठी मोकळा डबा ठेवत.
या डब्यात रोज गोळा होणाऱ्या पालेभाज्या, फळभाज्या, फळांच्या आणि इतर साली, उरलेला भात, पाव वगैरे अन्नधान्य तो शेजारी आपल्या पिगरीत असलेल्या डुकरांना खाऊ घालत असे.
पिगरी म्हणजे डुकरे पोसतात ती जागा. त्याकाळी गोव्यात सगळीकडे डुकरे दिसायची. गोवा आणि डुकरे एक अविभाज्य संबंध होता. मारिओ मिरांडा यांचे गोव्यासंबंधीचे कुठलेही व्यंगचित्र शेपूट वळवळणारे डुक्कर दाखविल्याशिवाय पूर्ण होत नाही, त्याचे हे कारण.
घरांघरांतून असे भरपूर उरलेले अन्नधान्य वगैरे खाद्यपदार्थ डुकरांसाठी रोज मिळत असे.
यात अर्थात कुठल्याही प्रकारची आर्थिक देवाणघेवाण नसायची.
अपवाद एकच.
वर्षांतून दोनदा म्हणजे डिसेंबरात ख्रिसमसला आणि मार्च-एप्रिलमध्ये ईस्टर फेस्ताला आम्हाला त्या घरांतून सोरपोतेल आणि पोर्क विंदालू मिळायचे.
हे खाद्यपदार्थ जितके जास्त मुरेल तितके जास्त चवीचे असते, त्यामुळे चारपाच दिवस आमची मस्त मेजवानी असायची.
हे दोनतीन सण वगळता पोर्कचे खाद्यपदार्थ आम्ही वर्षभर फारसे खात नसू. युरोपात असताना मात्र पोर्कचे खाद्यपदार्थ आमचे मुख्य जेवण असायचे.
नंतर मिरामार समुद्रकिनारी असलेल्या ताळगावला मी राहायला लागलो. ताळगाव आणि करंझले त्या काळात भातशेतीसाठी आणि पणजीला आणि आसपासच्या परिसराला भाजीपाला पुरवणाऱ्या शेतकऱ्यांचे गाव होते.
हे मी सांगतो आहे तो काळ अर्थातच सत्तर आणि ऐंशींच्या दशकातला आहे.
ताळगावला माझ्या स्वतःच्या त्या कौलारीं बंगलीवजा घरापाशी कितीतरी नारळाची झाडे होती. मला आसपास शेजार असा कुणी नव्हताच.
तेव्हा माझ्या घराशेजारी भर रस्त्यावर अनेकदा सोरपोतेल, विंदालू आणि सॉसेझेस बनवण्यासाठी मोठ्या भांड्यांत चुलीवर पोर्कला उकळी येऊन ते मसालायुक्त मिश्रण रटरटत असायचे.
पोर्कच्या सर्वच प्रकारच्या खाद्यपदार्थात भरपूर चरबी आणि तेल असते.
कालपरवा ईस्टर सणानिमित्त घरगुती बनवल्या जाणाऱ्या विविध खाद्यपदार्थांच्या जाहिरीतीवजा मॅसेजेस मोबाईलवर दिसले. ....
ईस्टर संडे मेन्यू
सोरपोतेल रु
चिकन काफ्रियाल
चिकन चॉप्स
प्रॉन्स करी
पोर्क विंदालू
गोव्यातल्या या खास खाद्यपदार्थांची आठवण येऊन तोंडाला पाणी सुटले.
आमच्या परिसरात ख्रिसमस, न्यू इयर आणि त्यापाठोपाठ ईस्टर सणानिमित्त मांसाहारी खाद्यपदार्थांच्या कॅटरींगसाठी प्रचंड मागणी असते.
अनेकदा आदल्या दिवशीच आपली ऑर्डर देऊन ठेवावी लागते.
ख्रिसमस, न्यू इयर आणि ईस्टर हे तिन्ही सण वास्तविक पूर्णतः कौटुंबिक स्वरूपाचे असतात.
या तिन्ही सणानिमित्त अनेक जण आदल्या रात्री चर्चमध्ये प्रार्थनेसाठी मध्यरात्रीच्या किंवा संद्याकाळी उशिरा जात असतात, त्यामुळे दुसऱ्या दिवशी स्वयंपाकघरात निम्मा दिवस राबत बसणे हल्ली अनेकांना पसंत नसते.
मला स्वतःला तर अशा सणांच्या दिवशी सकाळीच दुकानांत रागेंत राहा, नंतर घाम घाळत कांदे चिरा, ओले खोबरे किसत बसा अशा गोष्टींचा जाम वैताग येतो.
अशा तीनचार कॅटरिंग करणाऱ्या लोकांचे नंबर आमच्याकडे असतात.
नेहेमीचे हे कॅटरिंगवाले अर्थातच मुसलमान आहेत.
``त्याच्यांशिवाय असे चवीष्ट मांसाहारी पदार्थ कोण बनवणार ?'' असंच म्हटलं जातं.
पोर्क, मटण आणि चिकनचे शाकुती, विंदालू, स्टिक्स किंवा लॉलीपॉप घरगुती बनवणारे लोक अर्थातच प्रामुख्याने कॅथोलिक असतात, मुळचे गोंयकार असतात.
लेन्ट सिझन म्हणजे उपवासाचा काळ कालच गुड फ्रायडेच्या दिवशी संपला.
आज शनिवारी रात्री ईस्टर उपासना आणि उद्या दिवसभर सेलेब्रेशन.
ईस्टर सणाच्या तुम्हा सगळ्यांना आगाऊ शुभेच्छा ! !
Bon Appetit... !
Camil Parkhe,

Comments

Popular posts from this blog

Dnyanodaya monthly enters 175th year

Shakuntala Paranjape : Crusade of a lifetime

Fr. Rudolf Schoch. A Jesuit Looks back in satisfaction