`हा, तर आज तुमच्यापैकी किती  जणांनी उपवास केला आहे ?''  


प्रवचन करणाऱ्या धर्मगुरुंनी अचानक हा प्रश्न  केला अन देवळात एकदम शांतता पसरली. 

तशीही जगभरच्या आमच्या सर्वच देवळांत हजारोंचा समुदाय असला तरी तशी शांतता असतेच, 

ऐतिहासिक आणि वास्तुशास्त्राचे उत्तम नमुने असलेल्या आणि त्यामुळे आता केवळ पर्यटन  वास्तू ठरलेल्या युरोपातील अनेक देवळे अर्थात याला पूर्ण अपवाद. 

व्हॅटिकन सिटीमध्ये सेंट पिटर्स बॅसिलिकातील सर्वाधिक अतिपवित्र मानलेल्या सिस्टाईन चॅपलमध्ये पर्यटकांचा असाच गोंगाट मी अनुभवला आहे. 

मायकल अँजेलोच्या ती जगप्रसिद्ध छतावरील आणि भिंतीवरील चित्रे पाहताना न राहवून मीसुद्धा त्या कोलाहलात सामील झालो होतो. 

तर धर्मगुरुंनी तो प्रश्न विचारला तेव्हा काही काळ  शांतता पसरली आणि केवळ दोनचार हात वर झाले. 

ही खूपच आश्चर्याची गोष्ट होती. 

कारण हा प्रश्न विचारला गेला तो कालचा दिवस होता ऍश वेन्सडे, भस्म किंवा राखेचा बुधवार. 

चाळीस दिवसांच्या उपवासकाळाची या दिवसापासून सुरुवात होते आणि गुड फ्रायडेला त्याची समाप्ती होती.  या  चाळीस दिवसांत अर्थात वेगळ्या अर्थाने पवित्र असणाऱ्या रविवारचा समावेश होत नाही.    

लेन्ट सिझनच्या आधी म्हणजे भस्म बुधवारच्या आदल्या शनिवारी गोव्यात, युरोपात आणि लॅटिन अमेरिकेत कार्निव्हल साजरा होतो.  

लेन्ट सिझनमध्ये लग्न किंवा इतर आनंदी सोहोळे होत नसतात  

ऍश वेन्सडेला धर्मगुरु भाविकांच्या कपाळावर राखेने क्रुसाची खूण करत म्हणतात  
Dust you are, and to dust you shall return  

``माती असशी, मातीत मिळशी'  - मानवाच्या मर्त्यपणाची आठवण 
 
दिड हजाराची क्षमता असलेले आमचे देऊळ खचाखच गच्च भरले होते आणि  ऍश वेन्सडेला त्या प्रश्नाला प्रतिसाद म्हणून उपवास करणारे दोनचार हात वर झाले होते. 

अर्थात त्या लोकांत उपवास करणारे लोक अनेक होते, हात वर करून  ते जाहीर करण्याची त्यांना गरज वाटत नव्हती हे उघड होते. 

``Oh, You have not fasted, rather you have feasted!'' 

``अच्छा, तुम्ही उपवास पाळला नाही तर उत्तम मेजवानी करून आलात तर'' असे ते फादर काहीशा विनोदाने म्हणाले  आणि त्यांनी पुन्हा प्रवचनाच्या मुख्य विषयाचा धागा हाती घेतला.     '

मी मात्र फादरांच्या त्या विधानाकडे विनोदाने पाहिले नाही.   

माझ्या लहानपणापासून उपवासाच्या दिवसांच्या म्हणजे लेन्ट सिझनमध्ये किती  मोठा फरक झाला आहे ते या विधानाने स्पष्ट झाले. 

त्या काळात  बाई आणि दादा त्या चाळीस दिवसांतील बुधवारी आणि शुक्रवारी कडक उपवास पाळायचे, चहा आणि पाणी घेऊन दिवसातून केवळ एकदा जेवण करायचे. 

या काळात खूप जण मांसाहार, सिगारेट, किंवा इतर काही बाबी वर्ज्य करत. उपवासाचे खादयपदार्थ अर्थात कधीही नसायचे.    

लेन्ट सिझनबद्दल एक पूर्ण लेख मी येथे लिहिलेला आहे.  

तर काळ नेहेमी बदलत असतो. काळानुसार नियम बदलत जातात.  

उपवास केवळ सज्ञान व्यक्तीसाठी असतो. त्यामुळे श्रीरामपूरला शाळेत असताना मी कधीही उपवास केला नाही. दहावीनंतर फादर होण्यासाठी मी गोव्यात गेलो तेव्हा तिथे कुणीही धर्मगुरु अगदी लेन्ट सिझनमध्येसुद्धा उपवास करत नाही हे पाहून धक्काच बसला. 

त्यामुळे तेव्हापासून आजतागायत मी कधीही उपवास केलेला नाही.  एक जेवण टाळणेसुद्धा मला शक्य होत नाही. 

काल  ऍश वेन्सडेला सकाळी तर  १४ फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे चे निमित्त साधून आम्ही डेक्कनला होतो !  त्यामुळे वाडेश्वरला भेट दिली होती.  

काळ नेहेमी बदलत असतो. काळानुसार नियम बदलत जातात.  

लोकांच्या कलानुसार आता चाळीस दिवसांच्या लेन्ट सिझनमध्ये केवळ  ऍश वेन्सडे आणि गुड फ्रायडे हे Obligatory fasting days  आहेत.

म्हणजे फक्त  या दिवशी उपवास करणे भाविकांचे कर्तव्य आहे. 

आणि हा उपवास कसा करायचा ते ऐच्छिक आहे, आपण स्वतः  ठरवू शकता, 

ब्रेकफास्ट किंवा कुठलेही एक जेवण टाळून किंवा अशाच प्रकारे काही तरी वर्ज्य करुन ! 

काळानुसार अशी लवचिकता चर्चने स्विकारली आहे. 

Comments

Popular posts from this blog

Dnyanodaya monthly enters 175th year

Shakuntala Paranjape : Crusade of a lifetime

Fr. Rudolf Schoch. A Jesuit Looks back in satisfaction